Friday, 23 March 2018

Morgiri Fort, मोरगिरी किल्ला (From Lonavala)


मोरगिरी किल्ला 
(लोणावळा मार्गे )

                             
मोरगिरी ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा    




रविवार ११ मार्चला ट्रेक करायचे ठरले होतेच, पण कुठे ते ठरवायचं होते. प्रणवने तुंग गडाजवळील खूप कमी लोकांना माहित असणारा आणि नेमकेच ट्रेकर्स जाणारा मोरगिरी सुचविला.

गडाबद्दल (माझ्या मते) हा किल्ला टेहळणी साठी वापरत असावा. कारण गडावर फक्त पाण्याची टाकी दिसतात. बाकी तटबंदी, बुरुज, दरवाजा, तोफा आणि वाड्याचे अवशेष काही दिसत नाही. गडावरून तुंग, तिकोणा, कोरीगड असे महत्वाचे किल्ले आणी लांबच्या लांब पसरलेला पवना जलाशयचा परिसर दिसतो. वातावरण स्वच्छ असेल, तर बहुतेक त्या परिसरामधील लोहगड, विसापूर इत्यादी दुसरे गड सुद्धा दिसत असतील. त्यामुळे मोरगिरीवरून बाकीच्या गडांवर आणि आजूबाजूच्या परिसरावर चांगली नजर ठेवता येत असावी. प्रणवने सांगितले, गडावर जाण्यासाठी अजून दोन गावातून वाटा  आहेत. पण प्रणवने सुचविल्याप्रमाणे, एस्सार ऍग्रोटेक कंपनी समोरून जाणारी वाट लवकर म्हणजेच दीड तासात गडावर पोहचते. त्याचवाटेने आम्ही बरोबर दीड तासात गडावर पोहचलो.

मुंबई ते लोणावळा प्रवास 
नेहमीप्रमाणे विनय, प्रणव आणि मी असे आम्ही तीन जणच होतो.  शुक्रवारी रात्री मोरगिरी किल्ल्यावर जायचे ठरवल्यामुळे, आम्हाला रविवारची इंद्रायणी एक्सप्रेसचे आरक्षण भेटले नाही. आणि अनारक्षित डब्ब्यात उभे राहून जाण्यापेक्षा, आम्ही सकाळची पहिल्या कर्जत लोकलने कर्जतला आरामात बसून जायचे ठरवले. तेथून पुढे कर्जत लोकलच्या पाठोपाठ इंद्रायणी एक्सप्रेस येते. ती पकडून लोणावळ्याला जायचे ठरले.

मी सकाळी ४.५८ ला चिंचपोकळी स्थानकातून कर्जत लोकल पकडली. विनय आणि प्रणव मला डोंबिवलीला भेटले. गाडी वेळेत सकाळी ७.१० ला कर्जतला पोहचली. आम्ही लगेच १ क्रमांकाच्या फलाटवर गेलो. कारण इंद्रायणी एक्सप्रेसची वेळ ७. १३ ची होती. पण गाडी ५ मिनिट उशिराच आली, तरी पण लोणावळ्याला वेळेत ८ वाजता पोहचली.

लोणावळ्यावरून ९ ची भांबुर्डे एसटी होती. त्यामुळे आमच्या कडे १ तास होता. तोपर्यंत आम्ही एसटी स्थानकाजवळच नाश्ता करून, एसटीच्या वेळेत आलो.

थोडक्यात प्रवासाबद्दल:
मुंबई ते लोणावळा प्रवास सकाळी ५.४०ची इंद्रायणी ने करणे 
किंवा सकाळची पहिली कर्जत लोकल पकडून ७. १० ला कर्जतला पोहचून , कर्जतवरून  ८. १३ ची इंद्रायणी पकडून लोणावळा उतरणे. 

लोणावळा एसटी स्थानका (आगार) वरून सकाळी ९ ची लोणावळा ते भांबुर्डे एसटीने घुसळखांब फाट्याला उतरणे 
घुसळखांब फाटा ते एस्सार ऍग्रोटेक कंपनी ३.३ किमी,  पुढे तुंग किल्ला अजून ५ किमी वर आहे.

तुंगला जाणाऱ्या रस्त्याला मधल्या गावात  जाण्यासाठी अधून मधून छोटे मोठे ट्रक किंवा टेम्पो जात असतात. त्यामुळे काही ना काही वाहनाचे साधन मिळतेच. 


लोणावळा ते एस्सार ऍग्रोटेक नर्सरी (मोरवे गाव) वाया घुसळखांब फाटा 
मोरगिरीला किंवा तुंग किल्ल्याला जायला लोणावळ्या वरून थेट एसटी नाही. त्यामुळे सकाळी ९ ची लोणावळा -भांबुर्डे एसटीने घुसळखांब फाट्याला उतरून, पुढे जायला लागते. हीच एसटी पुढे घनगड किल्ल्याला जाण्यासाठी पकडतात. साधारण २० मिनीटात, आम्ही घुसळखांब फाट्याला पोहचलो. फाट्यावरून तुंग किल्याला जाणाऱ्या रस्त्यामध्येच ३.३ किमी अंतरावर एस्सार कंपनी आहे आणि त्याच्या पुढे ६ किमी वर तुंग किल्ला आहे.
नर्सरीपर्यंत पोहचण्यासाठी गाडीची वाट न बघता, आम्ही चालायला सुरवात केली. जेमतेम ५ ते १० मिनिटे चाललो असता, आम्हाला एस्सार कंपनीला जाणारा मालवाहू टेम्पो भेटला. त्यामुळे आम्ही १० मिनिटात नर्सरीपर्यंत पोहचलो. नर्सरी पोहचेपर्यत ९.५० वाजले होते.

दहा वाजता आम्ही ट्रेकला सुरवात केली.


मोरगिरी किल्ल्यावर कसे पोहचलो
नर्सरीच्या गेटपासून, पुन्हा थोडे ५० मीटर मागे फिरून नर्सरीच्या समोर एक लहान घर लागते. हे घर खाजगी मालमत्तेत असल्यामुळे पूर्ण जागेला तारेचा कुंपण आणि एक मोठा लोखंडी गेट आहे. डोंगराच्या पायथ्याला घर असल्यामुळे, कुंपणाच्या तिन्ही बाजूने डोंगर आणि झाडाने वेढलेले आहे. त्या घरात, ती जागा सांभाळण्याचे काम करणारे दंशू आखाडे आणि त्यांचे कुटुंब राहते. आम्ही आखाडे काकांना गडावर कसा जायचे विचारले

काकांनी त्यांच्या घरामागून असलेल्या डोंगराच्या घळीमधून पठारावर पोहचून, पठारावरून डाव्याबाजूने गडावर जायला सांगितले, तशी आम्ही सुरवात केली.

आम्ही त्यांच्या जागेत असलेल्या उंबराच्या झाडाकडून उजव्या बाजूला तुटलेल्या कुंपणाच्या बाहेर पडलो. कुंपणाच्या बाहेर आल्यावर, एक वाट डावीकडे घळीच्या दिशेने जाते. ह्या वाटेत एका ट्रेकरने वाट दर्शवण्यासाठी दोन ते तीन ठिकाणी ३/४ इंचाचे लॅमिनेट केलेले बाणाचे चिन्ह झाडाला लावले आहेत. त्यामुळे पठारावर लवकर पोहचायला मदत होते.  (ह्या वाटेने अर्ध्यावर पोहचल्यावर आपल्याला घळ लागते.)  घळेतून वर गडाच्या दिशेने आपण पठारावर पोहचतो.

पठारावर पोहचलो 
वीस मिनिटात आम्ही पठारावर पोहचलो. पठारावर पोहचल्यावर मागे फिरून पाहिले असता आपल्याला तुंग, तिकोना किल्ला पवना जलाशयाचे दृश्य दिसते. पण आपल्याला मोरगिरीचे शिखर लगेच दिसत नाही. कारण  पठारावर पोहचल्यावर आपल्या समोरच छोटी टेकडी दिसते. ही टेकडी म्हणजेच मोरगिरी गडाची पठारावर उतरलेल्या सोंडेचे टोक आहे.

पठारावर थोडा वेळ विश्रांती घेऊन, पठारावरून डाव्याबाजूने वाट गडाकडे जाते. आम्ही ह्या डावीकडच्या वाटेने गडाच्या दिशेने चालू लागलो. १०/१२ पावले चालून पुढे आलो असता, मोरगिरीचा गड दिसायला लागला. पठारावरून वाटेने चालत असताना, गड सतत आपल्या उजव्या बाजूला असतो. आपल्या पाठीमागे तुंग किल्ला आणि डावीकडे डोंगरमाळ आणि त्याचा पसरलेला मोठा पठार दिसत असतो.

पठारावरून साधारण ५ मिनिट पुढे चालून आलो असता, मोठी रुळलेली वाट दिसली. हि वाट मोरगिरी गडाच्या पायथ्या खालून जाते. गडाच्या पायथ्याला असलेल्या जंगलामुळे, वाटेने चालत असताना झाडांमुळे गडाचे शिखर दिसत नाही. कधीतरी मध्येच झाडातून गडाचे शिखर डोकावताना दिसते.

गडाच्या माथ्यावर/ शिखरावर  कसे पोहचलो
७/८ मिनटात चालून आल्यावर, गडावर जाण्यासाठी उजव्याबाजूला, पायथ्याचा झाडांमधून एक वाट गडावर जाताना दिसते. वाट झाडामध्ये असल्यामुळे लगेच दिसून येत नाही. त्यामुळे येथे नीट लक्ष ठेवून चालावे अन्यथा वाट चुकण्याची दाट शक्यता आहे. जर ही गडावर जाणारी वाट तुम्हाला सापडली नाही, तर तुम्ही चुकून वाटे बरोबर पुढे पठारावर पोहचाल आणि गड मागे राहील.

पण जेथून वाट वर जाते. तेथे एका संस्थेने एका झाडाला वाट दर्शवण्यासाठी "किल्ल्याकडे" असा लॅमिनेट केलेली पाटी लावला आहे. पण आजूबाजूचा दुसऱ्या झाडांची पान आणि फाद्यांमुळे लगेच दिसून येत नाही. त्यामुळे आम्हाला सुद्धा हा फलक लगेच दिसला नाही. येथून आपण १५ ते २० मिनटात टाकीजवळ पोहचतो. आणि  टाकीजवळून अजून ५ ते १० मिनटात  गडमाथ्यावर.

गडमाथ्यावर जाणारी ही वाट पहिल्या टाकीपर्यंत खडी चढण आहे. गडाच्या पायथ्याच्या जंगलामुळे, चढतेवेळी वाटेत सुरवातीलाच फक्त दाट झाडी लागते, त्यानंतर गवत लागते. ह्या वाटेत माती जास्त असल्यामुळे चढतेवेळी आणि उतरतेवेळी जपून जायायला लागते. खासकरून उतरतेवेळी. माती जास्त असल्यामुळे, घसरण्याची खूप शक्यता आहे. वाटेत काही ठिकाणी छोटे दगड लागतात. आम्हाला उतरते वेळी उन्हाने दगड तापल्यामुळे, हात ठेवताच जोराचे चटके लागत होते. आणि माती सरकत असल्यामुळे बहुतेक ठिकाणी आम्ही बसूनच उतरलो.

हा खडा चढ चढून आल्यावर, वाट टाकीजवळ पोहचते. तेथून उजव्याबाजूने तीन टाकीचा बाजूने वाट गड माथ्यावर जाते. आणि डावीकडे आपल्याला गडाचा माथ्यापर्यंत कातळाला मोठी फट गेलेली दिसते. हि फट आपल्याला जेव्हा गडाचा माथा दिसायला लागतो तेव्हा पासूनच दिसते. (त्यासाठी वर गडाचा फोटो लावला आहे. तो बघितल्यावर तुम्हाला हि गडमाथ्याची घळ दिसते.)

( झाडीतून गडमाथ्यावर येणारी वाट जर सापडत नसेल. तर गडाच्या कातळाची हि घळ किंवा फट लक्षात ठेवणे. त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल, गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी ह्या घळीच्या पुढेच वाट वर येते. )

गडाच्या कातळातील टाक्या 
खडा चढ चढून वर आल्यावर, गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी वाटेने चालायला लागलो असता, आपल्याला एका पाठोपाठ ठराविक अंतरावर अश्या ३ लहान टाक्या लागतात. पहिल्या दोन्ही टाकी कातळात खोलगट खोदलेल्या दिसतात.
पहिल्या टाकीतील पाणी चांगले दिसत होते. पण टाकी तळ गाठायला आल्यामुळे, तळाच्या मातीमुळे पाणी अस्वच्छ दिसत होते. दुसऱ्या टाकीचे पाणी वरून हिरवे दिसत होते. बहुतेक म्हणूनच अर्धी भरलेली दिसत होती. दोन्ही टाकी अंदाजे ५ फूट खोल असतील.पण पाणी पिण्यायोग्य वाटत नव्हते.


तिसऱ्या टाकीचे तोंड लहान गुहेसारखे आहे. ह्यात जाखमाता देवीचे मंदिर आहे. मंदिराच्या गुहेत फक्त २ माणसे बसू शकतात एवढीच जागा आहे आणि बाजूलाच लहान टाकी आहे. टाकीत प्लेट वैगेरे कचरा टाकलेला होता. तरी पण टाकीतील पाणी नितळ आणि स्वच्छ दिसत होते. म्हणून आम्ही ह्या टाकीतील पाणी प्यायला वापरले.  

मंदिरा बद्दल
मंदिरात देवीची मूर्ती शेंदूर लावलेली तांदळा स्वरूपातील आहे. गुहेच्या आत एका कातळावर जाखमाता मोठया अक्षरात लिहिले आहे.

ह्या मंदिराचा बाहेरच, गुहेचा बाजूला माथ्यावर जाण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानने १० फुटाची शिडी लावली आहे.  

शिडी चढून वरच्या कातळावर पोहचताच कातळाच्या कडेला कोरलेल्या ६ ते ७ पायऱ्या लागतात. ह्या पायऱ्या चढून आल्यावर डाव्याबाजूला अजून १०/१२ तुटलेल्या पायऱ्या लागतात.  ह्या शेवटच्या पायऱ्या चढून गेल्यावर आपण गडाच्या माथ्यावर पोहचतो.

गड माथ्यावरून दिसणारे दृश्य
गडमाथा लहान आहे. तसेच गडावर फक्त दोनच पाण्याची टाकी आहेत. त्यामुळे नुसता माथा फिरायला १० मिनिटे पुरेसे आहेत.

आम्ही प्रथम, माथ्यावर पोहचताच गडावरील भगव्या झेंडेच्या दिशेने म्हणजेच डाव्या वाटेने गेलो. झेंड्याचा  बाजूलाच २ पाण्याची टाकी आहेत. त्यातील एक मोठी चौकोनी टाकी आहे. टाकीतील गढूळ पाण्यामुळे पाणी पिण्यायोग्य वाटत नव्हते. त्याच टाकीच्या खाली गडाच्या कडेला  साधारण ३ फूट खोल सुकलेली लहान टाकी आहे. टाकी बघून, आम्ही माथ्याचा दुसऱ्या बाजूला गेलो. वर सांगितल्याप्रमाणे गड माथ्यावर फक्त दोन पाण्याची टाकी आहेत, त्याप्रमाणे माथ्यावर आम्हाला बाकी काहीच अवशेष आढळले नाही.  अशा प्रकारे पूर्ण माथा फिरून होतो

गडावरून आपल्याला तुंग, तिकोना आणि कोरीगड किल्ले, पवना धरणाचा पसरलेला जलाशय आणि समोरील पसरलेली डोंगरमाळ आणि विशाल पठाराच दृश्य दिसते.  तसेच गडाखालील एस्सार कंपनी, घुसळखांब इत्यादी दिसते.

परतीचा  प्रवास
गडमाथ्यावर सावली साठी झाड नसल्यामुळे. उन्हात जास्तवेळ न थांबता, अर्ध्या तासात गड माथा उतरून टाकी जवळ पोहचलो, जेवण आणि विश्रांती घेऊन आम्ही आलेल्या वाटेने १. ४५ वाजता गड उतरायला सुरवात केली. २.४५ वाजता आम्ही नर्सरी जवळ पोहचलो. साधारण सव्वा तासात आम्ही गड उतरलो.

१५ ते २० मिनिट ट्रकची वाट पाहून, आम्ही घुसळखांब फाट्यापर्यंत पर्यंत चालायला सुरवात केली. १ ते १.३० किमी चालल्यावर आम्हाला एक डंपर भेटला. त्याने आम्हाला थेट लोणावळ्याला सोडले. त्यामुळे आम्ही ४ पर्यत लोणावळा स्थानकात पोहचलो आणि तिथून मुंबईसाठी परतीचा प्रवास सुरु केला. 
  
विशेष सूचना:  पावसाळ्यात हा ट्रेक करणे खूप धोक्याचे ठरेल. त्यामुळे जास्त करून हिवाळ्यात किंवा उन्ह्याळात करावा आणि तेही अनुभवी ट्रेकर्स सोबत करावा.


कुंपणाच्या बाहेर पडून घळीतून पठारावर जाताना सुरवातीची वाट 



घळीमधून वर जाऊन उजवीकडे पठारावर जाणे. 
घळीमधून  पठारावर येताना 

 गड सतत आपल्या उजव्या बाजूला राहतो आणि वरती मी  पिवळ्या तुटक रेषेने,  अंदाजे वाट गड माथ्यावर कशी जाते दाखवायचा प्रयत्न केला आहे. 




गडाचा माथ्यावर जाणारी वाट. झाडाला मी पिवळ्या रंगाने वर्तुळ केला आहे. तेथे "किल्ल्यावर" अशी लॅमिनेट केलेली पाटी लावली आहे. 
गडाच्या  माथ्यावर वाट कशी जाते. हे मी अंदाजे पिवळ्या रेषेने दाखवायचा प्रयत्न केला आहे. 

माथ्यावर जाताना वाट झाडा-झुडपातून जाते 

तीन टाकीच्या बाजूने गड माथ्यावर जाणारी वाट. आणि तिसऱ्या टाकी जवळ, गड  माथ्यावर जाण्यासाठी असलेली शिडी सुद्धा दिसत आहे. 

पहिली टाकी 


 

दुसरी टाकी आणि खाली बाहेरून काढलेला फोटो 
देवीचे  मंदिर आणि तिसरी टाकी 


मंदिराच्या बाजूला गड माथ्यावर जाण्यासाठी लावलेली शिडी 
शिडी चडून  वर आल्यावर कातळावरून काढलेला फोटो. ह्यात आपण खडा चढ चडून आल्यावर. शिखराचा कातळ लागतो त्याचा पासून कशी वाट टाकी जवळून माथ्यावर जाते ते दाखवायचा पिवळ्या रेषेने दाखवायचा प्रयत्न केला आहे. आणि वर्तुळात पहिल्या दोन टाक्या कुठे लागतात. ते दाखवला आहे. 
शिडी चढून वर आल्यावर लागणाऱ्या पायऱ्या 
पहिल्या पायऱ्या चढून आल्यावर वरती ह्या पायऱ्या लागतात. ह्या पायऱ्या चढून गेल्यावर आपण गड माथ्यावर पोहचतो. 





गडावरील भगवी झेंडा/पताका आणि खालील फोटो त्याचाच बाजूला असणारी मोठी टाकी दिसत आहे त्याचा बाजूला झुडपावर जेथे बाण दाखवला आहे.  तिथे खाली गडाचा कडेला पाण्याची छोटी सुखलेली टाकी आहे.  त्या टाकीचा फोटो,  हि मोठ्या टाकीचा फोटो खाली लावला आहे  आणि त्याचा बाजूने वाट पुढे गडाच्या दुसऱ्या बाजूला घेऊन जाते. 


मोठ्या टाकीच्या बाजूला, गडाचा कडेला असलेल सुखलेल टाके. 

मोरगिरी ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा    







Friday, 23 February 2018

Mahuli माहुली



माहुली गडाचा वाटेत चडतेवेळी  टिपलेले  दृश्य
also click on aboved link to check my youtube video of Mahuli fort

दोन महिन्याच्या मोठ्या कालावधीनंतर, २०१८ चा शिवजयंतीच्या आदल्या रविवारी ट्रेकसाठी वेळ भेटला. त्यासाठी मी व्हाट्सअप ग्रुपमध्ये आधीपासूनच ट्रेकसाठी दोन पर्याय दिले. पण बहुतेक जणांनी प्रतिसाद न दिल्यामुळे, रविवारचा बेत रद्द झाला होता. अचानक शनिवारी संध्याकाळी प्रणवने दूरध्वनी करून विचारले, उद्या माहुलीला जाऊया का?. मला सुद्धा ट्रेक करायचच होता त्यामुळे मी होकार दिला. विनय पण तयार होता. मग रविवारी माहुली मोहीम ठरली. 

माहुली गडाला इतिहास हा मोठा आहे, मी तो सगळा इतिहास सांगत नाही आणि मला तेवढा  माहित सुद्धा नाही. कारण माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा इतिहासाचा भाग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वयाने लहान असते वेळी १/२ वर्षे त्यांच्या मातापिता म्हणजेच, शहाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ सोबत वास्तव्य केले होते. त्यासाठी मला या गडाचे खूप महत्व वाटते.  

ठरल्याप्रमाणे मी सकाळी ५.२४ ची आसनगाव ट्रेन करीरोड स्थानकावरून पकडली. विनय आणि प्रणव मला डोंबिवलीला भेटले. आम्ही ७. २० ला आसनगावला पोहचलो. स्थानकाबाहेरच आम्ही न्याहरी केली.
माहुली गडाचा पायथ्याच्या गावात जाण्यासाठी शहापूर एसटी स्थानकातून एसटी आहे. त्यासाठी तुम्हाला आसनगाव स्थानकातून रिक्षा करून जायायला लागते. पण आम्ही आसनगाव स्थानकातूनच २५० रुपये देऊन (एकावेळेचे) रिक्षा केली. २० मिनिटात आम्ही गडाच्या पायथ्याच्या गावात पोहचलो. गावातील महादेवाच्या मंदिरात दर्शन घेऊन, आम्ही गड चढायला सुरवात केली.  तोपर्यंत ८.३० वाजले होते.

मुंबई ते माहुली कसा प्रवास करावा. 
मुंबई ते आसनगाव ट्रेनने ८६. ७ किमी आहे. आसनगाव किंवा कसारा ट्रेन पकडावी 

आसनगाव ते माहुली गड पायथ्याचे गाव ८ किमी. 

२०१४ला पावसाळ्यात ट्रेकच्या एका ग्रुपसोबत माहुलीला गेलो होतो. त्यावेळी फक्त आम्ही महादरवाजापर्यंतच जाऊन आलो होतो. पण यावेळी आम्ही पळसगड सोडला तर बहुतेक गडाचा भाग पिंजून काढला. तरीपण आमचे नकाशात दाखवलेल्या पैकी मोजकेच काही अवशेष बघायचे राहिले.

पहिलेवेळीची आणि आताच्या वेळीची गडाच्या वाटेत खूप फरक जाणवत होता. आताची वाट तुम्ही न चुकता गडावर पोहचू शकता एवढी व्यवस्थित करून ठेवली आहे. पावसाळ्यात गवतामुळे मध्येच वाट चुकलात तरच, नाही तर ती शक्यता पण बोलायाची असेल. गडाच्या पायथ्याच्या गावापासून ते ओढ्यापर्यंत गाडी जाईल, एवढी मोठी वाट केली आहे. आणि ओढ्यावर छोटा पूल बांधला आहे. ओढा ओलांडून गेल्यावर गड चढायला सुरवात होते.
पायथ्याच्या गावसमितीने गावात निसर्ग पर्यटनासाठी पायथ्याला असलेल्या वाटेत सुधारणा केल्या आहेत. तसेच गडावर जाणाऱ्या वाटा काही ठिकाणी थोड्या मोठया केल्या आहेत आणि काही ठिकाणी लोखंडाचे पाईपचे कुंपण केले आहे. त्यामुळे न चुकता गडाच्या बुरुजाजवळ पोहचलो आणि म्हणूनच मला ही गडावर वाट कशी जाते सांगणे जास्त महत्वाचे वाटले नाही.

गडाच्या बुरुजाला लागून असलेल्या तटबंदीला लोखंडाची शिडी लावली आहे. ती शिडी चढूनच गडाच्या माथ्यावर पोहचतो. ह्यावरून माझ्या अंदाजे जोपर्यंत गड वापरात असेल तो पर्यंत गडावर जाण्यासाठी ही मुख्य वाट नसावी. कारण ह्या वाटेने आपल्याला दरवाजा लागत नाही. पण शिवकाळी गडाला बहुतेक महादरवाजा, कल्याण दरवाजा आणि हनुमान दरवाजा. हे तीनच दरवाजे मुख्य असावेत. आता तिन्ही दरवाजाच्या गडाखाली जाणाऱ्या वाटा उध्वस्त झाल्या आहेत. 

आम्हाला गडाच्या माथ्यावर पोहचायला १०.३० वाजले.
गडाच्या माथ्यावर पोहचल्यावर आपल्याला डाव्याबाजूला बुरुज लागतो. बुरुजावर डोलात फडकणारा भगवा आहे. जो आपल्याला  गड चढतेवेळी दिसतो. बुरुजावरून खालील माहुली गाव आणि आजूबाजूचे निसर्गाचे दर्शन होते. बुरुजावरून मागे फिरले असता एक वाट महादरवाजाकडे जाते.  गडावरील काही वाटा गडसंवर्धन संस्थेने अथवा पर्यटन समितीने रुंद करून ठेवल्या आहेत. तसेच एका गडसंवर्धन संस्थेने काही ठराविक जागी, मार्गदर्शनासाठी लहान माहिती फलक लावले आहेत. त्यामुळे गडावरील अवशेष शोधायला सोपे जाते.

पहिली टाकी:
बुरुजावरून महादरवाजाकडे जातेवेळी आपल्याला एक ८ फूट रुंद आणि १० ते १२ फूट लांब आकाराची कातळातील टाकी लागते. ह्या टाकीतील पाणी पिण्यायोग्य नाही, ते बघूनच कळते. टाकी जवळून वाटेने सरळ वर चालत गेले असता, एक ठिकाणी वाट दुभागते. एक वाट सरळ महादरवाजा जवळ जाते आणि दुसरी डावीकडे भांडारगड, तलाव आणि शिवमंदिर कडे घेऊन जाते. 

महादरवाजा :
आम्ही पहिले सरळ वाटेने जाऊन महादरवाजा करायचा ठरवले. सरळ वाटेने चालून आल्यावर महादरवाजासाठी जाणारी मोठी वाट अरुंद होऊन समोर असलेल्या झाडीतून वाट खाली दरवाजाजवळ जाते. त्यामुळे लगेच कळण्यात येत नाही. ह्या वाटेने ५ मिनिटात खाली उतरून आपण महादरवाजा जवळ पोहचतो. दरवाजा खाली असल्यामुळे आपण दरवाजाच्या डाव्या मोठ्या बुरुजावर पोहचतो. येथे आपल्याला १ छोटे पिण्याचे पाणीचे कुंड दिसते. त्याच्या समोरच एका झाडाखाली शिवपिंड आहे आणि त्याच्या समोर बुरुजाच्या टोकावर लहानशी महाराजांची मूर्ती ठेवली आहे.  बुरुजाच्या बाजूने म्हणजेच आपल्या उजव्या बाजूने वाट दरवाजा जवळ जाते ते लगेच कळून येते कारण आपण वरून खाली उतरतेवेळी आपल्याला दरवाजा दिसतो. दरवाजाचा आत दोन्ही बाजूना गुहेत खोली एवढ्या आकाराच्या दोन देवड्या, एक मोठी गुहा आणि २ लहान गुहा आहेत. गुहेत १५/२० माणसे आणि देवड्यात प्रत्येकी ३/ ४ लोक राहू शकतात.

दरवाजाची वरची चौकट तुटलेली आहे. दरवाजातुन बाहेर गेल्यावर, त्याकाळची वाट तुटल्यामुळे पुढे गेल्यावर घळ लागते. बुरुजाच्या भिंतीमुळे दरवाजाचा बाहेर अर्धा वर्तुळासारखी वाटआहे. गडाचा सुरक्षेसाठी दरवाजाची आणि बुरुजाची रचना अशी करत असे. महादरवाजाच्या बाहेर दारात डाव्या बाजूला एक शरभ शिल्प ठेवलेले आहे आणि त्याच्या समोरच बाजूच्या बुरुजाच्या भिंतीजवळ चिन्ह्याचा एक दगड ठेवला आहे. बहुतेक हे दगड वरचा कोसळलेल्या चौकटीतले असावे. दरवाजा पाहून आम्ही जेथून खाली उतरलो तिथे पुन्हा वर आलो.

पण आम्ही पुन्हा दोन वाटा जिथे दुभागतात तिथे न जाता आम्ही वर येऊन डावीकडे राजसदर बघून भंडारगडाच्या दिशेने गेलो.

राजसदर:
थोड्या २ ते ४ मिनिटांच्या अंतरावर राजसदर लागते. सदरेची मुख्य आसनाच्यामागील भिंत सोडली तर बाकीच्या ३ भिंती नाही, चौथरा ही दिसत नाही. त्याच सदरेचे पडलेले दगड चौथऱ्याची चौकाट दर्शवण्यासाठी ठेवले आहेत.   सदरेच्या भिंती आणि आतील भग्न झालेली सदर जांभा दगडाची आहे. सदरेवर बाकी काही अवशेष नाही. सदरेच्या मागे पुढे किल्वरच्या आकाराचे जांभा दगड दिसतात.

महत्वाचे  
आम्ही सदर बघून, सदरेच्या डाव्याबाजूने एक वाट जात होती. त्यावाटेने कल्याण दरवाजा आणि भंडारगडकडे गेलो, पण माझ्या मते सदरेच्या वाटेने न जाता सदर बघून पुन्हा मागे फिरून, जेथे आपल्याला महादरवाजा आणि भंडारगड कडे जाण्यासाठी वाट दुभागते किंवा २ वाटा लागतात, तिथे फलक ही लावला आहे. तिथून जावे. कारण ह्या वाटेने तुम्हाला ठराविक अंतरावर एक मागोमाग अवशेष बघायला मिळतात आणि मी तुम्हाला त्यावाटेने गेलो असता कुठचे कुठचे अवशेष आणि कश्या ओळीत लागतात, ते वर्णुन सांगितले आहे. आम्ही सदरेच्या डाव्याबाजूचा वाटेने गेलो,  आम्हाला ह्या वाटेला काही अवशेष सापडले नाहीत तसेच खूप चालायला ही लागते, पण ह्या दोन्ही वाटा एका खिंडीत जाऊन पोहोचते. ही खिंड म्हणजे माहुली आणि भंडारगड दरम्यानची खिंड आहे. खिंडीच्या थोडेवर शिडी लावली आहे, या शिडीने आपण कल्याण दरवाजा जवळ जाऊ शकतो

दोन शिळा:
ह्या वाटेने तुम्ही पहिल्या एका लहान मोकळ्या कातळावर असलेल्या २ शिळा लागतात.  तिकडून उजवीकडे किंचित खाली असलेल्या शिळेच्या दिशेने एक वाट झुडपातून जाते.
हि वाट मोठ्या गवतातून जाते, थोडावेळ चालले असता, आपल्या डावीकडे एक वाट जाताना दिसते. त्या वाटेला १०/१५ पावले गेलो असता मोठ्या वाड्याचे अवशेष लागतात .

मोठा वाडा:
वाड्याचा चौथरा ५ ते ५.३० फूट उंच आहे. त्याला चढून जाण्यासाठी ५ पायऱ्या आहेत.  पायऱ्यांच्या समोर मातीत खचलेले दगडी तुळशी वृदांवन सारखे अवशेष दिसतात. चौथरा १५ फूट लांब आणि २० फूट रुंद असावा, चौथऱ्यावर बाकी काही अवशेष दिसत नाही. चौथऱ्याच्या बाजूला गवत झुडपे असल्यामुळे चौथरा बाकीच्या तीन बाजूने बघायला मिळत नाही.

छोटा वाडा :
चौथरा बघून पुन्हा पाठी मुख्य वाटेला येऊन, सरळ पुढे गेलो असता, वाटेला लागून उजव्या बाजूला झुडपात अजून एका लहान वाड्याचे अवशेष दिसतात. ह्या वाड्याच्या चौथराची उंची नेहमीच्या वाड्यासारखी असून त्याची लांबी रुंदी १० x १० फुटाची असेल .

शिव मंदिर:
वाडा बघत तसाच सरळ गेलो असता पुढे काही अंतरावर शिवमंदिर लागते.

मंदिराची दरवाजाची भिंत सोडली तर बाकीच्या भिंती अजून उभ्या आहेत. भिंतीला आतून सिमेंटने प्लास्टर केलेलं दिसते. बाहेरून मात्र दगड दिसतो. मंदिर १५x२० फूट लांबीरुंदीला असेल. मंदिरात शिवाची पिंड, नंदी, वीरगळ आणि काही चिन्हाचे दगड भग्न अवस्थेत, एका जागी ठेवलेले आहेत. मंदिराच्या दरवाजाच्या समोर वाट गडावरील तलावाकडे जाते.

तलाव:
हा तलाव फक्त पावसाळ्यात भरत असावा. कारण तलाव पूर्णपणे सुकला होता. त्यामुळे आम्ही उजवीकडे वळून तलावाच्या कडेने पुढे गेलो. ही वाट पुढे हनुमान दरवाजा आणि भंडारगडकडे जाते, पण पावसात तलाव भरला असेल त्यावेळी काठोकाठ जायला लागत असेल किंवा तलावाला डावीकडून उजवीकडे फेरी मारून जावे लागत असेल. 

हनुमान दरवाजा:
हनुमान दरवाजा कडे जाण्यासाठी मधेच एके ठिकाणी वाट दुभागते. सरळ गेलात तर नवरा-नवरी डोंगर आणि कल्याण दरवाजा कडे जाते आणि डावी कडे गेलात तर हनुमान दरवाजाकडे. 
हनुमान दरवाजा कडे जाणारी वाट थोडी अंतरापर्यंत गडसंवर्धन करणाऱ्या प्रेमींनी मोठी केली आहे. पण पुढे जाऊन वाट नेहमीचा वाटे सारखी छोटी होते. जेथे मोठी वाट संपते, त्याचा समोरच वाट थोडीशी डावीकडे झाडीतून खाली जाते. ह्या वाटेने खाली गेल्यावर पुन्हा दोन वाटा लागतात. त्यात डावीकडील वाट पकडून गेले असता आपण हनुमान दरवाजा जवळ पोहोचतो. उजवीकडील वाट गोल फिरून घेऊन जाते. पण ह्या वाटेने गेलो असता आपल्याला एका ठिकाणाहून नवरा-नवरी आणि भटोबा हे सुळके समोर दिसतात.

गडसंवर्धन संस्थेने जागोजागी लावलेल्या महितीच्या फलकामुळे, आम्हाला हनुमान दरवाजा शोधणे सोपे गेले. अन्यथा कोणाला कळून ही येणार नाही अशा ठिकाणी हा दरवाजा आहे.  दरवाजाजवळ उतरण्यासाठी आपल्याला मातीत केलेल्या पायऱ्या खाली जाताना दिसतात, त्याच्या अगोदर एक ४ फूट लांब जाडा चौकटी खांब सारखा दगड पडलेला आहे. तिथून खाली जायला मातीत केलेल्या पायऱ्या आहेत, पण पावसात त्या पायऱ्या झिजून पायवाट होण्याची शक्यता मला जास्त वाटते. पायऱ्या उतरून आल्या असता आपल्याला समोर एका कातळावर हनुमानाची आणि त्याच्या डाव्या बाजूला लहान गणपतीची कोरलेली मूर्ती दिसते. हनुमानाच्या उजव्याबाजूला खाली कातळात लहानशी शिवपिंड कोरलेली आहे, ह्या व्यतिरिक्त तुम्हाला येथे काहीच अवशेष दिसत नाही. येथून खाली उतरण्यासाठी एका खालोखाल अंदाजे २५ फुटाच्या दोन शिड्या लावल्या आहेत. ह्या शिड्या कातळात वरच्यावर अडकवल्या (किंवा ठेवल्या) आहेत. त्याला कुठे हि खिळा ठोकून किव्हा सिमेंट लावून बसवली नाही. त्यामुळे उतरतेवेळी एका वेळी एकानेच जपून चढायला अथवा उतरायला लागते.

शिड्या खाली उतरून, आम्ही वाट कुठे जाते बघत होतो, पण आम्हाला, पुढे वाट कुठेच खाली उतरताना दिसली नाही. बहुतेक काळाच्या ओघात ही वाट बुजून गेली असेल. ज्या कातळावर या मूर्ती कोरल्या आहेत त्या कातळाच्या वर बुरुजाची तटबंदी आहे. बहुतेक ह्या बाजूला जिकडून आपण दरवाजासाठी खाली उतरतो. तिथपर्यंत ही तटबंदी असावी. बाकी येथे दरवाजाच्या चौकटीचे काहीच अवशेष सापडत नाही. ह्या दरवाजाला जाते वेळी जपून जावे.

हनुमान दरवाजा बघून पुन्हा वाटा जिथे दुभागतात, तिथे येऊन सरळ वाटेने पुढे भंडारगड कडे चालत जावे. पुढे माहुली आणि भंडारगडाच्या खिंडीत थोडे खाली उतरून पुन्हा समोरच्या भंडारगडाच्या पठारावर चढायला लागते. समोर पठारावर चढण्यासाठी १० फुटाची शिडी बसवली आहे. शिडी चढल्यावर आपण भंडारगडाच्या पठारावर पोहचतो. ह्या कातळाला वर तटबंदी आहे ह्या जागेचे फोटो मी खाली दाखविले आहे. 

कल्याण दरवाजा :
पठारावर आल्यावर, पठाराच्या टोकाला (सुळक्याचा जवळ) जाणाऱ्या वाटेतच,  उजव्याबाजूला कल्याण दरवाजाची वाट लागते . आम्हाला कल्याण दरवाजा पण माहिती फलकमुळे न शोधता सापडला, अन्यथा लगेच कळून येणे मुश्किल आहे. उजव्यावाटेने दरवाजाकडे खाली गेले असता,  दरवाजाजवळ जाण्यासाठी संवर्धन प्रेमाने मातीत केलेल्या पायऱ्या लागतात, ह्या पायऱ्या संपून खाली आलो असता, वाट डावीकडे वळते तेथे  कातळात खोदलेल्या ४ पायऱ्या दिसतात.  त्या पायऱ्या पुढे तुटल्या असल्यामुळे उतरण्यासाठी त्याचा खाली काही दगड ठेवले आहेत.  खाली उतरताच समोर पाण्याची टाकी किंवा जमिनीचा सपाटीला असलेली कातळाची विहीर जशी असते, असा दरवाजाचा वरचा भाग दिसतो. त्यामुळे दरवाजातून उतरतेवेळी एकाद्या शिडीचा विहिरीत उतरतो तसे वाटते. दरवाजाचा आतील भागात जांभा दगडाची भिंत काही ठिकाणी प्लॅस्टर केलेली दिसते, पण बाहेरील बाजूस दरवाजा दगडाचा आहे. दरवाजा रुंदीला निमुळता आहे.
दरवाजात उभे राहून खाली पहिले असता, कातळात कोरलेल्या अंदाजे ३०/४० पायऱ्या दिसतात. पण ह्या पायऱ्या आणि दरवाजा मधील पायऱ्या तुटलेल्या असल्यामुळे, दरवाजाच्या बाजूने एक कातळाला लावलेल्या लाकडाच्या १० फूट ओंडक्यावरून उतरायला लागते.
आम्ही ह्या ३०/४० पायऱ्या उतरून खाली जाऊन पहिले असता. पुढे पायऱ्या तुटलेल्या असल्यामुळे १५ ते २० फुटाचा खड्डा पडलेला दिसतो. त्यामुळे खाली उतरायचे असेल तर दोरीच्या साह्याने उतरायला लागेल ( किंवा रॅपलिंग  ).
आम्हाला खड्यात खाली कातळावर रॅपलिंग साठी २ लोखंडी कड्या मारलेल्या दिसल्या.  ह्या दरवाजाने अनुभवी ट्रेकर्स ट्रेक करतात. कल्याण दरवाजाने चडते वेळी ३० वर्षाच्या एका ज्येष्ठ गिर्यारोहकाचा १९९७ साली अपघाती मृत्यू झाल्यामुळे त्याचा स्मरणार्थ पायऱ्याजवळ कातळात लहान फलक लावला आहे.
पायऱ्याजवळ उतरतेवेळी सोबत अनुभवी किंवा अनुभव असेल तरच उतरावे. नाही तर शक्यतो टाळावे.

खांब टाकी :
दरवाजा पाहून आम्ही पुन्हा वर वाटेला फलकाजवळ आलो. आणि तिकडून वर नवरा-नवरी सुळका पाहण्यासाठी माथ्याच्या टोकाकडे गेलो. त्या वाटेत मध्येच एक गुहेतील खांब टाकी लागते.  टाकीत आत थोडे पाणी होते पण पिण्यायोग्य वाटत नव्हते. गुहेच्या बाहेर तोंडावर कातळाचा तुटलेला बांध आहे. बांधामुळे त्याकाळी पावसात टाकी आत पूर्ण भरून पाणी बाहेरील भागात साचून नेहमीच्या टाकी सारखी वाटत असावी. पण बहुतेक आता पावसाळ्यात टाकी अर्धी भरत असावी, आतील पाण्याचा ओलसर भागाने मला असे वाटले.

नवरा- नवरी, भटोबा सुळका :

टाकी बघून टाकीच्या बाजूने वाट वर माथ्याचा टोकावर जाते. काही मिनिटातच आपण पठाराच्या टोकाला पोहचतो. टोकावरून आपल्याला समोर (दक्षिणीकडे) माहुलीचा चंदेरी आणि ह्या डोंगराच्या मध्ये नवरा-नवरी, भटजीचे सुळके दिसतात. डावीकडे (पूर्वेकडे) खाली माहुली गाव, शहापूर आणि आसनगाव परिसर दिसतो.

थोडावेळ निसर्ग पाहून फोटो काढून आम्ही पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो. वाटेतच आम्ही जेवून घेतले आणि ज्या वाटेने गड बघत यावे असे मी वर्णिले आहे, त्याच वाटेने आम्ही ते सगळे अवशेष बघत गेलो. पळसगडवर अवशेष नसल्याने आम्ही तिथे जाणे टाळले, पळसगडावरून तानसा धरण आणि त्याच्या बाजूचा परिसर दिसतो.

आम्ही २.३० वाजता गड उतरायला सुरवात केली. कारण आम्हाला ५ ची एसटी पकडायची होती. पण आम्ही वाटेत जमेल तेवढा प्लास्टिकचा कचरा आणि बाटल्या उचलत गेल्यामुळे, आम्हाला गावातील महादेव मंदिराजवळ पोहचायला संध्याकाळचे ४. ४५ वाजले आणि ५ ची एसटी पायथ्याच्या गावात न येता २ किमी अगोदरच्या गावातूनच फिरते. आणि आम्ही तिथे चालत पोहचेपर्यंत गाडी गेली असती. आणि संध्याकाळी शेवटची ७ च्या एसटीची, २ तास वाट बघण्यात काहीच अर्थ नव्हता. 

म्हणून मग आम्ही सकाळच्या रिक्षा वाल्याचा फोन नंबर घेऊन ठेवला होता त्यालाच बोलावून घेतले. आम्हाला ६. १५ची आसनगाव - मुंबई सीएसमटी लोकल भेटली.


गडाच्या पायथ्याची वाट

गडाच्या माथ्यावर पोहचण्यासाठी लावलेली शिडी

गडाचा बुरुज

गडाच्या माथ्यावर आल्यावर लागणारी पहिली टाकी

डावी वाट शिळा, वाडा, शिवमंदिर, तलाव, हनुमान दरवाजा कडून भंडारगड कडे जाते. ह्या डाव्यावाटेने  गेले असता, हे अवशेष आपल्याला एका मागोमाग सापडतात. आणि उजवीकडची वाट महादरवाजा आणि सदरकडे जाते

गडावर वाट दाखवण्यासाठी असे फलक लावले आहेत.

महादरवाजाकडे उतरतेवेळी टिपलेले दृश्य. त्यात बुरुजावर पाण्याचं कुंड, शिवपिंड दिसत आहे

महादरवाजाच्या आतील देवडी व गुहा 


महादरवाजा
महादरवाजाच्या बाहेर शरभ चे शिल्प दिसतो. 

महादरवाजाच्या बाहेरील चिन्ह 

सदर

माहुली गड आणि भंडारगड जेथे दुभागतो ती खिंड. सामोर भंडारगड पठार लागतो. लाल वर्तुळात तटबंदीचे अवशेष दिसतात ते दाखविले आहे.

भंडारगडचा पठार चढते वेळी लागणारी शिडी आणि त्याचा वर कातळ चढायला लागतो.
कल्याण दरवाजा कडे खाली जाणाऱ्या पायऱ्या

कल्याण दरवाजा कडे जाणाऱ्या पायऱ्या आणि खाली दरवाजाच्या वरचा भाग विहीर सारखा दिसत आहे


कल्याण दरवाजाच्या पायऱ्याजवळ उतरण्यासाठी ७/८ फुटाचा खडक ह्या लाकडाच्या ओंडक्यावरून उतरायला लागतो.




कल्याण दरवाजा उतरून लागणाऱ्या पायऱ्या

गिर्यारोहकाचा स्मरणार्थ लावलेला फलक

पायऱ्या तुटून पडलेला १५ ते २० फुटाचा खड्डा

कल्याण दरवाजाचा बाहेरून काढलेला फोटो

खांबटाकी

भंडारगडाचा पठाराचा टोकाकडे जाताना. येथून नवरा-नवरी, भटजी सुळका आणि माहुलीचा चंदेरी दिसतो

सुळक्यासोबत आमच्या तिघांचा फोटो 



हनुमान दरवाजा
हनुमान दरवाजा कडील कातळात कोरलेल्या मुर्त्या

हनुमान दरवाजाच्या शिड्या

तलाव

शिवमंदिर

मंदिरातील  अवशेष


छोटा वाड्याचे अवशेष

मोठ्या वाड्याचे अवशेष

दोन शिळा

https://youtu.be/PuAMkM__2k0
also click on aboved link to check my youtube video of Mahuli fort

Thursday, 16 November 2017

Irshalgad Trek

इर्शाळगड 

इर्शाळगड

गडावर वाट कशी जाते, पाहण्यासाठी मी बनविलेल्या विडिओची youtube  लिंक वर दिली आहे.  


तीन-चार वर्षापूर्वी एका ट्रेकिंग ग्रुप बरोबर मी इर्शाळगड ट्रेक केला होता.  त्यावेळी हि सप्टेंबर महिन्याचा शेवटी म्हणजेच पावसाळ्या संपल्यानंतर केला होता. आणि आता हि त्याच महिन्यात केला पण मित्रां सोबत.  तीन चार वर्षांपूर्वी, मला झालेल्या ऊन्हाचा त्रास तसेच वाटेत आडोसा घेण्यासाठी ठराविक लक्षात राहणारी  छोटी मोठी झाडे. आणि गडाचा निमुळता माथा, आणि गडावर विशेष असा ऐतिह्यासिक वास्तू  काही आढळत नाही. त्यामुळे मी हा ट्रेक पुन्हा करणार नाही.  हे मी त्यावेळीच ठरवलं होता. 

पण प्रणव बरोबर कुठच्या किल्ल्यावर जायायचे ठरवत असताना,  मी दुसरा टकमक किल्ला सुचवला होता,  पण तो हि मी हल्लीच एकट्याने केला होता,  हे माझ्या लक्षात राहिले नाही. नंतर मग लक्षात आले. त्यामुळे मीच फसलो,  मग काय टकमकला न जाता इर्शाळगडावर ट्रेकिंगसाठी जायायला  लागले.  त्यात प्रणवने पण हा ट्रेक केला नव्हता.

प्रणवने त्याचा मित्र सुरज बरोबर आधीच हा गड करायचा ठरवलं होता. पण माझा शेवटचा वेळी जायायचा ठरला. त्यामुळे मी दुसरे पर्याय सांगितले पण वर सांगितल्याप्रमाणे मला ह्या गडावर जायायला लागले. 

गडावर गेल्यावर लक्षात येते, गड म्हणजे नावाला आहे.  मला इर्शाळ गडाचा इतिहास किंवा काही अन्य बाकी गोष्टी बद्दल माहित नाही . पण मी पाहिल्यानंतर मला गडाबद्दल काय अंदाज आला, ते थोडक्यात ह्या विभागात सांगतो.  हा दुर्ग पनवेल, कर्जत भागावर लक्ष्यठेवण्यासाठी वापरत असावे.  ह्या किल्ल्याला टेहळणीचा किल्ला हि बोलू शकतो .  गडावर फक्त पाण्याचा टाकी आहेत,  बहुतेक तेथे टेहळणी करण्याऱ्या सैनिकांसाठी पाण्याचा सोयी साठी कातळात खोदल्या असाव्या.  तसेही गडाचा उत्तरेला प्रबळगड सारखा मुख्य गड आहे.  त्यामुळे येथे बहुतेक फक्त टेहेळणी साठी वापरात असावे. असा माझा अंदाज आहे. 

गडावर फक्त पाण्याचा दोन छोट्या टाकी आहेत. बाकी गडाला  बुरुज, तटभिंत वगैरे काही दिसत नाही. 

इर्शाळगडचा पायथ्याचा गावापर्यंतचा प्रवासाचे वर्णन

ठरल्या प्रमाणे आम्ही तिघे ७ ला पनवेल स्थानकावर भेटलो. तेथून आम्ही पनवेल एसटी डेपोत गेलो. डेपोच्या समोरचा हॉटेल मध्ये नाश्ता केला. नंतर पुन्हा डेपोत येऊन कर्जत एसटीचा वेळ विचारला.  पनवेल ते इर्शाळगड अंतर रस्त्याने अंदाजे १५ कमी आहे.  कर्जत ला जाणारी ८. १५ ची एसटी होती.  त्या एसटी ने आम्ही जुन्या मुबई-पुणे महामार्गावर चौक रेल्वे स्टेशन थांब्याला उतरलो. आम्हाला चौक स्थानकाला पोहचे पर्यंत ८. ४५ वाजले.  

महामार्गावरून गडाचा पायथ्याचा गावाचा अंतर अंदाजे दोन किलोमीटर आहे. हे अंतर पायी पार करायला  २० ते २५ मिनिट लागतात . महामार्गावरून  एक रस्ता स्थानकाजवळ जातो. तेथून रेल्वेचा पादचारी पूलने आम्ही पलीकडे गेलो. स्थानकातून बाहेर आल्यावर डावीकडे रस्ता सरळ इर्शाळगडाचा पायथ्याचा गाव नानिवली गावात जातो. रस्ता  जिथे संपवतो तिथेच एक सरळ वाट गडावर जाते. त्यामुळे चुकण्याचा काही प्रश्नच येत नाही. 

इर्शाळगडला कसे पोहचावे थोड्यकात 
मुंबई  लोकल ट्रेन ने पनवेलला पोहचावे. 
पनवेल वरून कर्जतला जाणारी एसटी पकडावी. 
कर्जत एसटी ने चौक रेल्वे स्थानकाला उतरावे. 
पनवेल ते इर्शाळगड अंतर रस्त्याने अंदाजे १५ किमी आहे.

गडावर चढायला सुरवात केल्याचे वर्णन

गडावर जाणारी वाट इर्शाळवाडी  शिवाय कुठे हि दुसरीकडे वळत नाही, आणि आम्हाला दुसरी वाट दिसली पण नाही. त्यामुळे तुम्ही न चुकता इर्शाळवाडीत पोहचतात.  आम्ही नांनिवली गावातून ९. १५ ला चढायला सुरवात केली, आम्हाला इर्शाळवाडीत पोहचायला ११ वाजले.  सकाळचा उन हि खूप जाणवत होता आणि गरमी पण होत होती. त्यात आम्हाला पूर्ण गड चढेपर्यंत जरा सुद्धा वारा लागला नाही, त्यामुळे आम्ही बरेच ठिकाणी थांबत थांबत चालत होतो. 

इर्शाळवाडीत पोहचल्यावर डाव्याबाजूने एक वाट इर्शालकर्णी देवीचा मंदिराजवळ जाते, त्या वाटेने जावे.  वाडीत आल्यावर गड दिसत नाही. पण आपल्याला ज्या दिशेला गडाची मोठी लांब सोंड उतरते, त्या दिशेने जायायचा आहे हे लक्षात ठेवावे. इर्शालकर्णी देवीच्या मंदिरजवळूनच वाट पुढे जाते.  वाडीतून जरी वाट मिळाली नाही तरी गावातील कोणीही व्यक्ती तुम्हाला सांगेल. 

मंदिराजवळून थोडे पुढे गेल्यावर एक ठिकाणी वाट उजवीकडे वर जाते.  तिथून पुन्हा फिरून सोंडेचा दिशेने वर वर जाते. सोंडेवरून आपण वर चढायला सुरवात केली कि, सोंडेवर एक ठिकाणी वर आल्यावर गडाचा छोट्या सुळक्याचा कातळ लागतात आणि पहिला एक सुळका हि दिसतो. हा कातळ म्हणजेच मोठी दगडी. बहुतेक ट्रेकर सोंडेवरून सरळ वर कातळावर चढायला लागतात. त्यामुळे ते गडावर पोहचत नाही. 

त्यामुळे सोंडेवर जिथे आपल्याला कातळ लागतो किंवा मोठे दगड लागतात, ते सरळ न चढत जाता. जेथे कातळ किंवा दगड लागतात तेथून आपल्या डाव्या बाजूने,  गडाच्या दुसऱ्या बाजूला एक वाट जाते.  हि वाट गडाचा सुळक्यांचा पायथ्याने  सरळ जाते. या वाटेने गडाचा शेवटचा टोकापर्यंत पुढे न जाता, मधेच हि वाट कातळातून वर गडावर जाते.  वर जाणारी वाट आपल्याला सहजासहजी दिसत नाही.  त्यामुळे नीट लक्ष ठेवावे लागते.  नाही तर तुम्ही चुकून पुढे जाऊन शकता.  वाट नक्की कुठून वर जाते,  हे लक्षात ठेवण्यासाठी जेथे गडाचा नेढा दिसतो किंवा गडाचा मोठा सुळका आणि दुसरा टोकाचा सुळका ह्यांचा मधला भाग आहे, त्या जागेचा खालूनच वाट गडावर जाते.  हे लक्षात ठेवलात तर तुम्हाला वाट शोढायला सोपी पडेल. 


गडावरील वर्णन

ह्या वाटेने कातळातून वर चढायला सुरवात केल्यावर, आपल्याला पहिली एक छोटी कातळातील टाकी लागते. त्या टाकीचा वरती एका ठिकाणी कातळ चढायला अवघड असल्यामुळे ३ फुटाची छोटी लाकडाची शिडी लावलेली आहे. शिडीचा डाव्या बाजूला एके ठिकाणी काही अंतरावर उघड्यावर एका देवीची पाषाणाची मूर्ती आहे. .ते उघड्यावरील मंदिर प्राचीन दिसत नाही. 


शिडीने  वर चढल्यावर अजून दोन ते तीन ठिकाणी चालून गेल्यावर आपण नेढ्या जवळ पोहचतो. नेढ्या जवळून उजवीकडे एक छोटा सुळका लागतो.  त्या सुळक्यावर जायायला कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. पण त्या पायऱ्या झिजलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे ह्या सुळक्यावर चढतेवेळी तसेच विशेष करून उतरतेवेळी सांभाळून जावे. जास्त करून कमी अनुभवी ट्रेकर ने टाळावे. कारण सुळक्यावर  बुरुज किंवा प्राचीन खुणा काहीच आढळत नाही. 

नेढ्याजवळ आल्यावर नेढ्यातून पलीकडे जाऊन डावीकडे वाट वर मोठ्या सुळक्याजवळ जाते.  ह्या वाटेने आपण मोठ्या मुख्य  सुळक्याजवळ पोहचतो. मोठ्या सुळक्याचा कातळाजवळ आल्यावर, सुळक्याचा दोन बाजूला जायायला, दोन वाटा लागतात. 

डाव्याबाजूचा वाटेने गेल्यावर, थोडा पुढे गेल्यावर आपण कातळावर खोदलेल्या टाकी जवळ पोहचतो.  टाकीजवळ जाणारा रस्ता  निमुळता असल्याने जपून जावे लागते , तसेच टाकी जवळ बसायला जास्त जागा हि नाही आहे. 

टाकीकडील बाजूने आपल्याला प्रभळगड आणि तेथील परिसर दिसतो. आम्ही टाकीजवळ थोडा वेळ आराम करून, जेवून निघालो.  टाकी चा वाटेने म्हणजेच सुळक्याचा डाव्या वाटणे पुन्हा पाठी येऊन आम्ही सुळक्याचा उजव्या बाजूला गेलो.  सुळक्याला पूर्ण वळसा घालता येत नाही. कारण पूर्ण रिंगण करायला वाट नाही आहे. त्यामुळे पुन्हा एका वाटेने पाठी येऊन.  दुसऱ्या बाजूला जायायला लागते.

सुळक्याचा उजव्या बाजूला, म्हणजेच दुसऱ्या बाजूला जुनी वास्तू  किंवा पाण्याची टाकी, असे काहीच नाही.  कातळात बसण्यासाठी थोडीशी घसरती जागा आहे. पण ह्या बाजूने आपल्याला इर्शाळवाडी, मोरबे धरण, तसेच माथेरानचा डोंगर आणि त्याचा भोवतालीचा परिसर दिसतो.

परतीचा प्रवास 

सुळक्याचा दोन्ही बाजू पाहून आम्ही २. ३० वाजता, आलो त्या वाटेने पुन्हा  परतीचा प्रवासाला लागलो.  आम्ही  ४ वाजता गडाचा पायथाचा गाव नानिवलीला पोहचलो.  तेथून आम्ही पुन्हा चालत बससाठी महामार्गाचा दिशेने चालू लागलो. पण दमट वातावरण आणि उनामुळे प्रणव एकदमच थकून गेला होता. त्याला आम्ही रस्त्यात दुचाकी वाहनावर पुढे पाठवून दिले.  सुरज आणि मी दोघे चालत  ४. ३० ला बस स्थानकाजवळ पोहचलो. १५ ते २० मिनीटांनी पनवेल एसटी मिळाली. आम्ही ५. ३० वाजता पनवेलला पोहचलो.  ह्या ट्रेक साठी आम्हाला प्रत्येकी १२५ रुपये खर्च आला.  अशा प्रकारे आमचा इर्शाळगड झाला 
 



 https://youtu.be/Dsi67boEGOQ





इर्शाळ वाडीतून डावीकडे सोंडेच्या दिशेने गेलो असता. देवीचा मंदिर लागते.
इर्शाळगडाचा सुळका हिथून दगडाच्या डाव्याबाजूने गडावर जाणारी वाट आहे. त्यामुळे दगडावर सरळ चढत  जाऊ नये. त्यामुळे तुम्ही गडाचा वर पोहोचणार




 
गडाचा कातळ चढताना लागणारी पहिली टाकी





 
गडाच्या दुसऱ्या टोकाच्या माथ्यावरून दुसऱ्या शिखराच्या टोकाचा काढलेला फोटो.

 
गडावरील उंच सुळक्याचा डावीकडील बाजूची टाकी . गडाचा डावीकडे जातो तिकडे हि टाकी आहे. पाठी आपल्याला दुसऱ्या टोकाचा सुळका दिसत आहे. आणि खालील फोटोत उजवीकडे इर्शाळवाडीचा बाजूला म्हणजेच गडाचा उंच सुळक्याचा कातळाच्या डावीकडे असलेली जागा, इथून  इर्शाळ वाडी आणि मोरबे धरण दिसते.






गडावर वाट कशी जाते, पाहण्यासाठी मी बनविलेल्या विडिओची youtube  लिंक वर दिली आहे.