Showing posts with label #gad. Show all posts
Showing posts with label #gad. Show all posts

Saturday, 30 March 2019

Gumtara fort /Ghotawada fort गुमतारा किल्ला/ घोटवडा गड/ गोतारा किल्ला

गुमतारा किल्ला / घोटवडा गड / गोतारा किल्ला 
गुमतारा गड / घोटवडा किल्ला

गुमतारा / घोटवडा किल्ल्याचा ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  

तीन चार महिन्याच्या विश्रांती नंतर, एकाच आठवड्यात २ दिवसाआड लागोपाठ दोन ट्रेक केले. पहिला, गुरुवारी एकट्याने अंजनेरी किल्ला केला आणि रविवारी घोटवडा/गुमतारा किल्ला केला. तो नेहमीप्रमाणे प्रणव बरोबर त्याने सुचविल्याप्रमाणे. आमच्या सोबत प्रणवच्या दुसऱ्या ट्रेक ग्रुप मधील मित्र सुरेश पण आमच्या सोबत होता.

बहुतेक नेमकेच किंवा नियमित ट्रेक करणारे ट्रेकरच ह्या गडावर जात असावे, हे गडावर जाणाऱ्या वाटेने आपल्याला कळून येते. गडावर जास्त काही अवशेष आढळून येत नाही. गडाचा माथा हि लहान आहे. ह्या गडावर माझ्या माहिती नुसार दुगड गावातून आणि मोहली गावातून जाता येते आणि बहुतेक उसगाव गावातून सुद्धा. आम्ही दुगड गावातून चढायचे ठरवले. 

कल्याण ते दुगड फाटा एसटी प्रवास:
ठरल्याप्रमाणे आम्ही सकाळी ७ ला कल्याणला भेटायचे ठरवले. प्रणव आणि सुरेश डोंबिवली वरून कल्याण एसटी आगारात वेळेत पोहचले. मी सुद्धा ७. २० पर्यंत कल्याणला पोहचलो. आम्ही तिथेच नाश्ता करून सकाळी ७.३० वाजता  कल्याण-वाडा-जव्हार एसटी पकडली. सुरेशने मोटारसायकल आणली होती, तो तिच्यावरूनच दुगड फाट्याला अगोदर पोहचला. कल्याण ते दुगड फाटा अंतर २६ किमी आहे, एसटीचे प्रत्येकी ४० रुपये तिकीट घेतात. एसटीने सव्वा तास पोहचायला लागतो. एसटी भिवंडीनाका- भिवंडी एसटी आगार वरून जाते.
[ परतीच्या वेळी आम्ही दुगड फाटा ते भिवंडी एसटी आगार पर्यंत शेअर गाडी ने प्रत्येकी २० रुपये घेतले. तेथून भिवंडी वरून कल्याणला जाणाऱ्या एसटीने प्रवास केला. त्याचे तिकीट प्रत्येकी ३० रुपये घेतले. भिवंडी वरून ठाण्यासाठी सतत एसटी पण असतात किंवा आगाराच्या बाहेर ठाणे पर्यंत शेअर रिक्षा असतात]

दुगड फाटा ते दुगड गाव
दुगड फाट्याला पोहचेपर्यंत ८.४० झाले. दुगड फाट्यावरून दुगड गाव ४ किमी आतमध्ये आहे. पण आमच्या कडे सुरेशची मोटरसायकल असल्यामुळे आम्ही तिघेजण त्याच्या गाडीवरून ६ ते ७ मिनिटात गावात पोहचलो. चालत गेलो असतो तर आमचा १ ते दिड तास फुकट गेला असता किंवा रिक्षाने जास्त भाडे देऊन जायला लागले असते.

फाट्यावरून डांबरी रस्ता सरळ दुगड गावात जातो. त्या रस्त्याने सरळ जात रहावे शेवटी जेव्हा रस्ता उजवीकडे वळतो तेथे थांबावे, तेथून डावीकडे एक कच्चा रस्ता दिसतो त्या रस्त्याने जावे. हा रस्ता जेथे लागतो तेथे एका झाडावर "गडावर जाण्यासाठी" लहान पाटी लावली आहे. अश्या पाट्या आपल्याला गडावर जाताना वाटेमध्ये दिसतात. त्यामुळे गडावर जाणारी वाट शोधणे सोप्पे पडते. त्यामुळे ह्या पाट्या न चुकता पहात जाणे.

गड चढायला सुरवात
सकाळी नऊ वाजता आम्ही गड चढायला सुरवात केली. ह्या कच्च्या रस्त्याने पाच सहा मिनिटे चालल्यावर नाल्यावर एक छोटा सिमेंटचा पूल लागतो. हा पूल जमिनीवरतीच रस्त्याच्या उंचीला असल्यामुळे लगेच कळत नाही. इथेच ह्या रस्त्याला डावीकडे वाट फुटते ती वाट पकडावी.  सुरवातीला हि वाट मोठी लागते पण नंतर चढ लागल्यावर ती नेहमीच्या वाटे सारखी लहान होते. ह्या वाटेने चढू लागलो असता मध्येच एक ठिकाणी वाट दोन ठिकाणी जाते. एक सरळ जाते आणि एक डावीकडे जाते. इथे डावीकडच्या वाटेने जाण्यासाठी पाटी लावली आहे. पण ती पाटी जर बघितली नाही, तर आमच्या सारखे चुकून सरळ त्या वाटेने गेलात तर वाट चुकू शकता कारण ती वाट धबधब्याजवळ जाऊन संपते.

दुगड गावातून पहिला असता, आपल्याला एका छोट्या डोंगराचा किंवा टेकाडच्या पाठी गुमतारा गडाचा डोंगर दिसतो. हा छोटा डोंगर किंवा टेकाड म्हणजेच गडाचा डोंगराच्या सोंडेचा भाग आहे. आपल्याला गड चढतेवेळी  आपण पहिले ह्या लहान डोंगरावरती पोहचतो नंतर आपण पुढे गडाच्या दिशेने चालू लागतो तेव्हा मध्ये खोलगट सपाट भाग लागतो. तो थोडासा उतरून मग पुन्हा गडाचा मुख्य गड चढू लागतो. जेव्हा आपण गड चढू लागतो, त्या आधी आपल्याला आंब्याचे मोठे झाड लागते आणि तिथून आपल्याला लहानसा चढ लागतो. आंब्याच्या झाडापासून आपल्याला गवती बांबूचे जंगल लागतो. ह्या जंगलातून वर बाहेर आल्यावर, वाट डावीकडे गडाच्या  कातळाच्या पायथ्या खालून जाताना दिसते. त्यामुळे चालते वेळी आपल्याला उजव्या बाजूला गड लागतो आणि डावीकडे खाली दरी लागते. ही वाट पुढे उजवीकडे वळते आणि एका लहान घळीतून गडावर जाते.
ही वाट जिथे उजवीकडे वळते तेथून आपल्याला गडाची तटबंदीची भिंत दिसायला लागते. इथून आपण १० मिनिटात घळीतून गडाच्या मुख्य दरवाजा जवळ पोहचतो. गावातून गडाचा मुख्य दरवाजापर्यंत पोहचायला आम्हाला दीड तास लागला. दरवाजा जवळ पोहचेपर्यंत ११. ३० वाजले.

गडाचा दरवाजा
गडाला बहुतेक हा एकच मुख्य दरवाजा आहे.गडाचा दरवाजा पूर्णपणे उधवस्त झालेला आहे. पण दरवाज्याच्या गोमुखी बुरुजाची तटबंदी आणि बुरुज दिसतो. पण बुरुज ही बहुतेक अर्धाच वाटतो.

पाण्याची टाकी
दरवाज्याने गडावर पोहचल्यावर समोरच थोड्या डावीकडे एक सुकलेली टाकी दिसते. त्या पुढे एक वाट जाते तिथे अजून एक टाकी किंवा खड्डा दिसतो. पण त्यात झाड आणि गवत असल्यामुळे तो खड्डा वाटत होता. दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे मागे पाच ते सहा टाक्यांचा समुदाय दिसतो. त्यातील एका टाकीत पाणी होते. बाकी टाक्या रिकामी होत्या. त्यात एका मोठ्या टाकीत कोणीतरी संवर्धनाचे काम करत होते. हे त्या टाकीतील अर्धी खोदून काढलेली माती आणि त्यात असलेल्या दोन घमेल्यावरून कळत होते. 

