सिद्धगड
नारिवली गावातून दिसणारे सिद्धगडाचे दृश्य. उजवीकडील डोंगर सिद्धगड आहे.
सिद्धगड ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE लिंक वर क्लिक करा
|
जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सगळीकडे
जोरदार पाऊस पडला होता, पण दुसऱ्या आठवड्यात पावसाने दांडी मारली होती.
म्हणून आम्ही १७ जुनसाठी दोन तीन पर्याय निवडले. त्यात मध्यम श्रेणीचा सिद्धगड करायचा ठरवले, पण
पावसाळ्यात सिद्धगडच्या बालेकिल्ल्यावर जाणे धोक्याचे आहे, म्हणून आम्ही
ठरवले की नाही जमले तर फक्त गुहेपर्यंत जाऊन येऊ. पण २ आठवडे जोरदार पाऊस न
पडल्याने, आम्हाला बालेकिल्ल्यावर जायला मिळाले.
ह्यावेळी
विनय आणि मी, आम्ही दोघेच होतो. त्यामुळे आम्ही बालेकिल्ला करू या
प्रयत्नानेच गेलो होतो आणि आम्ही बालेकिल्ला सर केला. ह्या अगोदर मी एक
ग्रुप सोबत सिद्धगड केला होता, पण फक्त माची पर्यंतच, कारण गुहेची वाट
भेटली नाही म्हणून ह्या वेळी पूर्ण किल्ला करायचा ठरवलेच होते.
प्रवास कसा करावा:
- मुंबई किंवा पुणे वरून ट्रेन ने कल्याणला उतरावे
- कल्याण ते मुरबाड एसटी पकडावी. ह्या मार्गावर सतत एक तासाने मुरबाडसाठी गाडी असते. कल्याण ते मुरबाड अंतर ३० किमी आहे. साधारण पाऊणतास ते एक तासात मुरबाडला पोहचतो.
- मुरबाड वरून नारिवली गावासाठी, देहरी गावाची एसटी आहे. नारिवली करता सतत २ तासाने मुरबाड वरून गाडी आहे.
- एसटी चुकली असता, एसटी स्थानकाबाहेरून म्हसा पर्यंत शेअर गाडी असतात ते प्रत्येकी २० रुपये घेतात.
- मुरबाड ते म्हसा १२ किमी अंतर आहे. आणि म्हसा ते नारिवली गाव ९ किमी आहे.
- म्हसा वरून नारिवली गावापर्यंत शेअर गाडी असतात. ते प्रत्येकी १० रुपये घेतात.
- नरिवली वरून येते वेळी शेअर गाडी ५.३०/६ नंतर बंद होतात. हे लक्षात ठेवावे नंतर तुम्हाला एसटीचा पर्याय आहे.
- नारिवली वरून मुरबाड साठी शेवटची एसटी ७. ४५ ची आहे.
कल्याण - मुरबाड- म्हसा -नारिवली
आम्हाला
मुरबाड एसटी स्थानकावरून सकाळी ७ किंवा ७.१५ ची देहरी साठीची बस पकडायची
होती. त्यासाठी मी करीरोड स्थानकावरून सकाळी ५ वाजता कर्जत लोकल पकडली आणि
६. २० ला कल्याण ला पोहचलो. पण कल्याण एसटी स्थानकात, एसटीचा १६ जून पासून
लागू झालेल्या भाडेवाढी मुळे, वाहकाची (कंडक्टर) तिकीटची यंत्रे अपडेट
करायची असल्यामुळे सगळ्या गाड्या उशिरा सुटत होत्या. त्यामुळे आम्हाला
मुरबाडला पोहचेपर्यंत ८ वाजले. आता देहरी साठी ९.४५ वाजताची एसटी होती.
त्यामुळे आम्ही एसटी साठी न थांबता, नाश्ता करून मुरबाड एसटी स्थानकाबाहेरून
सुटणाऱ्या शेअर गाड्याने म्हसाला गेलो. आणि म्हसा वरून पुढे देहरी आणि
नारीवली गावासाठी जाणाऱ्या शेअर गाडीने नारिवलीला पोहचलो.
मुरबाड
ते म्हसा आम्ही २० मिनिटात पोहचलो. म्हसा ते नारीवली २०-२५ मिनटे लागली.
नारिवली पोहचे पर्यंत ९.४० वाजले. आम्ही नारिवली गावातून ९. ४५ ला ट्रेक
सुरु केला, बालेकिल्यावर पोहचेपर्यंत आम्हाला साडेचार तास लागले.
नारिवली गावातून धापडपाडा गावात पोहचायला सव्वा तास लागतो. खरे पाहायला गेले तर
धापडपाडा सिद्धगडचा पायथ्याचे गाव आहे. कारण गड चढायला सुरवात येथूनच होते
पण गावात कच्चा आणि अरुंद रस्ता जात असल्यामुळे ह्या गावापर्यंत चालत यायला
लागते. पण अजून काही वर्षात बहुतेक जर पक्का रस्ता झाला आणि गाडी ह्या
गावापर्यंत आली तर ट्रेकचा तेवढा वेळ कमी होईल.
नारिवली गाव ते धापडपाडा:
नारिवली गावातून आपण १० मिनिटात चालत गावाच्या बाहेर येतो. जेथे गाव संपतो तेथे
मातीचा कच्चा रस्ता धापड पाड्यापर्यंत जातो. पण रस्त्याला मध्येमध्ये शेतात
जाणारे किंवा दुसरीकडे जाणारे इतर रस्ते ही लागतात. त्यामुळे आपण चुकू
शकतो. बहुतेक गावातील शेतकरी ट्रॅक्टर ने शेती करत असावे, म्हणून शेतात
रस्ते जातात. पण आम्हाला वाटेत शेतात काम करणारे गाववाले भेटले म्हणून
आम्ही न चुकता गेलो. दोन तीन वर्षापूर्वी धापड पाडा अगोदर मोठा ओढा ओलांडून
जावा लागत असे. आता ह्या ओढ्यावर पूल बांधला असल्यामुळे सोयीस्कर झाला
आहे. पूल पार करताच आपण धापडपाडा गावात पोहचतो.
धापडपाडा ते सिद्धगड माची:
धापडपाड्यातून सिद्धगड माची पर्यंत जाण्याकरता बऱ्यापैकी वाट रुळलेली आहे.
त्यामुळे तुम्ही न चुकता माचीपर्यंत पोहचता. तसेच काही ठिकाणी वाटेत
वनविभागाने वन्यपशूंची माहिती देणारे मोठे फलक लावलेले आहेत. सिद्धगड आणि
त्याचा बाजूचा डोंगर त्याचा मध्ये एक V आकार आहे. त्याच घळेच्या दिशेने वाट
वर जाते. साधारण तासाभरात धापड पाड्यापासून वर चालून आल्यावर, एक मोठा ओढा
लागतो. ह्या ओढयाच्या पलीकडे समोरून वाट वर जाते. पावसाळ्यात हा ओढा ही
भरून वाहत असल्यामुळे, ओढा पार करायला, ओढ्यात दगड रचून वाट केलेली दिसते.
ओढ्यापासून
सिद्धगड माची (दरवाजा) पर्यंत अर्धा ते पाऊण तासाचा खडा चढ लागतो. ओढा पार
करून वर आल्यावर, १५-२० मिनिटाने आपल्याला उजवीकडे वाटेच्या थोड्या बाजूला
कातळात खोदलेली, जमिनीचा सपाटीलाच एक छोटी टाकी लागते. ह्या टाकीतील पाणी
माची वर राहणारे लोक गड चढते किंवा उतरतेवेळी पिण्यासाठी वापरतात.
ह्या
टाकी पासून अजून ५-१० मिनिटे वाटेला चाललो असता डावीकडे वाटेचा थोड्या वर,
बाजूला कातळात अजून एक टाकी लागते. ह्या टाकी ला ६ कातळाच्या पायऱ्या
आहेत. टाकीतील पाणी पिण्यायोग्य वाटत नव्हते. ह्या टाकी पासून थोडा वर
चढून गेलो असता, ५ मिनिटात आपण गडाच्या मुख्य दरवाजा जवळ पोहचतो.
म्हणजेच
आपण माची वर पोहचतो. दरवाजा समोर लहान पठार आहे, त्यावर एक लहान दगडी
मंदिरासारखे रिकामी मंदिर दिसते. आम्ही तेथे उतरतेवेळी गेलो. ह्या
पठारावरून समोर सिद्धगड कडे पहिले असता आपल्याला डावीकडे गुहा दिसते. ह्या
गुहे जवळ पोहचायला वाट दिसत नाही.
सिद्धगड माची वर पोहचल्यावर:
दरवाजातून
वाट उजवीकडे फिरत सिद्धगड माची गावात जाते. थोडे आत चालत आल्यावर,
आपल्याला वाटेत बाजूला डावीकडे १ मोठी पूर्ण आणि १ तुटलेली लहान वीरगळ
दिसते. ह्या वीरगळ जेथे आपल्याला दिसतात, त्याच्या वरती आपल्याला एक मंदिर
दिसते. तेथे अजून १०-१५ वीरगळी दिसतात. काही तुटलेल्या तर काही अखंड
आहेत. तिथेच मंदिराच्या बाहेर एके ठिकाणी शंकराची पिंडी आणि काही मुर्त्या
ही ठेवलेल्या आहेत. त्याच्या जवळच एक तुटलेली तोफ ही आहे. पण ह्या
मंदिराजवळ जाण्यासाठी थोडे पुढे जाऊन वरती वाट लागते. जेथे आपल्याला
सुरवातीला वाटेत वीरगळ दिसते तेथून वाट नाही. त्यामुळे आम्ही उतरतेवेळी
ह्या वीरगळी आणि मूर्ती पाहिल्या.
वाडीकडे
जाते वेळी रस्त्यात डाव्याबाजूला थोडा उंचावर दगडी भांडे असा झाडाला फलक
लावलेला दिसतो. तेथे एका दगडात भांड्यासारखा खड्डा केलेला दिसतो. ते पाहून
आम्ही पुढे चालू लागलो असता, वाटेत डावीकडे अशाच एका झाडाला "दगडी गोळे "
म्हणून फलक लावलेला दिसतो आणि तेथून एक वाट डावीकडे पाठीमागे वाट झाडातून
जाताना दिसते. त्या वाटेने आत गेलो असता, झाडांमध्ये एका मोकळ्या जागेत गोल
आकाराचे, दगडाचे ८ गोळे दिसतात. त्याच्या बाजूलाच भग्न अवस्थेतला एक नंदी
बैल सुद्धा दिसतो. त्याचा समोरच आंब्याच्या एका मोठ्या झाडाखाली छोटा
दगडाचा बांध आहे. त्यात तांदळा स्वरूपाचा शेंदूर लावलेला देव दिसतो. ते
पाहून पुन्हा मुख्य वाटेला येऊन आम्ही सिद्धगड वाडी गावात गेलो.
गावात
पोहचेपर्यत आम्हाला १२.४५ वाजले होते. अजून आम्हाला बालेकिल्ल्यावर जायचे
होते. त्यामुळे आम्ही १० मिनिटात थोड खाऊन आणि आराम करून बालेकिल्ल्याच्या
दिशेने चालू लागलो.
बालेकिल्ला आणि गुहा:
बालेकिल्ला
किंवा गुहेकडे जाण्यासाठी तुम्हाला गावात जाण्याची गरज नाही. गावात
पोहोचायच्या थोडे अगोदर डावीकडे, पाठी एक वाट आत झाडा-झुडपातून जाताना
दिसते. त्यावाटेच्या बाजूलाच डावीकडे एक लहान फलक लावला आहे. झाडामुळे तो
पटकन दिसत नाही. बालेकिल्ल्याची वाट पायथ्याच्या झाडाझुडपातून वर
किल्ल्यावर जाते. त्यामुळे पायथ्याला वाट चुकण्याची खूप शक्यता आहे. त्यात
मुख्य कारण वाटेला मध्ये मध्ये अजून फाटे फुटतात, त्यामुळे तुम्ही
चुकू शकता. त्यामुळे आम्ही गावातील एका मुलाला विचारला. त्याने आम्हाला
त्या वाटेने, एका आंब्याच्या मोठ्या झाडाजवळ आणून सोडले. तिकडून त्याने
आम्हाला सरळ वर चालत जायला सांगितले. तिकडून सुद्धा ,वाट झुडपातून शोधणं
जरा अवघड होता. पण त्याने आम्हाला सांगितल्या प्रमाणे आम्ही सरळ वर चढायचे
आहे. हे लक्षात ठेवून पुढे गेलो आणि आम्हाला वाट सापडली. काही ठिकाणी
आम्हाला दगडावर केलेले बाणाचे चिन्ह ही दिसले. त्यामुळे आम्ही बरोबर त्या
वाटेने चढायला सुरवात केली.
एकदा तुम्ही त्या
झुडपातून बाहेर आलात कि गुहेपर्यंतची वाट न चुकता पोहचतात. पण काही ठिकाणी
वाट जरा जपून चढायला लागते. वीस मिनिटात आम्ही गुहे जवळ पोहचलो.
गुहेचे वर्णन:
गुहा
डाव्याबाजूला लागते आणि उजव्याबाजूने वाट बालेकिल्यावर जाते. ह्या
उजव्याबाजूच्या वाटेवर एक टाकी लागते. ही टाकी खालून लगेच दिसत नाही.
जेव्हा वाटवर फिरते तेव्हा दिसते.
पण
आम्ही पहिले डाव्याबाजूला गुहा बघायला गेलो. गुहेत जायला दगडांचा थर रचून
त्यावर पायऱ्या केल्या आहेत. गुहेत ८ ते १० माणसे झोपतील एवढी जागा आहे.
गुहेच्या डाव्या बाजूला थोडे पुढे वर गेले की कातळात खोदलेल्या अजून दोन
टाकी लागतात.
बालेकिल्ल्यावर जाणाऱ्या वाटेचे वर्णन:
टाकी आणि गुहा बघून आम्ही उजवीकडे बालेकिल्ल्यावर जाणाऱ्या वाटेने चालू लागलो.
गुहेपासून
बालेकिल्ल्यापर्यंत उभा चढ लागतो. त्यामुळे माथ्यावर पोहचेपर्यंत पूर्ण
घामटा निघतो. ह्या वाटेत बहुतेक ठिकाणी आपल्याला कातळात कोरलेल्या तुटलेल्या, तर काही जीर्ण
झालेल्या पायऱ्या लागतात. तर काही ठिकाणी दगडावर पाय ठेवून जायला लागते.
वाटेत एके ठिकाणी लहानशी बसण्यासाठी गुहा लागते, त्याच्या बाजूने,
डाव्याबाजूला वर जायला पायऱ्या लागतात.
वाटेत विशेष
करून किल्ल्याच्या माथ्यावर पोहचण्याचा वरच्या भागात, वेगवेगळ्या अंतरावर
दोन मोठ्या कातळात खोदलेल्या पाण्याची टाकी लागतात. पहिली टाकी तुटलेली
आहे. तर दुसरी रिकामी टाकी एकदम माथ्याच्या जवळ लागते. ह्या टाकी जवळ
पोहचताच आपण माथ्यावर पोहचतो.
आम्हाला गुहेपासून गडमाथ्यावर पोहचायला १ तास लागला. तर सिद्धगड वाडीतून दीड तास लागला.
माथ्यावरील
वाऱ्यामुळे, आमचा थकवा पूर्णपणे निघून गेला. माथ्यावर पोहचेपर्यंत अडीच
वाजले होते. परत वेळेत गड उतरायचा होता. त्यामुळे आम्ही जास्त वेळ न दवडता
बालेकिल्ला पाहून घेण्याचे ठरवले.
बालेकिल्ल्याचे वर्णन
आमचा
दिवस चांगला होता. त्यामुळे आम्हाला किल्ल्यावर पाउस किंवा पावसाचे ढग दिसले नाहीत.
त्यामुळे आम्हाला गडावरून संपूर्ण बाजूचा परिसर दिसत होता. एक बाजूला
गोरखगड तर दुसऱ्या बाजूला भीमाशंकरचा डोंगर आणि पदरगड दिसत होता.
तर पदरगडच्या मागे कोथळी गड अंधुक दिसत होता.
माथ्यावर
पोहचताच समोर आपल्याला महादेवाची पिंड आणि त्याचा समोर बसलेला नंदी
दिसतो. पिंड आणि त्याच्या बाजूला असलेले काही दगड पाहून, तिथे पहिले मंदिर
असावे, असा अंदाज येतो. आपण माथ्यावर जिथे पोहचतो ते बहुतेक आपण बरोबर
माथ्याच्या मध्यभागी पोहचतो. त्यामुळे आपल्या एका बाजूला वाड्याचे अवशेष लागतात तर दुसऱ्या बाजूला पाण्याची टाकी आणि टोकाला बुरुज लागतो.
त्याप्रमाणे आम्ही महादेवाचे दर्शन घेऊन, पहिले वाड्याच्या बाजूचा भाग पाहायला सुरवात केला.
वाड्याच्या
दरवाजातूनच आपल्याला प्रवेश करायाला लागतो. वाड्याच्या फक्त चौथऱ्याचे
अवशेष दिसतात. वाड्याच्या दरवाजाच्या खालची
अर्धी चौकट शाबूत आहे, त्याच्या बाजूला पडकी भिंत आहे. दरवाजातुन आत
गेल्यावर आपल्या दोन्ही बाजूला चौथरे लागतात आणि समोर थोड्याच अंतरावर अजून
एक चौकोनी चौथरा लागतो हा चौथरा घराचा वाटत नाही. त्याच्या बाजूने वाट पुढे गडाच्या टोकाला जाते.
पुढे
गेल्यावर डावीकडे आपल्याला लहान मंदिरासारखा चौथरा दिसतो. ह्या चौथऱ्यावर
पिंडीच्या वरच्या भागासारखा, तांदळा स्वरूपातील शेंदूर लावलेला
देव सिमेंट लावून स्थापित केलेला दिसतो.
पुढे गडाचे
टोक लागते. गडाच्या टोकाला, बहुतेक लहान चौकी किंवा घराचा पडक्या भिंतीचे अवशेष दिसतात. त्याच्या मागे गडाचे टोक लागते तिथे
भगवा झेंडा लावलेला आहे. इथे आपल्याला बुरुज किंवा तटबंदीचे काही अवशेष
दिसत नाही. ह्या टोकावरून आम्हाला बारवी धरण जलाशय पर्यंतचा परिसर दिसत
होता तर उजवीकडे गोरखगड, पाडाळे धरण जलाशय दिसत होता. डावीकडे पूर्ण सपाट
प्रदेश दिसत होता बहुतेक खांडस गावापर्यंत दिसत असावे.
हा
भाग पूर्ण बघून, गडाचे दुसरे टोक पाहण्यासाठी निघालो. पुन्हा त्याच
वाटेने, आपल्याला महादेवाच्या पिंडीजवळ पोहचायला लागते. गडाच्या ह्या
बाजूला टाकी आणि टोकाला बुरुज लागतो. बाकी ह्या बाजूला काही अवशेष नाही. पण
ह्या बाजूचा माथा थोडा लांब आहे.
गडावरील टाकी
पिंडीच्या बाजूलाच ३ मोठ्या टाक्या लागतात आणि त्याच्या पुढे मोजून १०-१२ पाऊले चाललो असता,
त्याच्या
पुढे पाच टाक्यांचा समूह दिसतो. ह्या मधील पहिल्या टाकीच्या कातळाची भिंत
चांगली असल्यामुळे अखंड टाकी दिसते. पण दुसरी आणि तिसरी टाकीच्या मधील कातळ
भिंत अर्धी तुटल्यामुळे एक झाली आहे. तर त्याच्या वर अजून दोन टाकी
दिसतात. पण त्याचा बाजूचा कातळ तुटलेला असल्यामुळे टाकीचा खड्डा दिसतो
येथे दोन टाक्या असाव्यात.
गडाच्या माथ्यावरील एकाही टाकीतील पाणी पिण्यायोग्य वाटत नव्हते.
गडावरील बुरुज:
टाकी
बघून आम्ही पुढे चालू लागलो. मी आधी सांगितल्याप्रमाणे, ह्या बाजूचे टोक
थोडे लांब आहे आणि खाली आहे. त्यामुळे बुरुज थोडा खाली असल्यामुळे,
गडाच्या टोकाला गेल्याशिवाय दिसून येत नाही.
गडावर
दिसणारा हा एकमात्र बुरुज आम्हाला दिसला. बुरुजाला एका खिडकी
सारखा, बहुतेक चोर दरवाजा आहे. पण ह्या दरवाजातुन खाली उतरण्यासाठी वाट
नसून सरळ खोल दरी लागते. ह्या बुरुजावरून खाली दिसणाऱ्या छोट्या टेकडीवर
कातळात खोदलेल्या दोन टाकी दिसतात. टाकी रिकामी होत्या. पण तिथे टाकी
असण्याचे प्रयोजन मला कळाले नाही किंवा त्याकाळी ती टेकडी वापरत असावी.
साडे
तीन वाजता आम्ही गड उतरायला सुरवात केली. जाताना पुन्हा आम्ही सिद्धगड
वाडीत थोडे जेवून, गड उतरायला सुरवात केली. उतरते वेळी नारिवली गावात
पोहचेपर्यंत आम्हाला ६.५० वाजले. संध्याकाळी शेअर गाडीवाल्यांना जास्त
प्रवासी नसल्यामुळे, बहुतेक ५.३०-६.०० नंतर ती वाहतूक बंद होते. त्यामुळे
आम्हाला आता एसटीचाच पर्याय होता. त्यात आम्हला वाटले ६. ४५ ची आमची
मुरबाड एसटी चुकली. आता आम्हाला ७.४५ गाडीसाठी थांबायला लागेल. पण एसटी
अजून गेली नव्हती. त्यामुळे आम्हाला ७ वाजता एसटी भेटली आणि आम्ही ८
वाजेपर्यंत मुरबाडला पोहचलो. मुरबाडला कल्याण एसटी लागलीच होती, ती सुद्धा
रिकामीच भेटली. त्यामुळे आमचा परतीचा प्रवास, सकाळच्या प्रवासापेक्षा सुखकर
झाला.
सिद्धगड ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE लिंक वर क्लिक करा
धापडपाड्याचा अगोदर लागण्याऱ्या ओढ्यावर बनवलेल्या नवीन पूल |
वाटेतील टाकी ह्या टाकीतले पाणी पियायला वापरतात. |
वाटेतील दुसऱ्या टाकी जवळून दिसणारी माची वरची तटबंदी |
गडाचा दरवाजा |
दरवाजाचा आत गेल्यावर येथे वीरगळ दिसतात. त्याचा वरती मंदिर आहे. तिथे अजून १०/१५ वीरगळ आणि काही मूर्ती तसेच एक तुटलेली तोफ दिसते. |
दगडाचे भांडे |
दगडाचे गोळे |
बालेकिल्ल्यावर जाताना गुहा लागते. गुहेचा डाव्याबाजूला अजून दोन टाकी लागतात. मी फोटोत पिवळ्या रंगाने वर्तुळ करून दाखवला आहे. त्यातील एका टाकीचा फोटो खाली लावला आहे. |
बालेकिल्ल्यावर जाणाऱ्या वाटेत अशाप्रकारच्या तुटलेल्या पायऱ्या लागतात. |
गडमाथ्याला लागूनच खाली असलेली टाकी. ह्या टाकीचा बाजूनेच वाट जाते. आणि खालील फोटोत गड माथ्यावर आलेली वाटेचा फोटो. |
बाले किल्य्यावरील महादेवाची पिंड |
वाड्याचे अवशेष आणि खालील फोटोत त्याचा दरवाज्याचा फोटो |
दरवाजाने आत गेल्यावर काढलेला फोटो |
गडाचा टोकाला भगवा झेंडा लावलेला दिसतो. |
गडावर असणाऱ्या तुटलेल्या टाकीचा समुदाय |
बालेकिल्ल्यावर एकमेव बुरुज गडाच्या दुसऱ्या टोकाला लागतो. |
गडाचा बुरुज |
बुरुजाला असलेला खिडकीचा आकाराचा दरवाजा (बहुतेक चोरदरवाजा) |
बुरुजावरून खाली दिसणाय्रा टेकडी कडे पहिला असता. टेकडीवर दोन टाक्या दिसतात |
बालेकिल्ल्यावरून दिसणारा भीमाशंकरचा परिसर आणि पदरगड |
दरवाजाचा समोर असलेल्या लहान पठारावरून वरती माथ्याला बुरुजाचा चोरदरवाजाची चोकट दिसते. आणि खालील वर्तुळात दिसणारी गुहा. येथे जाण्याची वाट कुठून आहे, ते कळले नाही आम्हाला बहुतेक आता ती नसावीच |
दरवाजाचा समोरील लहान पठारावर असणारे लहान रिकामी मंदिर
सिद्धगड ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE लिंक वर क्लिक करा
|
No comments:
Post a Comment