Showing posts with label #maharashtra. Show all posts
Showing posts with label #maharashtra. Show all posts

Saturday, 30 March 2019

Gumtara fort /Ghotawada fort गुमतारा किल्ला/ घोटवडा गड/ गोतारा किल्ला

गुमतारा किल्ला / घोटवडा गड / गोतारा किल्ला 
गुमतारा गड / घोटवडा किल्ला

गुमतारा / घोटवडा किल्ल्याचा ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  

तीन चार महिन्याच्या विश्रांती नंतर, एकाच आठवड्यात २ दिवसाआड लागोपाठ दोन ट्रेक केले. पहिला, गुरुवारी एकट्याने अंजनेरी किल्ला केला आणि रविवारी घोटवडा/गुमतारा किल्ला केला. तो नेहमीप्रमाणे प्रणव बरोबर त्याने सुचविल्याप्रमाणे. आमच्या सोबत प्रणवच्या दुसऱ्या ट्रेक ग्रुप मधील मित्र सुरेश पण आमच्या सोबत होता.

बहुतेक नेमकेच किंवा नियमित ट्रेक करणारे ट्रेकरच ह्या गडावर जात असावे, हे गडावर जाणाऱ्या वाटेने आपल्याला कळून येते. गडावर जास्त काही अवशेष आढळून येत नाही. गडाचा माथा हि लहान आहे. ह्या गडावर माझ्या माहिती नुसार दुगड गावातून आणि मोहली गावातून जाता येते आणि बहुतेक उसगाव गावातून सुद्धा. आम्ही दुगड गावातून चढायचे ठरवले. 

कल्याण ते दुगड फाटा एसटी प्रवास:
ठरल्याप्रमाणे आम्ही सकाळी ७ ला कल्याणला भेटायचे ठरवले. प्रणव आणि सुरेश डोंबिवली वरून कल्याण एसटी आगारात वेळेत पोहचले. मी सुद्धा ७. २० पर्यंत कल्याणला पोहचलो. आम्ही तिथेच नाश्ता करून सकाळी ७.३० वाजता  कल्याण-वाडा-जव्हार एसटी पकडली. सुरेशने मोटारसायकल आणली होती, तो तिच्यावरूनच दुगड फाट्याला अगोदर पोहचला. कल्याण ते दुगड फाटा अंतर २६ किमी आहे, एसटीचे प्रत्येकी ४० रुपये तिकीट घेतात. एसटीने सव्वा तास पोहचायला लागतो. एसटी भिवंडीनाका- भिवंडी एसटी आगार वरून जाते.
[ परतीच्या वेळी आम्ही दुगड फाटा ते भिवंडी एसटी आगार पर्यंत शेअर गाडी ने प्रत्येकी २० रुपये घेतले. तेथून भिवंडी वरून कल्याणला जाणाऱ्या एसटीने प्रवास केला. त्याचे तिकीट प्रत्येकी ३० रुपये घेतले. भिवंडी वरून ठाण्यासाठी सतत एसटी पण असतात किंवा आगाराच्या बाहेर ठाणे पर्यंत शेअर रिक्षा असतात]

दुगड फाटा ते दुगड गाव
दुगड फाट्याला पोहचेपर्यंत ८.४० झाले. दुगड फाट्यावरून दुगड गाव ४ किमी आतमध्ये आहे. पण आमच्या कडे सुरेशची मोटरसायकल असल्यामुळे आम्ही तिघेजण त्याच्या गाडीवरून ६ ते ७ मिनिटात गावात पोहचलो. चालत गेलो असतो तर आमचा १ ते दिड तास फुकट गेला असता किंवा रिक्षाने जास्त भाडे देऊन जायला लागले असते.

फाट्यावरून डांबरी रस्ता सरळ दुगड गावात जातो. त्या रस्त्याने सरळ जात रहावे शेवटी जेव्हा रस्ता उजवीकडे वळतो तेथे थांबावे, तेथून डावीकडे एक कच्चा रस्ता दिसतो त्या रस्त्याने जावे. हा रस्ता जेथे लागतो तेथे एका झाडावर "गडावर जाण्यासाठी" लहान पाटी लावली आहे. अश्या पाट्या आपल्याला गडावर जाताना वाटेमध्ये दिसतात. त्यामुळे गडावर जाणारी वाट शोधणे सोप्पे पडते. त्यामुळे ह्या पाट्या न चुकता पहात जाणे.

गड चढायला सुरवात
सकाळी नऊ वाजता आम्ही गड चढायला सुरवात केली. ह्या कच्च्या रस्त्याने पाच सहा मिनिटे चालल्यावर नाल्यावर एक छोटा सिमेंटचा पूल लागतो. हा पूल जमिनीवरतीच रस्त्याच्या उंचीला असल्यामुळे लगेच कळत नाही. इथेच ह्या रस्त्याला डावीकडे वाट फुटते ती वाट पकडावी.  सुरवातीला हि वाट मोठी लागते पण नंतर चढ लागल्यावर ती नेहमीच्या वाटे सारखी लहान होते. ह्या वाटेने चढू लागलो असता मध्येच एक ठिकाणी वाट दोन ठिकाणी जाते. एक सरळ जाते आणि एक डावीकडे जाते. इथे डावीकडच्या वाटेने जाण्यासाठी पाटी लावली आहे. पण ती पाटी जर बघितली नाही, तर आमच्या सारखे चुकून सरळ त्या वाटेने गेलात तर वाट चुकू शकता कारण ती वाट धबधब्याजवळ जाऊन संपते.

दुगड गावातून पहिला असता, आपल्याला एका छोट्या डोंगराचा किंवा टेकाडच्या पाठी गुमतारा गडाचा डोंगर दिसतो. हा छोटा डोंगर किंवा टेकाड म्हणजेच गडाचा डोंगराच्या सोंडेचा भाग आहे. आपल्याला गड चढतेवेळी  आपण पहिले ह्या लहान डोंगरावरती पोहचतो नंतर आपण पुढे गडाच्या दिशेने चालू लागतो तेव्हा मध्ये खोलगट सपाट भाग लागतो. तो थोडासा उतरून मग पुन्हा गडाचा मुख्य गड चढू लागतो. जेव्हा आपण गड चढू लागतो, त्या आधी आपल्याला आंब्याचे मोठे झाड लागते आणि तिथून आपल्याला लहानसा चढ लागतो. आंब्याच्या झाडापासून आपल्याला गवती बांबूचे जंगल लागतो. ह्या जंगलातून वर बाहेर आल्यावर, वाट डावीकडे गडाच्या  कातळाच्या पायथ्या खालून जाताना दिसते. त्यामुळे चालते वेळी आपल्याला उजव्या बाजूला गड लागतो आणि डावीकडे खाली दरी लागते. ही वाट पुढे उजवीकडे वळते आणि एका लहान घळीतून गडावर जाते.
ही वाट जिथे उजवीकडे वळते तेथून आपल्याला गडाची तटबंदीची भिंत दिसायला लागते. इथून आपण १० मिनिटात घळीतून गडाच्या मुख्य दरवाजा जवळ पोहचतो. गावातून गडाचा मुख्य दरवाजापर्यंत पोहचायला आम्हाला दीड तास लागला. दरवाजा जवळ पोहचेपर्यंत ११. ३० वाजले.

गडाचा दरवाजा
गडाला बहुतेक हा एकच मुख्य दरवाजा आहे.गडाचा दरवाजा पूर्णपणे उधवस्त झालेला आहे. पण दरवाज्याच्या गोमुखी बुरुजाची तटबंदी आणि बुरुज दिसतो. पण बुरुज ही बहुतेक अर्धाच वाटतो.

पाण्याची टाकी
दरवाज्याने गडावर पोहचल्यावर समोरच थोड्या डावीकडे एक सुकलेली टाकी दिसते. त्या पुढे एक वाट जाते तिथे अजून एक टाकी किंवा खड्डा दिसतो. पण त्यात झाड आणि गवत असल्यामुळे तो खड्डा वाटत होता. दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे मागे पाच ते सहा टाक्यांचा समुदाय दिसतो. त्यातील एका टाकीत पाणी होते. बाकी टाक्या रिकामी होत्या. त्यात एका मोठ्या टाकीत कोणीतरी संवर्धनाचे काम करत होते. हे त्या टाकीतील अर्धी खोदून काढलेली माती आणि त्यात असलेल्या दोन घमेल्यावरून कळत होते. 

