Monday, 13 January 2020

Mangalgad Trek /Kangori gad Trek



मंगळगड/ कांगोरीगड 

 मंगळगड / कांगोरीगडाच्या ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  




मंगळगड (कांगोरीगड) ची योजना नेहमीप्रमाणे प्रणवने केली, त्यासाठी व्हाट्सअँप संघावरील मित्रांना विचारून बघितले. होय नाही करता शेवटी आम्ही तीनजणच तयार झालो. प्रणव, मितेश आणि मी. प्रणवने एसटीची माहिती काढून ठेवली होती. त्याप्रमाणे आम्ही त्या एसटीचे शनिवारी रात्रीचे आरक्षण करून ठेवले होते.

प्रवासाबद्दल महत्वाची थोडक्यात माहिती:
मुंबई ते मंगळगड अंतर १९५ किमी
महाड ते मंगळगड २५ किमी
ठाणे सिबीएस ते गोठवली रात्री १२.३० एसटी
एसटी पनवेल, महाड ते बिरवाडी मार्गे जाते.
उतरायचे स्थानक पिंपळवाडी गाव, गोगावले वाडी.

मंगळगड ते मुंबई
दुपारी १२.३० ची बिरवाडी/ महाड पर्यंत एसटी आहे. त्यानंतर ३ ची शेवटची एसटी आहे.
पण रविवारी बहुतेक दुपारी १२.३० गाडी नसते त्यासाठी गावातल्या लोकांना अगोदर विचारणे.
बिरवाडीतून महाडला जाण्यासाठी सतत एसटी आणि रिक्षा भेटतात.
पण पिंपळवाडीतून बिरवाडीसाठी आम्हाला रिक्षा दिसल्या नाही. 

 


मुंबई ते मंगळगड प्रवास वर्णन

मंगळगड ह्याला कांगोरीगड असेही म्हणतात. गडाच्या पायथ्याचे गाव पिंपळवाडी, गोगावले वाडी. त्यासाठी ठाण्यावरून रात्री १२.३० ची ठाणे सिबीएस (खोपट) ते गोठवली एसटी आहे. ही गाडी ठाणे - पनवेल - महाड- बिरवाडीमार्गे जाते. ही एसटी सकाळी ५.३० ला गोठवलीला पोहचते. आम्हाला ही बरोबर त्याच वेळेत गोगावले वाडीत पोहोचवले.

ही महाडला जाणारी शेवटची गाडी असल्यामुळे गाडीला गर्दी असते त्यामुळे आरक्षण करून ठेवलेलं उत्तम. आमची ही गाडी महाडपर्यंत पूर्ण भरलेली होती. जरी ही गाडी पकडता नाही आली तर मुंबई वरून कुठलीही महाडला जाणाऱ्या गाडीने महाडला पोहचावे, महाड बस आगार मधून बिरवाडी साठी एसटी बघावी. महाड ते बिरवाडी साठी बहुतेक एसटी असाव्यात. पण बिरवाडी ते पिंपळवाडी साठी गाडी भेटणं मुश्किल वाटते.

गडाच्या वाटेचे वर्णन:
गोगावले वाडीत रस्त्याच्या शेजारीच असलेल्या मंदिरात ५० ते १०० लोक राहू शकतात. आम्ही थोडे झोपायचा प्रयत्न केला आणि उजाडताच सकाळी ७.२० ला ट्रेकला सुरवात केली. मंदिराच्या समोरच रस्त्याच्या पलीकडे उजवीकडे एक मोठी प्रशस्त वाट डोंगरात जाताना दिसते. तेथे मंगळगडचा फलक ही लावला आहे. साताऱ्याच्या शिवत्व प्रतिष्ठान या किल्ल्यावर गडसंवर्धन करत होते. त्यांनी ही पायथ्याची वाट कच्चा रस्त्यासारखी प्रशस्थ केली आहे. त्यामुळे वाट लगेच दिसते. वाट घाटातील रस्त्यासारखी नागमोडी आहे. हि नागमोडी वाट साधारण तासाभरात आपल्याला टेकडीवर घेऊन जाते. साधारण वीस मिनिट चालून आल्यावर आपल्याला मंगळगडचा पूर्ण डोंगर दिसतो, तो पर्यंत आपल्याला गावातून दिसत नाही.

नागमोडी वाट आपल्याला टेकडीवर घेऊन जाते पण आपण टेकडीच्या पठारावर पोहचत नाही. कारण जेव्हा आपण टेकडीवर येतो तेव्हा एक वाट डावीकडे वर गडावर जाते तर दुसरी समोर टेकडीच्या पठारावर जाताना दिसते. त्यामुळे आपण गडावर जाणाऱ्या वाटेने वर चढायला लागतो. येथून आपल्याला खडा चढ लागतो.

