Wednesday, 17 June 2020

कर्दमेश्र्वर महादेव मंदिर, वाराणसी. Kardameshwar Temple, Varanasi

कर्दमेश्वर मंदिर, वाराणसी

आम्ही काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेऊन अस्सी घाट बघायला गेलो. तेथून पुढे आम्हाला कर्दमेश्र्वर मंदिर पहायला जायचे होते. काशी मंदिर ते कर्दमेश्र्वर मंदिर अंतर हे अंदाजे ९ किमी आहे. कर्दमेश्वर मंदिर कन्दवा
गावात आहे. 

आम्ही अस्सी घाट बघायला आलो होतो. तेथून जवळच असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांचे जन्मस्थान स्मारक बघितले.  तेथून आम्हाला मंदिर बघायला जायचे होते, त्यामुळे एका रिक्षावाल्याला भाडे विचारले. त्यांनी फक्त तेथे सोडायचे २०० रुपये सांगितले शेवटी तो १५० रुपये वर आला. आम्ही दोघेच  असल्यामुळे आम्हाला ते महाग वाटले पण जर तिघेजण असतो तर शेअर रिक्षा एवढेच झाले असते.

सागर नको म्हणाला, मग आम्ही पुढे चालू लागलो. अंदाजे १. ५ किमी चालल्यानंतर आम्ही बनारस हिंदूविश्वविद्यालय जवळ पोहचलो. ह्या विभागाला लंका असे पण म्हणतात (लंका पोलीस स्थानक पण आहे). तेथून आम्हाला कळाले की इथून पुढे शेअर रिक्षा बदलत चितईपुर जवळ पोहोचता येते, मग आम्ही ४ रिक्षा बदलत कर्दमेश्र्वर् मंदिरा जवळ पोहचलो. 
काशी विश्वनाथ मंदिर जवळून पण शेअर रिक्षा भेटते पण ती ही लंकाला बदलायला लागते. आम्ही कुठून कुठं पर्यंत रिक्षा बदलत गेलो ते सांगतो.

पहिली रिक्षा - काशी विश्वनाथ मंदिराच्या गोदौलिया सर्कल मधून लंका साठी ( किंवा बनारस हिंदू महाविद्यालय पर्यंत ) भेटते त्यासाठी प्रत्येकी २० रुपये घेतात. ही रिक्षा तुम्हाला अस्सी घाटच्या रस्त्यानेच घेऊन जाते, मंदिर ते लंका हे अंतर ४ किमी आहे. 

दुसरी रिक्षा - लंका (बनारस हिंदूविश्व विद्यालय) पासुन नारिया साठी शेअर रिक्षा भेटते त्यासाठी प्रत्येकी १० रुपये घेतात आणि हे अंतर अंदाजे १ किमी आहे. 

तिसरी रिक्षा -  नारीया ते DLW पर्यंत भेटते त्यासाठी प्रत्येकी २० रुपये घेतात आणि हे अंतर २.८ किमी आहे.
DLW चौकात (सर्कल) मध्ये उतरल्यावर चितईपुर पोलीस चौकीसाठी रिक्षा उभ्या असतात. 

चौथी रिक्षा - DLW ते चितईपुर पोलीस चौकी त्यासाठी प्रत्येकी 10 रुपये घेतात आणि हे अंतर अंदाजे १.५ किमी आहे. पोलीस चौकी मुख्य रस्त्याला आहे. ( इथुन रिक्षा अजून कुठे तरी पुढे जाते ).  तेथे उतरल्यावर रस्त्यापलिकडे एक छोटा रस्ता कन्दवा गावात जातो, पण रस्त्याला कर्दमेश्र्वरचा नावाचा मोठा फलक आहे, म्हणून लगेच कळण्यात येते. पोलीस चौकी वरून पुढे मंदिराजवळ जायला रिक्षा मिळत नाही. मग आम्ही चालत निघालो आणि हे अंतर अंदाजे १ किमी आहे. आम्हाला मंदिराजवळ पोहचायला साधारण १५ मिनिटे लागली. 

वाराणसी कँट ( रेल्वे स्थानक) वरून पण चिताईपुरला थेट शेअर रिक्षा आहे. कारण आम्ही परत जाते वेळी कँटला जाणारी रिक्षा पकडून DLW (Circle) चौकात उतरलो. रिक्षावाले फक्त कँन्ट म्हणतात पण ते बहुतेक वाराणसी कॅन्ट किंवा जंक्शन रेल्वे स्थानकला जातात.

काशी विश्वनाथ मंदिरवरून चिताईपुर पर्यंत शेअर रिक्षा बदलत जायला लागते, थेट शेअर रिक्षा मिळत नाही. 

मंदिर वर्णन: 
मंदिर नागर शैलीत आहे. शिखरावर अंगशृंग व उरुशृंग पाहायला मिळतात. मंदिर शिवाचे आहे. मंदिरा बद्दल मी जास्त वर्णन करत नाही ते फोटो वरून कळेलच आणि बाकी माहिती विकिपिडिया वर मिळेलच. मंदिर एका तलावाकाठी आहे त्यामुळे बघायला सुंदर वाटते. मंदिराच्या भिंतीवर आपल्याला मोजकीच शिल्पं दिसतात त्यात मुख्य करून शिवाची आहेत, ब्रह्म आणि विष्णूची ठराविक दिसतात. आम्ही गेलो तेव्हा मंदिर बंद होते. त्यावेळी तेथे काही मुले बसली होती त्यांनी आम्हाला दरवाजा उघडून दिला. आम्ही दर्शन घेऊन पुन्हा मंदिर पाहू लागलो.

मंदिराच्या समोर रस्त्याच्या पलिकडे समोर सूर्याची प्राचीन 2 फुटाची मुर्ती ठेवलेली आहे. ही मूर्ती ज्या कातळावर आहे, तो कातळ चौकोनी आहे. त्याच्या बाकीच्या तिन्ही बाजूला शिल्पे आहेत. त्यांचे ही फोटो मी दिले आहेत. चुकून माझा एका बाजूचा फोटो delete झाल्यामुळे चौथ्या बाजूचा फोटो टाकता आला नाही.
मंदिर बघून आम्ही १५ मिनिटात तेथून निघालो आणि आलो तसेच रिक्षा बदलत बदलत पुन्हा काशी मंदिर जवळ पोहचलो.

मंदिराच वर्णन आणि शिल्पं ची नाव सागर पाटील ने सांगितल्याबद्दल धन्यवाद

मंदिराचं तलाव काठी दिसणारा दृश्य



गजासुर वध

उमामहेश्वर


नटेश्वर शिव

वामन

उजवीकडील शिल्प बलराम व रेवतीचे आहे. त्यात बलराम हल  घेऊन उभा आहे आणि मागे सर्प फणा  आहे. डावीकडे अर्धनारेश्वर चा शिल्प आहे









मंदिर समोरील सूर्याची मूर्ती आणि खाली त्याचा तिन् बाजूला असलेली शिल्प. एक बाजूचा फोटो माझा delete  झाल्या मुळे  टाकता आला नाही. वरती शिवाची पिंड आहे



















Monday, 13 January 2020

Mangalgad Trek /Kangori gad Trek



मंगळगड/ कांगोरीगड 

 मंगळगड / कांगोरीगडाच्या ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  




मंगळगड (कांगोरीगड) ची योजना नेहमीप्रमाणे प्रणवने केली, त्यासाठी व्हाट्सअँप संघावरील मित्रांना विचारून बघितले. होय नाही करता शेवटी आम्ही तीनजणच तयार झालो. प्रणव, मितेश आणि मी. प्रणवने एसटीची माहिती काढून ठेवली होती. त्याप्रमाणे आम्ही त्या एसटीचे शनिवारी रात्रीचे आरक्षण करून ठेवले होते.

प्रवासाबद्दल महत्वाची थोडक्यात माहिती:
मुंबई ते मंगळगड अंतर १९५ किमी
महाड ते मंगळगड २५ किमी
ठाणे सिबीएस ते गोठवली रात्री १२.३० एसटी
एसटी पनवेल, महाड ते बिरवाडी मार्गे जाते.
उतरायचे स्थानक पिंपळवाडी गाव, गोगावले वाडी.

मंगळगड ते मुंबई
दुपारी १२.३० ची बिरवाडी/ महाड पर्यंत एसटी आहे. त्यानंतर ३ ची शेवटची एसटी आहे.
पण रविवारी बहुतेक दुपारी १२.३० गाडी नसते त्यासाठी गावातल्या लोकांना अगोदर विचारणे.
बिरवाडीतून महाडला जाण्यासाठी सतत एसटी आणि रिक्षा भेटतात.
पण पिंपळवाडीतून बिरवाडीसाठी आम्हाला रिक्षा दिसल्या नाही. 

 


मुंबई ते मंगळगड प्रवास वर्णन

मंगळगड ह्याला कांगोरीगड असेही म्हणतात. गडाच्या पायथ्याचे गाव पिंपळवाडी, गोगावले वाडी. त्यासाठी ठाण्यावरून रात्री १२.३० ची ठाणे सिबीएस (खोपट) ते गोठवली एसटी आहे. ही गाडी ठाणे - पनवेल - महाड- बिरवाडीमार्गे जाते. ही एसटी सकाळी ५.३० ला गोठवलीला पोहचते. आम्हाला ही बरोबर त्याच वेळेत गोगावले वाडीत पोहोचवले.

ही महाडला जाणारी शेवटची गाडी असल्यामुळे गाडीला गर्दी असते त्यामुळे आरक्षण करून ठेवलेलं उत्तम. आमची ही गाडी महाडपर्यंत पूर्ण भरलेली होती. जरी ही गाडी पकडता नाही आली तर मुंबई वरून कुठलीही महाडला जाणाऱ्या गाडीने महाडला पोहचावे, महाड बस आगार मधून बिरवाडी साठी एसटी बघावी. महाड ते बिरवाडी साठी बहुतेक एसटी असाव्यात. पण बिरवाडी ते पिंपळवाडी साठी गाडी भेटणं मुश्किल वाटते.

गडाच्या वाटेचे वर्णन:
गोगावले वाडीत रस्त्याच्या शेजारीच असलेल्या मंदिरात ५० ते १०० लोक राहू शकतात. आम्ही थोडे झोपायचा प्रयत्न केला आणि उजाडताच सकाळी ७.२० ला ट्रेकला सुरवात केली. मंदिराच्या समोरच रस्त्याच्या पलीकडे उजवीकडे एक मोठी प्रशस्त वाट डोंगरात जाताना दिसते. तेथे मंगळगडचा फलक ही लावला आहे. साताऱ्याच्या शिवत्व प्रतिष्ठान या किल्ल्यावर गडसंवर्धन करत होते. त्यांनी ही पायथ्याची वाट कच्चा रस्त्यासारखी प्रशस्थ केली आहे. त्यामुळे वाट लगेच दिसते. वाट घाटातील रस्त्यासारखी नागमोडी आहे. हि नागमोडी वाट साधारण तासाभरात आपल्याला टेकडीवर घेऊन जाते. साधारण वीस मिनिट चालून आल्यावर आपल्याला मंगळगडचा पूर्ण डोंगर दिसतो, तो पर्यंत आपल्याला गावातून दिसत नाही.

नागमोडी वाट आपल्याला टेकडीवर घेऊन जाते पण आपण टेकडीच्या पठारावर पोहचत नाही. कारण जेव्हा आपण टेकडीवर येतो तेव्हा एक वाट डावीकडे वर गडावर जाते तर दुसरी समोर टेकडीच्या पठारावर जाताना दिसते. त्यामुळे आपण गडावर जाणाऱ्या वाटेने वर चढायला लागतो. येथून आपल्याला खडा चढ लागतो.

ही वाट डोंगराच्या एक बाजूच्या टोकावर किंवा माचीच्या टोकावर नेते. तेथून डोंगराची धार पठारावर खाली येते, ह्या धारेवरूनच वाट चढावी लागते. त्यामुळे खडा चढ लागतो. साधारण वीस मिनिटे या धारेच्या वाटेने चढून आल्यावर आपल्याला समोर गडाचा कातळ लागतो. येथून आपल्याला उजवीकडे आणि डावीकडे अश्या दोन वाटा लागतात. त्यातील आपल्याला डावीकडील वाट गडावर घेऊन जाते. उजवीकडील वाट कुठे जाते माहित नाही पण ती गडावर जात नाही.

डावीकडील वाट पकडल्यावर आपल्या डाव्याबाजूला सतत दरी लागते तर उजव्या बाजूला गड. ह्या वाटेने चालताना आपल्याला मध्ये मध्ये काही ठिकाणी कातळाच्या तुटक पायऱ्या लागतात (त्या नक्की पायऱ्या होत्या सांगता येत नाही पण पायऱ्यासारख्या वाटत होत्या.). कातळापासून डावीकडील वाटेने आम्ही वीस मिनिटात गडाच्या माथ्यावर पोहोचलो.

गडाच्या दरवाजा जवळ पोहचल्यावर आपल्याला तटबंदी आणि बुरुज दिसतो आणि काही पायऱ्या आपल्याला दिसतात. त्यांनी आपण गडावर पोहचतो. गडाचा दरवाजा पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे.

गडमाथा:

साधारण दीड तासात आम्ही गडावर पोहचलो. गडाच्या दरवाजा जवळ पोहचल्यावर एक वाट उजवीकडे बालेकिल्ल्यावर जाते तर एक वाट समोरच्या कांगोरी देवीच्या मंदिर असलेल्या माचीवर घेऊन जाते.

कांगोरी देवीचे मंदिर आणि माची:
आम्ही प्रथम समोरील वाटेने मंदिराकडे गेलो. जाते वेळी पहिल्या आपल्याला काही प्राचीन मुर्त्या दिसतात. त्यापुढे पायऱ्याचे सुकलेले मोठ टाके लागते आणि त्याच्या बाजूला थोडे खाली उजवीकडे एक मोठ अरुंद असे लांबट टाके लागते, ह्या टाकीला ही उतरायला तुटलेल्या पायऱ्या दिसतात. टाकी पाहून पुढे मंदिराकडे गेलो.  मंदिर थोडे उंचावर बांधल्यामुळे त्याला थोड्या पायऱ्या आहेत.

मंदिरात कांगोरी देवी, भैरवाची मूर्ती आणि शंकराची पिंड आहे. मंदिराच्या बाहेरील गाभाऱ्यात अजून काही मुर्त्या ठेवलेल्या दिसतात. मंदिरात देवीचे दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या मागे बुरुजाकडे गेलो. मंदिराच्या मागे बुरुजापर्यंत पूर्ण तटबंदी बांधलेली दिसते. तिथे बुरुजावर ध्वजस्तंभ आहे. बुरुजावरून दिसणारे दृश्य खूपच रमणीय आहे.

बालेकिल्ला

दोन टाकी
बुरुजावरून आम्ही बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो त्यासाठी पुन्हा दरवाजा जवळून असलेल्या उजवीकडील वाटेने वर गेलो. ह्या वाटेने थोडे वर चढले कि एक वाट बालेकिल्ल्यावर जाते. पण त्या आधी उजवीकडे वाट जाते. त्या वाटेने गेलो असता पुढे डावीकडे ती वाट वळते. तिथे आपल्याला दोन कातळातील गुहेत खोदलेल्या टाक्या लागतात. त्यातील एक खांब टाकी आहे. दोनी टाकी लहान आहेत. खांबटाकीतील पाणी पिण्यायोग्य दिसल्यामुळे आम्ही ते पाणी प्यायला वापरले.

त्या टाकी बघून आम्ही पुन्हा बाले किल्याच्या दिशेने वर जाऊ लागलो. तेव्हा आपल्याला डावी कडे मोठी टाकी दिसते. ह्या टाकीतील पिण्यायोग्य नव्हते.  दरवाजापासून ५ मिनिटात बालेकिल्यावर पोहचतो.

दोन वाड्याचे अवशेष:
बालेकिल्ल्यावर दोन वाड्याचे अवशेष शेजारीशेजारी दिसतात. त्यातील एका वाड्याचा फक्त चौथरा बाकी आहे तर दुसऱ्या वाडयाच्या पडक्या भिंती आहेत.  तसेच इथे आपल्याला एक शिव पिंड आणि एक मूर्ती दिसते.

गडाची दुसरी माची:
वाड्याच्या बाजूने, उजव्याबाजूने  गडाच्या दुसऱ्या माचीवर वाट जाते. माचीकडे जाताना आपल्याला अजून एका वाड्याचे अवशेष दिसतात. पण ते झाडझुडपा मुळे जवळून पाहता येत नाही. त्यामुळे आम्ही ते बाहेरूनच पाहून पुढे माची कडे गेलो.

हि माची पहिल्या माची पेक्षा लहान असल्यामुळे आपण लगेच बुरुजाच्या टोकावर पोहचतो. ह्या माचीला तटबंदी दिसत नाही. बुरुजही नीट दिसत नाही. पण ह्या बुरुजावर आल्यावर आपल्याला आपण ज्या टेकडीच्या धारेवरून वर येतो ती वाट दिसते. थोडक्यात आपल्याला गडाचे हे टोक, गड चढताना सतत दिसत असतो.

परतीचा  प्रवास:
साधारण दीड तासात आमचा पूर्ण गड पाहून झाला आणि आम्ही ११ वाजता गड उतरायला सुरवात केली. कारण आम्हाला १२.३० ची एसटी पकडायची होती. आम्ही १२.१० पर्यंत गावात पोहचलो.

गावात गेल्यावर काही गावकऱ्यांने सांगितले रविवारी १२.३० ची एसटी नसते थेट ३ ची शेवटची एसटी आहे. एसटी बिरवाडी/महाड पर्यंत असते का ते माहित नाही. पण बिरवाडी वरून महाडला जायायला  एसटी किंवा रिक्षा मिळतात.

गाववाल्याने सांगितल्याप्रमाणे आम्ही पुढच्या गावातून एखाद दुसरी रिक्षा वगैरे मिळेल, म्हणून चालू लागलो. आम्हाला चांभारगड पण करायचा होता, त्यामुळे आम्ही जास्त वेळ न थांबता चालू लागलो. पण काही अंतरावर गेल्यावर आम्हाला गडावर भेटलेले काही मित्र त्यांच्या गाडीने दासगाव किल्ल्याला जात होते त्यांनी आम्हाला त्यांचा सोबत दासगावला नेले. त्यामुळे आमचा दासगाव किल्ला सुद्धा झाला अन्यथा आमचा चांभारगड पण नसता झाला.

मी दासगावच्या किल्ल्याचे वर्णन लिहित नाही, कारण आम्हाला किल्यावरील वाट सापडली नाही. त्यामुळे आम्हाला फक्त एक टाके दिसले, बाकी ही एक टाकी सोडून काही अवशेष सापडले नाहीत.

तेथून आम्ही महामार्गावर येऊन मुंबई साठी गाडी पकडली.


मंगळगड / कांगोरीगडाच्या ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  

टेकडीवरून धार वर चढून गेल्यावर गडाच आपल्याला एकाबाजुच टोक लागत. त्याचा कातळ लागतो तिथून डावीकडील वाट गडावर कशी जाते ते ह्या फोटोत पिवळ्या रेषेने दाखवलं आहे.

दरवाजा जवळून उजवीकडे गडावर वाट कशी जाते ते पिवळ्या रेषेत दाखवलं आहे. सुरवातीनंतर  वाट वर वळते आणि सरळ गडावर जाते. तर एकवाट उजवीकडे जाते आणि पुढे डावीकडे वळते तेथे पाण्याचा दोन टाक्या आहेत. त्यातील एक खांब टाकी आहे त्यातील पाणी आम्ही पिण्यास वापरले. टाक्या जेथे आहे तेथे २ बाणाचे चिन्ह जुळताना फोटोत दाखवले आहे.

हि टाकी दरवाजाकडून मंदिराकडे जातो त्या वाटेवर सुरवातीलाच लागते . पण हि टाकी वाटेचा खाली आहे आणि वाट निसरडी असल्यामुळे, आम्ही जाण टाळलं. हि टाकी तुम्हाला जेव्हा बालेकिल्ल्याचा दिशेने जातो तेव्हा मंदिराकडे जाणाऱ्या माचीच्या वाटेला दिसते






          




मंगळगड / कांगोरीगडाच्या ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  

Tuesday, 10 September 2019

Solapur forts सोलापूरचे किल्ले

 सोलापूर भ्रमंती 
दिनांक १४ आणि १५जून २०१९

ह्यावेळी सोलापूरचे भुईकोट करायचे ठरविले होते. जायायचा टिकिट काढून ठेवला होता पण शेवटच्या क्षणापर्यत जाऊ की नको विचार करत होतो, कारण पाऊस पडला तर किल्ले निठ पाहता येणार नाही आणि एसटीने वेळेत आणि कुठून सुरुवात करावी. पण सुरुवात केली आणि शेवटपर्यंत सगळ उत्तम झाले. मी आतापर्यंत एकट्याने केलेल्या योजने मधील आठवणीत राहील असा उत्तम अनुभव मला आला.

प्रवास कसा करावा याचे अंदाज आणि शेवटी कसा  करायचा ते ठरवलं
सुरवात कशी करावी म्हणून ट्रेकचा एका व्हाँटसअप ग्रुप वर तर काहींना खाजगीत विचारल. मग ऐकाने कुर्डुवाडी वरून शेवटी सोलापूरला जायायचं सल्ला दिला. माझा हि मनात हाच विचार होता. सोलापूर वरून मुंबईला येण्यासाठी भरपूर गाड्या भेटतील म्हणून मग मी तसच ठरवलं.

ठरलं तर पाहिल्या दिवशी कुर्डुवाडीला उतरून पहिला करमाळा किल्ला, कमलाभवानी मंदिर नंतर परांडा किल्ला. रात्री सोलापूरला पोहचून दुसऱ्या दिवशी सोलापूर भुईकोट, मंगळवेढा,माचणूर आणि धोत्रीची गडी पण वेळे अभावी माझी धोत्रीची गडी राहिली.
मी इथे फक्त करमाळा, मंगळवेढा आणि मचणूर किल्ल्याची थोडी माहिती दिली आहे. बाकी किल्ल्याच विश्लेषण नाही दिला. मी एसटीने कसा प्रवास केला आणि कसा पोहचलो त्या बद्दल जास्त लिहला आहे. किल्ल्याबद्दलची माहिती मी स्वतः ट्रेकक्षितीज वरून वाचून गेलो, अतिशय सुंदर किल्ल्याची माहिती  देतात. त्यामुळे त्यांच्या साईट वर नक्की जाऊन पहा.

मुंबई ते कुर्डुवाडी, कुर्डुवाडी ते करमाळा प्रवास
मुंबई CSMT वरून रात्री ११.४५ ची चेन्नई मेलची सोलापूर पर्यंतची तिकीट काढली होती. शुक्रवारी रात्री कामावरून लवकर सुटल्यामुळे मी दादर वरून ट्रेन पकडली. ट्रेन कुर्डुवाडीला ७ चा ऐवजी ८ ला पोहचली. तसाच मी चालत १० ते १५ मिनटात कुर्डुवाडी एसटी आगारात पोहोचलो. तिथे ८.४५ची सोलापूर- नाशिक एसटी लागली होती. माझा कडे १५ मिनिट होते तोपर्यंत मी तिथेच नाश्ता करून घेतला.

कुर्डुवाडी ते करमाळा अंतर ४७ किमी आहे. एसटी ने मला सव्वा तास लागला. बरोबर दहा वाजता करमाळा स्थानकात पोहचलो.
(जेऊर वरून हि करमाळा  जाण्यासाठी तास ते दोन तासात एसटी आहे. त्याने हि जाऊ शकतात. माझा पहिला विचार जेऊरला उतरून एसटी ने करमाळ्याला जायायचा होता, कारण जेऊर ते करमाळा अंतर २१ किमी आहे. त्यामुळे मी लवकर पोहचलो असतो. पण मला गाड्याची माहिती नसल्यामुळे मी कुर्डुवाडी वरून जायचं ठरवलं. पण मी खाली करमाळा एसटी आगार मधील वेळापत्रकचा फोटो ठेवला. आहे त्यावरून तुम्हाला जेऊर ते करमाळा गाड्यांच वेळापत्रक कळेल.)

करमाळा किल्ला
एसटी आगारातून चालत ५ मिनिटावर किल्ला आहे. खरं बघितला तर पूर्ण गाव किल्ल्याचा तटबंदीच्या आत, बाहेर बसला आहे. त्यामुळे आपल्याला सगळे अवशेष शोधायला लागतात. किल्ल्याची तटबंदी आणि काही बुरुज ढासळायला लागले आहेत. ट्रेकक्षितीजच्या (trekshitiz) वेबसाईट वर दिल्याप्रमाणे मी मारुतीच मंदिर असलेल्या दरवाजा जवळ प्रथम गेलो. हाच मुख्य दरवाजा वाटतो. त्यातून आत गेल्यावर समोर मारुतीच मंदिर लागत आणि डावीकडे मंदिराच्या दरवाजा समोर अजून एक दरवाजा लागतो. मंदिराच्या आत अजून एक प्राचीन मूर्ती दिसते आणि बाहेर काही विरगळी आणि सतीशिळा दिसतात. तसेच मंदिराच्या समोर किंवा आतील किल्ल्याचा दरवाजाच्या तटबंदीला लागून, अजून एक छोट प्राचीन मंदिर आहे. आणि त्याचा बाजूला एक शंकराचा मंदिर आहे. त्या मंदिरात हि काही तुटलेल्या विरगळ आणि मूर्ती आहेत. मंदिरच्या गाभाऱ्यातील दगडी खांबावरून प्राचीन आहे असे कळते.

मंदिर बघून पुन्हा मुख्य दरवाजाच्या बाहेर येऊन डावीकडे किल्ल्याच्या तटबंदीला लागून पुष्कर्णी (पायऱ्यांची  विहीर) लागते. ती बघून मी पाठी फिरून पुन्हा मुख्य दरवाजाने आत जाऊन. पुन्हा आतील दुसरा दरवाजा लागतो तिथून आत गेलो. ह्या दरवाजाच्या बुरुजावर चढता येते. त्यासाठी उजव्या बाजूला असलेल्या मस्जिदच्या बाजूने बुरुजावर जाता येते. बुरुजावरून किल्ल्यातील थोडं गाव दिसते. पुन्हा खाली दरवाजा जवळ आल्यावर बाजूला असलेला महाल दिसतो. त्याचा विहिरीत आता पूर्ण कचरा टाकलेला आहे. हा महाल बघून पुन्हा दरवाजा जवळ आलो. तिथून एक रस्ता सरळ बुरुजाचा बाजूने जातो तर एक रस्ता उजवीकडे कडे जातो. उजवीकडील रस्त्याने गेलो असता आपण जुन्या कोर्ट जवळ पोहचतो. हा कोर्ट पहिला वाडा होता. तिथे आत एक विहीर आहे. अजून थोडं पुढे गेलो असता आपल्याला त्याचा दुसरा दरवाजा दिसतो.  हा लाखडी दरवाजा कायमचा बंद केलेला दिसतो.
कोर्ट / वाडा बघून बाहेर आल्यावर पुन्हा पाठी न जाता पुढे गेलो असता. आपण गावातील गल्लीतून जाताना आपल्याला तटबंदी लागते. त्या तटबंदीला पुढे एक लहान दरवाजा लागतो. ह्या दरवाजातुन बाहेर गेलो असता आपल्याला बाहेरून तटबंदीचे बुरुज आणि खंदकचा खड्डा दिसतो. पुढे रस्ता न दिसल्यामुळे मी पुन्हा दरवाजने आत येऊन गल्लीतून पुढे चालत राहिलो. आणि विचारत विचारत बुरुजाचा बाजूने किल्ल्याचा बाहेर आलो. मुख्य रस्त्याला आल्यावर जर पुन्हा डावीकडे वळून रस्त्याने बुरुजाचा बाजूने गेलो असता, पुन्हा एक रस्ता महात्मा गांधी महाविद्यालयचा बाजूने आत जाताना दिसतो. ह्या रस्त्याने गेलो असता हा रस्ता आपल्याला मारुती मंदिर जवळील दरवाजा जवळ घेऊन जातो. आणि बाजूला आपल्याला  बुरुज आणि तटबंदी दिसते.

किल्ल्यातून बाहेर पडून मी सात नाल्याची विहीर पाहायला गेलो. खरा तर मला खंदकातील विहीर बघायची ती किल्याच्या खंदका मध्येच होती. पण तिथे विचारलेल्या लोकांना कोणाला नीट माहित नव्हता. काही जणांनी  मला  सात नाल्याची विहीर म्हणून एक मोठी तळा एवढी विहीर आहे, तिथे पाठवलं. कोणी मला सांगितलं कि ह्यात सात विहीर आहेत. म्हणून ह्याला सात विहीर म्हणतात. पण पाणी एकदम सुखायला येते तेव्हा त्या विहिरी दिसतात. नाही तर एक मोठी विहीर दिसते. पण हि विहीर किल्ल्या पासून साधारण १ ते दीड किमी लांब  RTO कार्यालय जवळ आहे. बाकी मला तरी ती विहीर ऐतिहासिक वाटली नाही. तसा कुठे फलक हि नाही दिसला. त्यामुळे माझा इथे अर्धातास वाया गेला असा मला वाटलं. त्यामुळे मला पुढे उशीर झाला. त्यामुळे हि विहीर न पहिली तरी हरकत नाही.

कमलाभवानी माता मंदिर, ९६ पायऱ्यांची  बारव
तेथुन पुढे मी कमलाभवानी माता मंदिर बघायला गेलो. मंदिर गावातून २ किमी वर आहे. त्यामुळे खाजगी रिक्षा करून जायायला लागते किंवा एसटीने त्या मंदिराच्या फाट्याला उतरून ५ मिनटं लागतात. करमाळ्यावरून परांडा किंवा सालसचा दिशेने जाणाऱ्या एसटीने उतरावे. येथे लांबपल्याचा एसटी थांबत नाही.

मी मोठया विहिरी जवळून एका बाईकस्वार कडून मदत माघून एसटी स्टॅन्ड जवळ गेलो. तेथुन एसटीची वाट न पाहता ८०रुपये देऊन रिक्षा करून मंदिरात गेलो. सव्वा बाराला मी मंदिरात पोहचलो. मला साडे बाराची परांडा साठी एसटी पकडायची होती. पण मंदिर, ९६ पायऱ्यांची बारव आणि समाधी पाहेपर्यंत १ वाजला. हेच जर मी ती विहीर बघायला गेलो नसतो तर मला साडे बाराची परांडा एसटी भेटली असती.

मंदिराचा बाजूलाच बारव आणि समाधी आहेत. मंदिर किल्ल्या एवढेच प्राचीन आहे. असं म्हणतात किल्ल्या बांधायचा आधी मंदिर निर्माण केलं होता. मंदिर खूप सुंदर आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या सैराटचा गाण्याचा चित्रफीत मध्ये मंदिर आणि बारव दाखवली आहे.

करमाळा  ते परांडा प्रवासाचे वर्णन
एक वाजला होता. मी एसटी आगर मध्ये न जाता, तिथेच फाट्यावरील थांब्याला एसटी पकडली. पहिली १.३०ची भूम ला जाणारी लांब पल्ल्याची एसटी तिथे थांबली नाही. आगारात लावलेल्या वेळापत्रकात परांडा साठी २ ची एसटी होती, इथे फाट्याला हि पण गाडी थांबली नाही तर म्हणून मी पुन्हा आगारात जाणार होतो. तितक्यात एक एसटी येताना दिसली. म्हणून पुन्हा थांबलो तर नेमकी परांडा गाडी होती. आणि हि गाडी थांबली.  पण गाडी वेळे आधीच १.४५ ला फाट्याला आली. बरोबर २.४५ ला मी परंडा ला पोहचलो. ह्या मार्गावरती मला शेअर जीप दिसल्या नाही. त्यामुळे पूर्णपणे एसटी वर अवलंबून रहायला  लागते.

परांडा किल्ल्याच वर्णन
मी जेवलो नव्हतो त्यामुळे एक पूर्ण कलिंगड खाऊन पोटपूजा केली. आणि ३.१५ ला किल्ला पाहायला सुरवात केली. मी किल्ल्याबद्दल जास्त काही लिहीत नाही. पण मुख्य किल्ल्यात बघायला महादरवाजाची रचना. दरवाजाचा वरती असलेली मोठी तोफ, हमाम खाना, मस्जिद, विहीर, तोफेचे गोळे, बुरुजावर असलेल्या २ ते ३ मोठया तोफा आणि बाकी लहान लहान तोफा. किल्ल्याची बांदणी उत्कुर्ष्ट आहे. मला पूर्ण किल्ला पहायला अडीच तास लागले.

परांडा ते सोलापूर, बार्शी मार्गे प्रवासाचं वर्णन
मला रात्री राहण्यासाठी सोलापूरला जायायच होता. त्यासाठी मला बार्शीला जाऊन एसटी पकडायची होती. कारण परांडा वरून सोलापूरला थेट जाण्यासाठी दुपारी ३ ची शेवटची एसटी आहे. पण परांडा ते बार्शी दर तासाला एसटी आहे आणि बार्शी वरून सोलापूरला जायायला दर अर्ध्या तासाला विनावाहक न थांबता एसटी आहेत.

पाऊणे सहाला पाच मिनटं असताना मी पळत पळत एसटी आगारात गेलो. कारण ५. ४५ ची बार्शीला जायायची गाडी होती त्यानंतर ६.३० ची होती. मी बरोबर पाऊणे सहालाच पोहचलो.  हि गाडी चुकली असती तर मला खाजगी शेअर गाडी बघायला लागली असती, त्या गाड्या एसटी आगर पासून अर्धा ते १ किमी वर कुठन तरी सुटतात असं मला तेथील दुकानदाराने सांगितले. पण मला गरज लागली नाही. कारण गाडी १० मिनिट उशिरा आली.

परांडा ते बार्शी अंतर २८ किमी आहे. मला बरोबर १ तास लागला ७ वाजता मी बार्शी एसटी आगारला पोहचलो.
बार्शी ते सोलापूर आंतर ६८ किमी आहे. मला सोलापूरला पोहचायला पाऊणे दोन तास लागले. संध्याकाळी ८. ४५ ला मी सोलापूरला पोहचलो. सोलापूर मध्यवर्ती स्थानकात मंगळवेढाच्या एसटीचा वेळापत्रक बघून हॉटेलला गेलो. अशाप्रकारे माझा भटकंतीचा पहिला दिवस संपला.

सोलापूरचा किल्ला आणि सिद्धेश्वर मंदिरचा वर्णन 
दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० ला उठून अंघोळ नाश्ता करून, मी पहिला सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि सव्वा नऊ पर्यंत सोलापूर किल्ल्यामध्ये पोहचलो. किल्ला ASI चा अखत्यारित असल्यामुळे किल्ला पाहण्याची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ /६ पर्यंत आहे. दोन ते सव्वा दोन तासात माझा पूर्ण किल्ला पाहून झाला. चुकूनच एकाद दुसरा पहायचा राहिला असेल.

किल्ल्याचा एका बाजूला आपल्याला तलाव लागतो. तर तीन बाजूला त्यावेळी खंदक होता. पण आता बाजूचा खंदक दिसत नाही कारण किल्ल्याचा बाहेरील बाजूला आता बाग केली आहे. आपण जेथून किल्ल्यात प्रवेश करतो तेथेच पुढच्या बाजूला आपल्याला मोठा रुंद खंदक दिसतो. त्यावरून अंदाज येतो त्यावेळी खंदक पार करून येणे किती अशक्य असेल. खंदक अंदाजे  २५ ते ५० मीटर रुंद असावा.
किल्ल्यात आपण प्रवेश करतो त्याबाजूची किल्ल्याची तुटलेली तटबंदी तोडून रस्ता केलेला दिसतो. किल्ल्याचे मुख्य दरवाजे बघण्यासारखे आहे. तसेच पायऱ्या असलेली विहीर,मी गेलो तेव्हा विहिरीतील गाळ काढायचा काम चालू होता. बहुतेक ती पुन्हा स्वच्छ करून सुंदर करत असावे. किल्ल्यात तसेच एक उध्वस्थ मंदिर आहे. ह्या मंदिरापासून अजून एक मंदिर किंवा मस्जिद सारखी वास्तू दिसते.

सोलापूर ते मंगळवेढा आणि माचणूर प्रवासाचे वर्णन
पाऊणे अकराला मी किल्ला पाहून निघालो. पुन्हा हॉटेल वर जाऊन बॅग घेऊन बारा वाजता सोलापूर मध्यवर्ती एसटी आगारात पोहचलो. मला १२. १५ ची सोलापूर-सांगोला, वाया मंगळवेढा एसटी भेटली. मंगळवेढाला जायायला सकाळी ६ वाजल्यापासून एसटी आहे. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत दर अर्ध्यातासाला एसटी आहे.

सोलापूर ते मंगळवेढा ५५ किमी अंतर एसटी ने मला एकतास दहा मिनटं लागली पोहचायला. एसटीचा तिकीट ७० रुपये होता. वाटेतच मचणूर लागते. मचणूरचा किल्ला हि पाहायचा होता. पण मी पहिला मंगळवेढा किल्ला पाहून येतेवेळी माचणूर किल्ला पहायचा ठरवलं. मंगळवेढा ते माचणूर अंतर १३ किमी आहे.

बहुतेक इथे सोलापूर ते मंगळवेढा शेअर जीप चालतात.

मंगळवेढा पोहचेपर्यंत दीड वाजला होता म्हणून मग मी पंधरा मिनटात जेवून घेतला. आणि मग पाऊणे दोनला  किल्ला बघायला निघालो.

मंगळवेढा किल्ल्याच वर्णन
एसटी आगार पासून ५ ते १० मिनटात चालत मी किल्ल्याजवळ पोहचलो. रस्त्याला एक तांदळा स्वरूपातील कुठच्या तरी देवाचं मंदिर लागलं त्यात एका पाषाणावर नागाची कोरीव शिल्प होता. ते बघून पुन्हा पुढे चाललो. तेथून ५ मिनटात मी किल्ल्याचा  ४ बुरुज आणि ४ भिंतच्या गडी जवळ पोहचलो. आता ते उपविभागीय दंडाधिकारी यांचे कार्यालय आहे. त्यात काही मूर्ती आहेत पण पोलीस फोटो काडून देत नाही कारण त्याचा पाठी कारागृह आहे. मला स्वतः अनुभव आला तरी एका पोलिसाने फोटो काढून दिले म्हणून बर झालं. आत अजून पाहण्यासारखं काही नाही.

तेथून बाहेर पडून मी त्या गडीच्या चारी बाजूने फिरलो. गडीच्या बाजूला एक मंदिर आहे त्याचा बाहेर हि काही मूर्ती आणि शिवपिंड आहे. गडीच्या पाठी डाव्या बाजूला काशीविश्वेशरचा प्राचीन मंदिर आहे. तिथे हि अजून काही मूर्त्ती मंदिराचा आवारात दिसतात. तर त्याचा बाजूलाच लागून पायरायची विहीर आहे. ती आता दुरावस्थेत आहे आणि त्याचा एका कोपऱ्यात ब्रह्माची ३ ते ४ फूट उंचीची मूर्ती आहे. मी तिथे जाण्याचा  प्रयत्न केला पण दगडी घसरून पडण्याचा भीतीने लांबून फोटो काढला.

श्री संत दामाजी महाविद्यालय येथील संग्रहालय
ते बघून मी "श्री संत दामाजी महाविद्यालय" कडे निघालो. कारण तेथे अनेक प्राचीन मूर्तीचा उघड्यावर संग्रहालय केला आहे. त्याचा मी फोटो खाली लावला आहे. मंगळवेढा ते महाविद्यालय अंतर १.५ किमी आहे. गडीचा जवळ पास एका दुकानदाराला विचारलं त्यांनी मला त्या महाविद्यालयचा नाव सांगितलं आणि जवळच आहे सांगितलं.  म्हणून मी गडीपासून सरळ मारवाडी गल्लीतून चालू लागलो. थोड्या वेळाने मी गुगल नकाशावर बघितला अजून १ किमी आहे. चालत चालत मी मारवाडी गल्ली जेथे बोराळेनाका रोडच्या गल्लीला भेटते तिथं पर्यंत चालत आलो.  त्या दोन्ही गल्ली एकमेकांना जेथे भेटतात. त्याचा २ मिनटं आधी मारवाडी गल्लीत रस्त्यात डावीकडे एक नवीन मंदिर आहे. त्याचा समोर म्हणजेच आपल्या उजवीकडे एक जुन/ प्राचीन लहान मंदिर/ घरासारखी वास्तू  दिसते. तिथे त्या वास्तूच्या बाहेर काही प्राचीन मूर्ती दिसतात आणि एक मूर्ती आणि विरगळ भग्न अवस्थेत वडाचा झाडाखाली आहे. त्यांचे मी फोटो खाली दाखवले आहे. तसेच हि जागा कुठे आहे मी त्याचा नकाशाचा फोटो हि लावला आहे. ज्याने करून तुम्हाला कळेल. सांगायचं तात्पर्य माझ्या मते बहुतेक लोकांना कदाचित हे माहित नसावं. आणि हि जी प्राचीन जागा आहे. त्याचा पाठी सांगोल्याला जाणारा रस्ता लागतो. तो पुढे २ मिनिटावर बोराळे नाक्याला मिळतो. तेथून तुम्ही सोलापूरला जाणाऱ्या रस्त्याने गेलात कि ७०० मीटर वर महाविद्यालय आहे.

 
वरील नकाशात सफेद वर्तुळ केलेलं मंगळवेढा किल्ला आहे. तेथून मी कुठच्या रस्त्याने गेलो, ते पिवळ्या रंगात तुटक रेशेने दाखवल आहे त्यात पिवळ्या रेषेत मारवाडी गल्ली दाखविली आहे. आणि त्या पिवळ्या वर्तुळात जिथे ह्या मूर्ती आणि वास्तू आहे ती जागा दर्शविली आहे. त्या वास्तूच्या पाठी लाल तुटक रेशेत सांगोला कडे जाणारा रस्ता दाखवला आहे.  आणि एकदम छोटा पिवळा बिंदू दाखवला आहे तो बोराळे नाका आहे. तेथून सरळ रस्ता सोलापूरला जातो.  एकदम खाली त्या वास्तूचे आणि मूर्तीचे फोटो हि लावले आहे


पण मी पुन्हा त्या गल्लीत येऊन बोराळे नाक्याचा दिशेने चालू लागलो. तेथे मला एक मोटारसायकल वर जाणारा मुलगा भेटला तो हि तिथेच चालला होता. त्याला, मला महाविद्यालय जवळ सोडायला सांगितलं. त्यामुळे मी दोन मिनटात तेथे पोहचलो. महाविद्यालयाचा दरवाजाने आत पायऱ्या चडून आल्यावर एक मोठं मैदान लागते. तेथे डाव्याबाजूला उघड्यावर मुर्ती ठेवल्या आहेत.


उघड्यावरील संग्रहालय पाहून मी पुन्हा पाठी बोराळे नाक्याच्या एसटी थांब्यावर आलो. बहुतेक तीन सव्वा तीन वाजले असावे. गाडीची वाट बघत होतो. पण तिथे शेअर जीप लागल्या होत्या. शेवटी त्यात चोंदून माचणूरला गेलो.

माचणूर किल्ला आणि सिद्धेश्वर मंदिर
मंगळवेढा ते माचणूर अंतर १३ते १४ किमी आहे. मला जीप ने २० मिनट लागली. माचणूर फाट्यावरून चालत  किल्ल्यात पोहचायला १० ते १५ मिनटं लागतात. पण त्या आधी मी जवळच असलेल्या श्री सिद्धेश्वरचा प्रचीन मंदिरात गेलो. मंदिरात दर्शन घेऊन मी किल्ल्याकडे निघालो.

सध्या किल्लाची फक्त तीन बाजूंची तटबंदी राहिली आहे. नदीच्या बाजूची तटबंदी राहिली नाही आहे, बाकी किल्ल्यात पूर्ण मोकळा मैदान दिसते. दरवाजातून आत प्रवेश केल्यावर समोर नदी कडेच्या बाजूला एक छोटी वास्तू दिसते. तेवढीच एक वास्तू किल्ल्यात आहे. किल्ल्यात पहाण्यासारखं बाकी काही नाही. त्यामुळे किल्ला  बघायला १५ मिनटं पुरेशी होतात. मला तरी तेवढा वेळ लागला.

बेगमपूरचा दर्गाच वर्णन
पाच वाजता मी पुन्हा मुख्य रस्त्याला येऊन सरळ सोलापूरला न जाता. पुढेच १ किमी असलेल्या बेगमपुरला
(किंवा बेगमपूर फाट्याला) उतरलो. कारण बेगमपूरला एक दर्गाह आहे त्याला बेगाम्बी दर्गाह म्हणतात. हा दर्गाह जेव्हा आपण माचणूर किंवा मंगळवेढा कडे जातो, तेव्हा नदीच्या पुलावरून डावीकडे किल्ल्यासारखी तटबंदी असलेली मस्जिद नजरेस पडते. त्याचा आकर्षणामुळे मी ती बघायला गेलो.

मचणूर वरून चालत गेलो असतो, तर मला १५ मिनटं लागली असती. पण रस्त्याने जाणाऱ्या छोटा मॅक्स ट्रक वाल्याला सोडायला सांगितले त्यामुळे मी पाच मिनटात बेगमपूरला पोहचलो. मुख्य रस्त्यावरून दर्ग्यापर्यंत पोहचायला ५ मिनटं लागतात. दर्ग्याच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर पुरातत्व खात्याचा राष्ट्रीय संपत्तीं असलेला फलक आहे. दर्गा आतून पाहण्यापेक्षा दर्ग्याची बाहेरील किल्ल्यासारखी तटबंदी, विशेष करून नदीच्या बाजूची तटबंदी पाहण्यासारखी आहे. तीच पूलावरून आकर्षित करते.

तसेच दर्ग्याच्या बाहेर आल्यावर समोरच गावात छोटा दगडी दरवाजाची कमान दिसते आणि समोरच एक दगडाचा चौथरा दिसतो. नक्की ते कोणाचं घर होत का अन्य काही ते मला कळलं नाही. ते बघून मी पुन्हा मुख्य रस्त्याला आलो. दर्गा बघायला मला १० मिनटं लागली. संध्याकाळचे सव्वा पाच वाजले होते, त्यामुळे मी जास्त वेळ दर्गा न बघता गाडी साठी मुख्य रस्त्याला आलो. कारण संद्याकाळी साडे पाच नंतर सोलापूरला जायायला १ तासाने गाडी आहे. म्हणून मी जरा घाई करत मुख्य रस्त्याला एसटी थांब्याला गेलो. मला ५. २५ ची सोलापूर गाडी भेटली.

सव्वा सहा वाजता मी सोलापूरला पोहोचलो. अश्याप्रकारे माझी सोलापूरची यात्रा संपन्न झाली.



काही गाड्यांची माहिती तर काही चादर खरेदी साठीची माहिती
सोलापूर मध्यवर्ती स्थानक ( सोलापूर सेंट्रल बस स्टॅन्ड) वरून 
  • सोलापूर ते पंढरपूर, सोलापूर ते तुळजापूर सकाळी ६ ते रात्री ९. ३० पर्यंत दर अर्ध्यातासाला विनावाहक गाडी आहे.
  • अक्कलकोटला जायायला सकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत दर १५ मिनिटाला गाडी आहे.
  • नळदुर्गला जायायला सकाळी ७. ३० ते संध्याकाळी १८. ३० पर्यंत दर तासाला गाडी आहे.
  • मुंबईला जायला वेळेत आणि नेमक्या एसटी आहेत. 
  • पुण्याला जायला दर अर्धा ते पाऊण तासाला एक एसटी आहे. मात्र संध्यकाळी पाऊणे सहा नंतर तासाला एक गाडी आहे.
  • मंगळवेढा किल्ल्याला जायला सकाळी ६ ते संध्याकाळी ६ पर्यंत दर अर्ध्या तासाला एक गाडी आहे.
    तसेच सांगोला- मंगळगड मार्गे गावी जाणारी एसटी हि असते.


सोलापूरी चादर खरेदी करायची असेल तर काही माहिती
माझी रात्री ९.३० ची मुंबई साठी ट्रेन होती. तोपर्यंत काय करणार, म्हणून मी सोलापूरी चादर घेण्यासाठी गेलो.
मी तेथील रिक्षावाला आणि हॉटेल वाल्याकडून माहिती काढून घेतली होती. इथे चादरीची प्रसिद्ध दुकान कुठची आहे. तर मला ३ नावे कळली. गांजी शोरूम, पुलगाम आणि चिल्का. त्यात जर तुम्ही जास्त नग मध्ये (२५/५० किंवा १००) घेणार असाल तर गांजीचा कारखाना MIDC भागात आहे तेथे जावे. तेथे अजून स्वस्तात भेटतात असे  बोलतात. बहुतेक पुलगाम आणि चिल्का चा पण कारखाना आहे. पण नक्की कुठे ते मला माहित नाही. नाही तर गांजी, पुलगाम किंवा चिल्काच्या शोरूम मधून घ्यावा.



कुर्डुवाडी बस स्थानक वेळापत्रक खाली एका बाजूचा काढलेला फोटो त्यात परांडा आणि करमाळाचा वेळापत्रक पाहावे







करमाळा  बस स्थानक वेळापत्रक, खालील फोटोत अर्धा भाग आहे.



बार्शी बस स्थानक वेळापत्रक


सोलापूर मध्यवर्ती बस स्थानक वेळापत्रक
सोलापूर मध्यवर्ती बस स्थानक वेळापत्रक

सोलापूर मध्यवर्ती बस स्थानक वेळापत्रक

सोलापूर मध्यवर्ती बस स्थानक वेळापत्रक

सोलापूर मध्यवर्ती बस स्थानक वेळापत्रक

सोलापूर मध्यवर्ती बस स्थानक वेळापत्रक

सोलापूर मध्यवर्ती बस स्थानक वेळापत्रक

सोलापूर मध्यवर्ती बस स्थानक वेळापत्रक
परंडा बस स्थानक वेळापत्रक, हा फोटो गुगल वरून घेतला आहे.


करमाळा किल्ला
करमाळा  किल्ल्याचा मुख्य दरवाजा (डावीकडील, आतील भाग ) आणि आतील दरवाजा आणि त्यांचा समोर असलेला मारुतीच मंदिर

करमाळा किल्ल्याचा  आतील दरवाजाचा बुरुजावरून दिसणारं  दृश्य 

कमलाभवानी माता मंदिर

९६ पायऱ्याची बारव

सात नाल्याची किंवा सात विहीर, करमाळा

पायरची विहीर आणि खाली फोटोत कोपऱ्यात असलेली ब्रह्मदेवाची प्राचीन मूर्ती


मारवाडी गल्लीतून गेलो असता मला दिसलेल्या मूर्ती आणि वास्तू



मारवाडी गल्लीतून गेलो असता मला दिसलेल्या मूर्ती आणि वास्तू

मारवाडी गल्लीतून गेलो असता मला दिसलेल्या मूर्ती आणि वास्तू


श्री संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा येथील संग्रालय

महाविद्यालयाचा बाहेरील फोटो आणि पिवळ्या रंगाचा वर्तुळ मध्ये संग्रालयाची जागा दर्शवली आहे

बेगमपूर दर्गा/ मस्जिद

बेगमपूर दर्गा/ मस्जिद

बेगमपूर दर्गा/ मस्जिद

बेगमपूर दर्गा/ मस्जिद

बेगमपूर दर्गा/ मस्जिद


बेगमपूर दर्गा/ मस्जिदच्या दरवाजा बाहेर आल्यावर समोरच हि दगडी दरवाजाची कमान दिसते आणि त्याचा आत किंवा समोरच एक दगडाचा चौथरा दिसतो.