देवीचे मंदिर
टाकी बघून आम्ही पुन्हा मागे दरवाजा जवळ आलो, तिथूनच एक वाट उजवीकडे गडमाथ्यावर जाताना दिसते. त्या वाटेने दोन मिनिटात चढून गडावरील देवीच्या मंदिराजवळ पोहोचलो. मंदिराच्या बाजूला साधारण १ फुटाची कठड्यासारखी भिंत दिसते. बाकी मंदिराचे काही अवशेष दिसत नाही. मंदिरात फक्त उघड्यावरती असलेली पाषाणावरती कोरलेली देवीची मूर्ती दिसते.

अजून एक पाण्याची टाकी आणि भग्न मूर्ती
मंदिरा जवळूनच माथ्यावर एक वाट जाते. त्या वाटेने थोडे वर चढल्यावर वाटेत डावीकडे टाकी लागते आणि वाट सरळ माथ्यावर जाताना दिसते. आम्ही पहिले डावीकडे टाकी जवळ गेलो. टाकी सुकलेली होती. टाकीच्या वरच्या भागात एक जुनी मूर्ती भग्न अवस्थेत दिसते. मूर्तीचा फक्त कंबरेच्या खालील भाग दिसत असल्यामुळे ती कुठल्या देवाची मूर्ती आहे ते कळले नाही.

टाकी जवळ आसपास अजून काही अवशेष न दिसल्यामुळे, टाकी बघून आम्ही माथ्यावर जाणारी वाट चढू लागलो. टाकी जवळून पाच मिनिटात आम्ही गड माथ्यावर पोहचलो. दुपारी १२. १० पर्यंत आम्ही गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोहचलो.

गडमाथा
गडमाथा खूप लहान आहे आणि माथ्यावर काही अवशेष आढळत नाही.  माथ्यावरून कामण दुर्ग दिसतो पण टकमक गड आम्हाला काही ओळखता आला नाही. बाकी गडावरून उसगावचे धरण, वज्रेश्वरी आणि भिवंडीचा परिसर दिसतो. पेटपूजा करून आम्ही पाऊणे दोनला गड उतरायला सुरवात केली. दोन तासात मध्ये थोडी विश्रांती घेऊन आम्ही गावात पोहचलो.  ह्या ट्रेक साठी नाश्ताकरून प्रत्येकी ११५ रुपये खर्च आला. रेलवेच्या तिकिटचे पैसे यात मोजले नाहीत.


गुमतारा / घोटवडा किल्ल्याचा ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  
https://youtu.be/NZCiBMo63Pg

आंब्याचा झाडा कडून वाट गडावर कशी जाते ते अंदाजे दाखविल आहे

Thursday, 29 November 2018

Jivdhan Fort, जीवधन गड

 जीवधन ट्रेक
 


जीवधन ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  

 
बरेच वर्ष जीवधन ट्रेक करायचा विचार करत होतो. शेवटी विनयशी एक डील केली, त्याला बोललो, तु माझ्या बरोबर जीवधन किल्ला कर, मी तुझ्या बरोबर गोरखगड करेल. डील डन झाली, आणि ऑक्टोबर २७ चा शनिवारी एका दिवसात नाणेघाट मार्गे जीवधन करायचा ठरवलं. विनय ने ह्या अगोदर प्रणव बरोबर ५ ते ६ वर्षांपूर्वी हा ट्रेक केला होता. पण त्यावेळी पूर्ण पहिला नव्हता. ह्या वेळी आम्ही पूर्ण करायचा ठरवलं. तरी आम्ही बहुतेक ८० ते ९० टक्के गड पिंजून काढला. त्यात आमची मुख्य जिवाई देवीची मूर्ती पाहायची राहिली.

मुंबई ते नाणेघाट पायथा प्रवास वर्णन
पूर्ण गड पिंजायचा होता, म्हणून आम्ही लवकर निघायचा ठरवलं. मी सकाळी ४. १५ ची  सीएसमटी ते खोपोली ट्रेन, करीरोड वरून ४.३६ ला पकडली. ठरल्याप्रमाणे मी कल्याण ला ५. ४५ ला पोहचलो, पण विनयची गाडी चुकली, त्यामुळे तो पाठच्या ट्रेनने १० मि. उशिरा आला. आम्ही तसच कल्याण एसटी आगार मधून नाणेघाटला कुठची एसटी जाईल म्हणून बघू लागलो. सहाची भिवंडी - अहमदनगर आळेफाटा मार्गे लागली होती. वाहकाला मोरोशी पर्यंतची तिकीट द्या आणि  नाणेघाटला सोडा सांगतील म्हणून तयार झाला. मग ती एसटी पकडली. तरी गाडी सुटे पर्यत सव्वा सहा वाजले.

आम्ही पाऊणे आठला नाणेघाटला उतरलो. आमचा नाश्ता राहिला होता, म्हणून तिथे काही टपरी वर खाऊ असा विचार केला. पण आता पावसाळा नसल्यामुळे, तिथे कोणी येत नाही म्हणून त्या टपरी बंद होत्या. 

ट्रेकला सुरवात
आम्ही ८ वाजता आमचा ट्रेक चालू केला. नाणेघाटाच्या पायथ्याला सुधारणा केल्यामुळे,  वाटेचा जागी मातीचा मोठा रस्ता केला आहे. त्यामुळे वाट चुकण्याचा प्रश्न येत नाही. साधारण तासभरात आम्ही नाणेघाटच्या मुख्य घाटाच्या  दगडी वाटेच्या पायथ्याला पोहचलो. इथून पूर्ण तासाभराचा नागमोडी वळणाचा दगडी वाटेचा खडाचड चडून, आपण नाणेघाटाच्या माथ्यावर पोहचतो.  हा चढ चढतेवेळी, वाटेत कातळातल्या पाण्याचा टाक्या लागतात. पण त्यातले पाणी पिण्यायोग्य वाटत नव्हते. 

सकाळी ९. ४५ ला आम्ही नाणेघाटाच्या मुख्य गुहेत पोहचलो. तिथे  ५ ते १० मिनिट गुहा पाहून आणि थांबून. आम्ही पुढे चालू लागलो. तिथून अगदी ५ मिनटात आम्ही माथ्यावर पोहचलो.  माथ्यावरील अवशेष पाहून आम्ही पुढे चालू लागलो.

नाणेघाट माथ्यावरून जीवधन किल्ल्याचा ट्रेक वर्णन
साधारण १०. १५ मिनटांनी, आम्ही जीवधन किल्ल्याचा दिशेने चालू लागलो.

नाणेघाटाचा माथ्यावर पोहचल्यावर समोर एक डांबरी रस्ता जुन्नर- घाटघर मार्गे आलेला आहे. ह्या रस्त्याने गाडीने सरळ नाणेघाटाच्या माथ्यावर पोहचतो. ह्याच रस्त्याने मुंबई किंवा पुणेहून खाजगी गाडी करून आलो असता. जीवधन दोन्ही वाटेने करू शकतो.

एक वाट घाटघर मार्गे तर दुसरी वाट नाणेघाट मार्गे गडावर जाते. नाणेघाट मार्गे म्हणजेच नाणेघाटाचा पठारावरून दीड ते दोन तासात गड चढता येतो. तर घाटघर मार्गे बहुतेक दोन ते अडीच तासात गडावर पोहचता येते.

नाणेघाटाच्या माथ्यावरून, आपल्या उजव्या हाथाला जीवधन किल्ला दिसतो. सुरवातीला डांबरी रस्त्यावरून ५ ते १० मिनटं चालल्यावर, उजवीकडे एक कच्चा रस्ता जाताना दिसतो. आम्ही त्या रस्त्याने चालू लागलो. पाच मिनीटांनी डावीकडे तुम्हाला एक हॉटेल दिसेल, तिथे न जाता, उजिवाकडे सरळ रस्ता जाताना दिसतो. त्या रस्त्याने जावे, त्या रस्त्याने थोडा पुढे गेलो असता. अजून एक हॉटेल लागते. ह्या हॉटेलच्या पाठून जीवधन कडे वाट जाते. आम्ही ह्या हॉटेलच्या पाठून गेलो. 

जीवधन किल्ल्याला जायायला पठारावरती ठराविक वाट दिसत नाही. त्या साठी आम्ही त्या हॉटेल वाल्याला विचारला असता त्यानी हाताने वाट दाखवत "असा जा" म्हणून सांगितलं. सोबत त्यांनी त्याचा कुत्र्याला घेऊन जायायला सांगितलं. आणि बोलला कि हा दाखवेल तुम्हाला वाट. पण खरंच त्या कुत्र्याने आम्हाला गडाच्या पायऱ्यापर्यंत अचूक वाट दाखवली.

पठारावर जर वाट भेटली नाही, तर हे लक्षात ठेवावे. वानरलिंगी सुळका आणि जीवधन गड ह्या मधील घळच्या दिशेने चालत जावे. त्यानंतर ज्या बाजूला गडाचा टोक येतो तिथूनच वाट पायथ्याचा जंगलातून वर जाते. आम्हाला जंगलात दोन झाडावर, वाट दर्शविणारे बाणाचे चिन्ह केलेलं दिसले.

गडाच्या पायऱ्या
पायथ्याचा जंगलातून वाटेने वर चढत आम्ही १० मिनटात गडाच्या पायऱ्या जवळ पोहचतो. इथून गडाचा कातळ लागतो. पहिल्या टप्प्यातील पायऱ्या नंतर मध्ये पायऱ्या नसल्यामुळे कातळाच्या बाजूने वाट चढत, आम्ही दुसऱ्या टप्प्यातील  पायऱ्याजवळ पोहचलो. ह्या टप्प्यातील पायऱ्या गडाच्या दरवाज्या पर्यंत जातात. ह्या टप्यातील पायऱ्या तुटलेल्या आहेत. त्यामुळे जपून जायायला लागते. खास करून, दरवाजाचा बुरुजाजवळच्या पायऱ्या एकदमच तुटलेल्या आहेत. त्यामुळे येथे कातळ जास्त जपून चढायला किंवा उतरायला लागतो. त्याचा पुढे आपण लगेच दरवाजा जवळ पोहचतो. दरवाजापर्यंत पोहचायला आम्हाला १०.३५ वाजले.

दरवाजा पाहून आम्ही गडावर आलो. दरवाज्याचा बुरुजावरून उजवीकडे वाट वानरलिंगी सुळका दिसतो तिथे जाते. ह्या वाटेने ५ मिनटात तिथपर्यंत पोहचतो. आम्ही परत उतरतेवेळी वानरलिंगी पहायला गेलो.

गड पहायला  सुरवात कशी केली
आम्ही दरवाजाने वर आल्यावर, समोर गडमाथ्यावर वाट जाताना दिसते. त्या वाटेने आम्ही माथ्यावर गेलो. ह्या वाटेने जातना आपल्याला वाटेत, दोन ठिकाणी पाण्याचा टाकी लागतात. पहिली एक मोठी आडवी रुंद लागते. अजून थोडा ५ मिंनट वाटेने वर चढल्यावर, आपल्याला अजून ५ टाकी लागतात. पाच मधल्या दोन टाक्या मोठ्या आहेत. त्याचा पुढे लागून ३ छोट्या टाक्या आहेत. त्यासाठी टाकीच्या पुढंपर्यंत जावे.

ह्या वाटेने आपण गडाच्या माथ्यावर पोहचतो. इथून आपल्या  उजव्या हाथाला एक वाट गडाचा माथ्यावरील मंदिराजवळ जाते. तरी डावीकडील वाट माथ्याच्या दुसऱ्या टोकाला जाते. ह्या टोकावर अवशेष किंवा मंदिर नाही. आणि एक वाट समोर खाली जाते. हि वाट आपल्याला गडाच्या दुसऱ्या बाजूला घेऊन जाते.
गडाच्या ह्या बाजूला आपल्याला गडावरील बहुतेक वाड्याचे अवशेष, तटबंदी इत्यादी दिसतात. ह्या बाजूला जुन्नर-घाटघर मार्गे गडावर वाट येते.

गडाच्या दुसऱ्या बाजूला आढळणारे अवशेष
आम्ही समोरील वाट उतरून,आधी दुसऱ्या बाजूला गेलो. वाटेने खाली आल्यावर पाच मिनटात आपण धान्यकोठाराजवळ पोहचतो. वाटेच्या बाजूला डावीकडे धान्यकोठार लागते तर उजवीकडे पाण्याच्या टाक्यांचा समुदाय.
आम्ही पहिला पाच टाक्यांचा समूह बघायला गेलो.ते पाहून आम्ही धान्यकोठार कडे गेलो. 

कोठार आतील भाग कातळात कोरलेला आहे. तर  त्याचा बाहेरील भाग दगडाने बांधकाम करून बांधलेला आहे.
कोठाराच्या आतील दरवाज्यावर गजलक्ष्मी कोरलेली आहे. आत वाड्यासारखे चार खांब आहे. कमानीसारखे  त्याचा वरती छताला पुष्पाची नक्षी आहे. हे सगळं काम दगडात केलेलं आहे. त्याचा पुढे २ मोठ्या कातळातल्या खोल्या लागतात. ह्या खोल्या आत मध्ये प्रशस्त आहे. त्याचाच बाजूला एक छोटी खोली लागते. अशे एकूण मिळून तीन खोल्या लागतात.  कोठार आतून नीट बघण्यासाठी बॅटरी घेऊन जावी.
एक वाजला होता, म्हणून कोठार बघून आम्ही तिथेच जेवून घेतला आणि पुढे चालू लागलो.
कोठारचा समोर वाट खाली जाते. ह्या वाटेने आम्ही खाली उतरून पहिला डावी कडे तटबंदीकडे गेलो.

तटबंदी कडे जाताना आढळणारे अवशेष
ह्या वाटेने आम्हाला वाटते बऱ्याच घराच्या जोत्याचे दगडी अवशेष लागतात. तसेच एक टाकी लागते. थोड्याच वेळात आम्ही तटबंदी जवळ पोहचलो.  सुरवातीला एक छोटी तटबंदी लागते साधारण १० ते १५ मीटर लांबीची.   हि तटबंदी बुरजासारखी आहे किंवा बुरुजच वाटतो. ह्या तटबंदीच्या बाजूने वाट पुढे जाते. दोन-चार मिनटं पुढे गेलो असता, आपल्याला अजून एक तटबंदी लागते. साधारण ४ फूट उंच आणि साधारण २०ते २५ मीटर लांब असेल. नीट पाहिल असता, असा अंदाज येतो कि मधली तटबंदी तुटली असावी.त्यामुळे ह्या दोन तटबंदी फट पडून वेगळ्या झाल्या असाव्यात.  तटबंदीच्या बाजूने पुढे गेलो असता, पुढून तटबंदीचा बाहेरील भाग दिसतो. अजून इतर कुठे आम्हाला तटबंदी दिसली नाही. तटबंदीच्या पुढे एके ठिकाणी, एक बुरुज खाली बांधलेला दिसतो, त्यासाठी खाली उतरायला कोरलेल्या पायऱ्या हि दिसतात. पण पायऱ्या झिजलेल्या दिसतात त्यामुळे उतरू शकत नाही.
  
आम्ही वेळ कमी असल्यामुळे जास्त पुढे न जाता. तटबंदीच्या थोडा पुढे जाऊन चौथऱ्याचे अवशेषश बघून पुन्हा पाठी फिरलो. आणि दुसऱ्या बाजूला जिथून गडावर जुन्नर मार्गे दुसरी वाट येते. ते बघायला गेलो.

या बाजूला आम्हाला उजव्या बाजूला वाटेचा वर एक पडक्या वाड्याचे अवशेष दिसतात. ह्या वाड्याचा बाजूने  वाट धान्यकोठाराजवळ जाते. त्यामुळे परत येतेवेळी हा वाडा बघून पुढे जाऊ शकता. पण आम्ही हा वाडा  बघून पुन्हा खाली वाटेला येऊन. पुढे वाटेचा डावीकडे छोट्या वाड्याचे किंवा घराचे अवशेष लागतात. आणि तशीच वाट वाड्याचा बाजूने खाली जाताना किंवा येताना दिसते. हि वाट जुन्नर-घाटघर मार्गे गडावर येते.

वाड्याचा पुढे थोडा खाली गेलो असता आपल्याला कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात.  ह्या पायऱ्या पूर्ण खाल पर्यंत गेल्या आहेत. सुरुवातीला पायर्यांजवळ पोहचले असता आपल्याला वरून बुरुज दिसतो. आम्ही पायऱ्या उतरून खाली बुरुजावर गेलो. बुरुजाच्या बाजूने पायऱ्या खाली जातात.  पुढे थोडा अजून खाली उतरलो असतात आपल्याला तुटलेल्या दरवाजाचे अवशेष दिसतात. दरवाजा पूर्ण उध्वस्त झालेला आहे. पण दरवाज्याचा बाजूची कमानीचा अगदी थोडा भाग दिसतो. त्यावरून कळून येतो येथे दरवाजा असणार. दरवाजा जवळ आपल्याला  खांबटाकी दिसते. हि टाकी बुरुजावरून लगेच दिसते. पायऱ्या अजून खाल पर्यंत जात होत्या. आणि आम्हाला परत फिरायचा होता. म्हणून आम्ही जास्त खाली न जातात दरवाजा जवळून, पुन्हा पाठी फिरून गडावर आलो.
आणि पुन्हा धान्यकोठाराचा बाजूला माथ्यावरून जी वाट खाली आली होती, त्या वाटेने पुन्हा माथ्यावर गेलो. आणि
माथ्यावरील मंदिराजवळ गेलो. हे मंदिर जिवाई  देवीचे नाही. आमची जिवाई देवीची मूर्ती शोधण्याचे राहून गेले.

सर्वोच्च माथ्यावरील मंदिर
मंदिर पूर्णपणे उध्वस्त झालेलं बिना छपराच आहे. मंदिराच्या बाजूला दगडाने २ फुट उंच भिंत रचून ठेवली आहे., मंदिरात आत मूर्ती आहे. देवीचा दर्शन घेऊन, आम्ही मंदिराचा पाठी गेलो. तिथे तुटलेले दगडी खांब दिसतात. कदाचित मंदिरचा प्रवेश द्वाराचे खांब असावेत. येथे गवत जास्त असल्यामुळे, येथून कुठे वाट पुढे खाली जाते का. आम्ही शोधला नाही. आम्ही आलो त्या वाटेने पाठी फिरून गड उतरायला केली.

परतीचा  प्रवास
अडीच  वाजता आम्ही दरवाजा पासून गड उतरायला सुरवात केली. पावणे चार वाजता नाणेघाटाचा माथ्यावर पोहचलो. तिथे हॉटेल मध्ये लिंबू पाणी पिऊन.  नाणेघाट उतरायला सुरवात केली.  पाऊणे सहाला आम्ही रस्त्याला पोहचलो. जातेवेळी रस्त्याला एकही एसटी किंवा गाडी थांबत नव्हती. शेवटी आम्ही चालायला सुरवात केली, २ ते २.५ किमी चालल्यावर वैशाखारे गावाचा फाट्यावर एक रिक्षा वाला भेटला. त्याला शंभर रुपये देऊन, आम्ही पुढील ३किमी अंतरावरील टोकावडे स्टॅन्डला गेलो. तिथे रिक्षावाल्याने जिथे एसटी जेवायला थांबतात तिथे सोडला. तिकडून आम्हाला कल्याण एसटी भेटली. आणि आम्ही ९ ला कल्याणला पोहचलो.


जीवधन ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  

 
फोटोत अवशेष आणि तटबंदी वर्तुळ करून दाखवले आहेत. आणि त्याला धान्यकोठार साठी वाट कशी जाते. ते हि लाल रेषेने दाखवले आहे.
पहिली तटबंदी

दुसरी तटबंदीचा पुढे गेलो असता. तटबंदीचा बाहेरील भाग दिसतो.

तटबंदीच्या खाली असलेला बुरुज आणि त्याच्या कातळातल्या पायऱ्या दिसत आहेत.

दरवाजा कडून माथ्यावर येताना. वाटेत टाक्या लागतात. त्याचे वरून काढलेला फोटो.

जुन्नर मार्गे येणारी वाटेचा दरवाजा कडील  बुरुज आणि पायऱ्या. आणि खाली बुरुजाचा जवळ समोर असलेली खांबटाकी


जुन्नर वाटेच्या दरवाजाचे अवशेष
नाणेघाट वाटे लागणारा  दरवाजा

जीवधन ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा