Wednesday, 11 July 2018

Aajobagad आजोबागड

 आजोबागड 

आजोबागडचा डोंगर



आजोबागड  ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  

आजोबागड करायची ही माझी दुसरी वेळ होती. प्रणव आणि विनयने हा ट्रेक केला नव्हता, म्हणून आम्ही हा ट्रेक करायचा ठरवला. खरे तर हा गड नसून फक्त डोंगर आहे. ट्रेकिंग मधल्या सोप्या श्रेणीतील ट्रेक. जास्त करून ट्रेकर, सीतामाईच्या पाळण्यापर्यंतच ट्रेक करतात. ट्रेकिंग किंवा ट्रेकर मुळे बहुतेक ह्याला आजोबागड म्हणत असावेत. मुळात ह्या डोंगराला आजा पर्वत म्हणतात.



आजोबा गड बद्दलची माहिती:
विकिपीडिया वर दिलेल्या माहिती नुसार "पुराणकथेनुसार, याच गडावर बसुन वाल्मिकींनी रामायण लिहिले. याच गडावर सीतामाईने लव आणि कुश यांना जन्म दिला. लव आणि कुश वाल्मिकींना 'आजोबा' म्हणत असत, म्हणूनच या गडाचे नाव आजोबागड असे पडले. गडावर वाल्मिकींचा आश्रम व समाधी आहे. बाकी येथे काही अवशेष आढळत नाहीत.

थोडक्यात प्रवास कसा करावा.
  • मुंबई वरून आसनगावला ट्रेन ने पोहचावे. 
  • आसनगाव वरून शहापूर एसटी डेपोत जावे. ह्या मधील अंतर ४ किमी आहे. 
  • शहापूर वरून देहेणे गावी जावे. त्याचे अंतर ४१ किमी आहे. 
  • देहेणे एसटी चुकली, तर शहापूर ते डोळखांब शेअर गाडीने प्रवास करावा.
  • शहापूर ते डोळखांब अंतर ३० किमी आहे
  • डोळखांब ते देहेणेसाठी दुसरी गाडी करायला लागते. डोळखांब ते देहेणे अंतर ११ किमी आहे.


प्रवासाचे वर्णन:
नेहमीप्रमाणे, मी सकाळी ५.२४ ची आसनगाव ट्रेन पकडली. विनय आणि प्रणव मला डोंबिवलीला भेटले. आम्ही आसनगावला ७.२० ला पोहचलो. आजोबागडच्या पायथ्याचे गाव देहेणेसाठी, शहापूर वरून एसटी पकडायची होती. त्यामुळे आम्ही आसनगाव रेल्वे स्थानकाबाहेर नाश्ता न करता शहापूर एसटी आगारच्या बाहेर नाश्ता करायचे ठरवले. आम्ही रिक्षा करून शहापूर एसटी डेपोत गेलो. आसंनगाव ते शहापूर ४ किमी अंतर १० मिनिटात पोहचलो. आगारात जाऊन आम्ही प्रथम एसटीची चौकशी केली असता, कळले डोळखांब पर्यंतची पहिली एसटी निघून गेली होती आणि आता पाऊणे नऊची एसटी आहे. आम्ही एसटी साठी न थांबता, नाश्ता करून शेअर गाडीने जायचे ठरले.
सकाळी ८ वाजले होते, त्यामुळे बहुतेक हॉटेल आणि दुकाने बंद होती. आम्हाला वाटले आसनगावलाच नाश्ता केला असता, तर बरे झाले असते. पण एक लहानसे हॉटेल चालू होते. मग तिथेच नाश्ता केला. नाश्ता करून आम्ही शेअर गाडी बघायला गेलो.

शहापूरवरून देहेणेसाठी थेट शेअर गाडी नाही. त्यासाठी तुम्हाला शहापूर ते डोळखांब, डोळखांब ते देहेणे असा गाडी बदलत प्रवास करायला लागतो.

त्या शेअर सुमो गाडीत १६ लोक भरेपर्यंत, आम्हाला पाऊणे नऊ वाजले. डोळखांबपर्यंत ३० किलोमीटरचा पाऊण तासाचा प्रवास कसा केला, ते आमचे आम्हालाच माहिती.

साडेनऊ वाजता, आम्ही डोळखांबला पोहचलो. डोळखांबवरून आम्हाला दुसऱ्यागाडी साठी थांबायला लागले नाही. कारण आमच्याबरोबर ट्रेन मध्ये असलेले, ६ जण आजोबालाच चालले होते. त्यांनी आसनगाव वरून देहणेपर्यंत १६०० रुपये देऊन गाडी केली होती. त्यामुळे आम्ही त्यांच्याच गाडीतून डोळखांब ते देहणेपर्यंत गेलो. परत येते वेळी त्यांनाच परतीचे २०० रुपये भाडे देऊन, त्यांचाच सोबतच आसनगावला आलो.  त्यामुळे आमचा वेळ वाचला.

त्यांचाच गाडीतून आल्यामुळे, आम्हाला जिथे आजा पर्वताच्या पायथ्यापर्यंत म्हणजेच वाल्मिकी आश्रम पर्यंत जाण्याचा घाट चालू होतो तिथपर्यंत पोहचलो. आम्ही दुसऱ्या गाडीने आलो असतो, तर आम्हाला देहेणे गावातून अंदाजे २ ते ३ किमी जास्त चालायला लागले असते. खाजगी गाडी वाले डोंगराच्या एकदम पायथ्यापर्यंत सोडतात.

डोळखांब ते देहेणे अंतर ९ किमी आहे. पण खराब रस्तामुळे आम्हाला २५ मिनिटे लागली. इथे पोहचेपर्यंत १० वाजले होते.

सव्वा दहाला आम्ही ट्रेक चालू केला, वर सांगितल्याप्रमाणे आश्रम पर्यंत कच्चा रस्ता असल्यामुळे न चुकता आश्रम जवळ पोहचता येते.

आश्रमचे वर्णन: 
पाऊण तासात म्हणजेच ११ वाजता आम्ही आश्रम पर्यंत पोहलो. आश्रमचा परिसर मोठा आहे.

आश्रमात वालीमिकी ऋषी समाधी मंदिर आहे, मंदिराच्या बाहेर, समोरच ४ मोठ्या वीरगळ ठेवल्या आहेत. वीरगळाच्या मागे दोन लहान आयताकृती पाषाणावर पादुका दिसतात. त्याच्या बाजूला लागूनच, चौकटी सारखे अजून ८ पाषाण ठेवले आहेत. ह्यातील १ पाषाण आयताकृती चौकट त्यावर चौकोनी चिन्ह आहे आणि  ७ पाषाणाचे टोक त्रिकोणी तर काहीच गोलाकार टोक आहे. हे पाषाण कसले आहेत ते कळत नाही. तिथेच पायऱ्यांच्या बाजूला एक लहान दगडी मंदिर लागते. मंदिरात बहुतके देवीची लहान मूर्ती आहे. समाधी मंदिराच्या उजव्या बाजूला थोड्या अंतरावर अजून दोन लहान मंदिरे आहेत. त्या मंदिरात शंकराची पिंड आणि दोन-चार मूर्ती आहेत. समाधी मंदिराच्या समोरून वाट खाली कुंडा जवळ जाते. त्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या उतरून दोन मिनिटात कुंडाजवळ पोहचता येते. कुंडाला आता सिमेंटची चौकट केल्यामुळ, ते कुंड न दिसता सिमेंटची टाकी वाटते. त्याच्या बाजूला अजून एक कुंड लागते, त्याला भिंत करून दरवाजा लावला आहे. बहुतेक ह्यातील पाणी प्यायला वापरत असावेत. हे त्यात टाकलेल्या पाइपवरून कळत होते.

आश्रमचा परिसर मध्ये भक्तांसाठी एक धर्मशाळा सुद्धा बांधली आहे.

आश्रम ते सीतामाईच्या पाळण्यापर्यंतच्या वाटेचे वर्णन:
आश्रमात नंतर येते वेळी थांबू असा विचार करून, आम्ही पुढे चालू लागलो. समाधीच्या डाव्या बाजूला, साधूबाबा राहतात. त्यांच्या घरामागून वाट सीतामाईच्या पाळण्याला जाते. वाट दर्शवण्यासाठी वाटेत ठिकठिकाणी दगडावर बाणाचे चिन्ह केलेली दिसतात. त्यामुळे तुम्ही न चुकता पाळण्यापर्यंत पोहचू शकता.

सीतामाईच्या पाळण्यापर्यंत पोहचेपर्यंत आम्हाला १२.१५ वाजले. आम्ही आश्रम पासून पाळण्यापर्यंत १ तासात  पोहचलो होतो.

सीतामाईचा पाळणा, टाकी आणि सुळक्यावर जाणाऱ्या वाटेचे वर्णन:
पाळण्याजवळ पोहचल्यावर, आपल्याला खिंडीत आल्यासारखे वाटते. त्याचे कारण म्हणजे आजोबा डोंगराचा सुळका आणि मुख्य डोंगराचा मध्ये फट असल्यामुळे, ह्या जागेत पोहचल्यावर आपल्याला एका बाजूला दरी दिसते तर त्याच्या विरुद्ध दिशेने आपण वर येतो. तिकडून आपल्याला समोरील डोंगर माथ्याचे दृश्य दिसते.

ह्या सुळक्याच्या गुहेतच पाळणा आहे. ती गुहा पाहून, ती गुहा नसून कातळाचा खोलगट खड्डा आहे असे दिसते. तिथे वर कोपऱ्यात पाळणा ठेवला आहे. त्या पाळण्याजवळ पोहचण्यासाठी १० फुटाची लोखंडी शिडी लावली आहे. पाळण्यापर्यंत थोडे काळजीपूर्वक चालत जायला लागते, नाही तर पडण्याची शक्यता जास्त आहे. पाळण्यासाठी आपण जेथून शिडी चढतो, तिथेच वर उजव्याबाजूला पाण्याची टाकी लागते तर डावीकडे पाळणा लागतो.

ह्या टाकीच्या पुढे उजवीकडे एक वाट वर जाताना दिसते. पण त्यासाठी टाकीच्या कडेने जायला लागते. ही वाट बहुतेक वरती सुळक्याच्या माथ्यावर जाते. त्यासाठी आम्ही पुढे जाऊन बघितले. जेथे वाट संपते तेथे कातळावर  चढून जायला लागते. पण त्या कातळाची उंची जास्त असल्यामुळे आणि काही दगड हलत सुद्धा होते. त्यामुळे तेथून टेकनिकल मदत शिवाय वर चढणे म्हणजे जीवाला धोका आहे. त्यासाठी आम्ही तेथून मागे फिरलो.

पण त्या वाटेत जिथे वाट वळते. तिकडे एक छोटीशी जागा आहे. तेथून आपल्याला खालील देहेणे गावाचे दृश्य तर समोर उजवीकडे रतनगड, साम्रद गाव दिसते.

पाळण्याच्या समोरच्या डोंगरात अजून एक टाकी दिसते. ही टाकी जेथे खिंडीत उभे राहतो. तेथे खालच्या बाजूला लागते. पण ती टाकी बघण्यासाठी थोडे वर चढायला लागते.

आम्ही १ वाजता गड उतरायला सुरवात केली. आणि नंतर मग आश्रम मध्ये आम्ही आणलेले जेवून परतीच्या प्रवासाला सुरवात केली. ह्या ट्रेकला आम्हाला प्रत्येकी २०० रुपये खर्च आला.


आजोबागड  ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  

 

आश्रम पर्यंत जाणारी वाट

आश्रम

वाल्मिकी ऋषी समाधी मंदिर आणि खालील फोटोत मंदिरासमोर असलेले वीरगळ आणि पद  चिन्ह आणि  ८ पाषाण




सीतामाईचा पाळणा

टाकीच्या  बाजूला विरुद्ध दिशेला असलेली टाकी. ह्या टाकीच्या कड्यावर पाय ठेवून पुढे जायला वाट लागते.


समोरच्या डोंगरात असलेली टाकी

कुंड


गुहेजवळून दिसणारे दृश्य
आजोबागड  ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  

No comments:

Post a Comment