Wednesday, 26 July 2017

Tikona Fort (Vitanggad), तिकोना गड



 तिकोना गड (वितंगगड)
तिकोना गड,  चोरदरवाचा वाटेने सोंडेवरून काढलेला फोटो . ह्याच सोंडेवरून डावीकडे वाट वरती वळते



प्रवास कसा करावा त्याची थोडक्यात माहिती 
➤ मुंबई ते लोणावळा- इंद्रायणी एक्सप्रेस- सकाळी ५.४० ची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून
                                                         - ७. ५८ वाजता लोणावळा पोहचते . 
➤  कामशेत साठी लोणावळा ते पुणे (शटल) लोकल ट्रेन. ८. २० ची 
➤  कामशेत ते तिकोनापेठ अंतर २० किमी आहे. साधारण पाऊणतास ते १ तास लागतो. 
      (कामशेत ते पवनानगर १४/१५ किमी, पवनानगर ते तिकोनापेठ अंदाजे  ६ किमी )

➤  कामशेत वरून तिकोनापेठसाठी शिवाजी चौकातून  ९.२०/९.३० ची एसटी . 
➤  ती एसटी चुकली तर जुन्या महामार्गावरून पवनानगर साठी शेअर जीप किंवा सुमो पकडने
      प्रत्येकी २० रुपये घेतात. पवनानगर वरून तिकोनापेठ साठी शेअर छोटा टेम्पो  प्रत्येकी १०रु घेतो.
      गाडी पूर्ण भरेपर्यंत वाट पहावी  लागते.

 
दोन कारणामुळे तिकोना गड माझ्या चांगलाच लक्षात राहील, एक प्रणवला ताप असूनसुद्धा ट्रेकला आला आणि दुसरा गड उतरताना शेवटी कुत्र्याचा भूंकण्याचा प्रसंग. चुकून अजून एक प्रसंग आला असता तर तिकोना गडाचा शिखराचा तीन कोनाचा आकाराप्रमाणे, तिकोनाचे तीन कारण म्हणून जास्तच लक्षात राहिले असता. पण तिसरा कारण नाही झाला ते पण बरच झालं.

उत्तरेतून ट्रेक वरून आल्यावर सह्याद्रीत ट्रेक करण्यात मला वेगळाच आनंद येतो. त्यामुळे पुन्हा मी सह्याद्रीत कधी ट्रेक करतो असा झाला होता. मग ठरला मी प्रणवला विचारला आणि तो हि तयार झाला. आम्ही कुठे जायायच ठरवत होतो. प्रणव ने नाखिंड सुचविला, पण मी नाखिंड ला जाऊन आलो होतो आणि नाखिंडची वाट पावसाळ्यात मला जरा अवघड वाटत होती. म्हणून मी नाखिंड नको बोललो. मग प्रणव ने तिकोना सुचविला. माझा तिकोना नव्हता झाला त्यामुळे मी लगेच तयार झालो. प्रणवने बराच वर्ष्यापुर्वी  तिकोना गड केला होता त्यामुळे त्याला कसा जायायच माहिती होता.

तिकोनाला  जाण्यासाठीचा प्रवास
आम्ही सकाळी ५. ४० ची इंद्रायणी एक्सप्रेस ने जायायच ठरवलं.  इंद्रायणी ने लोणावळा उतरून, लोणावळ्यावरून कामशेतला जाण्यासाठी लोणावळा-पुणे लोकल पकडली.  आम्हाला कामशेत वरून तिकोना गडाच्या पायथ्याचा गाव तिकोनापेठला जायायच होता. कामशेत ते तिकोनापेठ अंतर २१ किमी आहे.
 सकाळी  ९. ३० वाजता तिकोनापेठला जायायला कामशेतचा शिवाजी चौकातून एसटी होती.  आम्ही कामशेतला ९. १० ला पोहचलो त्यामुळे आम्ही जवळच उपहारगृहात नाश्ता करण्यासाठी गेलो. पण नाश्ता करण्याचा नादात आमचा समोरून एसटी निघून गेली.  मग काय,  तिथून जुन्या महामार्गावर आलो. तिकडून समोर पवनानगरला जायायला रस्ता आहे. तिथे जीप किंवा सुमो लागल्या असतात. ती पकडून आम्ही पवनानगरला गेलो. पण त्या सुमोतून प्रवास करणे म्हणजे महान कामच आहे. एका सुमो मध्ये १६ जण भरले होते. पाठी ६ , मध्ये ५ बायका, पुढे चालक पकडून ५. पवनानगर पोहचेपर्यंत अर्धा तास अक्षरशः जीव मुठीत  धरून प्रवास करावा लागतो. कामशेत ते पवनानगर अंतर १४ किमी आहे.

पवनानगर पोहचेपर्यंत १० वाजले होते. पवनानगरला उतरल्यावर तीथून पुढे २ मिनटावर तिकोनापेठचा रस्त्यावर तिकोनापेठला जाण्यासाठी लहान टेम्पो उभे असतात. त्यात पाठी माणसांची वाहतूक करण्यासाठी आडवी लोखंडी आसन लावले असते. ती खाली दुमडली कि त्यात माल नेऊ शकतो, अशाप्रकारे दोन्ही कामासाठी त्या ट्रकचा उपयोग करतात.

अशाच एका ट्रकमध्ये आम्ही बसलो. आम्हीच पहिले होतो त्यामुळे बाकी गाडी भरेपर्यंत २० मिनटं लागली. गाडीभरल्या नंतर नेमकी गाडीवाल्याला मालाची ऑर्डर भेटली, मग काय, साहेबाने सगळ्यांना उतरवलं आणि गेला मालवाहतूक साठी. ५ मिनीटांनी दुसरा गाडी वाला आला, सगळे त्यात बसले. तरी पण अजून २ / ४ माणसासाठी गाडीवाला थांबला होता. अशा प्रकारे आम्हाला निघायला ११ वाजले. पवनानगर ते तिकोना पेठ अंतर साधारण ७ किमी आहे. आम्ही १० मिनटात तिकोनापेठला पोहचलो.
तिकोनापेठ गावातून एक रस्ता तिकोना दुर्गाचा दिशेने जातो. तिकोना दुर्गावर जायायला दोन वाटा आहेत.  एक वाट महादरवाजा जवळ घेऊन जाते. तर दुसरी वाट दुसऱ्या भुयारी दरवाजाने घेऊन जाते.

पहिली वाट जेव्हा आपण गावातून पुढे जातो, तेव्हा गडाची एक सोंड खाली रस्त्याला येते,  त्या सोंडेवरून वाट गडावर जाते. पण आता सोंडेचा सुरवातीलाच  बंगला बांधून  त्याचा भोवती  तारेचा कंपाउंड घातला आहे. त्यामुळे वाट भेटत नाही. त्यासाठी तुम्हाला रस्त्याचा बाजूने सोंडेवर जाण्यासाठी वाट शोधायला लागेल.  सोंडेवर थोडा चढताच आपण सोंडेचा छोट्या माथ्यावर पोहचतो, येथून वाट वर गडाच्या दिशेने जाते, माथ्यावर आल्यावर गडाचा आकार त्रिकोणी असल्यामुळे आपल्याला गडाचा दोन बाजू लागतात. एक उजवी आणि डावी. आपल्याला डाव्या वाटेने जायायला लागते. एकदोन वेळा वाट वर खाली होते, वाटेने वर गेलो असता आपल्याला गडाचा महादरवाजा जवळ पोहचताच कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. महादरवाजा थोडा ढासळलेला आहे. त्यामुळे "ह्यावाटेने कोणी जाऊ नये" असा महादरवाजाच्या आतील बाजूस फलक लावला आहे. महादरवाजाच्या वाटेने आपण पाऊण तासात  महादरवाजा जवळ पोहचतो. पण माझ्या मते ह्या वाटेने जास्त करून अनुभवी ट्रेकर्सने जावे.
बरेच वर्षांपूर्वी प्रणव ह्या वाटेने गडावर गेला होता, त्याप्रमाणे प्रणव त्या वाटेने चालत होता. पण सुरवातीलाच त्या बंगल्यामुळे आम्हाला वाट भेटली नाही. म्हणून आम्ही मग पुन्हा रस्त्याला येऊन, गावातून गडाचा दिशेने जो रस्ता  जातो त्या रस्त्याने पुढे चालत गेलो. ५ मिनटं झाले, रस्त्यात कोण दिसत नव्हते आणि गडावर जायायची  वाट सापडत नव्हती. थोडा वेळात एक शेतकरी काका भेटले, त्याने सांगितलं असाच पुढे जा,  फलक लावला आहे. आम्ही पुढे चालत राहिलो थोड्या वेळाने गडावर जाण्यासाठीचा फलक दिसला. आम्ही जेथे तिकोनापेठ थांब्याला उतरलो ते ह्या फलका पर्यंत साधारण २ किमी अंतर असेल.
गड आणि गडावर जाणारी वाट 
वाट मुरलेली आहे त्यामुळे चुकण्याचा काही प्रश्न येत नाही. हि वाट आपल्याला गडाचा दुसऱ्या सोंडेवर ( म्हणजेच गावात एक जी सोंड येते त्याचा विरुध्द दिशेला किंवा पाठच्या बाजूची सोंडवर) घेऊन जाते. १० ते १५ मिनटात आपण सोंडेवर येतो तिकडून वाट उजवीकडे वर गडाचा दिशेने जाते. सोंडेवर आल्यावर थोडावर गेल्यावर एक दगडाचा बांध लागतो, त्याचा बाजूला एका फलकावर "गडाचा संरक्षणा साठी मावळे /रक्षक पहिली येथे वाट अडवत असे" लिहिलेले आहे. आपल्याला येथून पहिला बुरुज जवळून दिसतो. येथून उजवीकडून पुढे गेलो असता आपल्याला एक गुहेचा दरवाजा लागतो ह्याला भुयारी दरवाजा बोलतात, दरवाजाचा आत समोर १ छोटी  गुहा आहे. गुहेजवळून वाट उजवीकडे वळते. ह्या गुहेत साधारण २ते ३ माणसं बसू शकतात एवढीच आहे.गुहा बघितली असता, त्यावेळी दरवाजाजवळ पहारेकरी बसण्यासाठी साठी वगैरे वापरत असतील असे वाटते. गुहेचा आत भिंतीतल्या कप्प्यासारखा छोटासा आयताकृती कप्पा आहे.

तिथून थोडा पुढे गेल्यावर वाट वर डावीकडे बुरुजाचा दरवाजाकडे जाते. दरवाजाकडे जातेवेळी आपल्याला  तुटलेल्या पायऱ्या लागतात. पायऱ्या चढून वर गेल्यावर आपण वेताळ दरवाजाजवळ पोहचतो. वेताळ दरवाजाने वर आल्यावर डावीकडे आपण बुरुजावर पोहचतो, दरवाजाचा जवळ म्हणजेच दरवाजाला लागूनच बाजूला काही तुटलेल्या चौक्यांचे अवशेष दिसतात.  बुरुजाचा बाजूला गेलो असता पुढे शेंदूर लावलेला एक पाषाण उघड्यावर दिसतो, ह्यालाच वेताळेश्वराचं मंदिर बोलतात .

बुरुजावरून पाठी फिरून, आम्ही उजवीकडे गडाचा दिशेने वर गेलो. थोड्यावर गेल्यावर आपण १०ते १२  फुटाचा हनुमंताचा मूर्ती जवळ पोहचतो. ह्या मंदिराला चपेटदान मारुती म्हणतात. सध्या मूर्तीचा बाजूला थोडा  संवर्धन केलेले दिसत होते, त्यामुळे ज्या पाषाणाला मूर्ती कोरलेली आहे त्याचा बाजूने दगडात सिमेंट वापरून भिंत केलेली आहे आणि त्याचा वर मूर्तीसाठी तातपुरतासाठी एका पत्र्याचा छप्पर केला आहे. मारुतीचे दर्शन घेऊन आम्ही पुढे गेलो.

पुढे आल्यावर उजव्या हाथाला काही जोत्याचे अवशेष लागतात त्याचा खाली हि अजून काही अवशेष आहे . त्या जागेला रामाची गादी म्हणतात. "रामाची गादी"  का म्हणतात तसा एक फलक लावला आहे. त्याचा फोटो मी खाली ठेवला आहे. डावीकडे आपल्याला तळजाई देवीचा गुहेतील मंदिर लागते.
तळजाई मंदिराचा गुहेचासमोर मोठी पाण्याची टाकी आहे. त्या टाकीत उतरण्यासाठी ३ते ४ पायऱ्या आहेत. गुहेत जाण्यासाठी तलावाचा उजव्याबाजूने वाट आहे. गुहेत आत मंदिर आहे. मंदिराचा बाजूलाच एक छोट्या खोली एवढी गुहा आहे त्याला सळ्यांचा दरवाजा लावला आहे. प्रणवने सांगितले त्या गुहेत काही वर्षापूर्वी एक साधू रहात असे. गुहेतच मंदिराचा थोडा बाजूला अजून दोन छोट्या गुहा आहेत. आम्ही मंदिराजवळ थोडा वेळ विश्रांती घेऊन पुन्हा पुढे गेलो. 
तळजाई मंदिराजवळून एकवाट वर बालेकिल्ल्यावर जाते आणि एक उजवीकडे खाली महादरवाजा आणि चोरदरवाजा जवळ जाते. बालेकिल्ल्यावर जायायला पायऱ्या लागतात. पहिल्या पायऱ्या चालून गेल्यावर चुन्याचा घाना लागतो.  तिकडून दुसऱ्या पायऱ्या लागतात.  पहिल्या दोन टप्प्यातील पायऱ्या चडून गेल्यावर किल्ल्याचा   पहिल्या दरवाजा जवळ पोहचतो. ह्या टप्प्यातील बहुतांश पायऱ्या तुटलेल्या होत्या,.

दरवाजाचा जवळील टप्यातील पायऱ्यापासून वर गडाचा मुख्य दरवाजापर्यंत दुर्गप्रेमीने पायऱ्या चढताना काळजीपोटी वायर लावली आहे. त्यामुळे त्यांचे आभार मानू तेवढे कमीच आहे
पहिल्या दरवाजाचा आत उजवीकडे पाण्याची खांब टाकी आहे, आणि टाकीतच वरती छोटी गुहा आहे. गुहेत जायला आम्हाला वाट दिसली नाही तरी पण गुहा उंचीला २ते ३ फूट होती  पण आत मध्ये बरीच रुंद वाटत होती.  दरवाजातून वर सरळ पायऱ्या मुख्य दरवाजा जवळ घेऊन जातात, त्याचाच मध्येच २ बुरुज लागतात.  एक मोठा उजवीकडे लागतो आणि डावीकडे वर छोटा बुरुज लागतो.  छोट्या बुरुजावर जाणाऱ्या पायऱ्या जराजपून चढायला लागतात कारण पायघसरला तर एकदम खाली दरवाजा जवळील गुहेजवळ पडू शकतात.
साधारण ४० ते ५० पायऱ्या चडून आपण मुख्य दरवाजा जवळ पोहचतो. दरवाजा गोमुखी आहे. दरवाजाचा समोर एक बुरुज लागतो. ह्या बुरुजावरून दरवाजाचा पूर्ण फोटो काढता येतो. गडाचा दरवाजा चांगल्या स्थितीत दिसतो.  दरवाजातुन आता गेल्यावर समोर छोटी रुंद जागा लागते. त्याचा बाजूला गडाची तटबंदी दिसते.
मुख्य दरवाजाचा आतील बाजूला,  एक वाट डावीकडे लागूनच असलेल्या पाण्याची टाकी आणि लेण्या/ गुहेजवळ जाते.
पहिली  एक गुहा लागते आहे त्याचा बाजूला लागून ३ते ४ टाक्याला लागतात. आम्ही गेलो तेव्हा शेवटच्या दोन टाक्यामध्ये गुडग्यापर्यंत्न पाणी होते. बाकीच्या  टाक्या सुखलेल्या होत्या. आम्ही टाकी बघून पुन्हा दरवाजा जवळ आलो. दरवाजाचा समोर छोटासा १५ते २० मीटर रुंदीचा मोकळी जागा आहे. तिथून पुढे गेल्यावर उजवीकडे वर बालेकिल्ल्यावर जाण्याकरिता पायऱ्या लागतात.  ह्या पायऱ्या चडून  गेल्यावर छोटा दरवाजा लागतो. दरवाजाची  दगडाची अर्धी चौकट अस्तित्वात आहे.  दरवाजाने आल्यावर आपल्याला समोर वितेडेश्वर शंकराचं मंदिर लागते. आणि मंदिराचा खालीच कातळात खांब टाकी आहे.  मंदिराचा समोर एक नंदी आहे आणि काही जुन्या नंदीच्या मुर्त्या आणि शंकराची  पिंड टाकीचा मुखावर  ठेवलेल्या भेटतात.
मंदिराच्या डाव्याबाजूने गेलो असतात  पहिला आपल्याला एक जोत्याचे अवशेष दिसतात, आणि थोडा त्याचा पुढे भली  मोठी टाकी लागते. टाकीचा घेर साधारण २०ते २५ फूट आडवी लांब आणि १५ फूट रुंद आहे. टाकीत उतरण्यासाठी पायऱ्या आहे आणि टाकीला बाजूने दगडाच बांधकाम केलेले आहे.
 टाकीचा थोडपुढे डावीकडे जवळच बाजूला एक बुरुज लागतो आणि उजवीकडे एक आपल्याला बुरुज दिसतो . आणि दोन बुरजाचा मध्ये आणि टाकीच्या वरती किल्ल्याचा शिखरावर बालेकिल्ल्याचे वाड्याचा जोत्याचे अवशेष आह. 

बुरुजाची बाजूची तटबंदी ढासळलेली आहे.
डाव्या बुरुजावरून पाठी फिरून आम्ही वरती गडाचा उंच जागी गेलो. वर वाड्याचा जोत्या मध्ये भगवा पताका लावलेला आहे.   हिथून आपल्याला गडाचा आजूबाजूचा संपूर्ण परीसर आणि दुसरे गड दिसतात . पण पावसाळी  वातावरणामुळे बहुतेक सगळेच डोंगर धुक्याखाली झाकले गेलो होते. आम्हाला तर तुंग सुद्धा दिसत नव्हता,  मग विसापूर, लोहगडची बात तर आम्ही सोडूनच दिली. फक्त पवनाधरण आणि आजूबाजूचे गाव दिसत होती.  थोडा वेळ धुके बाजूला सरायची  वाट पाहिली  पण धुके काही सरेना. शेवटी मग आम्ही परतीचा  वाटेला लागलो.
उजव्या बुरुजाचा बाजूकडील ज्या पायऱ्याने आम्ही आलो होतो त्याच पायऱ्याने खाली उतरून, पुन्हा मंदिराच्या दिशेने आम्ही मंदिराचा डाव्या बाजूला पोहचलो.  अशा प्रकारे आपली मंदिराला एक प्रदिक्षणाचं होते. 
आम्ही बालेकिल्ला बघून पुन्हा खाली तळजाई मंदिराजवळ आलो. तिकडून आम्ही खाली महादरवाजा जवळ गेलो.  महादरवाजा जवळ आत मध्ये काही उध्वस्त घराचे/ चौकीचे तुटलेले अवशेष दिसतात. तिथेच महादरवाजाचा बाजूला छोटासा चोर दरवाजा आहे. अजून पर्यंत मी मुख्यदरवाजा जवळ कधी चोर दरवाजा बघितला नवता. त्यामुळे दरवाजा पाहून मला जरा आश्चर्यच वाटलं.

महादरवाजाची  हि दगडाची अर्धी चौकट बाकी आहे. महादरवाजा कडून एक वाट खाली गावात जाते, मी तुम्हाला वरती नमूद केली आहे. त्यामुळे मी हिथे आता त्याचा जास्त काही सांगत नाही.
 पावसामुळे गवत उगवल्यामुळे वाट दिसत नव्हती.  प्रणव बोलला आपण हयावाटेने खाली उतरू, मी विचार करत होतो, वाट दिसत नाही उतरणार कसा. पण प्रणव ह्या वाटेने गडावर आला होता, त्यामुळे त्याला माहित होता. प्रणव ने थोडा खाली जाऊन वाट शोधली, मी तरी माझाच विचारात होतो. प्रणवला वाटलं मी वाट बघून घाबरलो?.  म्हणून प्रणव, मला बोलू लागला तू ह्या वाटेला घाबरला? ह्याच्या पेक्षा कठीण वाट आपण उतरलो आहे. मी बोललो घाबरलो नाही पण नक्की वाट भेटेल ना. पण खरा मी वेगळाच विचारात होतो. प्रणव ने वाट शोधली आणि आम्ही बरोबर वाटेने सोंडेवर आलो. 

तिकडून वाट खाली जिथे गावात उतरते तिकडे कोणी तरी बंगला बांधला आहे त्याचा बाजूला तारेचा कंपाउंड केला आहे . त्या बंगल्यात ३ ते ४ गावचे कुत्रे बसलेली मी बघितली. आम्ही जसा तारेचं कंपाऊंड चा बाजूने जात होतो. तितक्यात कुत्रे भूकू लागले.  मी कुत्र्याचा भीतीमुळे, प्रणवला आपण पुन्हा पाठी फिरुया म्हणून बोलू लागलो.  आणि प्रणव बोलत होता भेटेल पुढे वाट. पण मला तर वाट दिसत नव्हती. तितक्यात कुत्र्यांचा भूंकण्याचा आवाज जास्त होऊ लागला. मी कुत्र्याचा आवाज ऐकून भीती पोटी प्रणवला बोललो आपण हिथूनच हि झुडपे तोडून पुन्हा वर जाऊया. कारण ती कुत्री पाठून तारेचा खालून आपल्या पाठी येतील,  ह्याची भीती मला वाटत होती. आणि तसा झाला असता तर,  त्यांना मारायला किंवा घाबरवायला आम्हाला जवळपास साधा दगड पण दिसत नव्हता. पण प्रणव बोलला जाऊ आपण पुढे.  पण तिथे आम्हाला खरंच वाट भेट नव्हती. तरी पण प्रणव ने त्या काटेरी झुडपातून वाकुन खाली उतरत वाटत काढली, थोडा पुढे गेलो आणि आम्हाला बंगल्याचा कंपाउंड बाहेर,  त्या बंगल्यावाल्याचा कचरा टाकला होता तिकडून एक वाट कचऱ्यातून खाली जात आहे दिसली, त्याने आम्ही उतरलो. त्या कचऱ्याजवळ दारूची मोठी जाड बाटली भेटली.  मी पहिली ती बाटली उचलली, जर कुत्रा अंगावर आलाच तर त्यांच्यापासून  संरक्षणासाठी म्हणून घेतली.  त्या बाटली मुळे मला जरा धीर आला. आम्हाला रस्ता दिसला आणि मी सुटकेचा श्वास सोडला. आम्ही रस्त्याला पोहचलो. कुत्री अजून भुकतच होती पण आता मला त्यांची भीती वाटत नव्हती कारण मी आता रस्त्याला होतो आणि त्यांचा हद्दीत नव्हतो. पण मी थोडा शांतपणे विचार केला असता लक्षात आलं माझ्या घाबरण्यामुळे मी जरा आवाज करू लागलो त्यामुळे ती कुत्री अजूनच जास्त भुकु लागली.  प्रणव कुत्र्यांना घाबरला होता कि नाही, ते मला कळलं नाही पण महत्वाच म्हणजे ह्या सगळ्यात तो शांतपणे वाट काढत होता.

आम्हाला गावात येईपर्यंत ४  वाजले होते. तिकोना पेठ वरून आम्हाला लगेच छोटा ट्रक भेटला . पुढे पवनानगरला आम्हाला  कामशेत साठीची एसटी भेटली. आम्ही लोणावळल्या पोहचे पर्यंत ५. ४५ वाजले होते. आम्हाला वाटलं आता आपल्याला ७. १५ शिवाय मुबईला जायायला दुसरी एक्सप्रेस गाडी नाही आता.  पण ५. १५ ची लातूर एक्सप्रेस उशीरा धावत असल्यामुळे आम्हाला ती गाडी भेटली. त्यामुळे आम्ही वेळेत पोहचलो.

भुयारी दरवाजाचा आतील गुहा

वेताळ दरवाजाला जवळ जाणाऱ्या पायऱ्या

वेताळ दरवाजा

पहिल्या बुरुजावरून दिसणारे दृश्य





गडाचा मुख्य दरवाजा

मुख्य दरवाजाचा समोरील बुरुजावरून दिसणारे खालील पहिला दरवाजा आणि त्याचा वरील दोन बुरुज

मुख्य दरवाजाचा आतील फोटो  आणि डावीकडून वाट गुहा आणि टाकी जवळ

टाकी जवळून दिसणारा मुख्य दरवाजाचा बुरुज

बालेकिल्यावर जाणाऱ्या पायऱ्या

गडावरून दिसणारे दृश्य

बालेकिल्ल्यावरील मंदिर, मंदिराच्या खाली खांब टाकी आहे

बालेकिल्यावरील पाण्याची मोठी टाकी

मोठी टॉकीजवळून दिसणारा गडाचा उंच शिखराचा भाग. ह्य शिखरावर जोत्याचे अवशेष

एक वाट वर बालेकिल्ल्यावर जाते आणि एक महादरवाजा/चोर दरवाजाजवळ जाते

महादरवाजाचा आता लागून असलेली चौक्या किंवा घराचे अवशेष

महादरवाजाचा आतील फोटो

गडावरून दिसणारे दृश्य

महादरवाजा चा बाहेरील फोटो आणि खालील फोटो महादरवाजाची दिसणारी पूर्ण तटबंदी आणि बुरुज


महादरवाजाने खाली उतरताना लागणाऱ्या पायऱ्या