Saturday, 30 March 2019

Gumtara fort /Ghotawada fort गुमतारा किल्ला/ घोटवडा गड/ गोतारा किल्ला

गुमतारा किल्ला / घोटवडा गड / गोतारा किल्ला 
गुमतारा गड / घोटवडा किल्ला

गुमतारा / घोटवडा किल्ल्याचा ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  

तीन चार महिन्याच्या विश्रांती नंतर, एकाच आठवड्यात २ दिवसाआड लागोपाठ दोन ट्रेक केले. पहिला, गुरुवारी एकट्याने अंजनेरी किल्ला केला आणि रविवारी घोटवडा/गुमतारा किल्ला केला. तो नेहमीप्रमाणे प्रणव बरोबर त्याने सुचविल्याप्रमाणे. आमच्या सोबत प्रणवच्या दुसऱ्या ट्रेक ग्रुप मधील मित्र सुरेश पण आमच्या सोबत होता.

बहुतेक नेमकेच किंवा नियमित ट्रेक करणारे ट्रेकरच ह्या गडावर जात असावे, हे गडावर जाणाऱ्या वाटेने आपल्याला कळून येते. गडावर जास्त काही अवशेष आढळून येत नाही. गडाचा माथा हि लहान आहे. ह्या गडावर माझ्या माहिती नुसार दुगड गावातून आणि मोहली गावातून जाता येते आणि बहुतेक उसगाव गावातून सुद्धा. आम्ही दुगड गावातून चढायचे ठरवले. 

कल्याण ते दुगड फाटा एसटी प्रवास:
ठरल्याप्रमाणे आम्ही सकाळी ७ ला कल्याणला भेटायचे ठरवले. प्रणव आणि सुरेश डोंबिवली वरून कल्याण एसटी आगारात वेळेत पोहचले. मी सुद्धा ७. २० पर्यंत कल्याणला पोहचलो. आम्ही तिथेच नाश्ता करून सकाळी ७.३० वाजता  कल्याण-वाडा-जव्हार एसटी पकडली. सुरेशने मोटारसायकल आणली होती, तो तिच्यावरूनच दुगड फाट्याला अगोदर पोहचला. कल्याण ते दुगड फाटा अंतर २६ किमी आहे, एसटीचे प्रत्येकी ४० रुपये तिकीट घेतात. एसटीने सव्वा तास पोहचायला लागतो. एसटी भिवंडीनाका- भिवंडी एसटी आगार वरून जाते.
[ परतीच्या वेळी आम्ही दुगड फाटा ते भिवंडी एसटी आगार पर्यंत शेअर गाडी ने प्रत्येकी २० रुपये घेतले. तेथून भिवंडी वरून कल्याणला जाणाऱ्या एसटीने प्रवास केला. त्याचे तिकीट प्रत्येकी ३० रुपये घेतले. भिवंडी वरून ठाण्यासाठी सतत एसटी पण असतात किंवा आगाराच्या बाहेर ठाणे पर्यंत शेअर रिक्षा असतात]

दुगड फाटा ते दुगड गाव
दुगड फाट्याला पोहचेपर्यंत ८.४० झाले. दुगड फाट्यावरून दुगड गाव ४ किमी आतमध्ये आहे. पण आमच्या कडे सुरेशची मोटरसायकल असल्यामुळे आम्ही तिघेजण त्याच्या गाडीवरून ६ ते ७ मिनिटात गावात पोहचलो. चालत गेलो असतो तर आमचा १ ते दिड तास फुकट गेला असता किंवा रिक्षाने जास्त भाडे देऊन जायला लागले असते.

फाट्यावरून डांबरी रस्ता सरळ दुगड गावात जातो. त्या रस्त्याने सरळ जात रहावे शेवटी जेव्हा रस्ता उजवीकडे वळतो तेथे थांबावे, तेथून डावीकडे एक कच्चा रस्ता दिसतो त्या रस्त्याने जावे. हा रस्ता जेथे लागतो तेथे एका झाडावर "गडावर जाण्यासाठी" लहान पाटी लावली आहे. अश्या पाट्या आपल्याला गडावर जाताना वाटेमध्ये दिसतात. त्यामुळे गडावर जाणारी वाट शोधणे सोप्पे पडते. त्यामुळे ह्या पाट्या न चुकता पहात जाणे.

गड चढायला सुरवात
सकाळी नऊ वाजता आम्ही गड चढायला सुरवात केली. ह्या कच्च्या रस्त्याने पाच सहा मिनिटे चालल्यावर नाल्यावर एक छोटा सिमेंटचा पूल लागतो. हा पूल जमिनीवरतीच रस्त्याच्या उंचीला असल्यामुळे लगेच कळत नाही. इथेच ह्या रस्त्याला डावीकडे वाट फुटते ती वाट पकडावी.  सुरवातीला हि वाट मोठी लागते पण नंतर चढ लागल्यावर ती नेहमीच्या वाटे सारखी लहान होते. ह्या वाटेने चढू लागलो असता मध्येच एक ठिकाणी वाट दोन ठिकाणी जाते. एक सरळ जाते आणि एक डावीकडे जाते. इथे डावीकडच्या वाटेने जाण्यासाठी पाटी लावली आहे. पण ती पाटी जर बघितली नाही, तर आमच्या सारखे चुकून सरळ त्या वाटेने गेलात तर वाट चुकू शकता कारण ती वाट धबधब्याजवळ जाऊन संपते.

दुगड गावातून पहिला असता, आपल्याला एका छोट्या डोंगराचा किंवा टेकाडच्या पाठी गुमतारा गडाचा डोंगर दिसतो. हा छोटा डोंगर किंवा टेकाड म्हणजेच गडाचा डोंगराच्या सोंडेचा भाग आहे. आपल्याला गड चढतेवेळी  आपण पहिले ह्या लहान डोंगरावरती पोहचतो नंतर आपण पुढे गडाच्या दिशेने चालू लागतो तेव्हा मध्ये खोलगट सपाट भाग लागतो. तो थोडासा उतरून मग पुन्हा गडाचा मुख्य गड चढू लागतो. जेव्हा आपण गड चढू लागतो, त्या आधी आपल्याला आंब्याचे मोठे झाड लागते आणि तिथून आपल्याला लहानसा चढ लागतो. आंब्याच्या झाडापासून आपल्याला गवती बांबूचे जंगल लागतो. ह्या जंगलातून वर बाहेर आल्यावर, वाट डावीकडे गडाच्या  कातळाच्या पायथ्या खालून जाताना दिसते. त्यामुळे चालते वेळी आपल्याला उजव्या बाजूला गड लागतो आणि डावीकडे खाली दरी लागते. ही वाट पुढे उजवीकडे वळते आणि एका लहान घळीतून गडावर जाते.
ही वाट जिथे उजवीकडे वळते तेथून आपल्याला गडाची तटबंदीची भिंत दिसायला लागते. इथून आपण १० मिनिटात घळीतून गडाच्या मुख्य दरवाजा जवळ पोहचतो. गावातून गडाचा मुख्य दरवाजापर्यंत पोहचायला आम्हाला दीड तास लागला. दरवाजा जवळ पोहचेपर्यंत ११. ३० वाजले.

गडाचा दरवाजा
गडाला बहुतेक हा एकच मुख्य दरवाजा आहे.गडाचा दरवाजा पूर्णपणे उधवस्त झालेला आहे. पण दरवाज्याच्या गोमुखी बुरुजाची तटबंदी आणि बुरुज दिसतो. पण बुरुज ही बहुतेक अर्धाच वाटतो.

पाण्याची टाकी
दरवाज्याने गडावर पोहचल्यावर समोरच थोड्या डावीकडे एक सुकलेली टाकी दिसते. त्या पुढे एक वाट जाते तिथे अजून एक टाकी किंवा खड्डा दिसतो. पण त्यात झाड आणि गवत असल्यामुळे तो खड्डा वाटत होता. दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे मागे पाच ते सहा टाक्यांचा समुदाय दिसतो. त्यातील एका टाकीत पाणी होते. बाकी टाक्या रिकामी होत्या. त्यात एका मोठ्या टाकीत कोणीतरी संवर्धनाचे काम करत होते. हे त्या टाकीतील अर्धी खोदून काढलेली माती आणि त्यात असलेल्या दोन घमेल्यावरून कळत होते. 

देवीचे मंदिर
टाकी बघून आम्ही पुन्हा मागे दरवाजा जवळ आलो, तिथूनच एक वाट उजवीकडे गडमाथ्यावर जाताना दिसते. त्या वाटेने दोन मिनिटात चढून गडावरील देवीच्या मंदिराजवळ पोहोचलो. मंदिराच्या बाजूला साधारण १ फुटाची कठड्यासारखी भिंत दिसते. बाकी मंदिराचे काही अवशेष दिसत नाही. मंदिरात फक्त उघड्यावरती असलेली पाषाणावरती कोरलेली देवीची मूर्ती दिसते.

अजून एक पाण्याची टाकी आणि भग्न मूर्ती
मंदिरा जवळूनच माथ्यावर एक वाट जाते. त्या वाटेने थोडे वर चढल्यावर वाटेत डावीकडे टाकी लागते आणि वाट सरळ माथ्यावर जाताना दिसते. आम्ही पहिले डावीकडे टाकी जवळ गेलो. टाकी सुकलेली होती. टाकीच्या वरच्या भागात एक जुनी मूर्ती भग्न अवस्थेत दिसते. मूर्तीचा फक्त कंबरेच्या खालील भाग दिसत असल्यामुळे ती कुठल्या देवाची मूर्ती आहे ते कळले नाही.

टाकी जवळ आसपास अजून काही अवशेष न दिसल्यामुळे, टाकी बघून आम्ही माथ्यावर जाणारी वाट चढू लागलो. टाकी जवळून पाच मिनिटात आम्ही गड माथ्यावर पोहचलो. दुपारी १२. १० पर्यंत आम्ही गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोहचलो.

गडमाथा
गडमाथा खूप लहान आहे आणि माथ्यावर काही अवशेष आढळत नाही.  माथ्यावरून कामण दुर्ग दिसतो पण टकमक गड आम्हाला काही ओळखता आला नाही. बाकी गडावरून उसगावचे धरण, वज्रेश्वरी आणि भिवंडीचा परिसर दिसतो. पेटपूजा करून आम्ही पाऊणे दोनला गड उतरायला सुरवात केली. दोन तासात मध्ये थोडी विश्रांती घेऊन आम्ही गावात पोहचलो.  ह्या ट्रेक साठी नाश्ताकरून प्रत्येकी ११५ रुपये खर्च आला. रेलवेच्या तिकिटचे पैसे यात मोजले नाहीत.


गुमतारा / घोटवडा किल्ल्याचा ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  
https://youtu.be/NZCiBMo63Pg

आंब्याचा झाडा कडून वाट गडावर कशी जाते ते अंदाजे दाखविल आहे

No comments:

Post a Comment