देवीचे मंदिर
टाकी बघून आम्ही पुन्हा मागे दरवाजा जवळ आलो, तिथूनच एक वाट उजवीकडे गडमाथ्यावर जाताना दिसते. त्या वाटेने दोन मिनिटात चढून गडावरील देवीच्या मंदिराजवळ पोहोचलो. मंदिराच्या बाजूला साधारण १ फुटाची कठड्यासारखी भिंत दिसते. बाकी मंदिराचे काही अवशेष दिसत नाही. मंदिरात फक्त उघड्यावरती असलेली पाषाणावरती कोरलेली देवीची मूर्ती दिसते.

अजून एक पाण्याची टाकी आणि भग्न मूर्ती
मंदिरा जवळूनच माथ्यावर एक वाट जाते. त्या वाटेने थोडे वर चढल्यावर वाटेत डावीकडे टाकी लागते आणि वाट सरळ माथ्यावर जाताना दिसते. आम्ही पहिले डावीकडे टाकी जवळ गेलो. टाकी सुकलेली होती. टाकीच्या वरच्या भागात एक जुनी मूर्ती भग्न अवस्थेत दिसते. मूर्तीचा फक्त कंबरेच्या खालील भाग दिसत असल्यामुळे ती कुठल्या देवाची मूर्ती आहे ते कळले नाही.

टाकी जवळ आसपास अजून काही अवशेष न दिसल्यामुळे, टाकी बघून आम्ही माथ्यावर जाणारी वाट चढू लागलो. टाकी जवळून पाच मिनिटात आम्ही गड माथ्यावर पोहचलो. दुपारी १२. १० पर्यंत आम्ही गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोहचलो.

गडमाथा
गडमाथा खूप लहान आहे आणि माथ्यावर काही अवशेष आढळत नाही.  माथ्यावरून कामण दुर्ग दिसतो पण टकमक गड आम्हाला काही ओळखता आला नाही. बाकी गडावरून उसगावचे धरण, वज्रेश्वरी आणि भिवंडीचा परिसर दिसतो. पेटपूजा करून आम्ही पाऊणे दोनला गड उतरायला सुरवात केली. दोन तासात मध्ये थोडी विश्रांती घेऊन आम्ही गावात पोहचलो.  ह्या ट्रेक साठी नाश्ताकरून प्रत्येकी ११५ रुपये खर्च आला. रेलवेच्या तिकिटचे पैसे यात मोजले नाहीत.


गुमतारा / घोटवडा किल्ल्याचा ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  
https://youtu.be/NZCiBMo63Pg

आंब्याचा झाडा कडून वाट गडावर कशी जाते ते अंदाजे दाखविल आहे

Saturday, 29 September 2018

Tringalwadi Fort, त्रिंगलवाडी गड

 त्रिंगलवाडी किल्ला 


त्रिंगलवाडी गडाचे धरणाच्या भिंतीवरून दिसणारे दृश्य



 त्रिंगलवाडी ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  
https://youtu.be/A3v69AXmZEg

महिना झाला सतत काही कामामुळे मोरधन नंतर कुठेच ट्रेक केला नाही. त्यामुळे १६ सप्टेंबरचा रविवारी कुठचा तरी ट्रेक करायचा ठरवलं होत. पण सोबत कोणी येत नसल्यामुळे, एकटा जायायचा ठरवलं. त्यासाठी मी त्रिगलवाडी ट्रेक करायचा ठरवलं.

करीरोड-दादर ते इगतपुरी पर्यंतचा प्रवासाच वर्णन:
दादर वरून सकाळी  ६. २८ ची तपोवन एक्सप्रेस पकडली. इंजिनला लागून पुढे एकच जनरल डब्बा आल्यामळे, कल्याण येईपर्यंत तुफान गर्दी झाली. कसाबसा रेटत-ओरडत इगतपुरीला उतरलो. अस वाटलं, त्यापेक्षा कसाऱ्यापर्यंत लोकल ट्रेनने येऊन. शेअर गाडीने इगतपुरीलाआलो असतो, तर परवडला असता. कमीत कमी बसून तरी आलो असतो. मग येते वेळी इगतपुरी वरून २ तास ट्रेन नसल्यामुळे, कसाऱ्यावरून आलो. २० मिनटात इगतपुरी वरून रोडने कसाऱ्याला पोहचलो.

इगतपुरी रेल्वे स्थानक ते त्रिंगलवाडी पर्यंतचा प्रवासाचं वर्णन:
सकाळी ८. ५० ला इगतपुरीला पोहचलो. बाहेर जाऊन त्रिगलवाडी साठी शेअर जीप कुठे भेटतात म्हणून विचारला असता कळल. शेअर जीप आता बंद झाल्या आहेत. त्यासाठी रिक्षा करून जायायला लागेल. मग मी एसटी आगार मध्ये गेलो. तर तिथे कळलं त्रिंगलवाडीला जायायला एकही एसटी नाही.

आता पुन्हा पाठी फिरून चहा घेऊन दुसऱ्या कुठचा ट्रेक करता येईल का विचार करायचा ठरवलं. पुन्हा पाठी रिक्षा स्टॅन्डला आलो. एका रिक्षावाल्याला पुन्हा विचारला. त्याने मला त्रिगलवाडीला रस्ता जातो  तिथे जीप आहेत का बघायला सांगितले. आता मला हि माहिती होत, जीप नाहीत आणि त्याला हि. तरी हि मी बघायला गेलो.  

त्या रस्त्यात एका बाईक वाल्याला विचारला असता, तो हि मला तेच बोलला "जीप बंद" झाल्या.  तो बोलला, मी सोडतो तुम्हाला मी हि तिथेच चाललो आहे.  त्याचा नाव अर्जुन शेलार, खरतर त्याचा लिफ्ट देण्यामुळेच मी पुढे ट्रेक करू शकलो. त्याबद्दल मी त्याचा आभारी राहील. तरी हि माझ्या मनात प्रश्न पडला. परत येताना काही वाहन नाही भेटल तर?.  मग विचार केला येईल ५ किमी चालत.

नंतर मला अर्जुन आणि इतर गावातल्याकडून कळलं, इगतपुरी वरून गावात येण्या-जाण्यासाठी गाड्या
नसल्यामुळे. गावातील बहुतेक लोक बाईक वापरतात, त्यामुळे रस्त्यात कोणाकडे हि लिफ्ट मागितली कि देतात. त्यामुळे जातेवेळी हि, मी तसाच लिफ्ट मागत गेलो.

इगतपुरी वरून त्रिंगलवाडीला कसा रस्ता जातो त्याचे वर्णन:
इगतपुरी ते त्रिंगलवाडी अंतर ५ किमी आहे. इगतपुरी रेल्वे स्थानकाचा बाहेर आल्यावर इगतपुरी एसटी स्थानकासाठी रस्ता जातो. त्या रस्त्याने पुढे गेलो असता एक चौक लागते तेथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि बुद्ध विहार आहे. तिथून डावीकडे एक रस्ता वर जातो.  हा रस्ता त्रिंगलवाडीला जातो. रस्त्याने चालत गेलो तर अंदाजे १ ते १. ३० तास लागेल, पण रस्त्यामध्ये कुठे वस्ती लागत नाही. आणि एक छोटा घाट लागतो. 

बाइकवरून  १० मिनटात त्रिंगलवाडी गावात पोहचलो. तिथून त्यांनी मला धरणावरून चालत जायायला सांगितले. मी हि मग तिकडूनच गेलो. 

त्रिगलवाडी गाव ते त्रिगलवाडी किल्ल्या पर्यंतचा वाटेचे वर्णन:
दहा वाजता मी त्रिगलवाडी गावातून ट्रेक सुरु केला. गावामागे धरणावर एक वाट जाते. विचारात विचारात पाच  मिनटात मी धरणाजवळ पोहचलो. धरणाचा भिंतीवर आलल्यावर समोर धरणाच्या पलिकडे त्रिंगलवाडी किल्ला दिसतो. त्यासाठी आपल्याला धरणाच्या डाव्याबाजूने वाटेने जायायला लागते. त्यामुळे सतत डाव्याबाजूला डोंगर तर उजव्याबाजूला धरण लागतो.

समोर त्रिंगलवाडीचा वाटेने चालत असताना ध्यानात ठेवणे, डाव्या बाजूला लागणाऱ्या डोंगरावरती न चढता. त्याचा पायथ्याचा कडेने चालत राहणे. कारण काही ठिकाणी धरणाजवळची जमीन तारेचा कुंपण केला आहे. त्यामुळे वाट सुरवातीला धरणाच्या काठाने जाते. नंतर थोडी वरुनच जाते. गडाचा जवळ पोहचल्यावर मला लेण्याची वाडी लागली. वाडीतून १० मिनटात मी त्रिंगलवाडी गडाच्या पायथ्याचा लेणीजवळ पोहचलो

त्रिंगलवाडीतून लेणीपर्यंत पोहचेपर्यंत मला १ तास लागला. पण परत जाते वेळी ४० मिनटात गावात पोहचलो.  ११ वाजता मी लेणीजवळ पोहचलो.

पायथ्याचा लेणीचे थोडक्यात वर्णन:
गडाच्या पायथ्याशी ह्या जैन लेणी आहे. लेणीच्या आत चार दगडी खांबाचा मोठा गाभारा आहे. पण त्यातील एकच खांब अखंड आहे. गाभाऱ्याचा पुढे गुहेच्या खोलीत भगवान महावीरची मूर्ती भग्न अवस्थेत आहे.

लेणी पासून त्रिगलवाडी किल्ल्यावर जाणाऱ्या वाटेचे वर्णन: 
लेणीच्या डाव्याबाजूने गडावर वाट जाते. ह्या वाटेने मी १० मिनटात त्रिंगलगड डोंगराच्या सोंडेवर पोहचलो.
सोंडेवरून सरळ चढत गेल्यावर आपल्याला गडाच्या शिखराचा मुख्य कातळ लागतो. ह्या कातळाच्या दोन बाजूने, उजवीकडून आणि डावीकडून गडावर वाट जाते. 

मी सगळ्या ट्रेककर्स प्रमाणे डाव्या वाटेने गेलो. डाव्यावाटेने गेलो असता, आपल्याला कातळाच्या पायऱ्या आणि गडाचा दरवाजा लागतो. पायऱ्या चडून आल्यावर, समोर मारुतीची ७/८ फुटाची कातळावर कोरलेली मूर्ती दिसते आणि बाजूलाच उजवीकडे दरवाजा आहे.दरवाजाने  वर गेल्यावर आपण गडावर पोहचतो. 

बाराला दहा मिनटं असताना, म्हणजेच साधारण अर्ध्यातासात मी लेणी पासून दरवाज्याने गडावर पोहचलो.

त्रिगलवाडी किल्ल्यावरील पाहिलेल्या वास्तू:
दरवाज्याने वर आल्यावर एक वाट समोर जाताना दिसते. ह्या  वाटेने चालत गेलो असता आपण वाड्याचा अवशेषजवळ पोहचतो. 

वाड्याचे अवशेष 
ह्या पहिल्या वाड्याचा खाली थोड्या अंतरावर अजून एक वाड्याचे अवशेष दिसतात.  ह्या वाड्याचा बाजूने उजवीकडील वाट गडावर येते. ह्या वाटेचे वर्णन मी उतरतेवेळी शेवटी केले आहे. गवतामुळे मला वाडा नीट पाहता आला नाही. ह्या वाड्यांच्या व्यतिरिक्त तिथे आजूबाजूला ३ / ४  नुसते दगड रचून चौकोनी चौथरे केलेले दिसतात. पण त्यांना बघून प्राचीन अवशेष वाटत नाही.

पहिल्या  वाड्याचा येथे आल्यावर आपल्याला गडाच्या सर्वोच माथ्यावर जाताना एक वाट दिसते. ह्या वाटेने शिखर माथ्यावर पोहचता येते. पण ह्या वाटेने मी उतरलो आणि डावीकडील वाटेने पुढे गेलो. 

खांब टाकी किंवा गुहा आणि पाण्याचा तीन टाकी:
डावीकडील वाटेने पहिली मला गडावरील खांब टाकी किंवा गुहा लागली. टाकीचा बाजूला खाली एक आयताकृती टाकी लागते.  इथून वाटेने पुढे गेलो असता. मंदिर जवळ पोहचेपर्यंत, अजून दोन टाकी दिसतात. त्यातील एक जरा वाटेवरून उतरून बाजूला लागते. दोन हि टाकी बघून मी पुढे गडावरील मंदिराजवळ पोहचलो

गडावरील मंदिर:
मंदिरात दोन देवीच्या मूर्ती मध्ये गणपतीची लहान मूर्ती दिसते. मंदिराचा समोरील जागेत शंकराची पिंड आहे.  ह्या जागेच्या खाली बहुतेक समाधी सारखे दोन पाषाण दिसतात. 

शिखर माथ्यावर पोहचल्यावरचे वर्णन:
शिखर माथ्यावर जाण्यासाठी मंदिराचा पाठून माथ्यावर जाणारी वाट दिसते.त्या वाटेने मी ५ मिनटात शिखर माथ्यावर पोहचलो.  सगळे अवशेष बघून मी १२.३० ला शिखर माथ्यावर पोहचलो.

मंदिराच्या बाजूने वर आल्यावर, इथून समोर त्रंबक डोंगररांग स्पष्ट दिसत होती. इथून पुढे मी झेंड्याजवळ गेलो. तिथून त्रिंगलवाडी धरण आणि त्याचा पुढचा परिसर दिसत होता. तर त्याचा अजून डाव्या बाजूला डोंगराचा पाठी लांब कावनई  गड दिसत होता. उजवीकडे दूरवर डोंगररांग न दिसता. पठार आणि जंगल दिसत होता. डावीकडेच पाठी मध्य वैतरणा धरणाचं पाठीमागचा जलाशय दिसत होता.

पूर्ण गड पाहून झाला होता, मग माथ्यावरच जेवण करून सव्वा एकला गड उतरायला सुरवात केली. उतरतेवेळी  उजव्या वाटेने गड उतरायला सुरवात केली.  

उजव्या वाटेचे उतरतेवेळी वर्णन:
वर सांगितल्याप्रमाणे दुसऱ्यावाड्याचा बाजूने उजवीवाट वर येते. तिथूनच उतरायला सुरवात केली. 
वाड्याचा खाली आल्यावर आपल्याला कातळात कोरलेल्या तुटलेल्या पायऱ्या लागतात . पायऱ्यांचा वर आपल्याला भिंती सारखे अवशेष दिसतात. बहुतेक छोटा दरवाजा असल्यासारखे अवशेष वाटतात.  पायऱ्या  उतरतेवेळी उजव्याबाजूला एक छोटी गुहा लागते.  गुहेच्या पुढे पायऱ्या संपतात आणि वाट उजवीकडे वळते. आणि आपल्याला जेथे दोन वाटा लागतात तिथे घेऊन जाते.

२. ४० ला मी त्रिंगलवाडी गावात पोहोचलो. 

हि खालील माहिती, माझ्या आठवणी साठी मी लिहिली आहे
त्रिंगलवाडी गाव ते इगतपुरी पर्यंतचा परतीचा प्रवास कसा केला:
गावातून इगतपुरीला जातेवेळी गाडी नव्हती म्हणून चालायला सुरवात केली. गावातले बोलले वाटेत काही ना काही भेटेल. पाच मिनटं चाललो आणि तितक्यात एक डम्पर आला, त्याने मला पारदेवी फाट्याला सोडला आणि तो दुसऱ्या गावात गेला.  मग इगतपुरीच्या दिशने पुढे थोडा चाललो असता. एका बाईकवाला घाटा मध्ये चालला होता, त्यांनी मला तिथपर्यंत सोडला. पुढे मी घाट उतरू लागलो पुन्हा ५ते १० मिनटात दुसरा बाईक वाला आला. त्याने मला इगतपुरी रेल्वे स्थानकापर्यंत सोडला. अशा प्रकारे मी ३. १५ ला इगतपुरीला पोहचलो. काही गाडी नसती भेटली तरी मी ५ किमी म्हणजे साधारण १ ते दिड तास चालायची तयारी ठेवली होती. पण गावातल्याने सांगितल्याने मला गावातल्या लोकांनी लिफ्ट दिली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.


 त्रिंगलवाडी ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  
https://youtu.be/A3v69AXmZEg

लेणीच्या वाडीच्या अगोदर वाटेत हि शिळा दिसली, बहुतेक समाधी शिळा असावी.

गडावरील खांब टाकी किंवा गुहा आणि त्याचा बाजूला खाली टाकी दिसत आहे.

दुसरी टाकी

तिसरी टाकी

मंदिरातील मूर्ती

मंदिराच्या मागाहून शिखर माथ्यावर जाताना. हा शेंदूर लावलेला पाषाण दिसतो.

दुसऱ्या वाड्याजवळ आढळणारी खोबी

लेणीचे गाभाऱ्याचे दृश्य

गडाच्या शिखर माथ्यावरून दिसणारे दृश्य. पॅनोरमा मोड मध्ये टिपले आहे

गडाच्या शिखर माथ्यावरून दिसणारे दृश्य. पॅनोरमा मोड मध्ये टिपले आहे

गडाच्या शिखर माथ्यावरून दिसणारे दृश्य. पॅनोरमा मोड मध्ये टिपले आहे

धरणाच्या काठावरून पॅनोरमा मोड मध्ये टिपलेले दृश्य. 

 त्रिंगलवाडी ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  
https://youtu.be/A3v69AXmZEg

Friday, 24 August 2018

Mordhan fort मोरधन किल्ला

 मोरधन किल्ला 
मोरा किंवा मोरधन डोंगराच्या पठारावरून मोरधन गडाचा काढलेला फोटो.  गड उत्तरदक्षिणेला  लांब पसरलेला दिसतो.
मोरधन ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  
  

ह्या वर्षीच्या पावसाळ्यातील हा पाचवा ट्रेक होता. पण ह्या अगोदरचा ट्रेकपेक्षा ह्या ट्रेकला मिळालेला पावासाचा अनुभव आणि गड माथ्यावर लागणारा जोराचा वारा, ढगांचा खेळ, खूप सुंदर होता. गडावरील अवशेष पाहता, हा टेहळणीचा  किल्ला असल्याचे कळून येते.

प्रवासाचे वर्णन:
शुक्रवारी रात्री आमचा, रविवारी १२ ऑगस्टला मोरधन करायचा ठरल्यामुळे, आम्हाला एक्सप्रेस ट्रेनची तिकीट भेटली नाही. त्यामुळे आम्ही कसारा लोकलने जायच ठरवले. मी सकाळी ५. १२ ची कसारा पकडली, प्रणव आणि विनय डोबवलीला भेटले. ७. ४० ला आम्ही कसारा पोहचलो. तिथेच आम्ही नाश्ता करून. कसारा स्थानकातून शेअर गाडीने अर्ध्यातासात घोटीला पोहचलो.
कसारा ते घोटी अंतर २५ किमी आहे, त्यासाठी गाडीवाले प्रत्येकी ४० रुपये घेतात. पण तो अर्धातासाचा प्रवास अनुभवून, भुसावळ पॅसेंजरने सरळ घोटीला आलो असतो तर परवडलं असत. असे मला वाटत होते. घोटी स्थानकातून खैरगाव साठी एसटी नाही. त्यासाठी शेअर गाडीने किंवा खाजगी रिक्षा करून जायला लागते. किंवा एसटीने देवळे गावात उतरून खैरगाव साठी शेअर किंवा रिक्षाने जावे. घोटी ते खैरगाव अंतर अंदाजे ५ते ६ किमी असेल. त्यासाठी रिक्षावाल्यालाने आम्हाला ३०० रुपये घेऊन जरा लुबाडलच, हे प्रवास केल्यानंतर आम्हाला कळून आले. येतेवेळी आम्ही गावातीलच एकाचा गाडीने आलो त्याने १५० रुपये घेतले. पण जर शेअर गाडीने आलो असतो, तर अंदाजे प्रत्येकी २० ते ३० रुपये घेत असतील. असा माझा अंदाज आहे.

गडाच्या वाटेच वर्णन:
सव्वा दहा वाजता आम्ही खैरगावातील शाळेजवळून ट्रेकला सुरवात केली. शाळेजवळ वाटेत मध्येच झाडाखाली उघड्यावर गणपतीची थोडी प्राचीन अशी मूर्ती दिसते. तिथून पुढे, गावातून आम्ही वाट विचारत ५ मिनटात, गावाचा पाठीमागे बाहेर आलो.

गावातून  बाहेर गडाचा दिशेने आलो असता. मोरधन गडाची किंवा मोरा डोंगराची एक सोंड गावाचा दिशेने आलेली दिसते. ह्या डोंगराच्या वर आपल्याला मोरधन गडाचा मुख्य डोंगर दिसतो. सोंडेवरील ह्या वाटेने आपण, न चुकता डोंगर चढायला लागतो. वर चढल्यावर वाट डावीकडे वळत डोंगराची घळ लागते, तिथे घेऊन जाते.  इथून आपण ५ ते १० मिनटात डाव्याबाजूचा पठारावर पोहचतो.

मोरा किंवा मोरधनच्या डोंगराचा पठार:
आम्ही तासाभरात पठारावर पोहचलो. पठारावरून आपल्याला मोरधन गडाचा मुख्य डोंगर सरळ उत्तर दक्षिणेला लांब पसरलेला दिसतो. तसेच पठारावरून पलीकडील दरणा जलाशय दिसतो. सुसाट सुटलेल्याला वारा आणि पावसाचा थोडावेळ आनंद घेऊन, आम्ही गडावर जाण्यासाठी पुढे चालू लागलो.

पठारावरून गडामाथ्यावर जाणारी वाटेचे वर्णन:
पठारावरून एक वाट सरळ पुढे जाताना दिसते. पण गडावर जाण्यासाठी वाटेने सरळ पुढे न जाता, आपल्या उजव्या बाजूला जेथे मोरधन गडाचा मुख्य शिखर सुरवात होतो. तिथूनच बरोबर खाली वाट आहे, हे लक्षात ठेवणे. कारण पठारावरून येणारी मोठी वाट सरळ पुढे जाते, त्यामुळे उजव्याबाजूची हि छोटी वाट दिसत नाही. त्यामुळे चुकून तुम्ही सरळ जाणाऱ्या वाटेने पुढे जाऊन चुकू शकता.

उजव्याबाजूची हि वाट, डावीकडे वर नागमोडी वळून सरळ न चुकता गडावर घेऊन जाते. ह्या वाटेने आपण  पाऊण ते एक तासात गडाच्या माथ्यावर पोहचतो.

गड माथ्यावरील वर्णन:
गडाच्या माथ्यावर पोहचल्यावर, आम्ही उजवीकडचा माथा जवळ आणि लहान असल्यामुळे. पहिलं त्यादिशेला गेलो. उजव्या माथ्याचा टोकाला, आपल्याला एक चौथऱ्याचे अवशेष आढळतात.  ह्या बाजूला माथ्यावर बाकी काही अवशेष नसल्यामुळे, आम्ही पाठीमागे फिरून डावीकडे गेलो.

डावीकडील माथा दक्षिणेला लांबवर पसरलेला आहे. ह्या बाजूला तुम्ही गडमाथ्यावर ज्या वाटेने येतात.  त्याचा डाव्या बाजूला, काही अंतरावर गडावरील एकमेव पाण्याचे टाके लागते. टाकीच्या पुढे दक्षिणेला गड माथा अजून लांब पसरलेला आहे. पण आम्ही वाचलेल्या माहितीनुसार टाकीच्या पुढील माथ्यावर काही अवशेष नाहीत. म्हणून आम्ही इथूनच मागे फिरून गड उतरायला सुरवात केली.

तसेही गडमाथ्यावर आलेले ढग आणि गवतामुळे अवशेष ओळखणे जरा अवघडच होते. त्यामुळे आमचा चुकून एकाद-दुसरा अवशेष राहून गेले असतील.

थोड्यावेळा साठी माथ्यावरून ढग बाजूला झाल्यामुळे गडा खालील परिसर दिसू लागला. गडाचा पश्चिम बाजूला आपल्या खैरगाव, घोटीचा परिसर दिसतो. पूर्वेला दरना जलाशयचा सुंदर परिसर सतत दिसतो. ढगांमुळे आम्हाला गडावरून आजूबाजूच्या परिसरातील किल्ले दिसले नाहीत. गडावर पाऊस आणि जोराचा वारा लागत होता. वारा एवढ्या जोरात वाहत होता, कि मध्येच आम्हाला त्याचा प्रवाहात ढकलत होता. त्यामुळे आम्ही जास्त करून गडाचा कडेला जाणे टाळले. 


थोडक्यात प्रवासाबद्दल 
  • मुंबई ते कसारा लोकल ट्रेन ने कसारा उतरावे 
  • कसारा ते घोटी अंतर २५ किमी आहे. त्यासाठी शेअर गाडी असतात. प्रत्येकी ३० रुपये घेतात. 
  • किंवा भुसावळ पॅसेंजर घोटी ला १० वाजता पोहचते. हा प्रवास शेअर गाडी पेक्षा उत्तम पडेल. 
  • घोटी ते खैरगाव अंतर ५ते ६ किमी आहे. 
  • घोटी वरून खैरगाव साठी शेअर गाडी भेटतात किंवा खाजगी रिक्षा करून जाणे. 
  • स्वतःची गाडीने  मुंबई ते नाशिक महामार्गावरून घोटीला, घोटी -शिर्डी रस्त्याने देवळे गावातून खैरगाव गाठावे. 
मोरधन ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा