Showing posts with label #mumbai. Show all posts
Showing posts with label #mumbai. Show all posts

Saturday, 30 March 2019

Gumtara fort /Ghotawada fort गुमतारा किल्ला/ घोटवडा गड/ गोतारा किल्ला

गुमतारा किल्ला / घोटवडा गड / गोतारा किल्ला 
गुमतारा गड / घोटवडा किल्ला

गुमतारा / घोटवडा किल्ल्याचा ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  

तीन चार महिन्याच्या विश्रांती नंतर, एकाच आठवड्यात २ दिवसाआड लागोपाठ दोन ट्रेक केले. पहिला, गुरुवारी एकट्याने अंजनेरी किल्ला केला आणि रविवारी घोटवडा/गुमतारा किल्ला केला. तो नेहमीप्रमाणे प्रणव बरोबर त्याने सुचविल्याप्रमाणे. आमच्या सोबत प्रणवच्या दुसऱ्या ट्रेक ग्रुप मधील मित्र सुरेश पण आमच्या सोबत होता.

बहुतेक नेमकेच किंवा नियमित ट्रेक करणारे ट्रेकरच ह्या गडावर जात असावे, हे गडावर जाणाऱ्या वाटेने आपल्याला कळून येते. गडावर जास्त काही अवशेष आढळून येत नाही. गडाचा माथा हि लहान आहे. ह्या गडावर माझ्या माहिती नुसार दुगड गावातून आणि मोहली गावातून जाता येते आणि बहुतेक उसगाव गावातून सुद्धा. आम्ही दुगड गावातून चढायचे ठरवले. 

कल्याण ते दुगड फाटा एसटी प्रवास:
ठरल्याप्रमाणे आम्ही सकाळी ७ ला कल्याणला भेटायचे ठरवले. प्रणव आणि सुरेश डोंबिवली वरून कल्याण एसटी आगारात वेळेत पोहचले. मी सुद्धा ७. २० पर्यंत कल्याणला पोहचलो. आम्ही तिथेच नाश्ता करून सकाळी ७.३० वाजता  कल्याण-वाडा-जव्हार एसटी पकडली. सुरेशने मोटारसायकल आणली होती, तो तिच्यावरूनच दुगड फाट्याला अगोदर पोहचला. कल्याण ते दुगड फाटा अंतर २६ किमी आहे, एसटीचे प्रत्येकी ४० रुपये तिकीट घेतात. एसटीने सव्वा तास पोहचायला लागतो. एसटी भिवंडीनाका- भिवंडी एसटी आगार वरून जाते.
[ परतीच्या वेळी आम्ही दुगड फाटा ते भिवंडी एसटी आगार पर्यंत शेअर गाडी ने प्रत्येकी २० रुपये घेतले. तेथून भिवंडी वरून कल्याणला जाणाऱ्या एसटीने प्रवास केला. त्याचे तिकीट प्रत्येकी ३० रुपये घेतले. भिवंडी वरून ठाण्यासाठी सतत एसटी पण असतात किंवा आगाराच्या बाहेर ठाणे पर्यंत शेअर रिक्षा असतात]

दुगड फाटा ते दुगड गाव
दुगड फाट्याला पोहचेपर्यंत ८.४० झाले. दुगड फाट्यावरून दुगड गाव ४ किमी आतमध्ये आहे. पण आमच्या कडे सुरेशची मोटरसायकल असल्यामुळे आम्ही तिघेजण त्याच्या गाडीवरून ६ ते ७ मिनिटात गावात पोहचलो. चालत गेलो असतो तर आमचा १ ते दिड तास फुकट गेला असता किंवा रिक्षाने जास्त भाडे देऊन जायला लागले असते.

फाट्यावरून डांबरी रस्ता सरळ दुगड गावात जातो. त्या रस्त्याने सरळ जात रहावे शेवटी जेव्हा रस्ता उजवीकडे वळतो तेथे थांबावे, तेथून डावीकडे एक कच्चा रस्ता दिसतो त्या रस्त्याने जावे. हा रस्ता जेथे लागतो तेथे एका झाडावर "गडावर जाण्यासाठी" लहान पाटी लावली आहे. अश्या पाट्या आपल्याला गडावर जाताना वाटेमध्ये दिसतात. त्यामुळे गडावर जाणारी वाट शोधणे सोप्पे पडते. त्यामुळे ह्या पाट्या न चुकता पहात जाणे.

गड चढायला सुरवात
सकाळी नऊ वाजता आम्ही गड चढायला सुरवात केली. ह्या कच्च्या रस्त्याने पाच सहा मिनिटे चालल्यावर नाल्यावर एक छोटा सिमेंटचा पूल लागतो. हा पूल जमिनीवरतीच रस्त्याच्या उंचीला असल्यामुळे लगेच कळत नाही. इथेच ह्या रस्त्याला डावीकडे वाट फुटते ती वाट पकडावी.  सुरवातीला हि वाट मोठी लागते पण नंतर चढ लागल्यावर ती नेहमीच्या वाटे सारखी लहान होते. ह्या वाटेने चढू लागलो असता मध्येच एक ठिकाणी वाट दोन ठिकाणी जाते. एक सरळ जाते आणि एक डावीकडे जाते. इथे डावीकडच्या वाटेने जाण्यासाठी पाटी लावली आहे. पण ती पाटी जर बघितली नाही, तर आमच्या सारखे चुकून सरळ त्या वाटेने गेलात तर वाट चुकू शकता कारण ती वाट धबधब्याजवळ जाऊन संपते.

दुगड गावातून पहिला असता, आपल्याला एका छोट्या डोंगराचा किंवा टेकाडच्या पाठी गुमतारा गडाचा डोंगर दिसतो. हा छोटा डोंगर किंवा टेकाड म्हणजेच गडाचा डोंगराच्या सोंडेचा भाग आहे. आपल्याला गड चढतेवेळी  आपण पहिले ह्या लहान डोंगरावरती पोहचतो नंतर आपण पुढे गडाच्या दिशेने चालू लागतो तेव्हा मध्ये खोलगट सपाट भाग लागतो. तो थोडासा उतरून मग पुन्हा गडाचा मुख्य गड चढू लागतो. जेव्हा आपण गड चढू लागतो, त्या आधी आपल्याला आंब्याचे मोठे झाड लागते आणि तिथून आपल्याला लहानसा चढ लागतो. आंब्याच्या झाडापासून आपल्याला गवती बांबूचे जंगल लागतो. ह्या जंगलातून वर बाहेर आल्यावर, वाट डावीकडे गडाच्या  कातळाच्या पायथ्या खालून जाताना दिसते. त्यामुळे चालते वेळी आपल्याला उजव्या बाजूला गड लागतो आणि डावीकडे खाली दरी लागते. ही वाट पुढे उजवीकडे वळते आणि एका लहान घळीतून गडावर जाते.
ही वाट जिथे उजवीकडे वळते तेथून आपल्याला गडाची तटबंदीची भिंत दिसायला लागते. इथून आपण १० मिनिटात घळीतून गडाच्या मुख्य दरवाजा जवळ पोहचतो. गावातून गडाचा मुख्य दरवाजापर्यंत पोहचायला आम्हाला दीड तास लागला. दरवाजा जवळ पोहचेपर्यंत ११. ३० वाजले.

गडाचा दरवाजा
गडाला बहुतेक हा एकच मुख्य दरवाजा आहे.गडाचा दरवाजा पूर्णपणे उधवस्त झालेला आहे. पण दरवाज्याच्या गोमुखी बुरुजाची तटबंदी आणि बुरुज दिसतो. पण बुरुज ही बहुतेक अर्धाच वाटतो.

पाण्याची टाकी
दरवाज्याने गडावर पोहचल्यावर समोरच थोड्या डावीकडे एक सुकलेली टाकी दिसते. त्या पुढे एक वाट जाते तिथे अजून एक टाकी किंवा खड्डा दिसतो. पण त्यात झाड आणि गवत असल्यामुळे तो खड्डा वाटत होता. दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे मागे पाच ते सहा टाक्यांचा समुदाय दिसतो. त्यातील एका टाकीत पाणी होते. बाकी टाक्या रिकामी होत्या. त्यात एका मोठ्या टाकीत कोणीतरी संवर्धनाचे काम करत होते. हे त्या टाकीतील अर्धी खोदून काढलेली माती आणि त्यात असलेल्या दोन घमेल्यावरून कळत होते. 

देवीचे मंदिर
टाकी बघून आम्ही पुन्हा मागे दरवाजा जवळ आलो, तिथूनच एक वाट उजवीकडे गडमाथ्यावर जाताना दिसते. त्या वाटेने दोन मिनिटात चढून गडावरील देवीच्या मंदिराजवळ पोहोचलो. मंदिराच्या बाजूला साधारण १ फुटाची कठड्यासारखी भिंत दिसते. बाकी मंदिराचे काही अवशेष दिसत नाही. मंदिरात फक्त उघड्यावरती असलेली पाषाणावरती कोरलेली देवीची मूर्ती दिसते.

अजून एक पाण्याची टाकी आणि भग्न मूर्ती
मंदिरा जवळूनच माथ्यावर एक वाट जाते. त्या वाटेने थोडे वर चढल्यावर वाटेत डावीकडे टाकी लागते आणि वाट सरळ माथ्यावर जाताना दिसते. आम्ही पहिले डावीकडे टाकी जवळ गेलो. टाकी सुकलेली होती. टाकीच्या वरच्या भागात एक जुनी मूर्ती भग्न अवस्थेत दिसते. मूर्तीचा फक्त कंबरेच्या खालील भाग दिसत असल्यामुळे ती कुठल्या देवाची मूर्ती आहे ते कळले नाही.

टाकी जवळ आसपास अजून काही अवशेष न दिसल्यामुळे, टाकी बघून आम्ही माथ्यावर जाणारी वाट चढू लागलो. टाकी जवळून पाच मिनिटात आम्ही गड माथ्यावर पोहचलो. दुपारी १२. १० पर्यंत आम्ही गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोहचलो.

गडमाथा
गडमाथा खूप लहान आहे आणि माथ्यावर काही अवशेष आढळत नाही.  माथ्यावरून कामण दुर्ग दिसतो पण टकमक गड आम्हाला काही ओळखता आला नाही. बाकी गडावरून उसगावचे धरण, वज्रेश्वरी आणि भिवंडीचा परिसर दिसतो. पेटपूजा करून आम्ही पाऊणे दोनला गड उतरायला सुरवात केली. दोन तासात मध्ये थोडी विश्रांती घेऊन आम्ही गावात पोहचलो.  ह्या ट्रेक साठी नाश्ताकरून प्रत्येकी ११५ रुपये खर्च आला. रेलवेच्या तिकिटचे पैसे यात मोजले नाहीत.


गुमतारा / घोटवडा किल्ल्याचा ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  
https://youtu.be/NZCiBMo63Pg

आंब्याचा झाडा कडून वाट गडावर कशी जाते ते अंदाजे दाखविल आहे

Saturday, 29 September 2018

Tringalwadi Fort, त्रिंगलवाडी गड

 त्रिंगलवाडी किल्ला 


त्रिंगलवाडी गडाचे धरणाच्या भिंतीवरून दिसणारे दृश्य



 त्रिंगलवाडी ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  
https://youtu.be/A3v69AXmZEg

महिना झाला सतत काही कामामुळे मोरधन नंतर कुठेच ट्रेक केला नाही. त्यामुळे १६ सप्टेंबरचा रविवारी कुठचा तरी ट्रेक करायचा ठरवलं होत. पण सोबत कोणी येत नसल्यामुळे, एकटा जायायचा ठरवलं. त्यासाठी मी त्रिगलवाडी ट्रेक करायचा ठरवलं.

करीरोड-दादर ते इगतपुरी पर्यंतचा प्रवासाच वर्णन:
दादर वरून सकाळी  ६. २८ ची तपोवन एक्सप्रेस पकडली. इंजिनला लागून पुढे एकच जनरल डब्बा आल्यामळे, कल्याण येईपर्यंत तुफान गर्दी झाली. कसाबसा रेटत-ओरडत इगतपुरीला उतरलो. अस वाटलं, त्यापेक्षा कसाऱ्यापर्यंत लोकल ट्रेनने येऊन. शेअर गाडीने इगतपुरीलाआलो असतो, तर परवडला असता. कमीत कमी बसून तरी आलो असतो. मग येते वेळी इगतपुरी वरून २ तास ट्रेन नसल्यामुळे, कसाऱ्यावरून आलो. २० मिनटात इगतपुरी वरून रोडने कसाऱ्याला पोहचलो.

इगतपुरी रेल्वे स्थानक ते त्रिंगलवाडी पर्यंतचा प्रवासाचं वर्णन:
सकाळी ८. ५० ला इगतपुरीला पोहचलो. बाहेर जाऊन त्रिगलवाडी साठी शेअर जीप कुठे भेटतात म्हणून विचारला असता कळल. शेअर जीप आता बंद झाल्या आहेत. त्यासाठी रिक्षा करून जायायला लागेल. मग मी एसटी आगार मध्ये गेलो. तर तिथे कळलं त्रिंगलवाडीला जायायला एकही एसटी नाही.

आता पुन्हा पाठी फिरून चहा घेऊन दुसऱ्या कुठचा ट्रेक करता येईल का विचार करायचा ठरवलं. पुन्हा पाठी रिक्षा स्टॅन्डला आलो. एका रिक्षावाल्याला पुन्हा विचारला. त्याने मला त्रिगलवाडीला रस्ता जातो  तिथे जीप आहेत का बघायला सांगितले. आता मला हि माहिती होत, जीप नाहीत आणि त्याला हि. तरी हि मी बघायला गेलो.  

त्या रस्त्यात एका बाईक वाल्याला विचारला असता, तो हि मला तेच बोलला "जीप बंद" झाल्या.  तो बोलला, मी सोडतो तुम्हाला मी हि तिथेच चाललो आहे.  त्याचा नाव अर्जुन शेलार, खरतर त्याचा लिफ्ट देण्यामुळेच मी पुढे ट्रेक करू शकलो. त्याबद्दल मी त्याचा आभारी राहील. तरी हि माझ्या मनात प्रश्न पडला. परत येताना काही वाहन नाही भेटल तर?.  मग विचार केला येईल ५ किमी चालत.

नंतर मला अर्जुन आणि इतर गावातल्याकडून कळलं, इगतपुरी वरून गावात येण्या-जाण्यासाठी गाड्या
नसल्यामुळे. गावातील बहुतेक लोक बाईक वापरतात, त्यामुळे रस्त्यात कोणाकडे हि लिफ्ट मागितली कि देतात. त्यामुळे जातेवेळी हि, मी तसाच लिफ्ट मागत गेलो.

इगतपुरी वरून त्रिंगलवाडीला कसा रस्ता जातो त्याचे वर्णन:
इगतपुरी ते त्रिंगलवाडी अंतर ५ किमी आहे. इगतपुरी रेल्वे स्थानकाचा बाहेर आल्यावर इगतपुरी एसटी स्थानकासाठी रस्ता जातो. त्या रस्त्याने पुढे गेलो असता एक चौक लागते तेथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि बुद्ध विहार आहे. तिथून डावीकडे एक रस्ता वर जातो.  हा रस्ता त्रिंगलवाडीला जातो. रस्त्याने चालत गेलो तर अंदाजे १ ते १. ३० तास लागेल, पण रस्त्यामध्ये कुठे वस्ती लागत नाही. आणि एक छोटा घाट लागतो. 

बाइकवरून  १० मिनटात त्रिंगलवाडी गावात पोहचलो. तिथून त्यांनी मला धरणावरून चालत जायायला सांगितले. मी हि मग तिकडूनच गेलो. 

त्रिगलवाडी गाव ते त्रिगलवाडी किल्ल्या पर्यंतचा वाटेचे वर्णन:
दहा वाजता मी त्रिगलवाडी गावातून ट्रेक सुरु केला. गावामागे धरणावर एक वाट जाते. विचारात विचारात पाच  मिनटात मी धरणाजवळ पोहचलो. धरणाचा भिंतीवर आलल्यावर समोर धरणाच्या पलिकडे त्रिंगलवाडी किल्ला दिसतो. त्यासाठी आपल्याला धरणाच्या डाव्याबाजूने वाटेने जायायला लागते. त्यामुळे सतत डाव्याबाजूला डोंगर तर उजव्याबाजूला धरण लागतो.

समोर त्रिंगलवाडीचा वाटेने चालत असताना ध्यानात ठेवणे, डाव्या बाजूला लागणाऱ्या डोंगरावरती न चढता. त्याचा पायथ्याचा कडेने चालत राहणे. कारण काही ठिकाणी धरणाजवळची जमीन तारेचा कुंपण केला आहे. त्यामुळे वाट सुरवातीला धरणाच्या काठाने जाते. नंतर थोडी वरुनच जाते. गडाचा जवळ पोहचल्यावर मला लेण्याची वाडी लागली. वाडीतून १० मिनटात मी त्रिंगलवाडी गडाच्या पायथ्याचा लेणीजवळ पोहचलो

त्रिंगलवाडीतून लेणीपर्यंत पोहचेपर्यंत मला १ तास लागला. पण परत जाते वेळी ४० मिनटात गावात पोहचलो.  ११ वाजता मी लेणीजवळ पोहचलो.

पायथ्याचा लेणीचे थोडक्यात वर्णन:
गडाच्या पायथ्याशी ह्या जैन लेणी आहे. लेणीच्या आत चार दगडी खांबाचा मोठा गाभारा आहे. पण त्यातील एकच खांब अखंड आहे. गाभाऱ्याचा पुढे गुहेच्या खोलीत भगवान महावीरची मूर्ती भग्न अवस्थेत आहे.

लेणी पासून त्रिगलवाडी किल्ल्यावर जाणाऱ्या वाटेचे वर्णन: 
लेणीच्या डाव्याबाजूने गडावर वाट जाते. ह्या वाटेने मी १० मिनटात त्रिंगलगड डोंगराच्या सोंडेवर पोहचलो.
सोंडेवरून सरळ चढत गेल्यावर आपल्याला गडाच्या शिखराचा मुख्य कातळ लागतो. ह्या कातळाच्या दोन बाजूने, उजवीकडून आणि डावीकडून गडावर वाट जाते. 

मी सगळ्या ट्रेककर्स प्रमाणे डाव्या वाटेने गेलो. डाव्यावाटेने गेलो असता, आपल्याला कातळाच्या पायऱ्या आणि गडाचा दरवाजा लागतो. पायऱ्या चडून आल्यावर, समोर मारुतीची ७/८ फुटाची कातळावर कोरलेली मूर्ती दिसते आणि बाजूलाच उजवीकडे दरवाजा आहे.दरवाजाने  वर गेल्यावर आपण गडावर पोहचतो. 

बाराला दहा मिनटं असताना, म्हणजेच साधारण अर्ध्यातासात मी लेणी पासून दरवाज्याने गडावर पोहचलो.

त्रिगलवाडी किल्ल्यावरील पाहिलेल्या वास्तू:
दरवाज्याने वर आल्यावर एक वाट समोर जाताना दिसते. ह्या  वाटेने चालत गेलो असता आपण वाड्याचा अवशेषजवळ पोहचतो. 

वाड्याचे अवशेष 
ह्या पहिल्या वाड्याचा खाली थोड्या अंतरावर अजून एक वाड्याचे अवशेष दिसतात.  ह्या वाड्याचा बाजूने उजवीकडील वाट गडावर येते. ह्या वाटेचे वर्णन मी उतरतेवेळी शेवटी केले आहे. गवतामुळे मला वाडा नीट पाहता आला नाही. ह्या वाड्यांच्या व्यतिरिक्त तिथे आजूबाजूला ३ / ४  नुसते दगड रचून चौकोनी चौथरे केलेले दिसतात. पण त्यांना बघून प्राचीन अवशेष वाटत नाही.

पहिल्या  वाड्याचा येथे आल्यावर आपल्याला गडाच्या सर्वोच माथ्यावर जाताना एक वाट दिसते. ह्या वाटेने शिखर माथ्यावर पोहचता येते. पण ह्या वाटेने मी उतरलो आणि डावीकडील वाटेने पुढे गेलो. 

खांब टाकी किंवा गुहा आणि पाण्याचा तीन टाकी:
डावीकडील वाटेने पहिली मला गडावरील खांब टाकी किंवा गुहा लागली. टाकीचा बाजूला खाली एक आयताकृती टाकी लागते.  इथून वाटेने पुढे गेलो असता. मंदिर जवळ पोहचेपर्यंत, अजून दोन टाकी दिसतात. त्यातील एक जरा वाटेवरून उतरून बाजूला लागते. दोन हि टाकी बघून मी पुढे गडावरील मंदिराजवळ पोहचलो

गडावरील मंदिर:
मंदिरात दोन देवीच्या मूर्ती मध्ये गणपतीची लहान मूर्ती दिसते. मंदिराचा समोरील जागेत शंकराची पिंड आहे.  ह्या जागेच्या खाली बहुतेक समाधी सारखे दोन पाषाण दिसतात. 

शिखर माथ्यावर पोहचल्यावरचे वर्णन:
शिखर माथ्यावर जाण्यासाठी मंदिराचा पाठून माथ्यावर जाणारी वाट दिसते.त्या वाटेने मी ५ मिनटात शिखर माथ्यावर पोहचलो.  सगळे अवशेष बघून मी १२.३० ला शिखर माथ्यावर पोहचलो.

मंदिराच्या बाजूने वर आल्यावर, इथून समोर त्रंबक डोंगररांग स्पष्ट दिसत होती. इथून पुढे मी झेंड्याजवळ गेलो. तिथून त्रिंगलवाडी धरण आणि त्याचा पुढचा परिसर दिसत होता. तर त्याचा अजून डाव्या बाजूला डोंगराचा पाठी लांब कावनई  गड दिसत होता. उजवीकडे दूरवर डोंगररांग न दिसता. पठार आणि जंगल दिसत होता. डावीकडेच पाठी मध्य वैतरणा धरणाचं पाठीमागचा जलाशय दिसत होता.

पूर्ण गड पाहून झाला होता, मग माथ्यावरच जेवण करून सव्वा एकला गड उतरायला सुरवात केली. उतरतेवेळी  उजव्या वाटेने गड उतरायला सुरवात केली.  

उजव्या वाटेचे उतरतेवेळी वर्णन:
वर सांगितल्याप्रमाणे दुसऱ्यावाड्याचा बाजूने उजवीवाट वर येते. तिथूनच उतरायला सुरवात केली. 
वाड्याचा खाली आल्यावर आपल्याला कातळात कोरलेल्या तुटलेल्या पायऱ्या लागतात . पायऱ्यांचा वर आपल्याला भिंती सारखे अवशेष दिसतात. बहुतेक छोटा दरवाजा असल्यासारखे अवशेष वाटतात.  पायऱ्या  उतरतेवेळी उजव्याबाजूला एक छोटी गुहा लागते.  गुहेच्या पुढे पायऱ्या संपतात आणि वाट उजवीकडे वळते. आणि आपल्याला जेथे दोन वाटा लागतात तिथे घेऊन जाते.

२. ४० ला मी त्रिंगलवाडी गावात पोहोचलो. 

हि खालील माहिती, माझ्या आठवणी साठी मी लिहिली आहे
त्रिंगलवाडी गाव ते इगतपुरी पर्यंतचा परतीचा प्रवास कसा केला:
गावातून इगतपुरीला जातेवेळी गाडी नव्हती म्हणून चालायला सुरवात केली. गावातले बोलले वाटेत काही ना काही भेटेल. पाच मिनटं चाललो आणि तितक्यात एक डम्पर आला, त्याने मला पारदेवी फाट्याला सोडला आणि तो दुसऱ्या गावात गेला.  मग इगतपुरीच्या दिशने पुढे थोडा चाललो असता. एका बाईकवाला घाटा मध्ये चालला होता, त्यांनी मला तिथपर्यंत सोडला. पुढे मी घाट उतरू लागलो पुन्हा ५ते १० मिनटात दुसरा बाईक वाला आला. त्याने मला इगतपुरी रेल्वे स्थानकापर्यंत सोडला. अशा प्रकारे मी ३. १५ ला इगतपुरीला पोहचलो. काही गाडी नसती भेटली तरी मी ५ किमी म्हणजे साधारण १ ते दिड तास चालायची तयारी ठेवली होती. पण गावातल्याने सांगितल्याने मला गावातल्या लोकांनी लिफ्ट दिली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.


 त्रिंगलवाडी ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  
https://youtu.be/A3v69AXmZEg

लेणीच्या वाडीच्या अगोदर वाटेत हि शिळा दिसली, बहुतेक समाधी शिळा असावी.

गडावरील खांब टाकी किंवा गुहा आणि त्याचा बाजूला खाली टाकी दिसत आहे.

दुसरी टाकी

तिसरी टाकी

मंदिरातील मूर्ती

मंदिराच्या मागाहून शिखर माथ्यावर जाताना. हा शेंदूर लावलेला पाषाण दिसतो.

दुसऱ्या वाड्याजवळ आढळणारी खोबी

लेणीचे गाभाऱ्याचे दृश्य

गडाच्या शिखर माथ्यावरून दिसणारे दृश्य. पॅनोरमा मोड मध्ये टिपले आहे

गडाच्या शिखर माथ्यावरून दिसणारे दृश्य. पॅनोरमा मोड मध्ये टिपले आहे

गडाच्या शिखर माथ्यावरून दिसणारे दृश्य. पॅनोरमा मोड मध्ये टिपले आहे

धरणाच्या काठावरून पॅनोरमा मोड मध्ये टिपलेले दृश्य. 

 त्रिंगलवाडी ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  
https://youtu.be/A3v69AXmZEg

Monday, 16 July 2018

Thanale caves ठाणाळे लेणी

ठाणाळे लेणी 

ठाणाळे लेणी

ठाणाळे लेणी  ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  

दोन-चार आठवडे, आमचा ठाणाळे लेणी करायचा विचार चालला होता. पण वेळेला दुसराच ट्रेक ठरवल्यामुळे होत नव्हता. शेवटी प्रणव आणि मी १ जुलैचा रविवारी करायचा ठरवले. ह्या वेळी आमच्या सोबत हेमेश आणी त्याची बायको स्वप्ना होती.

विकिपीडियावर सांगितल्याप्रमाणे ठाणाळे लेणी ह्या २३ बुधलेणींचा समुदाय असून, पहिल्या शतकातील आहे.

थोडक्यात प्रवासबद्दल
  • मुंबई वरून खोपोलीला ट्रेन ने पोहचावे.
  • खोपोली ते पाली एसटी पकडावी, त्या गाडीने पेडली गावात उतरावे 
  • खोपोली ते पेडली अंतर २९ किमी आहे. एसटीने प्रत्येकी ४५ रुपये तिकीट आहे.
  • पेडली ते ठाणाळे साठी रिक्षा करावी (किंवा शेअर रिक्षा हि असाव्यात पण ती भरेपर्यत वाट पहावी लागेल.)
  • पेडली ते ठाणाळे ६.५  किमी अंतर आहे, त्यासाठी आम्ही रिक्षाला १५० रुपये भाडे दिले.

प्रवासाचे वर्णन:
ठाणाळे लेणी रायगड जिल्ह्यातील, सुधागड तालुक्यातील ठाणाळे गावात आहे. पण ठाणाळे गावात जाण्यासाठी तुम्हाला एसटीने पेडली गावात उतरायला लागते. एकंदर इथपर्यंत पब्लिक ट्रान्सपोर्ट ने प्रवास वेळेत करणे, खूप मोठ काम आहे. त्यासाठी आम्हला सकाळी ८ ची कर्जत-खोपोली ट्रेन कर्जत वरून पकडायची होती. ती ट्रेन पकडण्यासाठी, मी सकाळी ५..२० ची  सीएसमटी-कर्जत धीमी लोकल ५. ३२ ला करीरोड वरून पकडली. हि ट्रेन कर्जतला बरोबर ७. ४०ला वेळेत पोहचली. बाकी माझे मित्र मला डोंबीवलीला भेटले.

जास्त करून कर्जतला मुबईवरून आलेली लोकल ज्या स्थानकावर लागते, त्याच स्थानकाच्या दुसऱ्या बाजूला खोपोली ट्रेन लागलेली असते. आम्ही ८. २५ ला खोपोलीला पोहचलो. खोपोली रेल्वे स्थानकाबाहेर हॉटेल मध्ये नाश्ता करून, आम्ही पालीसाठी एसटी बघायला गेलो.

खोपोलीला २ ठिकाणाहून एसटी सुटतात. एक मुख्य एसटी आगर आहे, जिथून बाहेरगावी जाणाऱ्या एसटी येतात. हे मुख्य आगार खोपोली स्थानकातून अंदाजे ३ किमी वर आहे. तर दुसरं रेल्वे स्थानकापासून चालत ५ मिनटाचा अंतरावर महामार्गावर आहे. येथे नगरपरिषदेच्या गाड्या सुटण्यासाठी वेगळा आगार आहे आणि त्याचा समोर रस्त्या पलीकडे. पाली व इत्यादी जवळपासच्या गावात जाण्यासाठी जाणाऱ्या एसटी सुटतात.

आम्ही नाश्ता करून, ह्या स्थानकात पोहचेपर्यंत नऊ वाजले होते. त्यामुळे आमची पाली एसटी गेली होती. बहुतेक ती एसटी ८ किंवा ८. ३० ची होती. आणि आता दुसरी गाडी ९. ४५/ १०. ४५ होती. त्यासाठी आम्ही मुख्य आगार मध्ये जाऊन एसटी बघायचा ठरवल. आम्ही रिक्षा करून तिथे पोहचलो. तिथून सकाळी ९ .४५ची मुंबई- पाली एसटी होती, आम्ही त्या एस्टीने जायचा ठरवलं. गाडी वेळेत आली पण सुठेपर्यंत १० वाजले.
खोपोली ते पेडली  २९ किमीचा अंतर पाऊण तासात पोहचलो. पेडलीला पोहचे पर्यंत १०. ५० झाले. पेडली पासून  पुढे पाली अजून ११ किमी आहे.

खोपोली ते पेडली पर्यंत शेअर गाडीने प्रवास कसा करावा.
खोपोली वरून तुम्ही शेअर गाडीने सुद्धा पाली किंवा पेडली पर्यंत जाऊ शकता. पण पाली किंवा पेडली पर्यंत थेट गाडी नाही.त्यासाठी तुम्हाला खोपोली वरून परळी गावात जायला लागते. नंतर परळी वरून पालीला जाण्यासाठी शेअर गाडी असतात, त्याने पेडली गावात उतरायला लागेल. परळी वरून मृगगडला सुद्धा जातात. 
तसच तुम्ही परतीचा प्रवास करू शकतात. पेडली गावातून तुम्हाला पाली, खोपोली, कर्जत आणि पनवेल ला जाण्यासाठी वेळेत एसटी आहेत.

पेडली ते ठाणाळे गाव अंतर ७ किमी आहे. पेडलीतून आता आम्हाला ठाणाळे साठी एसटी नव्हती. बहुतेक ठाणाळे गावातून वाया करत जाणारी ठराविक एक ते दोन एसटी असाव्यात. ठाणाळे गावात जाणाऱ्या रस्त्याला तशी पण जास्त रहदारी दिसली नाही. त्यामुळे आम्ही पेडली वरून एकवेळेच १५० रुपये भाडे देऊन रिक्षा केली. येते वेळी पण आम्ही त्याच रिक्षावाल्याला फोन करून बोलवून घेतले. बहुतेक ठाणाळे किंवा त्याचा पुढच्या गावात जाण्यासाठी शेअर रिक्षा असाव्यात. कारण आमची हि शेअर रिक्षाची ६ आसनी होती. पण आम्हाला उशीर होत असल्यामुळे आम्ही जास्त विचारपूस न करता. भाड्यावर रिक्षा ठरवली. जर तुम्ही ७ ते ८ जण असाल, तर तुम्हाला परवडेल. 

पेडलीवरून ठाणाळे गावात पोहचायला १५ मिनटं लागली.
ठाणाळे लेणीसाठी वाट गावाचा मागून जाते. त्यासाठी आपल्याला गावामध्ये जाऊन विचारायला लागते. अन्यथा वाट मिळणे मुश्किल आहे. आम्ही ११. १५ ला ट्रेकला सुरुवात केली.

ठाणाळे गाव ते ठाणाळे लेणी पर्यंतच्या वाटेचं वर्णन:
गावातल्याने दोन घराचा मागुन जायायला सांगितले. त्या घराचा पाठी गेल्यावर, एक पाय वाट जंगलात जात होती. आम्ही त्यावाटेने चालू लागलो. पाच मिनटात आम्ही एका लहान मोकळ्या जागेत पोहचलो. तिथून ठाणाळे लेणी आणि डोंगर दिसतो. इथून एक वाट डावीकडे खाली उतरताना दिसते, तर दुसरी उजवीकडे जंगलात जाताना दिसते. उजवीकडची वाट लेणीकडे जाते. उजवीकडील वाटेने पुढे चालू लागल्यावर, वाटेत मध्ये मध्ये वाट दर्शवण्यासाठी दगडावर बाणाचे चिन्ह केलेले दिसतात. त्यामुळे तुम्ही न चुकता लेणीपर्यंत पोहचू शकता. जास्त करून वाट जंगलातून जात असल्यामुळे काही ठिकाणी वाट चुकू शकतात, त्यामुळे बाण पहात जावे. जंगलात मच्छरचा त्रास खूप होतो. वाटेत आपल्याला ३ ओढे पार करायला लागतात. त्यात तिसरा ओढा शेवटच्या टप्प्यात येतो. ह्या ओढ्या ओलांडून ५ मिनटात लेणीजवळ पोहचतो.

लेणी बद्दल
लेणीपर्यंत पोहचेपर्यंत आम्हाला १ वाजला. मला लेणी बद्दल जास्त माहिती नसल्यामुळे, लेणीबद्दल वर्णन केलेले नाही. 

लेणी एका ओळीत असल्यामुळे, ओळीतच बघून होतात. त्यात मध्ये एक लेणी रुंदीला सगळ्यात मोठी लागते. त्याचा बाजूचाच कातळात एक मोठा स्तुपा आहे . स्तूपाचा थोडा अजून पुढे, एक लेणीजवळ मोठा कातळ तुटून पडलेला दिसत्तो. पण त्या कातळाच्या बाजूने एक वाट पुढे जाताना दिसते. तिथून पुढे गेल्यावर आपल्याला अजून ३ लेणी  दिसतात. ह्या शेवटच्या लेणी, ह्याच्या पुढे लेणी नाहीत पण इथून एक वाट पुढे जाताना दिसते. ह्या वाटेने पुढे गेलो असता लेणीच्या वरती पठारावर जाता येते. पण हि वाट कडेने जात असल्यामुळे, जपून जायला लागते. हि वाट खाली कुठे तरी उतरताना दिसते. त्यामुळे तेथे खाली न जाता वर पठाराकडे जावे. जिथून आम्ही वर चढलो, तिथे आम्हाला एका दगडावर लेणीच्या दिशेने बाण केल्याचे दिसले. त्यामुळे हि वाट नक्की कुठून येते किंवा कोणी ह्या वाटेने येतात कि नाही, ते कळलं नाही.

लेणीच्या पठारावरून दिसणारे अप्रतिम दृश्य:
साधारण १० मिनटात आम्ही पठारावर पोहचलो. पण पठारावरून दिसणारे दृश्य सुंदरच होते. पाऊस किव्हा पावसाचे ढग हि नसल्यामुळे. आम्हाला पठारावरून डावीकडे सुधागड दिसत होता, तर समोर थोडा उजवीकडे सरसगड दिसत होता. तर उजवीकडे खालील ठाणाळे गाव. आणि खाली पूर्ण हिरवागार जंगल दिसत होता. तर पाठी मुख्य डोंगर आणि त्यामधली घळ दिसते. ठाणाळे गावातून जेव्हा आपल्याला ह्या लेणी दिसतात, तेव्हा हा एकच डोंगरा वाटतो.  पण लेणीचा डोंगर आणि मुख्य डोंगर मध्ये एक घळ लागते. त्यामुळे लेणीचा डोंगर मुळ डोंगराची सोंड वाटते.

पठारावरून वाट वर डोंगरात जाताना दिसते. पण ह्या वाटेने बहुतेक गड माथ्यावर जाता येत नाही. कारण आम्ही जेव्हा पठारावर पोहचलो. तेव्हा खालील गावातील काही तरुण वर असलेल्या धबधब्यावरुन परताना,आम्हाला भेटले. आम्ही त्यांना विचारले असता, त्यांनी हि वाट फक्त धबधब्यावर जाते सांगितले.

लेणी मधून तुम्हाला सुधागड आणि सरसगड दिसत नाही. पठारावरून आम्ही सरळ परतीची वाट पकडली. उतरतेवेळी १ तासात आम्ही गावात पोहचलो. ह्या ट्रेकला आम्हाला प्रत्येकी ३०० रुपये खर्च आला.


ठाणाळे लेणी  ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  



गावातून वर आल्यावर दिसणारा ठाणाळे लेणीचा डोंगर

ठाणाळे लेणीच्या  पठारावरून दिसणारे दृश्य

पठारावरून पुन्हा परत लेणीकडे जाताना काढलेला वाटेचा फोटो

ठाणाळे लेणी  ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  



Monday, 14 August 2017

Aasava Fort, आसावा किल्ला



आसावा  किल्ला  
Aasava Fort

नाला पार करून आल्यावर समोर दिसणारा आसावा गड


गडावर वाट कशी जाते, पाहण्यासाठी मी बनविलेल्या विडिओची youtube लिंक वर दिली आहे. 
         मुंबई ते बोईसर 
  • रेल्वेने पश्चिम रेल्वेने बोईसर स्थानकात उतरावे. 
  • सकाळी ५. ४० ची दादरवरून चर्चगेट-डहाणू लोकल आहे  
  • डोंबिवली वरून सकाळी ५.४० ची बोईसर शटल आहे.  ६. ५६  ला विरार वरून सुटते , ती ८. १०ला बोईसर ला पोहचते.  
  •  ७.४० ची विरार- डहाणू लोकल ८. २८ बोईसरला पोहचते 
  • बोईसर पश्चिमला नवकर नाक्यावरून वारंगडे  गाव, विराज फॅक्टरी शेअर टमटम रिक्षा १५ मिंनिताट पोहचवतात. प्रत्येकी १० रुपये घेतात
     
संपूर्ण जुलै महिना वयक्तीत कामात व्यस्त असल्यामुळे, महिन्यातील एकही रविवारी ट्रेक करता आला नाही. पण महिन्याचा शेवटच्या आठवड्यात मला शनिवारी जादा सुट्टी असल्यामुळे, शनिवारी ट्रेक करायचा ठरवलं. कुठे जायायचा, तर प्रणवने आसावा गड सुचविला. पण अजुन काही पर्यायाचा विचार करून शुक्रवार पर्यंत आसावाच  करायचा ठरवल.

आसावा किल्ला पालघर जिल्ह्यातील बोईसर पूर्वेला रेल्वे स्थानकापासून ८ कि.मी अंतरावर आहे.  त्यासाठी तुम्हाला वारंगडे गावी, विराज फॅक्टरी जवळ उतरायला लागते. टमटम किंवा बसने १०ते १५ मिनट लागतात.

प्रणव सकाळी ५.४० ची डोंबिवली-बोईसर शटलने येणार होता.  म्हणून मी दादर वरून ५.४० ची डहाणू लोकलने न जाता. ५.४५ ची विरार जलदने विरारला उतरून ती शटल पकडावी असा विचार केला होता. पण मला ५.३५ ची विरार जलद मिळालामुळे,  मी ५.२५ ला वसईला पोहचल्यामुळे, वसईलाच बोईसर शटल पकडली. बोइसरला पोहचेपर्यंत ८. १० झाले होते.

माझ्या मते, डोंबवली -बोईसर  शटल बोईसरला जरा उशिराच पोहचते. त्यामुळे नंतरची विरार-डहाणू शटल ७.४० ला विरार वरून सुटते, ती बोईसरला ८. २८ ला पोहचवते. किंवा सकाळी ५.४० ची डहाणू लोकल लवकर असल्यामुळे ७. ४० ची शटल विरार वरून पकडू शकतात.  काळदुर्ग किंवा आसावागड सोपे असल्यामुळे कमी वेळेत होतात त्यासाठी ७. ४० ची विरार-डहाणू शटल पकडून आरामात जाऊ शकतात.


 बोईसर पश्चिमेला आम्ही नाश्ता केला आणि वारंगडे गावासाठी रिक्षा कुठून मिळतात विचारू लागलो. बोईसर पश्चिम ते वारंगडे गाव सतत शेअर टमटम (वडाप) असतात.  म्हणून आम्ही एसटी साठी वेळ न घालवता टमटम साठी गेलो. वारंगडे साठी नवापूर नाकयावरून टमटम भेटतात.  त्यासाठी स्थानकाबाहेरून मुंबईचा दिशेने थोडा पाठी जायायला लागते. टमटमने प्रत्येकी १० रुपये घेतात. रिक्षावाल्यांना वारंगडे गाव, विराज फॅक्टरी सांगितल असता तुम्हाला बरोबर त्याठिकाणी सोडतात.

विराज फॅक्टरीचा (उजव्या) बाजूने एक रस्ता गावात जातो. त्या रस्त्याने ५ते १० मिनटात आपण गावात पोहचतो. पण गावात पोहोचायचा आधी आपल्याला एक ओढा गावातून वाहताना दिसतो. त्या ओढ्याचा पलीकडे एक वाट जाते. तो ओढा ओलांडून त्या वाटेने सरळ चालत राहिले असता आपल्याला आसावा किल्ला दिसतो.

आपण थोडा पुढे पोहचलो असता समोर एक नाला किंवा छोटा कालवा आडवा गेलेला दिसत . गडावर जाण्यासाठी उजवीकडेची वाट धरावी.  नाला/ छोटा कालवा बहुतेक धरणाचे पाणी दुसऱ्या धरणात किंवा इतर पाणी प्रकल्पांना पाणी सोडण्यासाठी बनवला आहे. त्यामुळे हा नाला दोनही दिशेला खूप लांबपर्यंत गेलेला आहे. नाल्याला लागून एक मोठी वाट डावीकडे आणि एक उजवीकडे जाते.

नाला पार करून गडावर जाण्यासाठी ३ छोटे पूल लागतील. पहिला पूल आपल्याला ज्याठिकाणी डावीकडे आणि उजवीकडे जाण्यासाठी वाट आहे, तिथे आहे. पहिला पूल तुम्हाला मिळेलच असा नाही. कारण आम्ही त्या वाटेजवळ पोहचण्याचा आधी,आम्हाला मधेच दोन वाटा लागल्या.  त्यात आम्ही उजवी वाट धरली त्यामुळे आम्ही पहिल्या पुलाच्या थोडा पुढे आलो. उजिवाकडे पुढे गेल्यावर आणखीन दोन पूल दिसतात.  हे दोन्ही पूल एकमेकांचा जवळच अंतरावर आहे ( त्यात आधीचा लहान आहे आणि पुढचा थोडा मोठा आहे).  ह्यात  जो दुसरा पूल (म्हणजेच तिसरा पूल) आहे, त्या पुलावरून नाला पार करायला लागतो.

नाला पार केल्यावर एक वाट वर डोंगरावर जाते. हि वाट चांगली रुळलेली आहे.  त्यामुळे तुम्ही न चुकता गडावर पोहचता. गडावर जाणारी वाट गडाचा डोंगराला लागून असलेल्या छोट्या डोंगरावरून गडावर जाते. त्यामुळे तुम्ही तासाभरात गडावर पोहचतात.

गडावरील वर्णन
गडाचा माथ्यावर पोहचण्याआधी पहिली तुम्हाला छोटी तटबंदी दिसते. तटबंदीचा बाजूने आपण गडावर पोहचतो.  गडाचा माथ्यावर पोहचल्यावर तुम्ही उजिवाकडून किंवा डावीकडून गड पाहायला सुरवात करू शकतात. आम्ही डावीकडून सुरवात केली.

डावीकडे  पहिल्या दोन पाण्याचा टाकी दिसतात.  पहिली टाकी लांब आयताकृती आहे. त्याला चिकटूनच वर दुसरी छोटी चौकोनी आहे. ह्या टाकीचा वरच लागून गडाची सर्वोच जागी भगवा झेंडा लावला आहे.  डावीकडे म्हणजे उत्तरेला तुम्हाला खालील वारंगडे गाव आणि विराज फॅक्टरी चा पूर्ण परिसर दिसतो. झेंडयाचा जवळून समोर पूर्वेला.  दोन टाकीच्या विरुद्ध दिशेला म्हणजेच पाठी खाली गेलो असता.  गडावरील सगळ्यात मोठी पाण्याची टाकी दिसते. हि टाकी झेंड्या जवळून हि दृष्टीस पडते. टाकीचा दिशेने जाते वेळी टाकीजवळ आपल्याला कातळ लागतो.  त्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. पण त्या झिजलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे कळून येत नाही.  हि टाकी आयताकृती आहे. साधारण २० फूट खोल आहे, तसेच  २० फूट लांब आणि १५ फूट रुंद आहे. टाकीत उतरण्यासाठी विहिरीप्रमाणे लहान पायऱ्या आहेत. टाकीची एका बाजूची भिंत कोपऱ्याला कोसळल्यामुळे टाकीत पाणी साचत नाही.

टाकी बघून आम्ही पाठी फिरून वर झेंड्या कडे न जाता,  डावीकडे दक्षिण दिशेने गेलो. डावी कडे गेलो असता प्रथम एक जोत्याचा चौथरा लागतो. हा चौथरा आपल्याला चौथऱ्याच्या  बाजूने खाली आल्यावरच दिसण्यात येतो.  त्या चौथऱ्याच्या थोडा खाली, एकदम समोर गडाचा दरवाजा दिसतो.

दरवाजाचा  डाव्याबाजूला असलेल्या चौथऱ्यामुळे दरवाजा ओळखण्यात येतो. अन्यथा दरवाजाचे काही अवशेष दिसत नाही. तुम्ही दरवाजाने  खाली उतरल्यावर तुम्हाला दरवाजाची खालील चौथरा दिसतो. दरवाजाचा पायऱ्या उध्वस्त झाल्याने मुळे पायऱ्या राहिल्या नाही आहेत. त्यामुळे उतरतेवेळी जपून उतरावे लागते. दरवाजाचा वाटेने खाली जातो तेव्हा दरवाजा पासून काही अंतराजवळच कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात

दरवाजाचा वर म्हणजेच आत डाव्या बाजूला चौक्यांचे / घराचा जोत्याचे अवशेष दिसतात.  ह्या दरवाजाने वाट खाली गुहे जवळून कोरडीपाडा गावात जाते. ( कोरडीपाडा गाव बहुतेक मुख्य गाव गुंडाळे मध्येच आहे.  पण कोरडीपाडा म्हणजेच गावातील एक वाडीचे नाव असावे.  गावातच सध्याचे सहलीसाठी प्रसिद्द असणारे मामाच गाव रिसॉर्ट आहे. )

पण दरवाजाने  खाली न उतरता, आम्ही उजवीकडे पश्चिमेला गेलो.  उजिवाकडे गडाची चांगल्या अवस्थेत असलेली,  गडावरची सगळ्यात मोठी तटबंदीची भिंत दिसते. पण हि तटबंदी बघण्यासाठी आपल्याला खाली उतरायला लागते कारण दरवाजाचा उजवीकडून आल्यावर आपण ह्या तटबंदीचा वरती असलेल्या चौथऱ्यावर येतो. त्यामुळे हि तटबंदी बघण्यासाठी खाली उतरायला लागते. किंवा दरवाजाने खाली उतरून उजिवाकडे वाट वर तटबंदी जवळ जाते. त्यामुळे पूर्ण तटबंदी दिसते. तटबंदीवरून आपण जर पाठी (उत्तरेला) गेलो असता.  आपण पहिल्या तटबंदी जवळून गडमाथ्यावर आलो तिथे पोहचतो.

गडावरून फक्त पश्चिमेला सोडला तर दूरवरचा डोंगररांगा दिसतात. त्यात मुख्य म्हणजे दक्षिणेला काळदुर्ग आणि त्या जवळील पालघर- मनोर रस्त्यावरील धरण दिसते. पूर्वेला सूर्या नदी, उत्तरेला खाली वारंगडे गावाचा परिसर आणि पश्चिमेला बोईसर शहराचा परिसर दिसतो

गुहेजवळ पोहचण्याचे आणि गुहेतील वर्णन
आम्हाला गुहा पण बघायची होती. वर सांगितल्याप्रमाणे आम्ही गडाचा दरवाजाचा वाटेने खाली उतरलो. हीच वाट पुढे तुम्हाला कोरडीपाडा (मामाचा गाव)  गावात घेऊन जाते. ह्या वाटेवर दुर्गप्रेमीने दगडावर जागोजागी बाणाचे चिन्ह केले आहेत. त्यामुळे खूप मदत होते. हि वाट त्याकाळी बहुतेक पक्की असावी कारण अजून एके ठिकाणी एका कातळात झिलेल्या काही पायऱ्या मिळतात. गडावरून आम्ही १५ ते २० मिनटात गुहे जवळ पोहोचलो. गुहा नैसर्गिक बनलेली आहे. सुरवातीला आपल्याला एक छोटी गुहा लागते. त्याला लागूनच पुढे मोठी गुहा आहे. नैसर्गिक गुहा असल्यामुळे गुहेचा तोंड रुंदीला लांब आहे. गुहेची तोंडाची उंची साधारण ६ ते साडे सहा फूट आहे. गुहा आत मध्ये निमुळती होत जाते.

पावसामुळे  गुहेत खोलगट भागात थोडा पाणी साचला होता. गुहा २५ते ३० फूट आडवी रुंद आणि आता मध्ये हि तेवडीच लांब होती. गुहेत एक ३ फूट उंचीचा मुंग्यांचा वारूळ सारखा उभा दगड आहे. शुक्रवारी म्हणजेच आदल्या दिवशी नाग पंचमी होती. त्यामुळे  गावातल्या लोकांनी त्या दगडाला हार घालून पूजा केली होती. आमचा पाठून आलेल्या गावातल्या मुलाने आम्हाला सांगितले या दगडात पहिले साप राहत असे . त्यामुळे लोक त्याची पूजा करतात. हि गाववाल्यांची श्रद्धा असावी.

गुहेचा एक बाजूचा तोंडावर जुन्या बांधकामाची साधारण भिंत ३ फूट उंचीची भिंत दिसते. हि भिंतअर्धवर्तुळाकार आहे. भिंत किती जुनी आहे ह्याचा अंदाज मला आला नाही. भिंत गुहेचा मोठया तोंडावर बांधली आहे. पण भिंत मध्येच  पूर्ण तुटलेली आहे.  एका बाजूला गुहेच्या कोपऱ्यातून भिंत चालू होते, त्या भिंतीवरती अर्धी नवीन दगडाची सिमेंटने भिंत बांधली आहे. ते भिंत पाहताच कळून येते.  त्या भिंतीमुळे गुहेचा बाजूला एक छोटी गुहा  झाली आहे. माझ्या अंदाजे बहुतेक त्याकाळी गुहेत पाणी साठवण्यासाठी  भिंत बांधली असावी . कारण ज्या ठिकाणी भिंत आहे तो भाग थोडा खोलगट आहे .  त्याकाळी भिंतीमुळे कमीतकमी गुडघा किंवा कंबरेएवढे पाणी गुहेत साचत असावे.  गुहेची लांबी रुंदी बघता,  गुहेतील पाणी सुकल्यानंतर २५/३० लोक आराम के साथ राहतील.  गुहेचा बाहेरून खालील कोरडीपाडा, गुंडाळे गावाचा पूर्ण परिसर दिसतो.

गुहेचा बाजूने खालील कोरडीपाडा गावात (गुंडाळे गाव) पोहचण्याचा वर्णन
आम्ही गुहा बघून झाल्यानंतर पुन्हा गडावर न जाता, खाली कोरडीपाडा गावात उतरायचा विचार केला. आम्ही  विचार करत होतो वाट सापडेल कि नाही, कारण खाली पूर्ण जंगल दिसत होता. पण आम्ही गुहेतून गाव कुठेचा दिशेने आहे ते नीट बघून ठेवला.  गावाचा दिशेने आम्हाला वाट शोधत जायायचा आहे असा ठरवून पुढे चालू लागलो . पण कुठचा तरी दुर्गप्रेमीने खाली कोरडीपाडा गावा पर्यंत बाणाचे चिन्ह करून ठेवले होते, त्यामुळे आम्हाला वाट शोधायला लागला नाही.

माझ्या मते,  तुम्ही जर अनुभवी ट्रेकर असाल तरच ह्या वाटेने जावे.

कोरडीपाडा  गावाची वाट वारंगडे गावातील वाटे सारखी सोपी नाही.  कोरडीपाडातून चढाई केली तर गड  मध्यम श्रेणीत मोडता येईल. बहुतेक वाट दगडातून आहे. पावसात बहुतेक ठिकाणी  पाण्यामुळे वाट निसरडी होत असेल. आठवडा भरात बहुतेक ह्याभागात मोठा पाऊस झाला नसेल त्यामुळे वाट निसरडी नव्हती वाटत.  जर तुम्हाला वाटेत बाणाची चिन्ह दिसले नाहीत , तर  वाट चुकण्याची  दाट शक्यता आहे.

आम्हाला गुहे पासून खाली कोरडीपाड्यात उतरायला सवातास तास लागला.

कोरडीपाड्यातून  मुख्य रस्त्या साधारण २ किमी असेल. कोरीडपाडयातून रस्त्याला पोहचेपर्यंत आम्हाला १५ मि. लागली.  आम्ही दोन वाजेपर्यंत रस्त्याला पोहचलो. त्यामुळे आम्हाला २. ३४ ची दादर लोकल भेटली तर बर होईल, असा  विचार करत होते. आम्हाला १० मिनिटाने बोइसर एसटी भेटली.  बोईसर पोहचेपर्यंत २. ३५ झाले होते.  पण लोकल ५ मिनटं उशिरा असल्यामुळे आम्हाला मिळाली.

गडावर गुंडावले गाव, कोरडीपाडा किंवा मामांचा गावचा बाजूने चढाई करायची असेल, तर एसटीने उतरण्यासाठी पेट्रोल पंम्प लक्षात ठेवा. 

नाल्यावरील तिसरा पूल (किंवा तुम्हाला पहिला नाही भेटला तर हा दुसरा पूल). हा पूल पारकरून  जायायला  लागते. 

वारंगडे  गावातून रस्त्याने विराज फॅक्टरीचा बाजूने . नाला पार करून नंतर पुलाचा दिशेला जाऊन. पूल पार करून वर ह्या वाटेने आपण वर येते. मी फोटोत अंदाजे दाखवायचा प्रयत्न केला आहे.

गडाचा माथ्यावर पोहचण्याआधी दिसणारी तटबंदी, ह्या तटबंदीचा बाजूने गडाचा माथ्यावर वाट जाते. खालील फोटोत तटबंदीचा बाजूने जाताना काढलेला फोटो.


गडावरील लागून असलेल्या दोन टाक्या





गडावरील सगळ्यात मोठी  टाकी.

प्रणव 





गडावरील सर्वोच जागी दिसणारा भगवा झेंडा. आणि खाली विहिरीचा  कातळात दिसणाऱ्या पायऱ्या . खालील फोटोत हि दिसत आहे खालील फोटोत पायऱ्या दिसतात आपण त्या पायऱ्यांवरून  खाली येतो. वरील फोटोत फक्त एवढ्याच पायऱ्या दिसतात.


टाकीचा बाजूने काढलेला फोटो.


गडावरून दिसणारा वारंगडे  गावाचा दृश्य

हा चौथरा, बाजूने खाली आल्यावर दिसतो. हे खालील फोटोत पाहिल्यावर कळून येईल.

वरील चौथऱ्या वरून समोर दिसणारा दरवाजा. दरवाजा डावीकडील चौथऱ्यामुळे कळण्यात  येतो. हे फोटो कळण्यात  येते.

दरवाजाच्या डावीकडे  दिसणारे चौथरे
दरवाजा उतरल्यावर दिसणारा दरवाजाचा चौथरा आणि दरवाजाला पायऱ्या नाही आहेत. बाजूला वर चढण्यासाठी बाणाचा चिन्ह केला आहे

दरवाजाने  एकदम थोडा खाली उतरल्यावर डावीकडे ह्या कातळात खोदलेल्या पायऱ्या दिसतात.
दरवाजाने खाली उतरून उजवीकडे फोटोत दिसत असलेल्या वाटेने आलो असता हि तटबंदी दिसते. किंवा दरवाजने खाली न उतरता उजवीकडे गेलो असता.  ह्या तटबंदीचा वरती आपण पोहचतो त्यामुळे आपल्याला हि तटबंदी उडिमारून खाली उतरून बघायला लागते.


तटबंदीचा वरती एक चौथरा लागतो त्यावर प्रणव उभा आहे. ह्या चौथऱ्यावरून खालील फोटोत दिसणारे दृश्य दिसते.
प्रणवने टिपलेला माझा फोटो

फोटोत  शेवटी पालघर चा काळदुर्ग दिसत आहे,  आणि त्याचा पायथ्या खाली पालघर मनोरा रस्त्यला लागून असणारा धरण  दिसतो आहे




गडाचा खाली पोहचेपर्यंत वाट  अशाच  खडकातून खाली उतरते. बहुतेक ठिकाणी दुर्गप्रेमीने फोटोत दिसत असलेलं बाणाचे चिन्ह केले आहेत.



हि वाट त्याकाळी वापरात असावी.  हे कातळात कोरलेल्या पायऱ्या वरून कळून येते.

पहिली छोटी गुहा , त्याचा पुढे लागूनच मोठी गुहा आहे

मोठी गुहेतील आतील फोटो. फोटो गावकरी पुजणारा दगड दिसत आहे.

गडाचा मोठ्या तोंडावर तुटलेली जुनी भिंत दिसत आहे.

गुहेत ज्या बाजूने येतो तेथील गुहेचा निमुळता तोंड.

गुहेचा बाहेरून  काढलेला फोटो
प्रणवने कोपरीपाडा गावात जाते वेळी काढलेला माझा वाटेतील फोटो 

जुन्या भिंतीवर बांधलेली नबीन भिंत दिसत आहे. वरील फोटो कळून येते.





गुहेतुन दिसणारे गुंडाळे  (कोरडीपाडा ) गावाचे दृश्य

गडाचा खाली आल्यावर, खालून दिसणारी गुहा लाल वर्तुळात दाखवली आहे.


कोरडीपाड्यात जाणारी वाट

कोरडीपाडा गाव (गुंडाळे  गाव)

कोरडी पाड्यातून मुख्य रस्त्याला जाताना काढलेले आसावा गडाचा फोटो.  गावातून गुहा दिसते तिथे मी लाल वर्तुळात दाखवली आहे

मुख्य रस्त्यासाठी जाताना प्रणव आणि मी
गडावर वाट कशी जाते, पाहण्यासाठी मी बनविलेल्या विडिओची youtube लिंक वर दिली आहे.