ही वाट डोंगराच्या एक बाजूच्या टोकावर किंवा माचीच्या टोकावर नेते. तेथून डोंगराची धार पठारावर खाली येते, ह्या धारेवरूनच वाट चढावी लागते. त्यामुळे खडा चढ लागतो. साधारण वीस मिनिटे या धारेच्या वाटेने चढून आल्यावर आपल्याला समोर गडाचा कातळ लागतो. येथून आपल्याला उजवीकडे आणि डावीकडे अश्या दोन वाटा लागतात. त्यातील आपल्याला डावीकडील वाट गडावर घेऊन जाते. उजवीकडील वाट कुठे जाते माहित नाही पण ती गडावर जात नाही.

डावीकडील वाट पकडल्यावर आपल्या डाव्याबाजूला सतत दरी लागते तर उजव्या बाजूला गड. ह्या वाटेने चालताना आपल्याला मध्ये मध्ये काही ठिकाणी कातळाच्या तुटक पायऱ्या लागतात (त्या नक्की पायऱ्या होत्या सांगता येत नाही पण पायऱ्यासारख्या वाटत होत्या.). कातळापासून डावीकडील वाटेने आम्ही वीस मिनिटात गडाच्या माथ्यावर पोहोचलो.

गडाच्या दरवाजा जवळ पोहचल्यावर आपल्याला तटबंदी आणि बुरुज दिसतो आणि काही पायऱ्या आपल्याला दिसतात. त्यांनी आपण गडावर पोहचतो. गडाचा दरवाजा पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे.

गडमाथा:

साधारण दीड तासात आम्ही गडावर पोहचलो. गडाच्या दरवाजा जवळ पोहचल्यावर एक वाट उजवीकडे बालेकिल्ल्यावर जाते तर एक वाट समोरच्या कांगोरी देवीच्या मंदिर असलेल्या माचीवर घेऊन जाते.

कांगोरी देवीचे मंदिर आणि माची:
आम्ही प्रथम समोरील वाटेने मंदिराकडे गेलो. जाते वेळी पहिल्या आपल्याला काही प्राचीन मुर्त्या दिसतात. त्यापुढे पायऱ्याचे सुकलेले मोठ टाके लागते आणि त्याच्या बाजूला थोडे खाली उजवीकडे एक मोठ अरुंद असे लांबट टाके लागते, ह्या टाकीला ही उतरायला तुटलेल्या पायऱ्या दिसतात. टाकी पाहून पुढे मंदिराकडे गेलो.  मंदिर थोडे उंचावर बांधल्यामुळे त्याला थोड्या पायऱ्या आहेत.

मंदिरात कांगोरी देवी, भैरवाची मूर्ती आणि शंकराची पिंड आहे. मंदिराच्या बाहेरील गाभाऱ्यात अजून काही मुर्त्या ठेवलेल्या दिसतात. मंदिरात देवीचे दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या मागे बुरुजाकडे गेलो. मंदिराच्या मागे बुरुजापर्यंत पूर्ण तटबंदी बांधलेली दिसते. तिथे बुरुजावर ध्वजस्तंभ आहे. बुरुजावरून दिसणारे दृश्य खूपच रमणीय आहे.

बालेकिल्ला

दोन टाकी
बुरुजावरून आम्ही बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो त्यासाठी पुन्हा दरवाजा जवळून असलेल्या उजवीकडील वाटेने वर गेलो. ह्या वाटेने थोडे वर चढले कि एक वाट बालेकिल्ल्यावर जाते. पण त्या आधी उजवीकडे वाट जाते. त्या वाटेने गेलो असता पुढे डावीकडे ती वाट वळते. तिथे आपल्याला दोन कातळातील गुहेत खोदलेल्या टाक्या लागतात. त्यातील एक खांब टाकी आहे. दोनी टाकी लहान आहेत. खांबटाकीतील पाणी पिण्यायोग्य दिसल्यामुळे आम्ही ते पाणी प्यायला वापरले.

त्या टाकी बघून आम्ही पुन्हा बाले किल्याच्या दिशेने वर जाऊ लागलो. तेव्हा आपल्याला डावी कडे मोठी टाकी दिसते. ह्या टाकीतील पिण्यायोग्य नव्हते.  दरवाजापासून ५ मिनिटात बालेकिल्यावर पोहचतो.

दोन वाड्याचे अवशेष:
बालेकिल्ल्यावर दोन वाड्याचे अवशेष शेजारीशेजारी दिसतात. त्यातील एका वाड्याचा फक्त चौथरा बाकी आहे तर दुसऱ्या वाडयाच्या पडक्या भिंती आहेत.  तसेच इथे आपल्याला एक शिव पिंड आणि एक मूर्ती दिसते.

गडाची दुसरी माची:
वाड्याच्या बाजूने, उजव्याबाजूने  गडाच्या दुसऱ्या माचीवर वाट जाते. माचीकडे जाताना आपल्याला अजून एका वाड्याचे अवशेष दिसतात. पण ते झाडझुडपा मुळे जवळून पाहता येत नाही. त्यामुळे आम्ही ते बाहेरूनच पाहून पुढे माची कडे गेलो.

हि माची पहिल्या माची पेक्षा लहान असल्यामुळे आपण लगेच बुरुजाच्या टोकावर पोहचतो. ह्या माचीला तटबंदी दिसत नाही. बुरुजही नीट दिसत नाही. पण ह्या बुरुजावर आल्यावर आपल्याला आपण ज्या टेकडीच्या धारेवरून वर येतो ती वाट दिसते. थोडक्यात आपल्याला गडाचे हे टोक, गड चढताना सतत दिसत असतो.

परतीचा  प्रवास:
साधारण दीड तासात आमचा पूर्ण गड पाहून झाला आणि आम्ही ११ वाजता गड उतरायला सुरवात केली. कारण आम्हाला १२.३० ची एसटी पकडायची होती. आम्ही १२.१० पर्यंत गावात पोहचलो.

गावात गेल्यावर काही गावकऱ्यांने सांगितले रविवारी १२.३० ची एसटी नसते थेट ३ ची शेवटची एसटी आहे. एसटी बिरवाडी/महाड पर्यंत असते का ते माहित नाही. पण बिरवाडी वरून महाडला जायायला  एसटी किंवा रिक्षा मिळतात.

गाववाल्याने सांगितल्याप्रमाणे आम्ही पुढच्या गावातून एखाद दुसरी रिक्षा वगैरे मिळेल, म्हणून चालू लागलो. आम्हाला चांभारगड पण करायचा होता, त्यामुळे आम्ही जास्त वेळ न थांबता चालू लागलो. पण काही अंतरावर गेल्यावर आम्हाला गडावर भेटलेले काही मित्र त्यांच्या गाडीने दासगाव किल्ल्याला जात होते त्यांनी आम्हाला त्यांचा सोबत दासगावला नेले. त्यामुळे आमचा दासगाव किल्ला सुद्धा झाला अन्यथा आमचा चांभारगड पण नसता झाला.

मी दासगावच्या किल्ल्याचे वर्णन लिहित नाही, कारण आम्हाला किल्यावरील वाट सापडली नाही. त्यामुळे आम्हाला फक्त एक टाके दिसले, बाकी ही एक टाकी सोडून काही अवशेष सापडले नाहीत.

तेथून आम्ही महामार्गावर येऊन मुंबई साठी गाडी पकडली.


मंगळगड / कांगोरीगडाच्या ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  

टेकडीवरून धार वर चढून गेल्यावर गडाच आपल्याला एकाबाजुच टोक लागत. त्याचा कातळ लागतो तिथून डावीकडील वाट गडावर कशी जाते ते ह्या फोटोत पिवळ्या रेषेने दाखवलं आहे.

दरवाजा जवळून उजवीकडे गडावर वाट कशी जाते ते पिवळ्या रेषेत दाखवलं आहे. सुरवातीनंतर  वाट वर वळते आणि सरळ गडावर जाते. तर एकवाट उजवीकडे जाते आणि पुढे डावीकडे वळते तेथे पाण्याचा दोन टाक्या आहेत. त्यातील एक खांब टाकी आहे त्यातील पाणी आम्ही पिण्यास वापरले. टाक्या जेथे आहे तेथे २ बाणाचे चिन्ह जुळताना फोटोत दाखवले आहे.

हि टाकी दरवाजाकडून मंदिराकडे जातो त्या वाटेवर सुरवातीलाच लागते . पण हि टाकी वाटेचा खाली आहे आणि वाट निसरडी असल्यामुळे, आम्ही जाण टाळलं. हि टाकी तुम्हाला जेव्हा बालेकिल्ल्याचा दिशेने जातो तेव्हा मंदिराकडे जाणाऱ्या माचीच्या वाटेला दिसते






          




मंगळगड / कांगोरीगडाच्या ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा