Tuesday, 25 December 2018

Pabargad, पाबरगड

 पाबरगड 
 


पाबरगड ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  

गेले दोन वर्ष प्रणव आणि माझा पाबरगड करायाचा विचार होता. शेवटी रविवार दिनांक २४ नोव्हेंबरला आम्हाला मुहूर्त सापडला. ह्या वेळी आमच्या दोघांसोबत ट्रेकचा माझा जुना मित्र विनायक आणि त्याची १२ वर्षाची मुलगी विधी होती.आम्ही फक्त चौघच होतो. त्यामुळे आम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट ने जवावयाचे होते. 

गुहिरे हे पाबरगडचा पायथ्याचं गाव, भंडारदराचा विल्सन धरणाच्या पुढे आहे. भंडारदरा धरणाचा दरवाजा समोर आल्यावर, रस्त्याला समोर पूर्ण डोंगर आडवा दिसतो. तोच हा पाबरगड. विशेष म्हणजे पाबरगड आपल्याला गुहिरे गावातून पूर्ण दिसत नाही. गावातून केवळ गडाचं शिखर दिसते. गावातून जेव्हा आपण ट्रेक करत डोंगराच्या सोंडेवर पोहचतो तेव्हा पूर्ण गड दिसू लागतो.

गुहिरे पर्यंतचा प्रवास
पाबरगडसाठी तुमची खाजगी गाडी असेल तर उत्तम. कारण मुंबई ते गुहिरे अंतर १८२ किमी आहे. त्यामुळे प्रवासाला ४ ते ५ तास लागतात. पण आम्हाला खाजगी गाडी परवडणारी नव्हती. त्यासाठी आम्ही इगतपुरी किंवा घोटी वरून पुणे, संगमनेर आणि अकोले ला भंडारदरा, राजूरमार्गे जाणारी भेटेल ती एसटी पकडणार होतो. पण आम्हाला सकाळी ५ ची इगतपुरी-घोटी-पुणे एसटी आहे, अस कळलं. मग आम्ही तीच पकडायची ठरवलं. 

ऐनवेळी ट्रेक ठरवल्यामुळे आम्हाला मेल एक्सप्रेसच आरक्षण मिळालं नाही. त्यामुळे आम्ही रात्री शेवटची कसारा लोकल ट्रेन पकडून, कसाऱ्यावरून पुढे इगतपुरीला थांबणारी कुठची हि एक्सप्रेस ट्रेनने इगतपुरीला उतरणार होतो. नाही तर कसाऱ्यावरून इगतपुरी किंवा घोटीसाठी जीप वैगरे भेटेलच असा विचार केला. त्याप्रमाणे आम्ही शनिवार २३ नोव्हेंबरला १२. १५ ची शेवटची सीएसमटी-कसारा धीमी लोकल आपआपल्या स्थानकावरून पकडली. लोकल कसाऱ्याला अर्धातास उशीरा पोहल्यामुळे ३. ३० वाजले.  त्यामुळे आम्हाला पुढची कुठचीच एक्सप्रेस ट्रेन भेटली नाही.

आम्ही कसारा स्टेशन बाहेर जीप किंवा काही वाहन भेटते का बघू लागलो. पण बराच वेळ काही भेटला नाही. चार वाजल्यानंतर हळूहळू नाशिकला जाणाऱ्या गाड्या येऊ लागल्या. पण कोणी आम्हाला घोटीला सोडायला तयार होईना. शेवटी एक टॅक्सी वाला घोटीला जात होता, त्याने प्रत्येकी ७० रुपये भाडे घेऊन सोडतो बोलला. आम्ही चौघेच होतो पण तिथे हरिहरला जाणारे ५ मुलं होती आणि अजून एक दुसरा माणूस असे मिळून १० जण झाले.

आम्ही कसारा वरून २५ मिनटात घोटीला पोहचलो. साधारण पहाटेचे ४. ४० झाले होते.  सकाळी ५ ची इगतपुरी- पुणे एसटी ५. १५ ला घोटीला येते. आम्ही सकाळी ६. ४५ ला आम्ही गुहिरेला पोहचलो. कसारा ते गुहिरे एकूण अंतर ६७ किमी आहे. एसटीने आम्हाला एकतास वीस मिनटं लागली. एसटीने प्रत्येकी ४४ रुपये तिकीट घेतली.

मुंबईला परतते वेळी आम्हाला एसटीची वेळ माहित नव्हती. पण येते वेळी काही ना काही तरी गाडी भेटते. फक्त एवढंच तुम्हाला गाडी बदलत जावावयास लागते.  परत जातेवेळी आम्ही गुहिरे वरून छोटा टॅम्पोने शेंडी गावात गेलो. तेथून घोटी साठी शेअर गाडी भेटतात. ते प्रत्येकी ५० रुपये घेतात. घोटी वरून कसारा साठी शेअर गाडी ने ५० रुपये घेतात. अस करत आम्ही कसारा पोहचलो.

आम्ही मुंबई ते पाबरगड आणि परतीचा प्रवास कसा केला थोडक्यात 

 मुंबई ते कसारा  - सिएसमटी ते कसारा १२. १५ ची शेवटची लोकल ट्रेन
 कसारा ते घोटी  - शेअर टॅक्सी प्रत्येकी ७०रुपये दिले.
 घोटी ते गुहिरे    - सकाळी ५. १५ ची इगतपुरी-घोटी-पुणे एसटी घोटी आगार मध्ये येते. 
                           सकाळी ५ वाजता इगतपुरी वरून सुटते.
                           घोटी ते गुहिरे पर्यंत अंतर ४०. ७ किमी आणि तिकीट ४४ रुपये

परतीचा प्रवास करते वेळी 
गुहिरे ते शेंडी पर्यंत  - कुठच्या हि छोटा ट्रकवाला सोडत. प्रत्येकी १० ते २० रुपये घेतात. 
शेंडी ते घोटी           - शेअर गाडीने प्रत्येकी ५० रुपये
घोटी ते कसारा        - शेअर गाडीने प्रत्येकी ५० रूपये
            

ट्रेकला सुरवात
सकाळची थंडी लागत होती. गावातल्या दोन मुलांनी एसटी थांब्याजवळ केलेली पेंड्याची शेकोटी थोडावेळ घेऊन. सात वाजता ट्रेकला सुरवात केली.

गुहेरी एसटी थांब्याचा बाजूने गावात डांबरी रस्ता जातो. रस्त्याने आत गेलो असता सरळ आपण मारुतीच्या मंदिराजवळ पोहचतो. ह्या मंदिराच्या बाजूने उजवीकडे एक वाट गावाच्या पाठी जाते. त्या वाटेने जावे. पण त्या आधी आम्ही मंदिराच्या बाहेर असलेल्या वीरगळ बघितल्या आणि पुढे गडाच्या दिशेने चालू लागलो.
गावातून जाताना काही २/४ बंद घरांचे जोते बघितल्यावर जुन्या काळातील वाटत होते. त्यामुळे ती घर जुन्या काळातील वाटत होती.

मंदिराच्या उजव्या बाजूने, एक मोठी वाट सरळ जाते. ती पुढे जाऊन एका घरा समोर रस्ता संपतो आणि वाट डावीकडे वळते. त्या वाटेने आपण गावाच्या पाठी मागे जातो. तिथून पुढे आपल्याला शेतातून सिमेंटची टाकीच्या बाजूने वाट वर डोंगरात जाताना दिसते. त्या वाटेने आम्ही चालू लागलो. सुरवातीला आम्ही बरोबर गेलो. नंतर पुढे आमची वाट चुकली. कारण टाकीचा बाजूने वर चढल्यावर पुढे वाटेला वाट फुटत होती. त्यामुळे कळत नव्हता नक्की कुठची वाट कुठे जाते. त्यामुळे आम्ही वाट चुकलो. मध्ये एक मेंढपाळ काका भेटले. त्यांनी लांबून अस असं जा आणि आंब्याचा झाडाकडून उजवीकडे जा सांगितलं. तसा गेलो, तरी आम्ही वाट शोधतच गेलो. शेवटी एका मोकळ्या जागी पोहचलो. तिथून आम्ही मग सोंडेचा टोकाला जाऊन तिथून वाट चढायचा ठरवलं. कारण आम्ही वाचलेल्या ब्लॉग मध्ये बरेच जणांनी सोंडेवरून वाट गडावर जाते, अस लिहिले होता. त्याप्रमाणे आम्ही सोंडेच्या दिशेने जाऊन. सोंड चढायला सुरवात केली.आणि आम्हाला वाट सापडली. पण ह्या सर्व गोष्टीत आमचा अर्धा ते पाऊण तास वाया गेला.

