कोकणदिवा
रायगड किल्ल्याच्या भोवतालच्या परिसरातील किल्ले हे दुर्ग दुर्गेश्वर रायगडाचे संरक्षण करतात. त्यातील कोकणदिवा सगळ्यात जवळचा किल्ला असावा. बहुतेक लोक ह्याला रायगडचा खंदा पहारकरी बोलतात आणि ते खरं ही आहे, ते किल्ल्यावर गेल्यावर कळते. कारण गड माथ्यावरून दुर्ग दुर्गेश्वर रायगड एकदम समोरच दिसतो. रायगडावरचे बरेचशे अवशेष ही दिसतात. पुणे जिल्हा आणि कोकणातील रायगड जिल्ह्यातील सीमेवर असलेला हा किल्ला बहुतेक हा किल्ला पुणेतील वेल्हे तालुक्यात येत असावा. ह्या डोंगराच्या कावळ्या- बावळ्या खिंडीतून आपण कोकणात उतरतो. त्या दृष्टीने शिवकाळात हा किल्ला संरक्षक रित्या किती महत्वाचा होता, हे कळून येते. गडावर गेला असता कळून येते हा किल्ला नसून त्या परिसरावर नजर ठेवण्यासाठी टेहळणीचा किल्ला असावा. कारण तसे गड माथ्यावर एका किल्ल्या सारखे फारसे असे अवशेष नाही आहेत.
कावळ्या बावळ्या खिंड उतरून आपण रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील सांदोशी गावात पोहचतो. पुण्यातून यायचे झाल्यास वेल्हे तालुक्यातील घोळ गाव मार्गे, गारजाईवाडी गावातून पोहचता येते आणि कोकणातून महाड तालुक्यातील सांदोशी गावातून गडावर पोहचता येते. आम्ही सांदोशी मार्गे चढाई केली.
कावळ्या-बावळ्या खिंड ऐतिहासिक महत्व.
कावळ्या-बावळ्या खिंड ही मराठयांच्या इतिहासात लढलेल्या एका रणसंग्रामाची साक्ष आहे. शिवाजी राजांच्या निधनानंतर आणि शंभुराजांच्या दुर्दैवी शेवटानंतर औरंगजेबाने आपला मोहरा राजधानी रायगडाकडे वळवला. गडावर राजाराम महाराज आणि येसुबाई राणीसाहेब होत्या. ईदीकतखानाने रायगडाभोवती वेढ्याचा फास आवळला. मात्र उत्तरेच्या बाजुला कुमक कमी असल्यामुळे शहाबुद्दीनखानाने कावळ्या घाटाने सैन्य उतरवून वेढा पक्का करायचे ठरवले. ही खबर लागताच २५ मार्च १६८९ या दिवशी गोंदाजी जगताप आणि सरकले नाईक यांनी शहाबुद्दीन खानाचे तीनशे सैन्य याच रणक्षेत्री कापून काढले. सांदोशी गावच्या या वीरपुत्रांनी अक्षरशः चार हातांनी ही खिंड लढवली. हा इतिहास किती जणांना माहिती असतो? पावनखिंड आणि उंबरखिंडीसारखीच ही आणखी एक वीरभुमी कावळ्या-बावळ्या खिंड ! या प्रतिकारामुळे मोघल सैन्य कावळ्या घाटाने खाली उतरु शकले नाही आणि रायगडाचा वेढा कमकुवत राहिला. परिणामी राजाराम महाराजाना रायगडाहुन सुरक्षित जिंजीला जाता आले. (संदर्भ दुर्गवीर प्रतिष्ठान).
ह्यावेळी प्रणव आणि मी दोन दिवसाची योजना केली होती. पहिल्या दिवशी कोकणदिवा किल्ला आणि संध्याकाळी रायगडला वस्तीला जाऊन दुसर्या दिवशी रायगड दर्शन घेऊन मुंबईला परत फिरायचे. आमच्या सोबत ह्यावेळी सागर पाटील सुद्धा होता, असे आम्ही तिघे जण होतो.
प्रवास वर्णन :
कोकणदिवा साठी आम्ही कोकणातील सांदोशी गावातून चढाई करणार होतो. त्यासाठी आम्ही मुंबई वरुन बोरिवली नॅन्सी कॉलनी (Nancy Colony) ते सांदोशी रात्री १०.१५ ची एसटी पकडली. मी आणि सागर कुर्ला नेहरुनगरवरुन आणि प्रणवने नेरुळ वरुन बस पकडली. आम्ही आधीच आरक्षण करून ठेवले होत म्हणून बरे झाले. शेवटची गाडी असल्यामुळे गाडीला गर्दी होती.
मुंबई ते सांदोशी हे महाड-पाचाड मार्गे अंदाजे २०० किमी आहे आणि महाड ते सांदोशी ३१.५ किमी आहे. पण तुम्ही स्वतःची खाजगी गाडी करून जाणार असाल तर माणगाव वरून पुनाडेगाव मार्गे सुद्धा जाऊ शकता. त्यामुळे अंदाजे ३० ते ३५ किमी अंतर वाचेल.
पहाटे ४.३० ला एसटी महाडला पोहोचली. महाडवरून गाडी १ तासानंतर म्हणजे ५.३० वाजता सुटली. त्यामुळे आम्हाला सांदोशी गावात पोहचायला सकाळचे ६.३० वाजले. महाड आणि माणगाव वरून सांदोशी साठी आणि सांदोशीवरून परतीची किती वाजताची एसटी आहे, त्याचे वेळापत्रक मी शेवटी दिले आहे.ट्रेकला सुरवात :
तुम्हाला वाट माहित नसेल तर गावातून वाटाड्या घ्यावा, अन्यथा तुम्ही वाट चुकू शकतात. कारण गडाखालील भागात खूप जंगल असल्यामुळे अनेक ठिकाणी वाटा जातात. त्यामुळे तुम्ही वाट नक्कीच चुकणार.
सकाळी ६.३० वाजले होते, थंडीचा हंगाम असल्यामुळे अजून उजाडले नव्हते. त्यामुळे आम्ही गावातील मंदिरात थोडी तासभर विश्रांती घेतली, तोपर्यंत उजाडलं होतं. गाडी जिथे थांबते तिथेच एक घरगुती लहान दुकान होते. तिथेच नाश्ता करुन आम्ही सकाळी सव्वा आठला ट्रेकला सुरवात केली.
त्या दुकानापासून एक रस्ता वर गावात जातो त्या रस्त्याने आम्ही चालू लागलो. कारण गडावर जाण्यासाठी गावातूनच वाट जाते. गावातून सरळ गेलो असता, एके ठिकाणी डावीकडे वळून गावाच्या बाहेर वाट जाते. ह्या वाटेने आपण गावाच्या बाहेर असलेल्या एका घराजवळ पोहोचतो. गावातून ह्या घरापर्यंत पोहचायला आम्हाला १० मिनिट लागले. इथपर्यंत पोहचलो म्हणजे आपण गावातून बरोबर वाटेवर आलो.
ह्या शेवटच्या घरापासुन थोड्या अंतरावर कच्चा रस्ता लागतो. घरापासून गेलेली ही वाट, कच्चा रस्ता ओलांडून पलीकडे जाते. तिथे पलीकडे कच्च्या रस्त्यालाच पायवाटेच्या बाजूला दुर्गप्रेमींने एका दगडावर पांढर्या रंगात दिशा दर्शक बाणाचे चिन्ह केले आहे. इथून ते गडावर पोहचेपर्यंत आपल्याला वाटेत, असे दिशा दर्शक बाण दिसतात. त्यामुळे वाट शोधायला सोपे जाते.
पण आमचा नेमका हा पहिला बाण चुकल्यामुळे आम्ही वाट चुकलो. त्यामुळे आमचा १ तास खालीच वाट शोधण्यात वाया गेला. आम्हाला वाटेत एक मावशी भेटल्या निर्मला भाटोळे, त्या चुलीसाठी लाकूड तोडायला आलेल्या होत्या. त्यांनी आम्हाला पुन्हा त्या शेवटच्या घरापासून वाट दाखवत, पुढे एके ठिकाणी जिथे गडाखालील जंगलातून वाट जाते त्याच्या तोंडाशी आणून सोडले. तो पर्यंत ९.३० वाजले होते.
मावशीने आम्हाला इथे नीट सुचना दिल्या. कसं जायचे. इथून आम्ही मावशींचे आभार मानून पुढे चालू लागलो. कारण जिथे मावशीने आम्हाला सोडला तिथून गडाखालील जंगल लागते. मावशीने आम्हाला कुठं पर्यंत सोडले, त्यासाठी तुम्ही माझा youtube वरील व्हिडीओ पहा त्यावरून तुम्हाला अंदाज येईल.
जंगलातून वाटेत दिशा दर्शक बाण असल्यामुळे, आम्हाला वाट मिळत गेली. काही ठिकाणी गवतामुळे बाण लगेच दिसत नाहीत, पण जर वाट चुकलोच तर जंगलात शिरल्यावर आपल्याला एक लक्षात ठेवायचे आहे. आपल्याला एकदम सरळ डोगराचा दिशेने वर न चढता, डावीकडे आपल्याला घळीच्या दिशेने चालत जायचे आहे आणि ही वाट सतत मध्ये-मध्ये थोडी खाली तर कधी वर होते. अशी करत आपल्याला घळीत आणून सोडते. आम्ही एक तासात घळीत पोहचलो. घळ लागली की मग आपण घळ चढून कावळ्या-बावळ्या खिंडीत पोहचतो. आम्हाला घळ चढायला पाऊण तास लागला.
कावळ्या-बावळ्या खिंड:
सकाळी ११.२० ला आम्ही खिंडीत पोहचलो. खिंडीत पोहचल्यावर आपल्याला खिंडीच्या तोंडावर वाटेत दोन्ही बाजूला दगडाची भिंत दिसते. इथे घळी मधून आपल्याला वाटेत झाडे-झुडपांना रिबीन लावलेल्या दिसतात. पूर्ण गडावर पोहचेपर्यंत आपल्याला त्या रिबीन दिसतात.
खिंडीत पोहचल्यावर, उजवीकडे एक वाट गडावर जाते. तर समोर आपल्याला थोडी मोकळी जागा दिसते. तिथे पाषाणाचा देव आहे ह्याला टाळ देव म्हणतात आणि त्याच्या पुढे आपल्याला एक वाट पुणे जिल्ह्यातील गारजाई गावातून आलेली दिसते.
आम्ही थोडा वेळ विश्रांती घेऊन पुन्हा उजवीकडे गड चडू लागलो. ६-७ मिनिटाची चढाई करून आम्ही छोट्याश्या पठारावर पोहचलो. आपल्याला समोर पुन्हा झुडपातून गडावर जाणारी वाट दिसते. इथून आपल्याला जरा खडा चढ लागतो. पण बाजूला झाडे-झुडपे असल्यामुळे चढते-उतरतेवेळी आपल्याला थोडी मदत होते. हा चढ चढुन, आपल्याला कातळ टप्पा लागतो. इथे थोडं सांभाळून चढायला लागते. पहिला छोटा कातळ टप्पा चढल्यावर आपल्याला लगेच कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. खिंडीतून वर गुहेत पोहचायला आम्हाला अर्धा तास लागला.
गुहा आणि टाक्या:
कातळ पायऱ्या चढून वर आल्यावर, डावीकडे आपल्याला गुहा लागते, तर एक वाट उजवीकडे गड माथ्यावर जाते. उजवीकडची वाट लगेच दोन चार पावलात संपते. आपल्याला गड माथ्यावर जाण्यासाठी तिथे कातळ चढायला लागतो, पण ही वाट जिथे संपते तिथेच थोड्याश्या खाली (खोलगट) आयताकृती लांब एक सुकलेली मोठी टाकी लागते. टाकी एकदम कडेला असल्यामुळे बाजूला खोल दरी दिसते.
आम्ही गड माथ्यावर आधी न जाता, गुहेत गेलो. आम्ही दुपारी १२.३० वाजता गुहेत पोहचलो. गुहेत ७ ते ८ लोक वस्ती करू शकतात. गुहेत आमच्या बॅग ठेवून आम्ही गुहेच्या पुढे असलेल्या टाकी बघायला गेलो. पहिली टाकी गुहेच्या बाजूला लागूनच आहे. ह्या टाकीतील पाणी पिण्यास वापरतात. टाकीतील पाणी काढण्यासाठी, टाकीच्या पुढच्या कातळाला मधोमध भोक केला आहे. त्यातून हात घालून पाणी काढता येते. पण टाकीजवळ जाते वेळी सांभाळून जायला लागते. कारण खाली दरी आहे आणि तिथे उभे राहायला जास्त जागा नाही.
ह्या पहिल्या टाकीच्या पुढे अजून दोन जोड टाके आहे. ह्या टाकी गुहे जवळून दिसत नाहीत. त्या थोड्या पुढे असल्यामुळे थोड्याशा आत आहेत. पण ह्या टाकीजवळ जाण्यासाठी, कातळावरून खूपच जपून जायला लागते. जरा सुद्धा पाय घसरला एकदम खाली दरीत पडू शकतो. (त्यासाठी मी दिलेल्या youtube लिंक वर जाऊन माझा व्हिडिओ पाहू शकता.) जोड टाकीतील, एक खांब टाकी आहे. खांब टाकीला सुद्धा पाणी काढण्यासाठी भोक आहे. दुसऱ्या टाकीत पण थोडं पाणी होत पण अर्धी टाकी बुजलेली होती. ह्या जोड टाकीतील, दोन्हीतील पाणी पिण्यायोग्य वाटत नव्हते.
ह्या टाकींच्या पुढे अजून टाकी नसावी. पुढे अजून काही आम्हाला नीट वाट दिसत नसल्यामुळे आम्ही इथून मागे फिरून गुहेजवळ पोहचलो. गुहेत थोडीशी पेटपूजा करून, ५ ते १० मिनिटे विश्रांती घेऊन. प्रणव आणि मी दोघेच गड माथ्यावर गेलो.
गडमाथा :
गुहेपासून आम्ही ५ मिनिटात गड माथ्यावर पोहचलो. माथ्यावर जाते वेळी काही ठिकाणी कातळ टप्पा जपून चढायला लागतो. आम्ही दुपारी १ वाजता गड माथ्यावर पोहचलो.
गड माथ्यावरून आपण खालील सांदोशी गावाच्या दिशेने पाहिले असता, आपल्याला समोर दुर्ग दुर्गेश्वर रायगड दिसतो. तर डावीकडे दूरवर दोन डोगंराच्या V आकाराच्या मधून लिंगाणा किल्ला दिसतो. पाठी मागे आपल्याला पुणे जिल्ह्यातील डोंगररांग दिसते. तर पुढे सांदोशी गावाच्या बाजूला कोकणातील रायगड जिल्हा लागतो.
गड उतरतेवेळी आम्ही अडीच तासात उतरलो. सांदोशी गावात वीरगळ आहेत, पण आम्हाला संध्याकाळी शेवटची ५ ची महाड एसटी पकडायची होती आणि आम्ही बरोबर त्यावेळेत पोहचल्यामुळे, वीरगळ पाहू शकलो नाही. वीरगळ पाहायच्या असल्यास गावातील लोकांना विचारावे.
एसटीचे वेळापत्रक सांदोशी साठी
मुंबई बोरिवली नॅन्सी कॉलनी (Nancy Colony)- सायन- कुर्ला नेहरूनगर- महाड-पाचाड- सांदोशी
रात्री १० वाजताची, सकाळी ४ ला महाडला पोहचते आणि रायगड किल्ल्याच्या रोपवे जवळून परतून पुन्हा पाचाडमार्गे ६.३० ला सांदोशी पोहचते.
महाड ते सांदोशी वेळापत्रक
सकाळी ८, दुपारी १ आणि शेवटची ३. ३०ची आहे.
सांदोशी ते महाड वेळापत्रक
सकाळी ६.३०, ९.३०, दुपारी ३ आणि संध्याकाळी ५ ची शेवटची
गावात गेल्यावर खात्री साठी परतीच्या एसटीची वेळ विचारून ठेवणे.
माणगाव ते सांदोशी पुनाडेगाव मार्गे
सकाळी ७. १५ आणि दुपारी ३. ३० वाजता.
(ह्या एसटी १३ फेब्रुवारी २०२१ पासून सुरु केल्या होत्या. त्या चालू आहेत कि नाही खात्री साठी एकदा माणगाव एसटी डेपो ला फोन करून विचारणे.)
कोकणदिवा ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE लिंक वर क्लिक करा
गडावर वाट जंगलातून कशी जाते आणि पुढे कसं घळीतून खिंडीत पोहचावे ते केवळ नि केवळ दाखवण्यासाठी अंदाजे पिवळ्या रंगाच्या रेषेत दाखवले आहे. (विशेष सूचना: हि रेष अंदाजे दाखवली आहे, वाट तशीच जात नाही) |
कच्च्या रस्त्याला ओलांडून वाट पलीकडे जाते, तिथे रस्त्याजवळ वाटेच्या बाजूला |
बाण केलेला आहे. इथून आपल्याला वाटेत बाण भेटत जातात.
कोकणदिवा ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE लिंक वर क्लिक करा
https://youtu.be/ZNdXQm9BRCg
https://youtu.be/ZNdXQm9BRCg