माहुली गडाचा वाटेत चडतेवेळी टिपलेले दृश्य |
also click on aboved link to check my youtube video of Mahuli fort
दोन महिन्याच्या मोठ्या कालावधीनंतर, २०१८
चा शिवजयंतीच्या आदल्या रविवारी ट्रेकसाठी वेळ भेटला. त्यासाठी मी
व्हाट्सअप ग्रुपमध्ये आधीपासूनच ट्रेकसाठी दोन पर्याय दिले. पण बहुतेक
जणांनी प्रतिसाद न दिल्यामुळे, रविवारचा बेत रद्द झाला होता. अचानक शनिवारी
संध्याकाळी प्रणवने दूरध्वनी करून विचारले, उद्या माहुलीला जाऊया का?. मला
सुद्धा ट्रेक करायचच होता त्यामुळे मी होकार दिला. विनय पण तयार होता. मग
रविवारी माहुली मोहीम ठरली.
माहुली
गडाला इतिहास हा मोठा आहे, मी तो सगळा इतिहास सांगत नाही आणि मला तेवढा
माहित सुद्धा नाही. कारण माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा इतिहासाचा भाग म्हणजे
छत्रपती शिवाजी महाराज वयाने लहान असते वेळी १/२ वर्षे त्यांच्या मातापिता
म्हणजेच, शहाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ सोबत वास्तव्य केले होते.
त्यासाठी मला या गडाचे खूप महत्व वाटते.
ठरल्याप्रमाणे
मी सकाळी ५.२४ ची आसनगाव ट्रेन करीरोड स्थानकावरून पकडली. विनय आणि प्रणव
मला डोंबिवलीला भेटले. आम्ही ७. २० ला आसनगावला पोहचलो. स्थानकाबाहेरच
आम्ही न्याहरी केली.
माहुली गडाचा पायथ्याच्या गावात
जाण्यासाठी शहापूर एसटी स्थानकातून एसटी आहे. त्यासाठी तुम्हाला आसनगाव
स्थानकातून रिक्षा करून जायायला लागते. पण आम्ही आसनगाव स्थानकातूनच २५०
रुपये देऊन (एकावेळेचे) रिक्षा केली. २० मिनिटात आम्ही गडाच्या पायथ्याच्या
गावात पोहचलो. गावातील महादेवाच्या मंदिरात दर्शन घेऊन, आम्ही गड चढायला
सुरवात केली. तोपर्यंत ८.३० वाजले होते.
मुंबई ते माहुली कसा प्रवास करावा.
मुंबई ते आसनगाव ट्रेनने ८६. ७ किमी आहे. आसनगाव किंवा कसारा ट्रेन पकडावी
आसनगाव ते माहुली गड पायथ्याचे गाव ८ किमी.
२०१४ला
पावसाळ्यात ट्रेकच्या एका ग्रुपसोबत माहुलीला गेलो होतो. त्यावेळी फक्त
आम्ही महादरवाजापर्यंतच जाऊन आलो होतो. पण यावेळी आम्ही पळसगड सोडला तर
बहुतेक गडाचा भाग पिंजून काढला. तरीपण आमचे नकाशात दाखवलेल्या पैकी मोजकेच
काही अवशेष बघायचे राहिले.
पहिलेवेळीची
आणि आताच्या वेळीची गडाच्या वाटेत खूप फरक जाणवत होता. आताची वाट तुम्ही न
चुकता गडावर पोहचू शकता एवढी व्यवस्थित करून ठेवली आहे. पावसाळ्यात
गवतामुळे मध्येच वाट चुकलात तरच, नाही तर ती शक्यता पण बोलायाची असेल.
गडाच्या पायथ्याच्या गावापासून ते ओढ्यापर्यंत गाडी जाईल, एवढी मोठी वाट
केली आहे. आणि ओढ्यावर छोटा पूल बांधला आहे. ओढा ओलांडून गेल्यावर गड
चढायला सुरवात होते.
पायथ्याच्या
गावसमितीने गावात निसर्ग पर्यटनासाठी पायथ्याला असलेल्या वाटेत सुधारणा
केल्या आहेत. तसेच गडावर जाणाऱ्या वाटा काही ठिकाणी थोड्या मोठया केल्या
आहेत आणि काही ठिकाणी लोखंडाचे पाईपचे कुंपण केले आहे. त्यामुळे न चुकता
गडाच्या बुरुजाजवळ पोहचलो आणि म्हणूनच मला ही गडावर वाट कशी जाते सांगणे
जास्त महत्वाचे वाटले नाही.
गडाच्या
बुरुजाला लागून असलेल्या तटबंदीला लोखंडाची शिडी लावली आहे. ती शिडी चढूनच
गडाच्या माथ्यावर पोहचतो. ह्यावरून माझ्या अंदाजे जोपर्यंत गड वापरात असेल
तो पर्यंत गडावर जाण्यासाठी ही मुख्य वाट नसावी. कारण ह्या वाटेने
आपल्याला दरवाजा लागत नाही. पण शिवकाळी गडाला बहुतेक महादरवाजा, कल्याण
दरवाजा आणि हनुमान दरवाजा. हे तीनच दरवाजे मुख्य असावेत. आता तिन्ही
दरवाजाच्या गडाखाली जाणाऱ्या वाटा उध्वस्त झाल्या आहेत.
आम्हाला गडाच्या माथ्यावर पोहचायला १०.३० वाजले.
गडाच्या
माथ्यावर पोहचल्यावर आपल्याला डाव्याबाजूला बुरुज लागतो. बुरुजावर डोलात
फडकणारा भगवा आहे. जो आपल्याला गड चढतेवेळी दिसतो. बुरुजावरून खालील
माहुली गाव आणि आजूबाजूचे निसर्गाचे दर्शन होते. बुरुजावरून मागे फिरले
असता एक वाट महादरवाजाकडे जाते. गडावरील काही वाटा गडसंवर्धन संस्थेने
अथवा पर्यटन समितीने रुंद करून ठेवल्या आहेत. तसेच एका गडसंवर्धन संस्थेने
काही ठराविक जागी, मार्गदर्शनासाठी लहान माहिती फलक लावले आहेत. त्यामुळे
गडावरील अवशेष शोधायला सोपे जाते.
पहिली टाकी:
बुरुजावरून
महादरवाजाकडे जातेवेळी आपल्याला एक ८ फूट रुंद आणि १० ते १२ फूट लांब
आकाराची कातळातील टाकी लागते. ह्या टाकीतील पाणी पिण्यायोग्य नाही, ते
बघूनच कळते. टाकी जवळून वाटेने सरळ वर चालत गेले असता, एक ठिकाणी वाट
दुभागते. एक वाट सरळ महादरवाजा जवळ जाते आणि दुसरी डावीकडे भांडारगड, तलाव
आणि शिवमंदिर कडे घेऊन जाते.
महादरवाजा :
आम्ही
पहिले सरळ वाटेने जाऊन महादरवाजा करायचा ठरवले. सरळ वाटेने चालून आल्यावर
महादरवाजासाठी जाणारी मोठी वाट अरुंद होऊन समोर असलेल्या झाडीतून वाट खाली
दरवाजाजवळ जाते. त्यामुळे लगेच कळण्यात येत नाही. ह्या वाटेने ५ मिनिटात
खाली उतरून आपण महादरवाजा जवळ पोहचतो. दरवाजा खाली असल्यामुळे आपण
दरवाजाच्या डाव्या मोठ्या बुरुजावर पोहचतो. येथे आपल्याला १ छोटे पिण्याचे
पाणीचे कुंड दिसते. त्याच्या समोरच एका झाडाखाली शिवपिंड आहे आणि त्याच्या
समोर बुरुजाच्या टोकावर लहानशी महाराजांची मूर्ती ठेवली आहे. बुरुजाच्या
बाजूने म्हणजेच आपल्या उजव्या बाजूने वाट दरवाजा जवळ जाते ते लगेच कळून
येते कारण आपण वरून खाली उतरतेवेळी आपल्याला दरवाजा दिसतो. दरवाजाचा आत
दोन्ही बाजूना गुहेत खोली एवढ्या आकाराच्या दोन देवड्या, एक मोठी गुहा आणि २
लहान गुहा आहेत. गुहेत १५/२० माणसे आणि देवड्यात प्रत्येकी ३/ ४ लोक राहू
शकतात.
दरवाजाची वरची चौकट
तुटलेली आहे. दरवाजातुन बाहेर गेल्यावर, त्याकाळची वाट तुटल्यामुळे पुढे
गेल्यावर घळ लागते. बुरुजाच्या भिंतीमुळे दरवाजाचा बाहेर अर्धा
वर्तुळासारखी वाटआहे. गडाचा सुरक्षेसाठी दरवाजाची आणि बुरुजाची रचना अशी
करत असे. महादरवाजाच्या बाहेर दारात डाव्या बाजूला एक शरभ शिल्प ठेवलेले
आहे आणि त्याच्या समोरच बाजूच्या बुरुजाच्या भिंतीजवळ चिन्ह्याचा एक दगड
ठेवला आहे. बहुतेक हे दगड वरचा कोसळलेल्या चौकटीतले असावे. दरवाजा पाहून
आम्ही जेथून खाली उतरलो तिथे पुन्हा वर आलो.
पण आम्ही पुन्हा दोन वाटा जिथे दुभागतात तिथे न जाता आम्ही वर येऊन डावीकडे राजसदर बघून भंडारगडाच्या दिशेने गेलो.
राजसदर:
थोड्या
२ ते ४ मिनिटांच्या अंतरावर राजसदर लागते. सदरेची मुख्य आसनाच्यामागील
भिंत सोडली तर बाकीच्या ३ भिंती नाही, चौथरा ही दिसत नाही. त्याच सदरेचे
पडलेले दगड चौथऱ्याची चौकाट दर्शवण्यासाठी ठेवले आहेत. सदरेच्या भिंती
आणि आतील भग्न झालेली सदर जांभा दगडाची आहे. सदरेवर बाकी काही अवशेष नाही.
सदरेच्या मागे पुढे किल्वरच्या आकाराचे जांभा दगड दिसतात.
महत्वाचे
आम्ही
सदर बघून, सदरेच्या डाव्याबाजूने एक वाट जात होती. त्यावाटेने कल्याण
दरवाजा आणि भंडारगडकडे गेलो, पण माझ्या मते सदरेच्या वाटेने न जाता सदर
बघून पुन्हा मागे फिरून, जेथे आपल्याला महादरवाजा आणि भंडारगड कडे
जाण्यासाठी वाट दुभागते किंवा २ वाटा लागतात, तिथे फलक ही लावला आहे. तिथून
जावे. कारण ह्या वाटेने तुम्हाला ठराविक अंतरावर एक मागोमाग अवशेष बघायला
मिळतात आणि मी तुम्हाला त्यावाटेने गेलो असता कुठचे कुठचे अवशेष आणि कश्या
ओळीत लागतात, ते वर्णुन सांगितले आहे. आम्ही सदरेच्या डाव्याबाजूचा वाटेने
गेलो, आम्हाला ह्या वाटेला काही अवशेष सापडले नाहीत तसेच खूप चालायला ही
लागते, पण ह्या दोन्ही वाटा एका खिंडीत जाऊन पोहोचते. ही खिंड म्हणजे
माहुली आणि भंडारगड दरम्यानची खिंड आहे. खिंडीच्या थोडेवर शिडी लावली आहे,
या शिडीने आपण कल्याण दरवाजा जवळ जाऊ शकतो
दोन शिळा:
ह्या
वाटेने तुम्ही पहिल्या एका लहान मोकळ्या कातळावर असलेल्या २ शिळा लागतात.
तिकडून उजवीकडे किंचित खाली असलेल्या शिळेच्या दिशेने एक वाट झुडपातून
जाते.
हि वाट मोठ्या गवतातून जाते, थोडावेळ चालले
असता, आपल्या डावीकडे एक वाट जाताना दिसते. त्या वाटेला १०/१५ पावले गेलो
असता मोठ्या वाड्याचे अवशेष लागतात .
मोठा वाडा:
वाड्याचा
चौथरा ५ ते ५.३० फूट उंच आहे. त्याला चढून जाण्यासाठी ५ पायऱ्या आहेत.
पायऱ्यांच्या समोर मातीत खचलेले दगडी तुळशी वृदांवन सारखे अवशेष दिसतात.
चौथरा १५ फूट लांब आणि २० फूट रुंद असावा, चौथऱ्यावर बाकी काही अवशेष दिसत
नाही. चौथऱ्याच्या बाजूला गवत झुडपे असल्यामुळे चौथरा बाकीच्या तीन बाजूने
बघायला मिळत नाही.
छोटा वाडा :
चौथरा
बघून पुन्हा पाठी मुख्य वाटेला येऊन, सरळ पुढे गेलो असता, वाटेला लागून
उजव्या बाजूला झुडपात अजून एका लहान वाड्याचे अवशेष दिसतात. ह्या
वाड्याच्या चौथराची उंची नेहमीच्या वाड्यासारखी असून त्याची लांबी रुंदी १०
x १० फुटाची असेल .
शिव मंदिर:
वाडा बघत तसाच सरळ गेलो असता पुढे काही अंतरावर शिवमंदिर लागते.
मंदिराची
दरवाजाची भिंत सोडली तर बाकीच्या भिंती अजून उभ्या आहेत. भिंतीला आतून
सिमेंटने प्लास्टर केलेलं दिसते. बाहेरून मात्र दगड दिसतो. मंदिर १५x२० फूट
लांबीरुंदीला असेल. मंदिरात शिवाची पिंड, नंदी, वीरगळ आणि काही चिन्हाचे
दगड भग्न अवस्थेत, एका जागी ठेवलेले आहेत. मंदिराच्या दरवाजाच्या समोर वाट
गडावरील तलावाकडे जाते.
तलाव:
हा
तलाव फक्त पावसाळ्यात भरत असावा. कारण तलाव पूर्णपणे सुकला होता. त्यामुळे
आम्ही उजवीकडे वळून तलावाच्या कडेने पुढे गेलो. ही वाट पुढे हनुमान दरवाजा
आणि भंडारगडकडे जाते, पण पावसात तलाव भरला असेल त्यावेळी काठोकाठ जायला
लागत असेल किंवा तलावाला डावीकडून उजवीकडे फेरी मारून जावे लागत असेल.
हनुमान दरवाजा:
हनुमान
दरवाजा कडे जाण्यासाठी मधेच एके ठिकाणी वाट दुभागते. सरळ गेलात तर
नवरा-नवरी डोंगर आणि कल्याण दरवाजा कडे जाते आणि डावी कडे गेलात तर हनुमान
दरवाजाकडे.
हनुमान दरवाजा कडे जाणारी वाट थोडी
अंतरापर्यंत गडसंवर्धन करणाऱ्या प्रेमींनी मोठी केली आहे. पण पुढे जाऊन वाट
नेहमीचा वाटे सारखी छोटी होते. जेथे मोठी वाट संपते, त्याचा समोरच वाट
थोडीशी डावीकडे झाडीतून खाली जाते. ह्या वाटेने खाली गेल्यावर पुन्हा दोन
वाटा लागतात. त्यात डावीकडील वाट पकडून गेले असता आपण हनुमान दरवाजा जवळ
पोहोचतो. उजवीकडील वाट गोल फिरून घेऊन जाते. पण ह्या वाटेने गेलो असता
आपल्याला एका ठिकाणाहून नवरा-नवरी आणि भटोबा हे सुळके समोर दिसतात.
गडसंवर्धन
संस्थेने जागोजागी लावलेल्या महितीच्या फलकामुळे, आम्हाला हनुमान दरवाजा
शोधणे सोपे गेले. अन्यथा कोणाला कळून ही येणार नाही अशा ठिकाणी हा दरवाजा
आहे. दरवाजाजवळ उतरण्यासाठी आपल्याला मातीत केलेल्या पायऱ्या खाली जाताना
दिसतात, त्याच्या अगोदर एक ४ फूट लांब जाडा चौकटी खांब सारखा दगड पडलेला
आहे. तिथून खाली जायला मातीत केलेल्या पायऱ्या आहेत, पण पावसात त्या
पायऱ्या झिजून पायवाट होण्याची शक्यता मला जास्त वाटते. पायऱ्या उतरून
आल्या असता आपल्याला समोर एका कातळावर हनुमानाची आणि त्याच्या डाव्या
बाजूला लहान गणपतीची कोरलेली मूर्ती दिसते. हनुमानाच्या उजव्याबाजूला खाली
कातळात लहानशी शिवपिंड कोरलेली आहे, ह्या व्यतिरिक्त तुम्हाला येथे काहीच
अवशेष दिसत नाही. येथून खाली उतरण्यासाठी एका खालोखाल अंदाजे २५ फुटाच्या
दोन शिड्या लावल्या आहेत. ह्या शिड्या कातळात वरच्यावर अडकवल्या (किंवा
ठेवल्या) आहेत. त्याला कुठे हि खिळा ठोकून किव्हा सिमेंट लावून बसवली नाही.
त्यामुळे उतरतेवेळी एका वेळी एकानेच जपून चढायला अथवा उतरायला लागते.
शिड्या
खाली उतरून, आम्ही वाट कुठे जाते बघत होतो, पण आम्हाला, पुढे वाट कुठेच
खाली उतरताना दिसली नाही. बहुतेक काळाच्या ओघात ही वाट बुजून गेली असेल.
ज्या कातळावर या मूर्ती कोरल्या आहेत त्या कातळाच्या वर बुरुजाची तटबंदी
आहे. बहुतेक ह्या बाजूला जिकडून आपण दरवाजासाठी खाली उतरतो. तिथपर्यंत ही
तटबंदी असावी. बाकी येथे दरवाजाच्या चौकटीचे काहीच अवशेष सापडत नाही. ह्या
दरवाजाला जाते वेळी जपून जावे.
हनुमान
दरवाजा बघून पुन्हा वाटा जिथे दुभागतात, तिथे येऊन सरळ वाटेने पुढे
भंडारगड कडे चालत जावे. पुढे माहुली आणि भंडारगडाच्या खिंडीत थोडे खाली
उतरून पुन्हा समोरच्या भंडारगडाच्या पठारावर चढायला लागते. समोर पठारावर
चढण्यासाठी १० फुटाची शिडी बसवली आहे. शिडी चढल्यावर आपण भंडारगडाच्या
पठारावर पोहचतो. ह्या कातळाला वर तटबंदी आहे ह्या जागेचे फोटो मी खाली
दाखविले आहे.
कल्याण दरवाजा :
पठारावर
आल्यावर, पठाराच्या टोकाला (सुळक्याचा जवळ) जाणाऱ्या वाटेतच, उजव्याबाजूला कल्याण दरवाजाची वाट लागते .
आम्हाला कल्याण दरवाजा पण माहिती फलकमुळे न शोधता सापडला, अन्यथा लगेच कळून
येणे मुश्किल आहे. उजव्यावाटेने दरवाजाकडे खाली गेले असता, दरवाजाजवळ जाण्यासाठी संवर्धन प्रेमाने मातीत केलेल्या पायऱ्या लागतात, ह्या पायऱ्या संपून खाली आलो असता, वाट डावीकडे वळते तेथे कातळात खोदलेल्या ४ पायऱ्या दिसतात. त्या पायऱ्या पुढे तुटल्या
असल्यामुळे उतरण्यासाठी त्याचा खाली काही दगड ठेवले आहेत. खाली उतरताच समोर पाण्याची टाकी किंवा जमिनीचा
सपाटीला असलेली कातळाची विहीर जशी असते, असा दरवाजाचा वरचा भाग दिसतो.
त्यामुळे दरवाजातून उतरतेवेळी एकाद्या शिडीचा विहिरीत उतरतो तसे वाटते.
दरवाजाचा आतील भागात जांभा दगडाची भिंत काही ठिकाणी प्लॅस्टर केलेली दिसते,
पण बाहेरील बाजूस दरवाजा दगडाचा आहे. दरवाजा रुंदीला निमुळता आहे.
दरवाजात उभे राहून खाली
पहिले असता, कातळात कोरलेल्या अंदाजे ३०/४० पायऱ्या दिसतात. पण ह्या
पायऱ्या आणि दरवाजा मधील पायऱ्या तुटलेल्या असल्यामुळे,
दरवाजाच्या बाजूने एक कातळाला लावलेल्या लाकडाच्या १० फूट ओंडक्यावरून उतरायला लागते.
आम्ही ह्या ३०/४० पायऱ्या उतरून खाली
जाऊन पहिले असता. पुढे पायऱ्या तुटलेल्या असल्यामुळे १५ ते २० फुटाचा खड्डा
पडलेला दिसतो. त्यामुळे खाली उतरायचे असेल तर दोरीच्या साह्याने उतरायला
लागेल ( किंवा रॅपलिंग ).
आम्हाला खड्यात खाली
कातळावर रॅपलिंग साठी २ लोखंडी कड्या मारलेल्या दिसल्या. ह्या दरवाजाने अनुभवी ट्रेकर्स ट्रेक करतात. कल्याण दरवाजाने चडते वेळी ३० वर्षाच्या एका ज्येष्ठ गिर्यारोहकाचा १९९७ साली अपघाती मृत्यू झाल्यामुळे त्याचा स्मरणार्थ पायऱ्याजवळ कातळात लहान फलक लावला आहे.
पायऱ्याजवळ उतरतेवेळी सोबत अनुभवी किंवा अनुभव असेल तरच उतरावे. नाही तर शक्यतो टाळावे.
पायऱ्याजवळ उतरतेवेळी सोबत अनुभवी किंवा अनुभव असेल तरच उतरावे. नाही तर शक्यतो टाळावे.
खांब टाकी :
दरवाजा
पाहून आम्ही पुन्हा वर वाटेला फलकाजवळ आलो. आणि तिकडून वर नवरा-नवरी सुळका
पाहण्यासाठी माथ्याच्या टोकाकडे गेलो. त्या वाटेत मध्येच एक गुहेतील खांब
टाकी लागते. टाकीत आत थोडे पाणी होते पण पिण्यायोग्य वाटत नव्हते.
गुहेच्या बाहेर तोंडावर कातळाचा तुटलेला बांध आहे. बांधामुळे त्याकाळी
पावसात टाकी आत पूर्ण भरून पाणी बाहेरील भागात साचून नेहमीच्या टाकी सारखी
वाटत असावी. पण बहुतेक आता पावसाळ्यात टाकी अर्धी भरत असावी, आतील पाण्याचा
ओलसर भागाने मला असे वाटले.
नवरा- नवरी, भटोबा सुळका :
टाकी
बघून टाकीच्या बाजूने वाट वर माथ्याचा टोकावर जाते. काही मिनिटातच आपण
पठाराच्या टोकाला पोहचतो. टोकावरून आपल्याला समोर (दक्षिणीकडे) माहुलीचा
चंदेरी आणि ह्या डोंगराच्या मध्ये नवरा-नवरी, भटजीचे सुळके दिसतात. डावीकडे
(पूर्वेकडे) खाली माहुली गाव, शहापूर आणि आसनगाव परिसर दिसतो.
थोडावेळ
निसर्ग पाहून फोटो काढून आम्ही पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो. वाटेतच
आम्ही जेवून घेतले आणि ज्या वाटेने गड बघत यावे असे मी वर्णिले आहे, त्याच
वाटेने आम्ही ते सगळे अवशेष बघत गेलो. पळसगडवर अवशेष नसल्याने आम्ही तिथे
जाणे टाळले, पळसगडावरून तानसा धरण आणि त्याच्या बाजूचा परिसर दिसतो.
आम्ही
२.३० वाजता गड उतरायला सुरवात केली. कारण आम्हाला ५ ची एसटी पकडायची होती.
पण आम्ही वाटेत जमेल तेवढा प्लास्टिकचा कचरा आणि बाटल्या उचलत गेल्यामुळे,
आम्हाला गावातील महादेव मंदिराजवळ पोहचायला संध्याकाळचे ४. ४५ वाजले आणि ५
ची एसटी पायथ्याच्या गावात न येता २ किमी अगोदरच्या गावातूनच फिरते. आणि
आम्ही तिथे चालत पोहचेपर्यंत गाडी गेली असती. आणि संध्याकाळी शेवटची ७ च्या
एसटीची, २ तास वाट बघण्यात काहीच अर्थ नव्हता.
म्हणून
मग आम्ही सकाळच्या रिक्षा वाल्याचा फोन नंबर घेऊन ठेवला होता त्यालाच
बोलावून घेतले. आम्हाला ६. १५ची आसनगाव - मुंबई सीएसमटी लोकल भेटली.
गडाच्या पायथ्याची वाट |
गडाच्या माथ्यावर पोहचण्यासाठी लावलेली शिडी |
गडाचा बुरुज |
गडाच्या माथ्यावर आल्यावर लागणारी पहिली टाकी |
डावी वाट शिळा, वाडा, शिवमंदिर, तलाव, हनुमान दरवाजा कडून भंडारगड कडे जाते. ह्या डाव्यावाटेने गेले असता, हे अवशेष आपल्याला एका मागोमाग सापडतात. आणि उजवीकडची वाट महादरवाजा आणि सदरकडे जाते |
गडावर वाट दाखवण्यासाठी असे फलक लावले आहेत. |
महादरवाजाकडे उतरतेवेळी टिपलेले दृश्य. त्यात बुरुजावर पाण्याचं कुंड, शिवपिंड दिसत आहे |
महादरवाजाच्या आतील देवडी व गुहा |
महादरवाजा |
महादरवाजाच्या बाहेर शरभ चे शिल्प दिसतो. |
महादरवाजाच्या बाहेरील चिन्ह |
सदर |
माहुली गड आणि भंडारगड जेथे दुभागतो ती खिंड. सामोर भंडारगड पठार लागतो. लाल वर्तुळात तटबंदीचे अवशेष दिसतात ते दाखविले आहे. |
भंडारगडचा पठार चढते वेळी लागणारी शिडी आणि त्याचा वर कातळ चढायला लागतो. |
कल्याण दरवाजा कडे खाली जाणाऱ्या पायऱ्या |
कल्याण दरवाजा कडे जाणाऱ्या पायऱ्या आणि खाली दरवाजाच्या वरचा भाग विहीर सारखा दिसत आहे |
कल्याण दरवाजाच्या पायऱ्याजवळ उतरण्यासाठी ७/८ फुटाचा खडक ह्या लाकडाच्या ओंडक्यावरून उतरायला लागतो. |
कल्याण दरवाजा उतरून लागणाऱ्या पायऱ्या |
गिर्यारोहकाचा स्मरणार्थ लावलेला फलक |
पायऱ्या तुटून पडलेला १५ ते २० फुटाचा खड्डा |
कल्याण दरवाजाचा बाहेरून काढलेला फोटो |
खांबटाकी |
भंडारगडाचा पठाराचा टोकाकडे जाताना. येथून नवरा-नवरी, भटजी सुळका आणि माहुलीचा चंदेरी दिसतो |
सुळक्यासोबत आमच्या तिघांचा फोटो |
हनुमान दरवाजा |
हनुमान दरवाजा कडील कातळात कोरलेल्या मुर्त्या |
हनुमान दरवाजाच्या शिड्या |
तलाव |
शिवमंदिर |
मंदिरातील अवशेष |
छोटा वाड्याचे अवशेष |
मोठ्या वाड्याचे अवशेष |
दोन शिळा |
https://youtu.be/PuAMkM__2k0
also click on aboved link to check my youtube video of Mahuli fort
also click on aboved link to check my youtube video of Mahuli fort