Friday, 24 August 2018

Mordhan fort मोरधन किल्ला

 मोरधन किल्ला 
मोरा किंवा मोरधन डोंगराच्या पठारावरून मोरधन गडाचा काढलेला फोटो.  गड उत्तरदक्षिणेला  लांब पसरलेला दिसतो.
मोरधन ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  
  

ह्या वर्षीच्या पावसाळ्यातील हा पाचवा ट्रेक होता. पण ह्या अगोदरचा ट्रेकपेक्षा ह्या ट्रेकला मिळालेला पावासाचा अनुभव आणि गड माथ्यावर लागणारा जोराचा वारा, ढगांचा खेळ, खूप सुंदर होता. गडावरील अवशेष पाहता, हा टेहळणीचा  किल्ला असल्याचे कळून येते.

प्रवासाचे वर्णन:
शुक्रवारी रात्री आमचा, रविवारी १२ ऑगस्टला मोरधन करायचा ठरल्यामुळे, आम्हाला एक्सप्रेस ट्रेनची तिकीट भेटली नाही. त्यामुळे आम्ही कसारा लोकलने जायच ठरवले. मी सकाळी ५. १२ ची कसारा पकडली, प्रणव आणि विनय डोबवलीला भेटले. ७. ४० ला आम्ही कसारा पोहचलो. तिथेच आम्ही नाश्ता करून. कसारा स्थानकातून शेअर गाडीने अर्ध्यातासात घोटीला पोहचलो.
कसारा ते घोटी अंतर २५ किमी आहे, त्यासाठी गाडीवाले प्रत्येकी ४० रुपये घेतात. पण तो अर्धातासाचा प्रवास अनुभवून, भुसावळ पॅसेंजरने सरळ घोटीला आलो असतो तर परवडलं असत. असे मला वाटत होते. घोटी स्थानकातून खैरगाव साठी एसटी नाही. त्यासाठी शेअर गाडीने किंवा खाजगी रिक्षा करून जायला लागते. किंवा एसटीने देवळे गावात उतरून खैरगाव साठी शेअर किंवा रिक्षाने जावे. घोटी ते खैरगाव अंतर अंदाजे ५ते ६ किमी असेल. त्यासाठी रिक्षावाल्यालाने आम्हाला ३०० रुपये घेऊन जरा लुबाडलच, हे प्रवास केल्यानंतर आम्हाला कळून आले. येतेवेळी आम्ही गावातीलच एकाचा गाडीने आलो त्याने १५० रुपये घेतले. पण जर शेअर गाडीने आलो असतो, तर अंदाजे प्रत्येकी २० ते ३० रुपये घेत असतील. असा माझा अंदाज आहे.

गडाच्या वाटेच वर्णन:
सव्वा दहा वाजता आम्ही खैरगावातील शाळेजवळून ट्रेकला सुरवात केली. शाळेजवळ वाटेत मध्येच झाडाखाली उघड्यावर गणपतीची थोडी प्राचीन अशी मूर्ती दिसते. तिथून पुढे, गावातून आम्ही वाट विचारत ५ मिनटात, गावाचा पाठीमागे बाहेर आलो.

गावातून  बाहेर गडाचा दिशेने आलो असता. मोरधन गडाची किंवा मोरा डोंगराची एक सोंड गावाचा दिशेने आलेली दिसते. ह्या डोंगराच्या वर आपल्याला मोरधन गडाचा मुख्य डोंगर दिसतो. सोंडेवरील ह्या वाटेने आपण, न चुकता डोंगर चढायला लागतो. वर चढल्यावर वाट डावीकडे वळत डोंगराची घळ लागते, तिथे घेऊन जाते.  इथून आपण ५ ते १० मिनटात डाव्याबाजूचा पठारावर पोहचतो.

मोरा किंवा मोरधनच्या डोंगराचा पठार:
आम्ही तासाभरात पठारावर पोहचलो. पठारावरून आपल्याला मोरधन गडाचा मुख्य डोंगर सरळ उत्तर दक्षिणेला लांब पसरलेला दिसतो. तसेच पठारावरून पलीकडील दरणा जलाशय दिसतो. सुसाट सुटलेल्याला वारा आणि पावसाचा थोडावेळ आनंद घेऊन, आम्ही गडावर जाण्यासाठी पुढे चालू लागलो.