सोंडेवर पोहचताच आपल्याला उजवीकडे आडवा पाबरगडचा मुख्य डोंगर दिसायला लागतो. आणि खाली भंडारदरा धरणाचा पसरलेला जलाशय. 

सोंडेवरून एकदम सरळ खडा चड लागतो. सकाळचा दवमुळे गवत ओल असल्यामुळे, आमचे पाय सरकत होते. हा चड चडून आम्ही १० मिनटा पहिल्या डोंगराच्या शिखर माथ्यावर वर पोहचलो. इथून अजून पाबरगडचा मुख्य डोंगर पुढे होता. त्यासाठी आम्ही पुढे चालू लागलो. डोंगरावर आल्यावर, आपल्याला समोर डोंगराची कातळ टोपी किंवा डोंगराचा दुसरा शिखर लागतो. ह्या कातळाच्या बाजूने उजवीकडून वाट पुढे गडाकडे जाते.  कारण वाट कडेने जात असल्यामुळे जरा जपून  जायायला लागते. त्यामुळे उजवीकडे खाली दरी लागते. त्यात डोक्यापर्यंत गवत असल्यामुळे पुढची वाट लगेच दिसत नाही. 
हि वाट कातळटोपीचा डोंगर जेथे संपतो आणि पाबरगडाचा डोंगर लागतो. त्या घळीमधून उजवीकडे पाबरगडावर जाते. कातळाटोपीच्या बाजूचा वाटेने घळी मध्ये पोहचायला आम्हाला २० मिनटं लागली.
तिथून आम्ही ९. ३० वाजता उजवीकडे वर पाबरगडचा मुख्य डोंगर चडू लागलो.

पाबरगडाचा डोंगर चढायला लागल्यावर आपल्याला एक कातळाचा पॅच (टप्पा) लागतो. हा पॅच चढायला नेहमीच्या ट्रेकरला इतका अवघड नाही. पण जपूनच चढायला लागतो. हा पॅच चडून वाट वर चढत गेल्यावर, वरती आपल्याला गडाचा कातळ (किंवा कातळटोपी) लागतो. तो चडून गेल्यावर आपण पाच मिनटात गडमाथ्यावर पोहचतो.

गडावरील गुहा अथवा गुहेतील टाकी
पण त्याचा अगोदर ह्या कातळाच्या बाजूने उजवीकडे एक वाट गुहे जवळ जाते.  गुहेपर्यंत पोहचेपर्यंत दहा वाजले. ह्या दोन गुहा बाजूबाजूला आहेत.
ह्या दोन्ही गुहा बघितला वर नेसर्गिक वाटतात. त्यातली पहिला गुहा पूर्णपणे कोरडी होती. पण गुहेत आत एक छोटी आडवी पण साधारण १ फूट खोल सुकलेली टाकी आहे. त्याचाच पुढे दुसरी गुहा होती. त्यात पाणी होते. त्या गुहेत शिरल्यावर डाव्या बाजूला कातळावर एक लहान पिंड लागते, आणि त्याचा समोर जीर्ण अवस्थेत असलेला नंदी दिसतो. बाकी गुहेत साधारण अर्धाफुट खोल एवढं पाणी साचलेला होता. पाणी स्वछ दिसत होता. त्यामुळे आम्ही ते पाणी पियावयास घेतले.
गड माथा
गुहा बघून पुन्हा जिथे गडाचा कातळ (कातळटोपी) लागतो तिथे आलो. इथून वाट वर कशी जाते कळत नाही. कारण समोर फक्त कातळ दिसतो वाट दिसत नाही. पण वाट कातळावरून कडेने उजवीकडे जाते. आणि मग डावीकडे कडेने वर जाते. हिथे हि एकदम छोटा पॅच लागतो. हा पॅच चडून आल्यावर, आपल्याला वर कातळातल्या पायऱ्या लागतात. आणि उजवीकडे बहुतेक उध्वस्त बुरजाचा अथवा चौकी (किंवा घराचा) चौथऱ्याचा पायथ्या दिसतो. इथून आपण पाच मिनटात गड माथ्यावर पोहचतो.

गडावरील मंदिर
सकाळी १०.३० ला आम्ही गडाच्या माथ्यावरील मंदिराजवळ पोहचलो. मंदिर उघड्यावर आहे.
मंदिराची बाजूची दगडाची भिंत साधणारं गुडघ्यापर्यंत अजून साबूत आहे. मंदिरात तांदळा स्वरूपातील शेंदूर लावलेला एक मोठा देव आणी शेंदूर लावलेली गणपतीची प्राचीन मूर्ती हि दिसते. आम्ही मंदिरात गेलो नाही. कारण गावातील काही लोक तिथे काही विधी करत होते. त्यामुळे आम्ही बाहेरूनच मंदिर बघितलं.
मंदिराला लागूनच, पाठी पाच सहा टाक्यांचा समूह लागतो. त्यातील ३ टाकीत पाणी होत. पण पाणी पिण्यायोग्य वाटत नव्हते. ह्या टाकीच्या बाजूने, वाट पुढे हनुमानाच शिल्प असलेल्या टाकीकडे जाते. तर मंदिराचा बाजूने एक वाट डावीकडे गडाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या टाक्यांकडे घेऊन जाते. तर एक वाट समोर गडाच्या सर्वोच्च माथ्यावर जाते.

गडाचा सर्वोच्च शिखर/माथा
आम्ही पहिला गडाचा सर्वोच्च माथ्यवर गेलो. मंदिरापासून पाच मिनटात माथ्यावर पोहचलो. सर्वोच्च माथ्यावर दगडाच्या पडक्या भिंतीच उघड्यावर असलेल एक छोटास मंदिर आहे. ह्या मंदिरात हि लहान तांदळा स्वरूपातील शेंदूर लावलेला देव दिसतो. बाकी ह्या माथ्यावर काहीच अवशेष आढळत नाही. पण माथ्यावरून आपल्याला भोवतालच्या परिसराचा सुंदर दर्शन होत.
एकीकडे कळसुबाई पर्वत रांगेतले कळसुबाई पर्वत, अलंग, मदन आणि कुलंग गड दिसतात. खाली भंडारदरा धरणाचा जलाशय दिसतो. तर थोडा डावीकडे रतनगड आणि त्याचा खुट्टा दिसतो. तर एकीकडे खाली भंडारदरा परिसर दिसतो.

गडावरील इतर टाकीचे वर्णन
सर्वोच्च माथ्यावरून पुन्हा खाली मंदिराजवळ येऊन, आम्ही डावीकडील वाटेने चालू लागलो. 
हि डावीकडील वाट बहुतेक सर्वोच्च माथ्याचा टेकाडला पूर्ण प्रदिक्षणा घालून, हनुमंताचे शिल्प असलेल्या टाकीकडून उजवीकडचा वाटेने पुन्हा मंदिराजवळ येते. असे आम्हाला गडावर असलेला गाववाला सांगत होता. पण आम्ही डावीकडून टाकी बघून पुढे गेलो असता. आम्हाला वाट सापडली नाही. कारण गवत आमच्या डोक्यापर्यंत वाढलं असल्यामुळे पुढे वाट दिसत नव्हती. त्यामुळे आम्ही पुन्हा पाठी फिरून डावीकडील वाटेनेच परत मंदिराजवळ आलो.

डावीकडील वाटेने जाते वेळी पहिली टाकी लागते, ती गुहेसारखी वाटते. तिला 2 चौकोनी छोटं तोंड आहे, पण आतून टाकी बुजलेली दिसत होती. एका बाजूला गडूळ पाणी दिसते पण ते हि जास्त खोल दिसत नव्हतं.

ह्या टाकी बघून आम्ही पुढे गेलो. पुढे वाट उजवीकडे वळते. तिथे अजून दोन टाकी लागतात. त्याचा बाजूलाच उजवीकडे काहीच पावलांवर अजून दोन टाकी लागतात. तिथून पुढे वाट जाताना दिसते. पण मी वर सांगितल्याप्रमाणे आम्ही पुन्हा त्याच वाटेने पाठी फिरून मंदिराजवळ आलो.

हनुमंताचे शिल्प असलेली टाकी
मंदिराला लागून असलेल्या टाकीच्या बाजूने उजवीकडे वाट दोनचार मिनटात हनुमंताच शिल्प असलेल्या टाकीकडे जाते. टाकी भरलेली होती पण पाणी पिण्यायोग्य वाटत नव्हते. हनुमंताचे  शिल्प एक ते दीड फूट उंचीच असून टाकीच्या वर कातळाचा भिंतीवर साधारण १० फुटावर असेल. मूर्तीच्या बाजूला छोट्या कातळ पायऱ्या दिसतात तिथं पर्यंत पोहचण्यापर्यन्त.

वर सांगितल्याप्रमाणे, गाववाल्याचा म्हणण्या नुसार डावीकडील वाट फिरून ह्या बाजूला उजवीकडे येते. पण आम्हाला तरी दिसली नाही.

टाकीच्या बाजूने पुढे वाट थोडी खाली जाताना दिसते. हि वाट आपल्या उजव्या बाजूला बाहेर दिसणारी डोंगराची एक शाखा/ सोंड आली आहे. त्याचावर जाते.  तेथे हि १/२ टाकी आहेत. हि शाखा /सोंड गड माथ्याच्या उंची पेक्षा थोडा खाली असल्यामुळे ती तुम्हाला सर्वोच्च माथ्यवरून किंवा शिल्पच्या टाकीजवळून हि दिसते. वेळेच्या अभावी आम्ही तिथे पुढे गेलो नाही. तिथे जर गेलो असतो, तर अजून येऊन जाऊन वीस मिनटं लागली असती. 

तरी अजून एके ठिकाणी आमच्या दोन टाक्या बघायचा राहिल्या. प्रणवने नंतर गूगल मॅप वर बघितला असता त्याला दिसल्या. मॅप वर बघितलं असता त्या टाकीजवळ जाण्यासाठी आपण जेव्हा गुहेच्या वरती चडून माथ्यावर येतो. त्यावेळीच वरती आल्यावर एक वाट डावीकडे जाताना दिसते. बहुतेक तेथे असावेत. आम्ही ती वाट बघितली होती. त्यामुळे नंतर येऊन बघणार होतो. पण गड उतरण्याचा गडबडीत विसरलो.

गड उतरायला सुरवात
सव्वाबाराला आम्ही गड उतरायला सुरवात केली. ते आम्ही अडीच वाजता पुन्हा एसटी थांब्याला पोहचलो.
आम्हाला गड चढायला साडेतीन तास आणि उतरतेवेळी सव्वा दोन तास लागले. पण दोन्ही वेळी आमची वाट चुकली. नाही तर अजून अर्धा तास कमी लागला असता. ह्या ट्रेक साठी आम्हाला प्रत्येकी २५० रुपये खर्च आला.


पाबरगड ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  
https://youtu.be/Y3B7zuu4iww





 गुहिरे गावातून दिसणारा पाबरगडच्या शिखर
प्राचीन असे वाटणारे घराचे जोते/ चौथरे




सोंडेवरून गडावर वाट कशी जाते लाल तुटक रेषेने अंदाजे दाखवले आहे. अचूक दाखवता येत नसल्याने अंदाजे दाखविलं आहे.

भविष्यातील मोठी ट्रेकर विधी
ह्या कातळटोपीच्या बाजूने उजवीकडून पाठी दिसणाऱ्या पाबरगड कडे वाट जाते. खालील फोटोत वाटेतून जाताना काढलेला फोटो


विनायक, विधी आणि प्रणव

दुसऱ्या गुहेत असलेली महादेवाची पिंड आणि त्याचा सामोर भग्न अवस्थेत असलेला नंदी
 
कातळाच्या पायऱ्या आणि बाजूला दिसणारं बुरुज अथवा चौकीचा चौथरा



गडाची एक सोंड बाहेर येते. त्याच वर असलेली टाकी लाल वर्तुळात दर्शवली आहे

गड उतरतेवेळी

पाबरगड ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा