Wednesday, 5 August 2026

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गड किल्ले- भाग 3- यशवंतगड, बांदा भुईकोट,रेडी गणपती, सिद्धेश्वर मंदिर, पोर्तुगिज वखार

 

दिवस तिसरा

बांदा भुईकोट

बांदा भुईकोट आता पोलीस ठाणे झाले आहे. त्यामुळे आत जास्त काही अवशेष दिसत नाही. आत पॉपोलिसांनी ठाणे बांधलं आहे त्यामुळे नवीन बांधकाम दिसते. पण आत मध्ये भुईकोट पाहून देतात. कारण आत मध्ये मंदीर आहे. कोटात मुख्य दरवाजाने प्रवेश करतो त्याचा बुरुज आणि त्याची तटबंदी बहुतेक दुरुस्ती केल्यामुळे चांगल्या अवस्थेत दिसते. कोटाची एकबाजूची तटबंदी चांगली दिसते. नदी बाजूची तटबंदी पडझड झालेली दिसते.  अगदी १० मिनिटात भुईकोट बघून झाला.


भुईकोट पाहून तिथेच जवळपास एक मुस्लिम समाधी आहे. समाधी पाहून कोणी मोठा सरदार/सावकाराची असावी वाटते. पाच मिनिटात समाधी पाहून, आम्ही रेडी साठी निघालो.





बांदा भुईकोट 


अज्ञाद समाधी 



सिद्धेश्वर मंदिर 

बांदा भुईकोट करून आम्ही यशवंत गड साठी रेडीला निघालो.दुपारी ३ वाजता आम्ही सिद्धेश्वर मंदिरात गेलो. इथे मंदिराचा समोर तुळशी वृंदावन जवळ भगवान शिवची चारमुखी प्राचीन भंग झालेली अर्ध मूर्ती आहे त्याचा बाजूला अजून एक गौतम बुध्द सारखी एक भग्न अर्ध मूर्ती आहे. मंदिर किनाऱ्या लगत आहे. त्यामुळे सुदंर निसर्ग पाहायला मिळतो. मंदिरात खाली उतरायचा अगोदर पायऱ्या लागतात त्याचा समोर कातळात छोट्या गुहा अथवा लेणीच्या खोली सारखं काही तरी दिसत. नक्की काय आहे ते कळत नाही. मंदिर पाहून आम्ही भुईकोट पाहायला गेलो.







यशवंतगड/ रेडीचा किल्ला 

सव्वा तीन वाजले होते म्हणून आम्ही आधी जेवून घेतले आणि मग भुईकोट पहायला  गेलो. भुईकोटाचं डागडुजीचे काम चालू होते. भुईकोटाचे प्रवेश दाराचे डागडुजी केल्यामुळे दरवाजा सुव्यवस्थित दिसतात. डागडुजी केल्यामुळे बुरुज आणि तटबंदी मधील फांजी पूर्णपणे बुजवून टाकलेल्या दिसल्या. तसेच भुईकोट मधील आतील इमारतीच्या खांबाचा जांभ्याचे आकार वर्तुळाकार आणि कलाकृती सारखे होते. तिथे आता सरळ चौकोनी जांभा दगड लावलेले दिसतात. भुईकोटाचा मध्ये इमारत आहे. तसेच भुईकोटचे प्रवेश दार सुंदर दिसतात. बाकी  कोटाचा  बाजूला झाडेझुडपे जास्त असल्यामुळे बाजूचा परिसर जास्त दिसत नाही. एके ठिकाणी समुंद्राच सुदंर दर्शन होते. 

तासभरात आमचा भुईकोट पाहून झाला. पुढे आम्ही रेडीचा गणपतीचे दर्शन घ्यायला गेलो.


रेडी गणपती मंदिर 

 पाच वाजता आम्ही मंदिरात पोहचलो. १५/२० मिनिटे दर्शन घेऊन वेंगुर्ल्याला पोर्तुगीज वखार पाहायला गेलो.



पोर्तुगिज वखार वेंगुर्ला 

रेडी ते वेंगुर्ला अंतर २१.७ किमी होते. संध्याकाळी ६.१० ला  वखार जवळ पोहचलो.  वखार पाहण्याची वेळ बहुतेक सकाळी ९/९.३ ते  संध्याकाळी ६.३० आहे. कारण साडे सहा वाजता गेट लावण्यासाठी तिथे सुरक्षा रक्षक आले. मग आम्ही निघालो. 





संध्याकाळी आम्ही मग तिथे राहण्यासाठी हॉटेल बघू लागलो. मे महिना पर्यटक जास्त असल्यामुळे बहुतेक हॉटेल भरले होते. तसेही मला वेंगुर्ल्यात हॉटेल कमीच वाटले. हॉटेल शोधण्यात आमचे दोन एक तास गेले. मग शेवटी एक ८०० रुपये देऊन घरगुती लॉन्ज मध्ये राहिलो. रात्री आम्ही जेवण हि एका खानावळ मध्ये केले.

अशा प्रकारे आमचा चौथा दिवस गेला. 


उद्या आमची योजना निवती कोट, सिंधुदुर्ग जलदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट पाहण्याचा होता. पण सुरवातीलाच दुसऱ्या दिवशी सोनगडला एक दिवस जादा  गेल्यामुळे आम्ही हे दुर्ग न करता पुढचे करायचे ठरवले. कारण हे दुर्ग प्रसिद्ध आहे आणि इथे जाण्यासाठी तुम्हाला गाडीची सोय होते. म्हणून आम्ही पुढचे दुर्ग करायचे ठरवले. पुढील भागात वेताळगड, भगवंतगड, भरतगड आणि आचरा रामेश्वर मंदिर /कोट. 






सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गड किल्ले- भाग २ - मनोहर-मनसंतोष आणि हनुमंतगड

दिवस तिसरा

सोनगड ते मनोहर-मनसंतोष प्रवास

सोनगड ते मनोहर-मनसंतोषगड, पांडुर-झाराप वरून आंबोली घाटाला रस्ता जातो त्यामार्गे शिरणशिंगे, गोठवेवाडी ९६ किमी अंतर होता. तर दुसरा रस्ता गाव नरुर-सकिर्डे-शिवापूर गाव मार्गे ७३ किमी अंतर होत. हा रस्ता आतील गावातून जात होता पण प्रवास वेळ तेवढाच दाखवत होता.

त्यामुळे आम्ही झाराप वरून आत गेलो. आंबोली घाटाचा रस्ता सोडून शिरशिंगेसाठी आत जातो तो रस्ता नागमोडी आणि छोट्यामोठ्या घाटाचा होता म्हणून मनोहरगड पोहोचेपर्यंत अडीच वाजले.


शिरशिंगे आणि शिवापूर हि दोन्ही गाव एक घाट रस्त्याने जोडली आहेत. हा घाट रस्ता गडाचा डोंगरातून जातो. गोठवेवाडीतून घाट रस्त्याने गेलो असता, शिवापूर गावाची वेस लागायच्या आधी डावीकडे एक मातीचा रस्ता गडाचा कातळ टोपीपर्यंत जातो. गोठावे वाडीतून घाट रस्ता चांगला आहे. पण शिवापूर गावातून येणारा रस्ता खूपच मातीचा अथवा खराब होता. त्यामुळे गोठवे वाडीतून जाणे उत्तम.


मनोहर-मनसंतोषगड

गडाच्या पायथाचे गाव शिरशिंगे.

गडडोंगराचा एका बाजूला एक सुळका दरी अथवा खिंडी मुळे वेगळा झालेला दिसतो तो सुळका म्हणजेच मनसंतोष गड. मनसंतोष गडावर जाण्यासाठी खालील टप्यात कातळ पायऱ्या आहेत पण वरच्या टप्पात प्रस्तरोहणचा सामान असेल, तरच वर जाता येते असं वाचलं होतं कारण वर पायऱ्या नाही. म्हणून आम्ही गेलो नाही. मनसंतोषला जाण्यासाठी नैसर्गिक गुहेच्या बाजूने पुढे कातळाला वळसा घालत वाट जाते. आपण जेव्हा कातळटोपीने बाजूने जातो तिथेच वरती ह्या गुहा आणि तिथे जाणारी वाट दिसते.


गडाच्या कातळ टोपीपर्यंत रस्ता केला आहे. त्यामुळे गावातून गडाच्या कातळ टोपीपर्यंत चालत जाण्याच्या बराच वेळ वाचतो. अजून एकदोन वर्षात डांबरी रस्ता होईल असे वाटते. 

आम्ही डावीकडे गडावर जाणारा रस्ता सुरु होतो तिथेच दुचाकी उभी केली आणि पुढे चालत गेलो. 

बाईक अजून पुढे गेली असती, पण मातीत सरकली अथवा रुतली असती. म्हणुन मग आम्ही चालत गेलो. तरी ह्या रस्त्याने आम्हला कातळ टोपी पर्यंत पोहचायला २० मिनिटे लागली. इथून गडाचा उजव्या बाजूने कातळाला लागून वाट जाते. ह्या वाटेने गड माथ्यावर पोहोचायला एक तास लागला. 


कातळटोपीच्या बाजूने चालताना जेव्हा वाट डावीकडे वर वळते, तिथे खालून शिवापुर गावातून येणारी वाट मिळते. इथे एक ढासळलेला बुरुज आणि उध्वस्थ तटबंदी दिसते. बहुतेक पहिला इथे दरवाजा होता असे वाचले होते.

गडाचा पायऱ्या ब्रिटिशांनी उध्वस्त केल्या होत्या, त्यामुळे जेव्हा आपण गडाचा मुख्य उध्वस्थ दरवाजा, बुरुज जवळ पोहचतो. त्याचा आधी लोखंडाच्या पायऱ्या लावलेल्या आहेत. त्याचा वरती दरवाजा पर्यंत पायऱ्या आहेत.


गडावर छत्तपत्री शिवाजी महाराज ३४ दिवस राहिले होते. एवढे दिवस विश्रांती साठी राहिले होते का अन्य कारणा साठी ते कारण स्पष्ट कुठे सांगितले नाही. पण माझ्या मते गडावर गेल्यावर गडाचा भवतालीचा आंबोलीच्या घाटाचा निसर्गमय परिसर खूपच सुंदर वाटते.


गड वर्णन

गड माथ्यावर पोहचल्यावर आम्ही डावीकडून गड फेरीला सुरवात केली.


आपण ज्या वाटेने गडावर येतो, गडाच्या त्या बाजूला तटबंदी दिसते. गोठवेवाडीच्या बाजूला तटबंदीचा एकही अवशेष दिसत नाही. तर त्याचा विरुद्ध बाजूला म्हणजे शिवापूर गावाचा बाजूला हि तटबंदी दिसत नाही. पण डोंगराचा कड्याला एक दोन ठिकाणी तटबंदीच्या दगडाचे काही अवशेष दिसतात. 


माथ्यावर आल्यावर आपल्याला पहिला ढासळलेला मुख्य दरवाजा आणि बुरुज दिसतो  त्याचा डाव्या बाजूला तटबंदीच्या बाजूने पुढे गेलो असता. पुढे तटबंदी मध्ये शौचकूप दिसतात. एकूण गडावर ३/४ शौचकूप आहेत. गडावर एक विहीर आहे. जी गडावरील एकमात्र पाण्याची सोयआहे, पण त्यातील पाणी खराब असल्यामुळे पिण्यास योग्य नव्हते.  

माथ्यावर औदुंबराचा मोठा झाडाखाली भैरोबा, गजलक्ष्मी आणि इतर देवांच्या मूर्ती आहेत. झाडाचा भोवती अर्ध वर्तुळाकार चुन्याचा गाडा आहे. अजून एक मुख्य वास्तू गडावर आहे ती म्हणजे वाडा. 

आम्ही डावीकडून सुरवात करून पुढे सरळ समोर गेल्यावर, शेवटी मनसंतोषगडचा सुळका आहे. त्याआधी मध्ये  एक उंचवटा लागतो, बहुतेक बुरुज असावा असं. सुळका पाहून उजवीकडे शिवापूर गावाच्या बाजूने चालू लागलो. अजून गडावर जास्त काही अवशेष दिसले नाही. अश्या प्रकारे गड फेरी पूर्ण करून साडेपाचला गड उतार केला. 

सहा वाजता गोठवेवाडीत पोहचलो. 


दुचाकी असल्यामुळे काळोख होण्याचा आत आम्हाला मुख्य रस्त्याला पोहचायचं होत. मे महिन्यात सूर्यास्त उशिरा होतो त्याचा एक फायदा असतो. त्यामुळे आम्ही  काळोख होण्या अगोदर मुख्य रस्त्याला पोहचलो. पुढे आम्ही आधी बांदा ल्या राहणार होतो पण बांदा पेक्षा सावंतवाडी जास्त मोठं शहर होत आणि अंतर हि जास्त फरक पडत नव्हत. म्हणून आम्ही सावंतवाडीला रहायला गेलो. मे महिना असल्यामुळे बहुतेक हॉटेल फुल्ल होते. मग शेवटी एका हॉटेल मध्ये १२०० रुपये देऊन एक अवतानुकूलित खोली घेतली.


उद्या हनुमंतगड, बांदा भुईकोट, यशवंत गड आणि वेंगुर्ल्याची पोर्टींगीझ वखार करायची योजना होती.















दिवस चौथा 

सकाळी साडेसात वाजता आम्ही हनुमंतगड साठी निघालो. सावंतवाडी ते हनुमंतगड, फुकेरी गाव अंतर २६ते ३०किमी आहे. बांदामार्गे ३० तर विळवडे मार्गे २६किमी आहे. दोनच मिनिटाचा फरक दाखवत होता. मग आम्ही बांदा मार्गे जायायचं ठरवल. बांदाला नाश्ता करून पुढे फुकेरीला गेलो. 


हनुमंतगड 

टकमक टोकावरून दिसणारा हनुमंतगड


पायथ्याचं गाव फुकेरी, गाडी अगदी वर पर्यंत जाते तिथून ५ मिनिटात चढून गड माथ्यावर पोहचतो. गडमाथा लांब पसरलेला आहे. त्यामानाने रुंदीला तोकडा आहे. गडावर जास्त अवशेष दिसत नाही. गडाची तटबंदी अखंड नाही मध्ये मध्ये टप्प्यात दिसते. आम्हाला गडाला दोन दरवाजे दिसले. एक महादरवाजा ज्याने आपण गडावर प्रवेश करतो आणि एक दिंडी दरवाजा. ह्या दरवाजा फुकेरी गावाचा दिशेला आहे. त्यामुळे अंदाजे पूर्वी गावातून येत असावे,   


आम्ही दुचाकी पायथ्याला लावून गड चढायला सुरवात केली. पाचच मिनटात महादरवाजा जवळ पोहोचलो. 

दरवाजाची कमान नाही पण  बाजूचे अवशेष आणि बुरुजाचे अवशेष बाकी आहे. पहिल्या दरवाजाने आत आल्यावर वाट डावीकडे जाते, तिथे दुसरा दरवाजा आहे.  ह्या दरवाजाच्या बुरुज वरना ढासळला आहे पण बाकी चांगल्या अवस्थेत दिसतात. ह्या दरवाजाने प्रवेश केल्यावर आपण गड माथ्यावर प्रवेश करतो. समोर प्रवेश केल्यावर आपल्याला दरवाजाचे दगड पडलेले दिसतात. 


महादरवाजा गडाच्या एका टोकाला आहे, त्यामुळे दरवाजाने प्रवेश केल्यावर उजवीकडे सरळ गड पसरलेला आहे. अंदाजे १ किमी लांब असेल. पुढे थोड्या अंतरावर मोकळ्या माथ्यावर शिवरायांची मूर्ती आणि त्याचा बाजूला दोन तोफा ठेवलेल्या आहेत. 


शिवरायांचे दर्शन घेऊन पुढे डावीकडच्या वाटेने चालू लागलो. मूर्तीमागे टेकाडभाग आहे. त्यामुळे इथे तुम्हाला डावी किंवा उजवीकडून पुढे गडफेरीसाठी जायायला लागते. आम्ही डावीकडून गेलो. डावीकडील वाट माथ्याचा कडेने जाते. त्यामुळे कड्याला समांतर अशी तटबंदी दिसते, अशीच तटबंदी पूर्ण गडाला दिसते काही काही ठिकाणी  दिसते. इतर ठिकाणी पडली असावी.  बहुतेक तटबंदीचा वरील भाग ढासळलेला असावा, म्हणून सगळीकडे अशाप्रकारची तटबंदी दिसते. 

गडावर सहयाद्री प्रतिष्ठाणने फलक लावल्यामुळे त्याचा फायदा होतो. सुरवातीला वाटेत आम्हाला श्री पिसादेवीचा फलक दिसला पण तिथे देव किंवा मंदिराचे काही अवशेष दिसले नाही. केवळ आम्हाला एक मोठा पाषाण दिसला.


तिथून पुढे चालू लागल्यावर वाटेत  गडावरच एकमात्र पाण्याचं टाक /तळ दिसते. थोड पाणी होत पण पिण्यास योग्य नव्हते. टाकी समोर कड्याला तटबंदी दिसते.  

टाकी कडून पुढे माथ्याचा टोकाला गेलो. तिथे हि काही ठिकाणी तशीच तटबंदी आणि बहुतेक बुरुज हि दिसतो. 
गडाचा ह्या टोकाला आले असता समोर दूरवर पारगड दिसतो. 
इथून आम्ही दुसऱ्या बाजूने म्हणजे फुकेरी गावाचा बाजूने गडफेरीला सुरवात केली. त्याआधी मध्य भागी असलेल्या झाडांन झुडपांमध्ये काही अवशेष आहेत का पहात होतो, पण काही दिसले नाही.  

फुकेरी बाजूने फेरी मारतेवेळी सुरवातीला एके ठिकाणी खाली थोडा खोलगट भाग आहे. तिथे तटबंदी दिसते. पाणी अडवण्यासाठी जशी तटबंदी बांधतात तशी आहे. अजून पुढे गेलो असता पुढे पुन्हा खोलगट भाग लागतो. हिथे हि  तटबंदी दिसते. ह्या तटबंदी मध्ये दिंडी दरवाजा आहे. ह्या दरवाजा फुकेरी गावाचा दिशेला आहे. बहुतेक पूर्वी गावातून ह्या वाटेने येत असावे. दरवाजा ढासळला आहे तरी पण अजून थोडा चांगला अवस्थेत दिसतो. दरवाजा पाहून वर आल्यावर तिथे एक तोफ दिसते. 


तिथून आम्ही वर टेकाड/ उंचवटा भाग आहे त्याच्यावर गेलो. तिथे राजसदर चा फलक लावला आहे. आधी सांगितल्याप्रमाणे शिवरायांचा मूर्तीच्या पाठी मागे हा टेकाड/उंचवटा भाग आहे. त्या टेकाडावर राजसदर असल्याचा फलक आहे. पण त्यावरील दाट झाडीमुळे काहीच अवशेष दिसत नाही. अथवा हि सदरची जागा असावी म्हणून फलक लावला असावा.


सदरेची जागा पाहून पुन्हा महा दरवाजाने गडउतार केला. तरी पूर्ण गड पहायला आम्हाला पाऊणे दोन तास लागले.  


हनुमंत गड सोबत आमचे सिंधुदुर्ग जिल्यातील वनदुर्ग पूर्ण झाले. आता आमचे पुढे भुईकोट, किनाऱ्या लगतचे आणि इतर गडकिल्लेची योजना होती.  त्याबद्दल पुढील भागात लिहेल.


हनुमंतगड वरून आम्ही पुढे पुन्हा बांदा भुईकोट साठी गेलो.  दुपारी १२.४० ला आम्ही बांदा पोहचलो.





Saturday, 30 May 2026

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गड किल्ले- भाग १ - भैरवगड आणि सोनगड/नरसिंहगड


भैरवगड आणि सोनगड/नरसिंहगड  

कोकणातील किल्ले बोललं कि बहुतेक जणांना जलदुर्ग आठवतात. त्यात मी मे महिन्याचा गर्मीत केलेल्या योजनेमुळे बहुतेक जणांना आदी सागरी किल्लेच वाटले. माझी योजना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गडकिल्ले, कोट आणि काही जलदुर्ग बघण्याचा होता. त्यात सहा दिवसाची सुट्टीचा बरेच जणांना जमत नव्हतं, तर काहींना फक्त शुक्रवार ते रविवार जमत होता. मग शेवटी अजय मिश्रा आणि मी दोघंच जायायचे ठरवले. मी सगळा आराखडा तयार ठेवला.  मे महिन्यामुळे ट्रेन बस सगळेच भरलेले होते. त्यात आम्ही इथून दुचाकी बसमधून नेणार आणि तिथे चालवणार होतो. पण अजय ने सांगितले आपण इथून बाईकने जाऊ. तस ठरल्याप्रमाणे आम्ही १ दिवस पूर्ण प्रवासाला द्यायचा ठरला. आणि १० मे ला आम्ही सकाळी ८ ला सुरु केलेला प्रवास रात्री ८ ला राजापूरला थांबवला. २० वर्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्गावरील कामामुळे ट्राफिक आणि खेड पासून पुढे लागलेल्या पावसाळामुळे आम्हाला उशीर झाला. पुढे कणकवलीला जाणार होतो पण बरेच हॉटेलला  फोन करून विचारला पण रहायला जागा नव्हती आणि उशीर हि खूप झाला होता. म्हणून मग राजापूरलाच थांबलो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८ ला भैरवगड साठी प्रवास चालू केला. 


दिवस दुसरा

वनदुर्ग भैरवगड 

पायथ्याच गाव भैरवगड पण तालुक्यातून यायचं असेल तर मुख्य गाव नरडवे सांगायला लागते. कणकवली ते भैरवगड पायथा अंतर २७/२८ किमी आहे.

आम्ही सकाळी राजापूर-कणकवली भैरवगड असा ८०/८५ किमीचा अडीच तास प्रवास करत, पाऊणे अकराला गडाचा पायथ्याला पोहचलो. अकराला गड चढायला सुरवात केली. सुरवातीला जरा सुद्धा हवा नव्हती त्यात वरील पट्ट्यात सोंडेचा खडा चढ होता. पण सोंड असल्यामुळे क्वचित एकाद दुसरं झाड होतं त्यामुळे उन आणि प्रचंड गर्मी होत होती. पण सोंडेवर मध्ये मध्ये वारा हि लागत होता. म्हणून बर वाटत होते. तरी हि गडमाथ्यावर पोहोचायला आम्हाला सव्वा तास लागला.

गडाचे वर्णन
गडावर जास्त अवशेष दिसत नाही. गडावरील मुख्य ठिकाण म्हणजे भैरावाचं मंदिर. मंदिरासमोर चौथऱ्या वर दीपमाळ आणि दोन लहान तोफा आहेत. चौथऱ्याच्या पाठीमागे (आपल्या) उजव्या बाजूला मारुतीचं शिल्प आहे.  मंदिरचा परिसरात अजून काही उध्वस्त चौथऱ्याचे अवशेष दिसतात.

माथ्यावर पोहचण्याचा अगोदर काही पायऱ्या लागतात. तसेच माथ्यावर पोहचण्याअगोदर तटबंदी चे काही दगड दिसतात, पण ते सहजा कळून येत नाही. नीट बघितले कि कळते.

माथ्यावर मंदिराकडे जाताना वाटेतच समोर झाडांमध्ये एक बुरुज, तटबंदी दिसते. बहुतेक बालेकिल्ल्याचा बुरुज असावा. बुरुजाचा डावीकडून बुरुजाचा तटबंदीमधून वाट मंदिराकडे जाते. मंदिराच्या पाठी एक वाट जाते. ह्या वाटेने खाली गेलो असता खाली पाण्याचा झरा लागतो. आम्ही गेलो तेव्हा तिथे छोट्या डबक्यात खराब पाणी होते. पण पिण्यायोग्य नव्हते. आजूबाजूला पडलेल्या दारूच्या बाटल्यावरून समजून येत होते पाणी खराब का झाले असावे.

मंदिरासमोर डावीकडे एक वाट जाते. ह्यवाटेने पुढे गेलो असता पुढे एक मातीच्या ढिगाऱ्यासारखी एक छोटी तटबंदी दिसते. बहुतेक ह्या बाजूची तटबंदी असावी. त्याचा उजव्याबाजूने वाट पुढे जाते. पुढे जाऊन एक वाट डावीकडे खाली जाते. बहुतेक ह्यवाटेने दिगवले,रांजणगाव मध्ये जाता येते. तर एक वाट डावीकडे झाडीतून जाताना दिसते. ह्यवाटेने पुढे जाऊन  पाहिले असता वाट पुढे थोडी खाली जाते. आणि नंतर पुन्हा पुढे सपाटी लागून पुढे जंगलात जाताना दिसते. पुढे दाट जंगल असल्यामूळे जास्त पुढे न जाता पुन्हा पाठी फिरून गड उतरायला सुरवात केली. गडाचा डोंगर खूप पसरलेला आहे आणि त्यावर जंगल हि खूप आहे. त्यामुळे जर पूर्ण डोंगर फिरायचा असेल तर सोबत गावातील जाणकार वाटाड्या पाहिजे. 

तरी आम्हाला गड चढउतार आणि गड पहायला साडेतीन तास लागले. 

प्रवास माहिती:
ह्या गडावर जाण्यासाठी स्वतःची गाडी असेल तर उत्तम. कारण त्यामुळे तुम्ही एका दिवसात भैरवगड आणि सोनगड करू शकता.  एसटीने एका दिवसात एकच गड होईल.

कणकवली तालुक्यातून नरडवे साठी ४ फेऱ्या आहेत.त्यातील सकाळी ८ ची पहिली एसटी आहे. आणि संध्यकाळी ५/७ ची वस्तीची एसटी आहे. ह्या दोन एसटी भैरवगड गावात वर येतात,दुपारच्या दोन एसटी ( बहुतेक १२ आणि ३ ची) वर येत नाही 


सुरवातीला गडावर जाणारी वाट, दुसऱ्या फोटोत इथूनग वर डावीकडे चाड्याला लागते. आणि वर सोंडेवर पोहचल्यावर इथून खडी चढाई आहे. 
पहिला फोटो गडमाथा.दुसऱ्या फोटोत माथ्यावर पोहचण्याआधी पायऱ्या लागतात.
माथ्यावर असलेली तटबंदी आणि बुरुज आणि मंदिराचे फोटो 


एकदम वरील फोटो मंदिराबाहेरील तोफा, त्याखाली डावीकडे दहिवली  गावात जाणारी वाट तर बाजूच्या फोटोत गडाच्या दुसऱ्या बाजूने थोडी खाली जाऊन पठारावरून जंगलात जाणारी वाट. त्याखाली चौथऱ्याचे अवशेष आणि मंदिराजवळील मारुतीचे शिल्प. एकदम खालील फोटो. मंदिरापाठुन जाणाऱ्या वाटेने खाली गेलो असता पाण्याचा झऱ्याचा जागी पोहचतो.


मंदिराच्या समोरील वाटेने गेलो असता पुढे मातीच्या डिगारयात अवशेष दिसतात. नीट पहिले असता तटबंदी वाटते.


सोनगड साठी प्रवास 

भैरवगड पाहून आम्ही सोनगडसाठी निघालॊ.  दोन्ही गड समोरासमोर दिसतात. भैरवगड गावातून सोनगडच्या पायथ्याचा गावाला पोहचायला ८/९ किमी चा रस्ता आहे, पण आम्हाला गावातील लोकांनी शॉर्टकट म्हणून नवीन बनत असलेल्या धरणातून जायायला सांगितले. लोकांचा तो नेहमीचा पण कच्चा मातीचा  रस्ता होता. कारण तिथे  अजून काही वाडी आहेत. शॉर्टकटमुळे आम्हाला उलट जास्तवेळ लागला. त्यापेक्षा डांबरी रस्त्याने गेलो असतो तर लवकर पोहचलो असतो.दोन गडाच्या मधून गड नदी वाहते त्यामुळे नदी पलीकडील सोनगड/ नरसिंहगड कुडाळ तर भैरवगड कणकवली तालुक्यात येतो .


तिसरा दिवस 

सोनगड/ नरसिंहगड  

कोकणातून गडावर जायला दोन गावातून वाटा आहे. एक वाट पवारवाडी (दुर्गामाता नगर) मधून तर एक वाट घोटगे गावातून जाते. बहुतेक कोल्हापूर जिल्हातील शिवडाव गावातून ५ किमी ट्रेक करून हि येऊ शकता. हि वाट गडावर जिथे एक बुरुज आणि दरवाजाचे अवशेष आहे तिथून सोंडेवरून येत असावी. कारण त्या बुरुजाचा इथे पायऱ्या आहेत आणि खाली समोर वाट सोंडेवरून जंगलात जाताना दिसते. पण इथे चढायला अथवा उतरायला रशी लागेल.

शिवडाव वरून येणारी वाट जंगल पठारावरून येत असावी. कारण कोल्हापूरचा भाग वरती आहे. आणि आपण कोकणातून खालून गडावर चढतो.



पहिला अयशस्वी प्रयत्न मग वस्ती आणि दुसऱ्या दिवशी वाटाड्या सोबत गडावर

पहिल्या दिवशी आम्ही जिपीएस वर साडेतीन वाजता गड चढायला सुरवात केली. पण ह्या वाटेने क्वचितच लोक जात असावे म्हणुनच वाटेत झाडेझुडपे, पालापाचोळा खूप पडलेला होता. सुरवातीला १५/२० वाट मळलेली होती नंतर पुढे एके ठिकाणी झाडेझुडपे पडून वाट बंद झाली होती. पण जिपीएसची वाट तिथूनच पुढे चालली होती. मग बाजूच्या झाडाझुपातून वाट करत आम्ही पुन्हा जिपीएस च्या साहाय्याने वाटेला चालू लागलो. इथून पुढे वाटेत पालापाचोळा असल्यामुळे मळलेली दिसत नव्हती. तरी पण आम्ही ५ ते १० मिनिटे जाऊन बघितले.

सव्वा चार वाजले होते. पुन्हा पुढे वाट चुकली किंवा शोधण्यात उशीर झाला असता. तर गडावर पोहचायला उशीर होऊन, उतरताना काळोख झाला असता. आणि गड हि नीट पाहता आला नसता म्हणून, आम्ही पुढे जास्त धोका न घेता पाठी फिरायचा निर्णय घेतला.

पुन्हा कधी तरी करू ह्या निर्णयाने उद्याचा गडासाठी पुढची योजनेनुसार निघालो. जाताना पवारवाडीच्या गावातून एका घरातून गावातील वाटाड्याचा नंबर घेतला (पण तो पुढे आम्ही त्याला नंबर फिरवला त्यावेळी लागला नाही). आणि पुढे निघालो.

आम्ही घोटगे गावी चहापाणी साठी थांबलो. घोटगे गावातून वाट जाते म्हणून थोडी तिथे हॉटेलवर वाटाड्याची विचारपूस केली. त्यांनी गुरव वाटाड्याचा नंबर दिला. वाटाड्याला फोन केला, त्याने १००० रुपये सांगितले. त्यांनी कमी केले नाही. मग आम्ही आधी इथे राहायची आणि जेवायची सोय होते का पाहू, आणि झाली तर मग हा गड करूनच जाऊ असा विचार केला. कारण पुन्हा खास ह्यासाठी इतके लांब यायचं कधी जमेल माहित नाही.

हॉटेल वाल्याने सांगितले पुढे तेली खानावळ आहे, त्यांना विचारा. तिथे जेवायची आणि राहण्याची सोय होईल. तेलींना विचारले, त्याची एक जास्त खोली होती पण त्याचे पावणे आले होते. त्यामुळे तिथे आमची सोय झाली नाही. त्यांनी तिथेच पुढे त्याचेच चुलत भाऊ यांच भाजीचा दुकान आहे देविदास तेली त्यांना विचारायला सांगितले. त्यांना विचारला त्याचाकडे पण नव्हते. पण त्यांनी आम्हाला थोडं थांबायला सांगितले आणि दुसरारीकडे कुठे आमची सोय करता येते का बघत होते. शेवटी त्यांनी तिथे सिंधुदुर्ग बँकेचचा वर एक कर्मचारीची खोली होती तिथे सोय केली. तो २ दिवस सुट्टीसाठी बाहेर गेला होता, सोमवारी येणार होता त्याला फोनवर विचारून, आम्हाला तिथे राहायला दिले.

त्यामुळे आमची राहण्याची आणि अंघोळीची सोय झाली. त्यांना आम्ही जाताना ठरल्याप्रमाणे ५०० रुपये दिले. देविदास भाऊ आणि त्यांचा सोबत अजून एक गावची व्यक्ती आम्हाला राहण्यासाठी सोय व्हावी म्हणून खूप खटपट केली. मग रात्री आम्ही त्यांचेच चुलत भाऊ तेली ह्यांच्या खानावळी मध्ये जेवलो. जेवण पण एकदम घरघुती होत आणि प्रत्येकी १२०रु घेतले.



गड चढायला सुरवात

गुरव वाटाडे काकांनी आम्हाला सकाळी ६ वाजता लिंगेश्वर मंदिराजवळ बोलावले होते. तिथून त्यांनी आम्हाला काल ज्यावाटेने सुरवात केली होती तिकडेच घेऊन गेला. सकाळी पावणे सात वाजता आम्ही पुन्हा त्याच वाटेने गड चढायला सुरवात केली.

साधारण पाऊण तासात आम्ही गडाच्या सोंडी वर पोहोचलो. सोंडेवरून वाट, सोंडेच्या टेकाड वरून चढउतार करत. गडाला लागून गडावर जाते.  आम्ही काल जिपीएस वर चाललेलो आणि वाटाड्या नेत होता तीच वाट होती. त्याने जिथे वाट बंद झाली होती त्याचा बाजूने कोयत्याने झाडी तोडून वाट केली. आम्ही जिपीएसने गेलो असतो तर बरोबर गेलो असतो पण आम्ही उशीर झाला असल्यामुळे धोका नाही घेतला.

तासात आम्ही गड माथ्यावर पोहोचलो.

गडाची बुरुज आणि काही ठिकाणी तटबंदी अजून आपलं अस्तित्व टिकवून आहे. पण वाटते काही वर्षात डागडुजी न झाल्यास तीही ढासळून जाईल. पवार वाडीतून गडावर जाणार्‍या वाटेवर आपल्याला बुरुज, पायर्‍या लागतात. माथ्यावर मंदिराचा चौथर्‍यावर भैरवाची सुबक दीड ते दोन फुटाची मुर्ती आहे. त्या मूर्ती मागे अजून एक फुटाची छोटी भैरवची मुर्ती आहे. दर्शन घेऊन आम्ही मंदिराचा पाठच्या बाजूला असलेल्या बुरुजाकडे गेलो, ह्या बुरुजाला दरवाजा असावा, दरवाज्याची चौकट दिसत नाही. पण पायर्‍या आहेत. ह्या दरवाजाने वाट सरळ दोन डोंगरातील धारेवर जाताना दिसते ( बहुतेक शिवापूर गावात जात असावी). बुरुज पाहून आम्ही डावीकडे चालत गेलो. इथे एक गुहा आहे. ही गुहा आत मध्ये 50 मीटर अंदाजे खोल असावी. त्याकाळी शत्रू पासून लपण्यासाठी हि गुहा वापरत असे , असे वाटाड्याने सांगितले.


गुहेचा तोंड खाली होत आणी तिथे जाण्यासाठी डोंगराचा कडेने वाट होती, कालांतराने वाट निसरडी झाली होती. त्यामुळे रशी विना जाने धोक्याचे होते. पण तिच्यावरुन झाडा झुडपातून जाता आले असते. पण आमच्या वाटाड्याला लग्नाला जाण्याची घाई होती म्हणुन त्यांनी आम्हाला आत जनावर असेल सांगून तिथून घेऊन गेला. 


तिथून पुढे घोटगे गावाकडून जी वाट येते तेथे तटबंदी, बुरुज आणि दरवाजा दिसतो. पुन्हा आमच्या वाटाड्याला लग्नाची घाई झाली होती. तिथे काही नाही गुहा दाखवतो म्हणुन गड उतरायला सुरवात केली. घोटगे गावाची वाटे वरील बुरुज, तटबंदी जरा खालीच होती. तिथे गेलो असतो तर आम्हाला अजून एक तास लागला असता. म्हणुन मग मी हि लांबूनच फोटो काढला. 

गुरव जी गुहा दाखवत होता, त्याला भिवाची आकडी म्हणतात.


भिवाची आकडी

एक मोठ्या उभट कातळात उभा भेग होती. आकडी म्हणजे गावी लोक कंबरेला पाटी कोयती अडकवतात त्याला आकडी म्हणतात. त्या काळाचा आकार त्या सारखा होता म्हणून भीवाची आकडी म्हणतात. पण भिवा कोण कळला नाही. हि आकडी आपण जेव्हा गडाच्या एकदम वरच्या टप्प्यात पायर्‍या येतात त्याचा आधी कातळ टप्पा लागतो तिथे उजवीकडे दिसतो.  सोनगड वर जास्त करून घोटगे गावातून गावकरी येत असावी. गुरवने सांगितले नवरात्रीला  गडावर मंदिरात कार्यक्रम असतो त्याचवेळी फक्त एकदा हि वाट साफ करतो.


सोनगडला आम्हाला एकूण 3 तास गेले. दहा वाजता आम्ही पुन्हा घोटगे गावात चहा नाश्ता करून अकरा वाजता मनोहरगडला निघालो. पुढील भागात मनोहरगड आणि हनुमंतगड.



वरील तीन फोटोत सोनगड दिसत आहे. तर चौथ्या (वरील) फोटोत गडाचा सोंडेवरून काढलेला फोटो 

गडावर पोहचण्याचा अगोदर बुरुज आणि पायऱ्या आहेत. गडावरील भैरोबा ची मूर्ती, तोफ.
तसेच वाड्याचा चौथरा आहे.



(वरून खाली) गडावरील वाड्याचा चौथरा अवशेष आणि त=चौथऱ्या वरील फोटो. बुरुजाचा बाजूने दिसणाऱ्या पायऱ्या आणि सोंडेवरून जाणारी वाट, गडावरील माथा एका फोटोत दिसत आहे. तर शेवटी दोन फोटोत मंदिर


आडव्या फोटोत वरून एका बाजूची तटबंदी अवशेष, पाण्याची टाकी, घोटगे गावाचा वाटेवरील बुरुज आणि गुहेचा तोंड असलेली जागा आणि निसरडी वाट

वरती आणि खालील फोटो गडावरून दिसणारा परिसर. भिवाची आकडी (लंबाकृती दगडाचा फोटो) आणि वाटेत दिसलेले रानगवाच्या खुरांचे निशाण