पठारावरून गडामाथ्यावर जाणारी वाटेचे वर्णन:
पठारावरून एक वाट सरळ पुढे जाताना दिसते. पण गडावर जाण्यासाठी वाटेने सरळ पुढे न जाता, आपल्या उजव्या बाजूला जेथे मोरधन गडाचा मुख्य शिखर सुरवात होतो. तिथूनच बरोबर खाली वाट आहे, हे लक्षात ठेवणे. कारण पठारावरून येणारी मोठी वाट सरळ पुढे जाते, त्यामुळे उजव्याबाजूची हि छोटी वाट दिसत नाही. त्यामुळे चुकून तुम्ही सरळ जाणाऱ्या वाटेने पुढे जाऊन चुकू शकता.

उजव्याबाजूची हि वाट, डावीकडे वर नागमोडी वळून सरळ न चुकता गडावर घेऊन जाते. ह्या वाटेने आपण  पाऊण ते एक तासात गडाच्या माथ्यावर पोहचतो.

गड माथ्यावरील वर्णन:
गडाच्या माथ्यावर पोहचल्यावर, आम्ही उजवीकडचा माथा जवळ आणि लहान असल्यामुळे. पहिलं त्यादिशेला गेलो. उजव्या माथ्याचा टोकाला, आपल्याला एक चौथऱ्याचे अवशेष आढळतात.  ह्या बाजूला माथ्यावर बाकी काही अवशेष नसल्यामुळे, आम्ही पाठीमागे फिरून डावीकडे गेलो.

डावीकडील माथा दक्षिणेला लांबवर पसरलेला आहे. ह्या बाजूला तुम्ही गडमाथ्यावर ज्या वाटेने येतात.  त्याचा डाव्या बाजूला, काही अंतरावर गडावरील एकमेव पाण्याचे टाके लागते. टाकीच्या पुढे दक्षिणेला गड माथा अजून लांब पसरलेला आहे. पण आम्ही वाचलेल्या माहितीनुसार टाकीच्या पुढील माथ्यावर काही अवशेष नाहीत. म्हणून आम्ही इथूनच मागे फिरून गड उतरायला सुरवात केली.

तसेही गडमाथ्यावर आलेले ढग आणि गवतामुळे अवशेष ओळखणे जरा अवघडच होते. त्यामुळे आमचा चुकून एकाद-दुसरा अवशेष राहून गेले असतील.

थोड्यावेळा साठी माथ्यावरून ढग बाजूला झाल्यामुळे गडा खालील परिसर दिसू लागला. गडाचा पश्चिम बाजूला आपल्या खैरगाव, घोटीचा परिसर दिसतो. पूर्वेला दरना जलाशयचा सुंदर परिसर सतत दिसतो. ढगांमुळे आम्हाला गडावरून आजूबाजूच्या परिसरातील किल्ले दिसले नाहीत. गडावर पाऊस आणि जोराचा वारा लागत होता. वारा एवढ्या जोरात वाहत होता, कि मध्येच आम्हाला त्याचा प्रवाहात ढकलत होता. त्यामुळे आम्ही जास्त करून गडाचा कडेला जाणे टाळले. 


थोडक्यात प्रवासाबद्दल 
  • मुंबई ते कसारा लोकल ट्रेन ने कसारा उतरावे 
  • कसारा ते घोटी अंतर २५ किमी आहे. त्यासाठी शेअर गाडी असतात. प्रत्येकी ३० रुपये घेतात. 
  • किंवा भुसावळ पॅसेंजर घोटी ला १० वाजता पोहचते. हा प्रवास शेअर गाडी पेक्षा उत्तम पडेल. 
  • घोटी ते खैरगाव अंतर ५ते ६ किमी आहे. 
  • घोटी वरून खैरगाव साठी शेअर गाडी भेटतात किंवा खाजगी रिक्षा करून जाणे. 
  • स्वतःची गाडीने  मुंबई ते नाशिक महामार्गावरून घोटीला, घोटी -शिर्डी रस्त्याने देवळे गावातून खैरगाव गाठावे. 
मोरधन ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  


Wednesday, 8 August 2018

Kamandurg कामणदुर्ग



 कामणदुर्ग 


कामणदुर्ग  ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  
तुंगारेश्वर राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलात, भिवंडी-वसई महामार्गावर असलेला कामणदुर्ग. ठाणे जिल्ह्यातील दुसरा उंच किल्ला.

कामणला कसे पोहचलो:
ह्यावेळी माझ्या सोबत नेहमीप्रमाणे प्रणव आणि माझ्या चाळीतील मित्र नंदू होता. प्रणव डोंबिवली वरून सकाळी ५.३३ ची डोंबिवली - बोईसर शटल पकडून वसईला येणार होता. ही गाडी ६.३५ ला वसईला पोहचते. त्याप्रमाणे  नंदू आणि मी पश्चिम रेल्वेच्या दादर वरून सकाळी ५.४५ ची विरार जलद पकडून, ६.४० ला वसईला पोहचलो.
वसई वरून सकाळी ७.१५ ची जळगाव एसटी पकडून, आम्ही कामणला पोहचलो. वसई ते कामण अंतर १४ किमी आहे, सकाळी रस्त्याला रहदारी नसल्याने आम्ही २० मिनिटात पोहचलो. एसटीने कामण पर्यंत प्रत्येकी २० रुपये घेतात. एसटी वाहकाला कामण सांगितले असता, कामण गावच्या थांब्याजवळ गाडी थांबते. बहुतेक कामणरोड रेल्वे स्थानक साठी वेगळे तिकीट असेल.  

वसई वरून सकाळी ७ ची डहाणू-पनवेल शटल होती. पण आम्ही विचार केला, कामणरोड स्थानकावरून पुन्हा रिक्षा करून जाण्यापेक्षा. वसई वरूनच सरळ एसटीने कामण गावात उतरावे. त्याप्रमाणे वसईला नाश्ता करून आम्ही एसटीने कामणला पोहचलो.

दादरला मला नाखिंड ट्रेकचा जुना मित्र भेटला. तो सुद्धा कामणदुर्गला चालला होता. ते चौघे जण होते. त्यातील  दोघांबरोबर मी नाखिंड ट्रेक केला होता. ते चौघे भेटल्यामुळे, आम्ही सात जण झालो. त्यामुळे आता आम्हाला कामणवरून देवकुंडी साठी एकच वडाप रिक्षा किंवा छोटा हाथी सारखी गाडी करता येईल, असा विचार केला. पण कामण वरून तुम्हाला ३ आसनीच रिक्षा मिळतात, त्यामुळे तसे झाले नाही. 

कामण वरून देवकुंडी गाव अंदाजे ३ किमी आत आहे. त्यासाठी रिक्षावाला आम्हाला २०० रुपये सांगत होता. त्याला येऊन-जाऊन ३०० रुपये ठरवत होतो. पण कोणी तयार होत नव्हते. त्यात एक महान रिक्षावाला तर आम्हा ७ जणांना एकाच रिक्षाने सोडायचे ३०० रुपये सांगत होता.

मग शेवटी आम्ही चालत जायचे ठरवले.आम्ही ७.४० ला चालायला सुरवात केली. गावातून रस्ता विचारत विचारत आम्हाला देवकुंडीला पोहचायला पाऊण तास लागला.

देवकुंडी गावातून कामणदुर्गच्या माथ्यापर्यंतचा प्रवास:
देवकुंडी गावातुन,आम्ही एक वाटाड्या मुलगा सोबत घेतला. गड माथ्यापर्यंत त्याच्या घरातल्यानी ५०० रुपये सांगितले होते. त्यामुळे आम्ही त्याला माथ्यापर्यंत न सोडता, जंगल जेथे संपते आणि गडाचा मुख्य खडा चढ लागतो तिथपर्यंत वाट दाखवायला सांगितले होते. त्यासाठी आम्ही २५० रुपये ठरवले. पण बहुतेक त्याला आमची साथ आवडली असावी म्हणून ते आम्हाला माथ्यापर्यंत घेऊन गेले. आमचा मुख्य वाटाड्या १६ ते १७ वर्षाचा मुलगा होता. त्याच्या सोबत त्याचे १२ ते १३ वर्षाचे दोन लहान मित्र होते. असे ते तिघे जण होते. ट्रेक केल्यावर त्यांची मेहनत बघून, आम्ही त्याला ३०० रुपये दिले.

गावात जास्त वेळ वाया न घालवता, आम्ही ८. ३५ ला ट्रेकला सुरवात केली. ट्रेकक्षितीज वर वाचले होते, वाट दर्शविण्यासाठी वाटेत बाणाचे चिन्ह केलेले आहेत. पण देवकुंडी गावातून सुरवातीला वाट सापडणे जरा अवघड आहे. अन्यथा सुरवातीलाच वाट चुकू शकता. पण एकदा जर बाणाचे चिन्ह दिसले तर अनुभवी ट्रेकर्स जाऊ शकतात. अनेक जणांचे ब्लॉग वाचले होते, त्यात त्यांनी वाटाड्या घ्यावा म्हणून सांगितले होते. त्यामुळे आम्ही वाटाड्या सोबत घेतला, त्यामुळे आम्ही वाट न चुकता लवकर पोहचलो.

कामण गावातून आपल्याला फक्त कामणदुर्गचा शिखर दिसतो.  शिखर एका लहान आडव्या लांब डोंगराच्या पाठी दिसतो.  हा लहान आडवा डोंगर वेगळा नसून कामणदुर्ग डोंगराचीच सोंड असून त्याच्या पायथ्याशी देवकुंडी गाव असल्यामुळे, कामणदुर्ग देवकुंडीतुन दिसत नाही.
पूर्ण वाट ह्या आडव्या डोंगराच्या जंगलातून वर चढत जाते. वाटेचे वर्णन करायचे झाले तर पूर्ण जंगलच आहे. कोणी तरी लिहिले होते की बांबूचे दाट वन लागते. पण बांबूच्या झाडापेक्षा इतर रानटी झाडे आणि रानटी केळीची झाडे भरपूर होती. अश्या प्रकारे आपण सोंडेच्या टेकडीवर पोहचतो. टेकडी वरून आपल्याला समोर कामणदुर्गचा खडा चढ दिसतो. पाऊस नसल्यामुळे आम्हाला हा चढ, चढायला जास्त त्रास झाला नाही.

हा चढ चढतेवेळी, चार ठिकाणी कातळाचे टप्पे चढायला लागतात, त्यात तीन मुख्य ठिकाणी कातळ चढायला लागतो. त्यातील २ कातळावर कोरलेल्या पायऱ्या लागतात.  ह्या दोन कातळाच्या वरती तिसऱ्या कातळाला पायऱ्या नाहीत. त्यामुळे ह्या ठिकाणी जरा जपून चढायला आणि उतरायला लागते. हा कातळ चढल्यावर, त्याचाच वरती  माथ्याच्या जवळ चौथ्या टप्यातील कातळ लागतो. माझ्या मते हा कातळ बाकीच्या तुलनेत चढायला एवढा अवघड आणि उंच ही नव्हता.  इथून आपण लगेच माथ्यावर पोहचतो. माझ्या मते नेहमीच्या ट्रेकरसाठी हे चारी टप्प्यातील कातळ चढणे काही अवघड नसावे.
पहिल्या कातळावरून चढून आल्यावर, आपल्याला थोड्याच वेळात पाच टाक्यांचा समुदाय लागतो. टाक्यांच्या अगोदर, हा कातळ चढून आल्यावर, वरती तिथे मोकळ्या जागेत एक प्राचीन पाषाणाची मूर्ती होती. पण आम्हाला त्या भागात कुठेच मूर्ती दिसली नाही. उतरते वेळी आम्हाला टाकीजवळ काही गाववाले भेटले. त्यांनी सांगितले ती मूर्ती गावातील मंदिरात ठेवली आहे. पण उतरल्यावर आमच्या लक्षात न राहिल्याने, ती मूर्ती पाहण्याची राहून गेली.  
पावसामुळे एका टाकीत गुडघाभर पाणी साचलं होता. बाकी टाक्या रिकाम्या होत्या. टाकीच्या डाव्याबाजूने वाट गडावर जाते. वर सांगितल्याप्रमाणे, इथून माथ्यावर पोहचेपर्यंत आपल्याला अजून तीन ठिकाणी कातळ चढायला लागतो. 

शेवटचा टप्यातील कातळ चढून आल्यावर माथ्यावर पोहचते वेळी, उजवीकडे माथ्याला लागूनच वाटेवर एक आडवी टाकी लागते.

कामणदुर्गाच्या माथ्यावरील वर्णन:
गडाचा माथा जास्त मोठा नाही आणि काही विशेष अवशेष ही आढळत नाही. त्यामुळे लगेच बघून होतो. गडाचा माथा दोन शिखराच्या भागात विभागलेला आहे. आपण ज्या शिखर माथ्यावर पोहचतो, त्याचा टाकीच्या बाजूने (उजव्याबाजूने) माथ्याचा टोकाला पोहचल्यावर. समोर आपल्याला दुसरा शिखर माथा दिसतो, समोरचा शिखर थोडा उंच आहे.  ह्या दोन शिखर माथ्यामध्ये लहान दरी सारखा खोलगट भाग आहे. त्यामुळे आपल्याला गडाचे दोन शिखर दिसतात. आम्ही समोरच्या माथ्यावर गेलो नाही. कारण तिथे जाण्याकरीता वाट आहे कि नाही आम्हाला माहित नव्हता. काही ब्लॉग मध्ये वाचले होते, तिथे काही अवशेष आढळत नाहीत. त्यामुळे आम्ही प्रयत्न केला नाही. पण मुख्य माथ्याच्या टोकाला आलो असता, ह्या दोन शिखर माथ्याच्या मधील त्या खोलगट भागात खाली वाट जाताना दिसली. ती नक्की कुठे जाते, ते आम्ही पहिले नाही.

माथ्यावरील टाकीचे वर्णन:
माथ्याला लागून असलेल्या, टाकीच्या बाजूने माथ्यावर आल्यावर. आपल्या डाव्या बाजूला अगदी काही पावलांवर माथा संपतो. आपल्या समोर खाली सुकलेला छोटा तलाव लागतो. उजवीकडे माथा थोडा मोठा आहे. उजवीकडे आपल्याला वाटेत, थोड्याफार अंतरावर २ चौकोनी टाक्या लागतात. दोन्ही टाक्या रिकामी होत्या. त्याच वाटेत अजून एक मोठी टाकी लागते. पण गवतामुळे कळत नव्हते, नक्की टाकी आहे कि खड्डा. टाकीच्या बाजूने वाट पुढे माथ्याच्या टोकाला जाते. 

त्याच्या पुढे मी वर सांगितल्याप्रमाणे, समोर गडाचा दुसरा माथा दिसतो. तिथून आम्ही मागे फिरलो आणि परतीच्या वाटेला लागलो. बाकी गडमाथ्यावर ढग दाटून आल्यामुळे गडावरून आजूबाजूचा परिसर दिसला नाही.
ह्या ट्रेकसाठी आम्हाला प्रत्येकी १२५ रुपये खर्च आला.

थोडक्यात प्रवासाची माहिती
  • मुंबईवरून वसईला पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनने वसईला उतरावे.
  • वसई एसटी स्थानकातून सकाळी ७. १५ ची जळगाव एसटी आहे. तिने कामणला जावे. 
  • वसई वरून गाडी चुकल्यास चिंचोटी-अंजूर फाट्यापर्यंत जावे.
    तिथून भिवंडीला किंवा भिवंडीमार्गे जाणाऱ्या गाडी किंवा शेअर रिक्षाने कामणला उतरावे.
  • अन्यथा वसई वरून सकाळी ७ वाजता डहाणू - पनवेल शटल आहे.
    ती ७.१७ पर्यंत कामण रोड स्थानकात पोहचते. 
  • डोंबिवली वरून सकाळी ५.३३ ची डोंबिवली-बोईसर शटल आहे. 
  • ती कामणरोड स्थानकात ६.१२ ला पोहचते.
  • कामणरोड रेल्वे स्थानक ते कामण गाव अंतर ३ किमी आहे.
  • नायगाव वरून ही कामणला जाता येते. पण नायगाव वरून बहुतेक २ ते ३ रिक्षा बदलत जायला लागते त्यामुळे माझ्या मते नायगाव पेक्षा वसईचा पर्याय निवडावा.



कामणदुर्ग  ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा