मोरगिरी ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE लिंक वर क्लिक करा
रविवार ११ मार्चला ट्रेक करायचे ठरले होतेच, पण कुठे ते
ठरवायचं होते. प्रणवने तुंग गडाजवळील खूप कमी लोकांना माहित असणारा आणि
नेमकेच ट्रेकर्स जाणारा मोरगिरी सुचविला.
गडाबद्दल
(माझ्या मते) हा किल्ला टेहळणी साठी वापरत असावा. कारण गडावर फक्त
पाण्याची टाकी दिसतात. बाकी तटबंदी, बुरुज, दरवाजा, तोफा आणि वाड्याचे
अवशेष काही दिसत नाही. गडावरून तुंग, तिकोणा, कोरीगड असे महत्वाचे किल्ले
आणी लांबच्या लांब पसरलेला पवना जलाशयचा परिसर दिसतो. वातावरण स्वच्छ असेल,
तर बहुतेक त्या परिसरामधील लोहगड, विसापूर इत्यादी दुसरे गड सुद्धा दिसत
असतील. त्यामुळे मोरगिरीवरून बाकीच्या गडांवर आणि आजूबाजूच्या परिसरावर
चांगली नजर ठेवता येत असावी. प्रणवने सांगितले, गडावर जाण्यासाठी अजून दोन
गावातून वाटा आहेत. पण प्रणवने सुचविल्याप्रमाणे, एस्सार ऍग्रोटेक कंपनी
समोरून जाणारी वाट लवकर म्हणजेच दीड तासात गडावर पोहचते. त्याचवाटेने आम्ही
बरोबर दीड तासात गडावर पोहचलो.
मुंबई ते लोणावळा प्रवास
नेहमीप्रमाणे
विनय, प्रणव आणि मी असे आम्ही तीन जणच होतो. शुक्रवारी रात्री मोरगिरी
किल्ल्यावर जायचे ठरवल्यामुळे, आम्हाला रविवारची इंद्रायणी एक्सप्रेसचे
आरक्षण भेटले नाही. आणि अनारक्षित डब्ब्यात उभे राहून जाण्यापेक्षा, आम्ही
सकाळची पहिल्या कर्जत लोकलने कर्जतला आरामात बसून जायचे ठरवले. तेथून पुढे
कर्जत लोकलच्या पाठोपाठ इंद्रायणी एक्सप्रेस येते. ती पकडून लोणावळ्याला
जायचे ठरले.
मी सकाळी ४.५८
ला चिंचपोकळी स्थानकातून कर्जत लोकल पकडली. विनय आणि प्रणव मला डोंबिवलीला
भेटले. गाडी वेळेत सकाळी ७.१० ला कर्जतला पोहचली. आम्ही लगेच १
क्रमांकाच्या फलाटवर गेलो. कारण इंद्रायणी एक्सप्रेसची वेळ ७. १३ ची होती.
पण गाडी ५ मिनिट उशिराच आली, तरी पण लोणावळ्याला वेळेत ८ वाजता पोहचली.
लोणावळ्यावरून
९ ची भांबुर्डे एसटी होती. त्यामुळे आमच्या कडे १ तास होता. तोपर्यंत
आम्ही एसटी स्थानकाजवळच नाश्ता करून, एसटीच्या वेळेत आलो.
थोडक्यात प्रवासाबद्दल:
मुंबई ते लोणावळा प्रवास सकाळी ५.४०ची इंद्रायणी ने करणे
किंवा सकाळची पहिली कर्जत लोकल पकडून ७. १० ला कर्जतला पोहचून , कर्जतवरून ८. १३ ची इंद्रायणी पकडून लोणावळा उतरणे.
लोणावळा एसटी स्थानका (आगार) वरून सकाळी ९ ची लोणावळा ते भांबुर्डे एसटीने घुसळखांब फाट्याला उतरणे
घुसळखांब फाटा ते एस्सार ऍग्रोटेक कंपनी ३.३ किमी, पुढे तुंग किल्ला अजून ५ किमी वर आहे.
तुंगला
जाणाऱ्या रस्त्याला मधल्या गावात जाण्यासाठी अधून मधून छोटे मोठे ट्रक
किंवा टेम्पो जात असतात. त्यामुळे काही ना काही वाहनाचे साधन मिळतेच.
लोणावळा ते एस्सार ऍग्रोटेक नर्सरी (मोरवे गाव) वाया
घुसळखांब
फाटा
मोरगिरीला किंवा तुंग किल्ल्याला जायला
लोणावळ्या वरून थेट एसटी नाही. त्यामुळे सकाळी ९ ची लोणावळा -भांबुर्डे
एसटीने घुसळखांब फाट्याला उतरून, पुढे जायला लागते. हीच एसटी पुढे घनगड
किल्ल्याला जाण्यासाठी पकडतात. साधारण २० मिनीटात, आम्ही घुसळखांब फाट्याला
पोहचलो. फाट्यावरून तुंग किल्याला जाणाऱ्या रस्त्यामध्येच ३.३ किमी
अंतरावर एस्सार कंपनी आहे आणि त्याच्या पुढे ६ किमी वर तुंग किल्ला आहे.
नर्सरीपर्यंत
पोहचण्यासाठी गाडीची वाट न बघता, आम्ही चालायला सुरवात केली. जेमतेम ५ ते
१० मिनिटे चाललो असता, आम्हाला एस्सार कंपनीला जाणारा मालवाहू टेम्पो
भेटला. त्यामुळे आम्ही १० मिनिटात नर्सरीपर्यंत पोहचलो. नर्सरी पोहचेपर्यत
९.५० वाजले होते.
दहा वाजता आम्ही ट्रेकला सुरवात केली.
मोरगिरी किल्ल्यावर कसे पोहचलो
नर्सरीच्या गेटपासून, पुन्हा थोडे ५० मीटर मागे फिरून नर्सरीच्या समोर एक लहान घर
लागते. हे घर खाजगी मालमत्तेत असल्यामुळे पूर्ण जागेला तारेचा कुंपण आणि एक
मोठा लोखंडी गेट आहे. डोंगराच्या पायथ्याला घर असल्यामुळे, कुंपणाच्या
तिन्ही बाजूने डोंगर आणि झाडाने वेढलेले आहे. त्या घरात, ती जागा
सांभाळण्याचे काम करणारे दंशू आखाडे आणि त्यांचे कुटुंब राहते. आम्ही आखाडे
काकांना गडावर कसा जायचे विचारले
काकांनी
त्यांच्या घरामागून असलेल्या डोंगराच्या घळीमधून पठारावर पोहचून,
पठारावरून डाव्याबाजूने गडावर जायला सांगितले, तशी आम्ही सुरवात केली.
आम्ही
त्यांच्या जागेत असलेल्या उंबराच्या झाडाकडून उजव्या बाजूला तुटलेल्या
कुंपणाच्या बाहेर पडलो. कुंपणाच्या बाहेर आल्यावर, एक वाट डावीकडे घळीच्या
दिशेने जाते. ह्या वाटेत एका ट्रेकरने वाट दर्शवण्यासाठी दोन ते तीन ठिकाणी
३/४ इंचाचे लॅमिनेट केलेले बाणाचे चिन्ह झाडाला लावले आहेत. त्यामुळे
पठारावर लवकर पोहचायला मदत होते. (ह्या वाटेने अर्ध्यावर पोहचल्यावर
आपल्याला घळ लागते.) घळेतून वर गडाच्या दिशेने आपण पठारावर पोहचतो.
पठारावर पोहचलो
वीस
मिनिटात आम्ही पठारावर पोहचलो. पठारावर पोहचल्यावर मागे फिरून पाहिले असता
आपल्याला तुंग, तिकोना किल्ला पवना जलाशयाचे दृश्य दिसते. पण आपल्याला
मोरगिरीचे शिखर लगेच दिसत नाही. कारण पठारावर पोहचल्यावर आपल्या समोरच
छोटी टेकडी दिसते. ही टेकडी म्हणजेच मोरगिरी गडाची पठारावर उतरलेल्या
सोंडेचे टोक आहे.
पठारावर
थोडा वेळ विश्रांती घेऊन, पठारावरून डाव्याबाजूने वाट गडाकडे जाते. आम्ही
ह्या डावीकडच्या वाटेने गडाच्या दिशेने चालू लागलो. १०/१२ पावले चालून पुढे
आलो असता, मोरगिरीचा गड दिसायला लागला. पठारावरून वाटेने चालत असताना, गड
सतत आपल्या उजव्या बाजूला असतो. आपल्या पाठीमागे तुंग किल्ला आणि डावीकडे
डोंगरमाळ आणि त्याचा पसरलेला मोठा पठार दिसत असतो.
पठारावरून
साधारण ५ मिनिट पुढे चालून आलो असता, मोठी रुळलेली वाट दिसली. हि वाट
मोरगिरी गडाच्या पायथ्या खालून जाते. गडाच्या पायथ्याला असलेल्या
जंगलामुळे, वाटेने चालत असताना झाडांमुळे गडाचे शिखर दिसत नाही. कधीतरी
मध्येच झाडातून गडाचे शिखर डोकावताना दिसते.
गडाच्या माथ्यावर/ शिखरावर कसे पोहचलो
७/८
मिनटात चालून आल्यावर, गडावर जाण्यासाठी उजव्याबाजूला, पायथ्याचा
झाडांमधून एक वाट गडावर जाताना दिसते. वाट झाडामध्ये असल्यामुळे लगेच दिसून
येत नाही. त्यामुळे येथे नीट लक्ष ठेवून चालावे अन्यथा वाट चुकण्याची दाट
शक्यता आहे. जर ही गडावर जाणारी वाट तुम्हाला सापडली नाही, तर तुम्ही चुकून
वाटे बरोबर पुढे पठारावर पोहचाल आणि गड मागे राहील.
पण
जेथून वाट वर जाते. तेथे एका संस्थेने एका झाडाला वाट दर्शवण्यासाठी
"किल्ल्याकडे" असा लॅमिनेट केलेली पाटी लावला आहे. पण आजूबाजूचा दुसऱ्या
झाडांची पान आणि फाद्यांमुळे लगेच दिसून येत नाही. त्यामुळे आम्हाला सुद्धा
हा फलक लगेच दिसला नाही. येथून आपण १५ ते २० मिनटात टाकीजवळ पोहचतो. आणि
टाकीजवळून अजून ५ ते १० मिनटात गडमाथ्यावर.
गडमाथ्यावर
जाणारी ही वाट पहिल्या टाकीपर्यंत खडी चढण आहे. गडाच्या पायथ्याच्या
जंगलामुळे, चढतेवेळी वाटेत सुरवातीलाच फक्त दाट झाडी लागते, त्यानंतर गवत
लागते. ह्या वाटेत माती जास्त असल्यामुळे चढतेवेळी आणि उतरतेवेळी जपून
जायायला लागते. खासकरून उतरतेवेळी. माती जास्त असल्यामुळे, घसरण्याची खूप
शक्यता आहे. वाटेत काही ठिकाणी छोटे दगड लागतात. आम्हाला उतरते वेळी
उन्हाने दगड तापल्यामुळे, हात ठेवताच जोराचे चटके लागत होते. आणि माती सरकत
असल्यामुळे बहुतेक ठिकाणी आम्ही बसूनच उतरलो.
हा
खडा चढ चढून आल्यावर, वाट टाकीजवळ पोहचते. तेथून उजव्याबाजूने तीन टाकीचा
बाजूने वाट गड माथ्यावर जाते. आणि डावीकडे आपल्याला गडाचा माथ्यापर्यंत
कातळाला मोठी फट गेलेली दिसते. हि फट आपल्याला जेव्हा गडाचा माथा दिसायला
लागतो तेव्हा पासूनच दिसते. (त्यासाठी वर गडाचा फोटो लावला आहे. तो
बघितल्यावर तुम्हाला हि गडमाथ्याची घळ दिसते.)
(
झाडीतून गडमाथ्यावर येणारी वाट जर सापडत नसेल. तर गडाच्या कातळाची हि घळ
किंवा फट लक्षात ठेवणे. त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल, गडाच्या
माथ्यावर जाण्यासाठी ह्या घळीच्या पुढेच वाट वर येते. )
गडाच्या कातळातील टाक्या
खडा
चढ चढून वर आल्यावर, गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी वाटेने चालायला लागलो
असता, आपल्याला एका पाठोपाठ ठराविक अंतरावर अश्या ३ लहान टाक्या लागतात.
पहिल्या दोन्ही टाकी कातळात खोलगट खोदलेल्या दिसतात.
पहिल्या
टाकीतील पाणी चांगले दिसत होते. पण टाकी तळ गाठायला आल्यामुळे, तळाच्या
मातीमुळे पाणी अस्वच्छ दिसत होते. दुसऱ्या टाकीचे पाणी वरून हिरवे दिसत
होते. बहुतेक म्हणूनच अर्धी भरलेली दिसत होती. दोन्ही टाकी अंदाजे ५ फूट
खोल असतील.पण पाणी पिण्यायोग्य वाटत नव्हते.
तिसऱ्या
टाकीचे तोंड लहान गुहेसारखे आहे. ह्यात जाखमाता देवीचे मंदिर आहे.
मंदिराच्या गुहेत फक्त २ माणसे बसू शकतात एवढीच जागा आहे आणि बाजूलाच लहान
टाकी आहे. टाकीत प्लेट वैगेरे कचरा टाकलेला होता. तरी पण टाकीतील पाणी नितळ
आणि स्वच्छ दिसत होते. म्हणून आम्ही ह्या टाकीतील पाणी प्यायला वापरले.
मंदिरा बद्दल
मंदिरात देवीची मूर्ती शेंदूर लावलेली तांदळा स्वरूपातील आहे. गुहेच्या आत एका कातळावर जाखमाता मोठया अक्षरात लिहिले आहे.
ह्या मंदिराचा बाहेरच, गुहेचा बाजूला माथ्यावर जाण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानने १० फुटाची शिडी लावली आहे.
शिडी
चढून वरच्या कातळावर पोहचताच कातळाच्या कडेला कोरलेल्या ६ ते ७ पायऱ्या
लागतात. ह्या पायऱ्या चढून आल्यावर डाव्याबाजूला अजून १०/१२ तुटलेल्या
पायऱ्या लागतात. ह्या शेवटच्या पायऱ्या चढून गेल्यावर आपण गडाच्या
माथ्यावर पोहचतो.
गड माथ्यावरून दिसणारे दृश्य
गडमाथा लहान आहे. तसेच गडावर फक्त दोनच पाण्याची टाकी आहेत. त्यामुळे नुसता माथा फिरायला १० मिनिटे पुरेसे आहेत.
आम्ही
प्रथम, माथ्यावर पोहचताच गडावरील भगव्या झेंडेच्या दिशेने म्हणजेच डाव्या
वाटेने गेलो. झेंड्याचा बाजूलाच २ पाण्याची टाकी आहेत. त्यातील एक मोठी
चौकोनी टाकी आहे. टाकीतील गढूळ पाण्यामुळे पाणी पिण्यायोग्य वाटत नव्हते.
त्याच टाकीच्या खाली गडाच्या कडेला साधारण ३ फूट खोल सुकलेली
लहान
टाकी आहे. टाकी बघून, आम्ही माथ्याचा दुसऱ्या बाजूला गेलो.
वर सांगितल्याप्रमाणे गड माथ्यावर फक्त दोन पाण्याची टाकी आहेत,
त्याप्रमाणे माथ्यावर आम्हाला बाकी काहीच अवशेष आढळले नाही. अशा प्रकारे
पूर्ण माथा फिरून होतो
गडावरून आपल्याला
तुंग, तिकोना आणि कोरीगड किल्ले, पवना धरणाचा पसरलेला जलाशय आणि समोरील
पसरलेली डोंगरमाळ आणि विशाल पठाराच दृश्य दिसते.
तसेच गडाखालील एस्सार कंपनी, घुसळखांब इत्यादी दिसते.
परतीचा प्रवास
गडमाथ्यावर
सावली साठी झाड नसल्यामुळे. उन्हात जास्तवेळ न थांबता, अर्ध्या तासात गड
माथा उतरून टाकी जवळ पोहचलो, जेवण आणि विश्रांती घेऊन आम्ही आलेल्या वाटेने
१. ४५ वाजता गड उतरायला सुरवात केली. २.४५ वाजता आम्ही नर्सरी जवळ पोहचलो.
साधारण सव्वा तासात आम्ही गड उतरलो.
१५
ते २० मिनिट ट्रकची वाट पाहून, आम्ही घुसळखांब फाट्यापर्यंत पर्यंत
चालायला सुरवात केली. १ ते १.३० किमी चालल्यावर आम्हाला एक डंपर भेटला.
त्याने आम्हाला थेट लोणावळ्याला सोडले. त्यामुळे आम्ही ४ पर्यत लोणावळा
स्थानकात पोहचलो आणि तिथून मुंबईसाठी परतीचा प्रवास सुरु केला.
कुंपणाच्या बाहेर पडून घळीतून पठारावर जाताना सुरवातीची वाट |
घळीमधून वर जाऊन उजवीकडे पठारावर जाणे. |
घळीमधून पठारावर येताना |
गड सतत आपल्या उजव्या बाजूला राहतो आणि वरती मी पिवळ्या तुटक रेषेने, अंदाजे वाट गड माथ्यावर कशी जाते दाखवायचा प्रयत्न केला आहे. |
गडाचा माथ्यावर जाणारी वाट. झाडाला मी पिवळ्या रंगाने वर्तुळ केला आहे. तेथे "किल्ल्यावर" अशी लॅमिनेट केलेली पाटी लावली आहे. |
गडाच्या माथ्यावर वाट कशी जाते. हे मी अंदाजे पिवळ्या रेषेने दाखवायचा प्रयत्न केला आहे. |
माथ्यावर जाताना वाट झाडा-झुडपातून जाते |
तीन टाकीच्या बाजूने गड माथ्यावर जाणारी वाट. आणि तिसऱ्या टाकी जवळ, गड माथ्यावर जाण्यासाठी असलेली शिडी सुद्धा दिसत आहे. |
पहिली टाकी |
दुसरी टाकी आणि खाली बाहेरून काढलेला फोटो |
देवीचे मंदिर आणि तिसरी टाकी |
मंदिराच्या बाजूला गड माथ्यावर जाण्यासाठी लावलेली शिडी |
शिडी चढून वर आल्यावर लागणाऱ्या पायऱ्या |
पहिल्या पायऱ्या चढून आल्यावर वरती ह्या पायऱ्या लागतात. ह्या पायऱ्या चढून गेल्यावर आपण गड माथ्यावर पोहचतो. |
मोठ्या टाकीच्या बाजूला, गडाचा कडेला असलेल सुखलेल टाके. |
मोरगिरी ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE लिंक वर क्लिक करा