Saturday, 8 August 2020

Ancient Karnatak - Last Part 6 Galganath's Galgeshwar, Haralahalli's Someshvara temple and Choudayyadanapur's Mukteshwara Temple

प्राचीन कर्नाटक - अंतिम भाग

गालगनाथचा गलगेश्वर मंदिर, हरलाहल्लीचे सोमेश्वरा मंदिर आणि चौडाय्यदनापूरचे मुक्तेश्वरा मंदिर


दुसऱ्या दिवशी म्हणजेच १८ फेब्रुवारीला आमची दुपारी १२.५५ ला हवेरी वरून मुंबईसाठी ट्रेन होती. त्या वेळेत आमची गालगनाथचे गलगेश्वर मंदिर करायची योजना होती. त्यासाठी आम्ही आदल्यादिवशीच बसची माहिती काडून ठेवली होती.

गालगनाथचा प्रवास वर्णन
गालगनाथ गावासाठी हवेरी वरून थेट बस नाही. त्यासाठी गुट्टलला उतरायला लागते. तेथून पुढे गुट्टल ते गालगनाथ बस पकडायला लागते. ह्या बसेस ठराविक वेळेत आहेत.

आम्ही सकाळी पाऊणे सहा किंवा सहाची रायदुर्गमची बस पकडली. तुम्ही हरपणहल्ली किंवा गुट्टल वरून जाणारी कोणतीही बस पण पकडू शकता. 

हवेरी ते गालगनाथ एकूण अंतर अंदाजे ४० किमी आहे. हवेरी ते गुट्टल अंतर २७ किमी आहे, त्यासाठी बसने आमचे ९० रुपये घेतले. आम्हाला अर्धा तास लागला आणि गुट्टल ते गालगनाथ अंतर अंदाजे १४ किमी आहे.

साधारण ६.४० पर्यंत आम्ही गुट्टलला पोहचलो आणि पहिले बस बद्दल विचारले. आम्हाला कळले गालगनाथ बस १०.३० ची होती. तोपर्यंत आम्हाला काही शेअर रिक्षा/जीप भेटतात का ते पाहू लागलो. आम्ही नाश्ता करून, थोडावेळ विचारपूस केली. तर कळाले इथे गावात शेअर जीप किंवा रिक्षा चालत नाही. खाजगी रिक्षा करून जायला लागते. इथे फक्त बसच चालतात त्यामुळे बसला गर्दी पण खूप असते.

मग आम्ही एकवेळचे २०० रुपये देऊन खाजगी रिक्षा करून गेलो. आम्ही २० मिनिटात तिथे पोहचलो. येते वेळी साडेदहाची बस पुन्हा फिरून गुट्टलला येईल त्यांनी येण्याचा विचार केला होता.

पण वाटेत रिक्षावाल्याने सांगितले इथे अजून दोन प्राचीन मंदिर आहेत. मग आम्ही त्याच्याशी बोलून त्याला आम्हाला बाकीचे दोन मंदिरे पण दाखवायला सांगितली.  त्यासाठी आम्ही त्याला एकूण ६०० रुपये दिले.  त्यात त्यांनी आम्हाला गुट्टल बस स्थानक पासून तिन्ही मंदिरे दाखवून पुन्हा गुट्टल बस स्थानकात सोडले. अंदाजे एकूण ४०किमी अंतर झाले. 

गालगनाथचे गलगेश्वर मंदिर  (Galaganath)
मंदिर वर्णन :
आम्ही पाऊणे आठ वाजता गालगनाथ मंदिरात पोहोचलो. अजून पर्यंत पाहिलेल्या मंदिराहून एकदम वेगळेच आहे.
मंदिराच्या कळसाचा खालील भाग पिरॅमिड सारखा वाटतो.  मंदिराचा गर्भ गाभारा बहुतेक बंद ठेवत असावे, हे गर्भ गृहाचा चौकट वर केलेल्या दरवाजा वरून वाटते. पुजारी फक्त पूजा करण्याकरता उघडत असावा. आम्ही गेलो तेव्हा पुजारी पूजा करायला आला होता.  त्यामुळे आम्हाला गर्भ गृहात जाता आले. 

मंदिर शिवाचेआहे. गर्भ गाभाऱ्याच्या बाहेर आपल्याला गणपती, दुर्गामाता, सूर्यदेव आणि विष्णूची मूर्ती दिसतात. तसेच आत गाभाऱ्यात अजून ही काही मूर्ती आहेत आणि मंडपात शिलालेख आहे.

 मंदिर तुंगभद्रा नदीच्या काठावर असल्यामुळे, मंदिराच्या समोर तुंगभद्रा नदीचे सुंदर दृश्य दिसते. मंदिराच्या बाजूला अजून एक खोली आहे, त्यात पण काही मुर्त्या आहेत. तुम्ही त्या पुजाऱ्याला सांगितलात तर तो दार उघडून दाखवतो. मंदिराच्या दुसऱ्या बाजूला दरवाजाची चौकट दिसते. ती चौकट बघून मला असे वाटले, त्यावेळी बहुतके हा इथे मुख्य दार असावे.  त्याच्या काही दगडावर शिलालेख ही दिसतात. 

मंदिर बघून आम्ही पुढील दोन मंदिरे बघायला निघालो. ह्या मंदिरात ही आतून फोटो काढायला देत नाही.

गलगनाथ मंदिर

 

हरलाहल्लीचे सोमेश्वरा मंदिर:
गलगनाथ पासून साधारण १० किमी अंतरावर हरलाहल्लीचे सोमेश्वरा मंदिर आहे. पुरातत्व विभागाचा कर्मचारीने   आम्हाला आतून फोटो काडून दिले नाही,  त्यामुळे मंदिराचे फक्त बाहेरूनच  फोटो काडले. त्या कर्मचारीने वहीवर आमचे नाव नोंदून घेतले. आणि आम्ही निघालो. 

सोमेश्वरा मंदिर

 

चौडाय्यदनापूरचे मुक्तेश्वरा मंदिर
सोमेश्वरा मंदिर बघून आम्ही पुढे सहा किमीवर असलेले, चौडाय्यदनापूरचे मुक्तेश्वरा मंदिर बघायला गेलो. गालगनाथ ते मुक्तेश्वर मंदिर १६ किमी आहे. ह्या मंदिरात पुरातत्त्व विभागाचा कोणी कर्मचारी देखभाली साठी नव्हता, त्यामुळे इथे आम्हाला फोटो काढायला कोणी अडवले नाही.

मंदिराच्या समोर नवीन मंदिरपण ह्या मंदिराचा मुख्य गाभाराचा भाग प्राचीन वाटतो. तिथे काही पूजा चालू होती म्हणून आम्ही तिथे गेलो नाही (ह्याचा फोटो खाली टाकला आहे).ह्या मंदिराचा बाजूला अजून एक नवीन मंदिर आहे त्यात अष्टदिगपाल देवाच्या लहान मुर्त्या ठेवल्या आहेत. मंदिर बघून आम्ही पुन्हा गुट्टल बस स्थानकाला आलो. ह्या मंदिरापासून गुट्टल बस स्थानक ९ ते १० किमी वर आहे.

मुक्तेश्वरा मंदिर, आणि उजवीकडे खाली कोपऱ्यात त्या समोर असलेले मंदिर त्याचा मुख्य गाभाऱ्याच्या भाग प्राचीन वाटतो.  


हवेरीसाठी परतीचा प्रवास:
हवेरीसाठी १०.३० ची बस होती, पण बस पाऊणे अकराला आली. इथे बसला खूप गर्दी असते, आम्ही घुसल्याने बसायला भेटले. गुट्टल स्थानका बाहेरून मेटॅडोर सारख्या जुन्या मिनी बस पण हवेरीसाठी जातात. पण त्या चोंदून भरेपर्यंत जात नाही. त्यामुळे बसचा प्रवास बरा पडतो. बारापर्यंत आम्ही हवेरीला पोहचलो.

हवेरीवरून आमची १२.५५ ची मुंबईसाठी ट्रेन होती. अशा प्रकारे आमचा कर्नाटक दौरा पूर्ण झाला. ह्या दौऱ्यासाठी आमच्या तिघांना एकूण १७,६०७ रुपये खर्च आला. आमच्या रेल्वे तिकीटचा खर्च वैयक्तिक होता.


 खाली प्राचीन कर्नाटक भाग १ ची दुआ/साखळी दिली आहे. 

Ancient Karnataka - 5, Balligavi's Kedareshwara, Tripurantakeshwara,Bherundeshvar and others, Also Haveri's Siddeshwara Temple

प्राचीन कर्नाटक - ५

शिरालाकोप्पा, बल्लीगाविचे केदारेश्वरा, त्रिपुरांतकेश्वरा, भेरुंडेश्वर (गंडभारुडंच) आणि इतर तीन मंदिरे , तसेच हवेरीचे सिध्देश्वरा मंदिर



१७ फेब्रुवारीला आम्ही बल्लीगावी मधील केदारेश्वरा मंदिर, त्रिपुरांतकेश्वर मंदिर, भेरुंडेश्वर (गंडभारुडंचे) मंदिर आणि तेथील तीन-चार मंदिरे पाहणार होतो. ते पाहून नंतर हावेरीला जाऊन सिद्धेश्वरा मंदिर पहायचे होते. हवेरी वरून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही मुंबईला निघणार होतो.


शिरलाकोप्पा (Shiralakoppa)

प्रवास वर्णन
आम्हाला उद्या म्हणजेच १७ फेब्रुवारीला बल्लीगावीचे केदारेश्वरा आणि त्या गावातील अजून काही प्राचीन मंदिरे पाहून, दुपारी पुन्हा हवेरीला जायचे होते. त्यासाठी आम्ही शिरालाकोप्पाची बस पाहू लागलो.

सिरसीवरून शिरालाकोप्पासाठी साडेसातची बस होती आमच्या कडे अजून एक तास होता. ह्या बसने आम्हाला पुढे पोहचायला वेळ लागला असता म्हणून आम्ही सध्या कुठली दुसरी बस आहे का ते पाहू लागलो. मग सागरने सांगितल्या प्रमाणे अनावट्टी (Anavatti) ची बस लागली होती. ती पकडून, तेथून पुढे शिरालाकोप्पासाठी बस बदलून गेलो. अनावट्टी हे महामार्गावरच आहे त्यामुळे इथून बस मिळतात.

सिरसी-बनावासी-सोराबा (Sorba) ते शिरालाकोप्पा अंतर ६५ किमी आहे. पण सिरसी-बनावासी-होसूर- अनावट्टी अंतर ४८किमी आहे, बसने आमचे १२०रुपये भाडे घेतले आणि अनावट्टी ते शिरालाकोप्पा अंतर २५ किमी असून ९०रु भाडे झाले, असे एकूण ७४ किमी अंतर आहे.

आमची बस बनावासी वरून पुढे बहुतेक होसूर (Hosur) गावावरून गेली. आम्हाला ह्या प्रवासाला एक तास वीस मिनटे लागली. पाऊणे आठला आम्ही अनावट्टीला पोहचलो.

अनावट्टीवरून खाजगी बसच चालतात. बस स्थानकावर बाजूलाच खाजगी बस लागलेल्या असतात. अनावट्टी वरून अर्ध्यातासात आम्ही शिरालाकोप्पाला पोहचलो.

हॉटेलचा शोध:
शिरालाकोप्प्पाला राहण्यासाठी मोजून फक्त चार ते पाच हॉटेल आहेत आणि एकाही ऑनलाईन ऍप वरती येथील हॉटेल दिसणार नाही आणि जवळपासच्या गावात एक ही हॉटेल नाही. जेवढे होते तेवढे सगळेच हॉटेल भरलेले होते. आमचा एक तास हॉटेल शोधण्यातच गेला. एक हॉटेल होते पण एकदमच साधे आणि आत घुमटल्यासारखा होत होते म्हणून आम्ही तिथे नाही राहिलो. मग शेवटी एक हॉटेल भेटला त्यांनी ६५०रु चोवीस तासाचे घेतले. हे हॉटेल सुद्धा साधेच होते, पण त्यापेक्षा थोडा बरा वाटले. बहुतेक इथे जेवढे हॉटेल्स आहेत ते सगळे असेच आहेत.

केदारेश्वरा मंदिर:
सकाळी सात वाजता आम्ही नाश्ता करून बल्लीगावीचे केदारेश्वरा मंदिर बघण्यासाठी चालत निघालो. शिरालाकोप्पा वरून बल्लीगावी अडीच किमी आहे, पण केदारेश्वरा मंदिर गावाच्या अर्धा किमी बाहेर महामार्गावरच आहे. मंदिर शिरालाकोप्पावरून २ किमी वर असल्यामूळे आम्ही चालत निघालो. बल्लीगावातून सुद्धा बस जातात पण त्या ठराविक असाव्यात.

मंदिर वर्णन
चालत गेल्यामुळे आम्हाला मंदिराच्या थोडे जवळ महामार्गावर एक छोटी वीरगळ दिसली, ती पाहून आम्ही मंदिराजवळ पोहचलो. हे मंदिर ११ ते १२ शतकातील शिवाचे मंदिर आहे. मंदिर परिसरातच संग्रहालय केले आहे. त्यात काही मुर्त्या ठेवल्या आहेत. केदारेश्वरचे मंदिर बघून आम्ही गावातील मंदिर बघायला गेलो.

बल्लीगावी मंदिरात चार पाच प्राचीन मंदिर आहे. तसेच गावात वीरभद्रेश्वराचे सध्याच्या काळातील मंदिर आहे, पण त्यातील मुख्य मूर्ती विरभद्रेश्र्वराची आणि चार-पाच मूर्ती प्राचीन आहेत. गावात सगळ्यात मुख्य मंदिर त्रिपुराणतेकेश्वराचे आहे.
केदारेश्वरा  मंदिर

त्रिपुरांतकेश्वरा मंदिर:
गावात आम्ही पहिले तेच मंदिर बघायला गेलो. हे मंदिर १० व्या शतकातील असून चालुक्याच्या राजवटीतील आहे. ह्या मंदिराच्या बाहेरील भिंतीवर, खालच्या बाजूला आपल्याला पंचतत्त्वाच्या पुरातन गोष्टी तसेच काही काम शिल्पे, असे लहान शिल्पे आहेत. आम्ही गेलो तेव्हा मंदिर बंद होते. पण तेथे पुरातत्व विभागाचा कर्मचारी असतो, त्यांनी आम्हाला मंदिराचा गर्भगृहचा दरवाजा उघडून दिला. ह्या मंदिरात फोटो काढायला काही बंदी नाही, फक्त विडिओ काढायला देत नाही. मंदिराच्या आत मोठा नंदी आहे. तसेच आतून ही मंदिरात सुंदर नक्षी काम दिसते.

त्रिपुरांतकेश्वरा मंदिर
 
सोमेश्वरा मंदिर:
ते मंदिर बघून भेरुंडेश्वर मंदिर बघायला गेलो. वाटेतच सोमेश्वर मंदिर लागते, पहिले ते बघायला गेलो. हे मंदिर प्राचीन पण साधं आहे. शिल्पाने नटलेलं नाही आणि मंदिर बंद सुद्धा होते, त्यामुळे आम्ही पाच मिनिटात निघालो.
 
सोमेश्वर मंदिर
 
 वीरभद्रेश्वराचे मंदिर:
सोमेश्वर मंदिराच्या बाजूलाच काही अंतरावर मुख्य रस्त्याला वीरभद्रेश्वराचे मंदिर आहे. मंदिर सध्याच्या काळातील आहे. त्यामुळे लगेच कळत नाही. तरी पण आम्ही मंदिरात बाहेरून डोकावले असता काही प्राचीन मूर्ती दिसल्या म्हणून आम्ही बघायला गेलो. आत गेल्यावर आम्हाला कळलं मंदिरातील वीरभद्रेश्वराची मुख्य मूर्ती प्राचीन आहे. तसेच बाहेर शिवाची पंच मुखी आसनस्थ मूर्ती आहे, सप्तमातृका पट, नंदी आहे.
वीरभद्रेश्वर मंदिर

 
भेरुंडेश्वर मंदिर:
सोमेश्वर मंदिराच्या पुढे गंडभेरूंड मूर्तीचे भेरुंडेश्वर मंदिर आहे. गंडभेरुंड म्हैसूरच्या वोडीयार राजवटीचे चिन्ह होते. गंडभेरूंडची मूर्ती हि मनुष्याच्या धडावर दोन पक्षाचे चेहरे असलेली असते, त्यांच्याबाबत एक पौराणिक गोष्ट प्रचलित आहे.
हे मंदिर म्हणजे लहानश्या देवडी सारखे आहे आणि त्याच्या वरती स्तंभ आहे, मंदिर हे १० ते १२ फूट उंचीवर आहे आणि त्याला जाळीचा लोखंडी दरवाजा असल्यामुळे मूर्तीचा नीट फोटो काढता येत नव्हता.


भेरुंडेश्वर मंदिर

ईश्वरा मंदिर:
भारुंडेश्वर मंदिरच्या समोर एक गल्ली जाते तिथे ईश्वरा मंदिर आहे, इथे तीन छोटी छोटी आणि साधी प्राचीन मंदिर आहेत. मंदिर बंदच होते. त्यामुळे आम्ही पाच मिनिटात तिथून निघालो.


गावात आपल्याला बऱ्याच ठिकाणी मंदिराचे अवशेष पडलेले दिसतात. एवढेच काय रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारावर लोकांनी त्या दगडाचा रस्त्यासाठी वापर केलेला दिसतो.
ह्या मंदिराचा बाजूला अजून एक असच लहान मंदिर आहे. ह्या दोन मंदिरा समोर गवतात  एक  प्राचीन उध्वस्त मंदिर आहे. त्याचे फक्त सभा मंडपाचे काही खांब आहेत.


हवेरी साठी प्रवास:
सगळी मंदिर बघून आम्ही शिरालाकोप्पावरून अंदाजे पाऊणे बारा वाजता हवेरी साठी निघालो. बल्लीगावी वरून शिरलाकोप्पाला जाताना, आम्ही ३०रुपये देऊन रिक्षाने गेलो.

प्रवास वर्णन:
हवेरी साठी आम्हाला थेट बस भेटली नाही म्हणून मग आम्हाला चिक्केरूर वरून बस बदलून जायला लागले.
शिरालाकोप्पा ते हवेरी, चिक्केरूर मार्गे ६२.३ किमी अंतर आहे. शिरालकोप्पा ते चिक्केरूर (खाजगी बस चालतात) २३ किमी अंतर होते, त्यासाठी तिघांचे ८४ रुपये घेतले आणि चिक्केरूर ते हवेरी (इथून KSRTC Bus) अंतर अंदाजे ३७ ते ३९ किमी होते त्यासाठी बसचे ९९ रुपये झाले. शिरालाकोप्पा ते चिक्केरूरमार्गे जाताना आम्हाला एका गावात लहान होयसळा पद्धतीचे प्राचीन मंदिर दिसले. पण बस मध्ये असल्यामुळे आम्ही उतरू शकलो नाही.

चिक्केरूर पर्यंत बसने आम्हाला ३० ते ४० मिनिटे लागली. चिक्केरूरला आम्हाला अर्धा तासात बस भेटली आणि चिक्केरूर ते हवेरी सव्वा तास लागला. आम्ही दुपारी २ ते २.३० च्यादरम्यान हवेरीला पोहचलो.

हवेरी गजबजलेले शहर असल्यामुळे, आम्हाला ६०० रुपयात चांगले हॉटेल मिळाले. बस स्थानकाच्या समोरच हॉटेल मिळाल्यामुळे, आम्हाला सकाळी उठून बस पकडायला बर पडले. सामान ठेवून, जेवण वगैरे करून, साडेचारला सिद्वेश्वरा मंदिर बघायला गेलो.

सिद्वेश्वरा मंदिर:
बस स्थानकापासून मंदिर साधारण दिड किमी वर असल्यामुळे आम्ही चालतच गेलो. पाच वाजता आम्ही मंदिराजवळ पोहचलो. हे मंदिर साधारण ११ ते १२ व्या शतकातील, चालुक्य राजवटीतील शिवाचचे मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर प्रदक्षिणा मारते वेळी, आपल्याला सुरसुंदरी, शिवाच्या एकदम ठराविकच शिल्पे दिसतात. मंदिराच्या आत फोटो काढायला देत नाही अगदी मोबाइलने पण नाही. मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला उग्र नरसिंहाचे मंदिर आहे. त्यात अजून २-४ मुर्त्या आहेत, त्यांचे ही फोटो काढायला देत नाही.

मंदिर परिसरात काही वीरगळी आणि शिलालेख ही ठेवलेले आहेत. सगळे बघून आम्ही मंदिर बंद करायच्या वेळी निघालो.
सिद्धेश्वर मंदिर


 
आजचा आमचा दिवस असा योजनाबद्ध झाला. दुसऱ्या दिवशी आमची मुंबईसाठी दुपारी १२.५५ची गाडी होती. पण त्या आधी आम्ही सकाळी गलागनाथ आणि त्याचा आसपासची हरलहल्लीचे सोमेश्वर मंदिर आणि चौडिय्यादिंकरचे मुक्तेश्वर मंदिर पाहणार होतो. त्याबद्दल मी ह्या च्या पुढील अंतिम भागात लिहले आहे.त्याची दुआ / साखळी मी खाली दिली आहे. 
 
 https://kunalstrek.blogspot.com/2020/08/ancient-karnatak-last-part-6-galganaths.html
 
 
 

 खाली प्राचीन कर्नाटक भाग १ ची दुआ/साखळी दिली आहे. 

Thursday, 6 August 2020

प्राचीन कर्नाटक - ४ गंजगट्टीचा अष्टदिगपाल चौकट , हंगलचे तारकेश्वर मंदिर आणि सिरसीचा सहस्रलिंग

प्राचीन कर्नाटक - ४

गंजगट्टीचा अष्टदिगपाल चौकट , हंगलचे तारकेश्वर मंदिर आणि सिरसीचा सहस्रलिंग


तिपटूर वरून हुबळीसाठी रात्री ११.३० ची ट्रेन होती. त्या ट्रेनने आम्ही १६ फेब्रुवारीला सकाळी ५.३० ला हुबळीला पोहचलो. ह्या आजच्या दिवसात आम्ही गंजीगट्टीची (Ganjigatti) (शिग्गाव (Shiggaon) जवळील) अष्टदिगपाल चौकट, तेथून आम्ही सिरसीचा (Sirsi) सहस्रलिंग आणि बनावासीचा (Banavasi) मधुकेश्वरा मंदिर पाहून वस्तीला शिराळकोप्पाला जाणार होते. वेळे अभावी आमचे बनावासीचा मंदिर राहून गेले.

गंजगट्टीचा अष्टदिगपाल चौकट:
प्रवास वर्णन
१६ फेब्रुवारीला आम्ही सकाळी ५.३० ला हुबळीला पोहचलो. योजने नुसार आम्हाला शिग्गाव (shiggaon) येथील गंजीगट्टीला जायचा होते. (विशेष सूचना: गंजीगट्टी गुगलमॅपवर शोधले असता हुबळी जवळील अजून एक गंजीगट्टी दाखवते. त्यामुळे शिग्गाव शोधून तेथील गंजीगट्टी शोधायला लागते). आम्ही रेल्वे स्थानकवरून रिक्षाला ९० रुपये भाडे देऊन, हुबळी बस आगार मध्ये पोहचलो. तिथून आम्हाला सकाळी ६ ची बंगळुरूला जाणारी बस भेटली. त्यांनी आम्ही शिग्गाव (Shiggaon) उतरलो. हुबळी ते शिगाव अंतर ४४ किमी आहे आणि शिग्गाव ते गंजीगट्टी अंतर ४ किमी आहे. आम्ही तासाभरात शिग्गावला पोहचलो.

नाश्ता करून आम्ही गंजीगट्टीच्या अष्टदिगपाल दगडी चौकट पहायला गेलो. त्यासाठी आम्ही फक्त जाण्याकरता १५० रुपयेने रिक्षा केली. रिक्षावाल्याला श्री गंजीगट्टेशा हनुमंता मंदिराजवळ सोडायला सांगायचे. गुगल मॅप चालू ठेवलात तर लगेच मिळेल.

मंदिर वर्णन:

आठ वाजता आम्ही मंदिरात पोहचलो. मंदिर आणि त्यातील देव प्राचीन नाही. पण मंदिराच्या समोर इथे १० फूट रुंद आणि १० फूट लांब प्राचीन दगडी चौकट आहे. ही चौकट मंदिराच्या आतील छतावर असते. बहुतेक कुठल्या तरी मंदिरातील आणून ठेवली असावी. त्या मंदिराच्या मागे त्याच परिसरात, महादेवाचे मुख असलेली पिंड आहे. ती प्राचीन आहे कि नाही माहित नाही, ते बघून आम्ही तिथून निघालो.

जाते वेळी आम्हाला शेअर रिक्षा मिळाली त्यामुळे आम्ही तिघे ३० रुपयात आलो. रिक्षाने आम्हाला बस आगाराच्या मागे पाच मिनिटे अंतरावर असलेल्या आतील रस्त्याला कर्नाटक ग्रामीण विकास बँक/शिग्गाव टॅक्सी स्टॅन्ड जवळ सोडले. बहुतेक इथून शेअर रिक्षा भेटत असणार, मी त्या रिक्षावाल्याला विचारले, त्यांनी कुठले तरी गावाचे नाव सांगितले पण मला समजले नाही. आम्ही स्टॅन्डपासून गल्लीतून चालत सरळ पाच मिनिटात बस आगार जवळ पोहचलो.

अष्टदिगपाल चौकट


हंगलचे तारकेश्वर मंदिर
प्रवास वर्णन:
शिग्गाव वरून आम्हाला हंगलला जायचे होते. शिग्गाव वरून हंगल ३४ किमी आहे. पण आम्हाला हंगल साठी थेठ बस भेटली नाही, म्हणून आम्ही हवेरीला जाऊन तेथून हंगल साठी बस पकडली. हवेरी मोठं शहर असल्यामुळे, आम्हाला हवेरीसाठी आणि तिथून हंगल साठी लगेच बस मिळाली. त्यामुळे आम्ही दीड ते पाऊणे दोन तासात पोहचलो. ११ ते सव्वा अकरापर्यंत आम्ही हंगलला पोहचलो. 

शिग्गाव ते हवेरी ३१.७ किमी आहे आणि हवेरी ते हंगल अंतर ३७.४ किमी आहे. शिग्गाव ते हवेरी तिघांचे १२३रु आणि हवेरी ते हंगल १०५रु बस भाडे झाले.

तारकेश्र्वरा मंदिर वर्णन:
तारकेश्वरा मंदिर हे बस आगार पासून १ ते दीड किमी अंतरावर आहे. चालत १५ मिनिटे लागतात.
हे मंदिर १० ते १२ शतकामध्ये बांधले आहे. मंदिर शिवाचे आहे, मंदिराचे काम बघायला खूपच सुंदर वाटते. विशेष करून मंदिराच्या मधील मंडप आतून तसेच छताला सुंदर कमळासारखी नक्षी आहे आणि खांबाच्यावर अष्टदिगपाल आहे. मंदिरात अजून ही काही प्राचीन मूर्ती एका बाजूला ठेवलेल्या आहेत. तसेच मंदिराच्या बाजूला गणपतीचे मंदिर आहे, पण त्याची प्राचीन मूर्ती बाहेरील झाडावर ठेवलेली आहे आणि मंदिरातील मुर्ती बहुतेक सध्याच्या शतकातील आहे.

कदंबा राजवटीचे मंदिर
हंगल ही कदंबा राजवटीची राजधानी होती, त्यामुळे इथे त्यांच्या राजवटीतील बिल्लेश्वराचे लहान मंदिर आहे. बिल्लेश्वराचे मंदिर गाडीतून येता-जाता झाडीत दिसते. तसेच एक वीरभद्रेश्वराचे पण प्राचीन छोटा मंदिर आहे. बहुतेक हे कदंबा राजवटीतील नाही. पण ही दोन्ही मंदिर लांब असल्यामुळे, आम्ही गेलो नाही. आणि इथे जाण्यासाठी रस्ता कसा आहे तेही आम्हाला माहीत नव्हते. त्यात आम्हाला अजून पुढे ही बसने जायचे होते, म्हणून आम्ही तिथे गेलो नाही. खाजगी गाडी असती तर नक्की बघायला गेलो असतो.

तारकेश्वर मंदिर


सरसीचे सहस्त्रलिंग
हंगल ते सिरसी प्रवास वर्णन:
एक वाजता आम्ही तारकेश्वरा मंदिर बघून निघालो. आम्हाला आता सिरसीला जायचे होते, १५ ते २० मिनिटात सिरसी साठी बस मिळाली. तासाभरात आम्ही सिरसीला पोहचलो. हंगल ते सिरसी अंतर ४७ किमी आहे. हवेरीवरून सिरसीला जाणाऱ्या  बहुतेक काही गाड्या हंगलवरूनच जातात. साधारण आम्हाला दीड वाजता बस मिळाली. आम्ही अडीच वाजेपर्यंत सिरसीला पोहचलो. बस भाडे १३२ रु घेतले.

एक आवर्जून सांगावस वाटते, ह्या रस्त्याने जाताना पूर्ण हिरवळ बाजूला दिसते. त्यामुळे असा वाटत कुठे तरी घनदाट जंगलातून गाडी चालली आहे, अगदी सिरसी ते सहस्रलिंगचा रस्ता पण असाच सुंदर वाटतो. खास करून स्वतःची गाडी असेल तर गाडी चालवायला खूप आनंद येईल. गुगल मॅप बघितले तर लगेच समजेल.

सिरसी ते सहस्त्रलिंग प्रवास वर्णन:
सिरसी बसआगारापासून सहस्रलिंग १४ किमी आहे. त्यासाठी सोंडा (Sonda) गावाची बस पकडायला लागते किंवा येल्लापूरला (Yellapur) जाणारी बस पकडावी. त्यांनी सहस्रलिंगला उतरावे, जर गाडी तेथे नाही थांबली तर हुलगोल (hulgol) ला उतरावे लागते. चालत दोनच मिनिटे लागतात.

सोंडा गावाला जाणारी बस कंडक्टरला सहस्रलिंगला जाते का आधी विचारा आणि मगच बसा. कारण सोंडा गावासाठी दोन मार्गाने बस जातात, एक सिरसी - येल्लापूर रोडवरून जाते, सहस्रलिंगसाठी ह्याच मार्गावरची बस पकडायला लागते. एक बस दुसऱ्या रस्त्याने हुलेकल गावातून जाते. आम्ही नेमके ह्याच दुसऱ्या रस्त्याच्या गाडी मध्ये बसलो. बसते वेळी, आम्ही गाडीतील एका दोघांना सहस्रलिंग जाते का हिंदीत विचारले, ते हो बोलले म्हणून आम्ही बसलो, पण नंतर वाहक येऊन आम्हाला नेहमीच्या वाहकाच्या भाषेत बडबडू लागला. गाडीची चौकशी आणि चुकीची बस या सगळ्यात आमचा अर्धा पाऊण तास फुकट गेला.

नशीब वाहकाला थोडे हिंदी येत होते आणि एक आजोबांना थोडे मराठी येत होते. त्यांनी आम्हाला सांगितलले ही गाडी दुसऱ्या गावातून जाते, सहस्रलिंग वरून नाही. त्यांनी आम्हाला सिरसीच्या नवीन बस आगरला उतरवले. तिथून त्यांनी आम्हाला येल्लापूर, हलियार अश्या काही लांब पल्ल्याच्या बस पकडायला सांगितले. पण ह्या लांब पल्ल्याच्या बस सहस्रलिंगला थांबत नाही, फक्त स्थानिक गाड्या थांबतात. मग आम्ही फिरायला आलेलो आहे हे पाहून, त्यांनी आम्हाला तेथील स्थानकावरील वाहकाला सांगून लांब पल्ल्याच्या गाडीत बसवायला सांगितले.

तशी एक लांब पल्ल्याची गाडी आली. त्या वाहकाने त्या गाडीच्या वाहकाला सांगून, बसच्या त्यामार्गातील पुढच्या स्थानकाचे तिकीट देऊन आम्हाला सहस्त्रलिंगला सोडायला सांगितले. हे बघून मला नाणेघाटला जातानाची आठवण झाली.

मग त्या वाहकाने आमच्या तिघांचे ९० रुपये घेतले. त्याने अंदाजे २५-३० किमी लांब गावाचे तिकीट आम्हाला दिले. पण त्यांनी आम्हाला सहस्त्रलिंगच्या थांब्यावर सोडले. त्या बसने आम्ही १० मिनिटात तिथे पोहचलो.

मुख्य रस्त्यावरून सहस्त्रलिंग साधारण १ ते सव्वा किमी आत आहे. आम्ही चालत १५ मिनिटात गेलो कारण इथे बाहेर रस्त्याला रिक्षा वैगरे काही मिळत नाही. इथे येणारे बहुतेक सगळेच खाजगी गाडीने येतात. कारण सहस्त्र लिंग ला सरकारी बसने येणेजाणे म्हणजे खूप मुश्कील आहे. हे आमचा अनुभव वाचूनच कळेल.

(इथे बहुतेक लोकांना हिंदी समजत नाही, कारण आम्ही इथे बस आगरामध्ये चौकशी खिडकीवर ३/ ४ वेळा तिघांनी हिंदीत विचारत होतो. पण ते आम्हाला त्या जागेचे नाव ऐकून कन्नड मध्येच सांगत होते. त्यामुळे आम्हाला कळत नव्हते. तसेच आम्ही बस मध्ये एका दोघांना बस मध्ये विचारले ते ही सगळे फक्त हो म्हणून मान हलवत होते. त्यांना बहुतेक हिंदी जास्त समजत नव्हते, त्यामुळे आम्ही चुकीची बस पकडली. )

सहस्त्रलिंग वर्णन
आम्हाला इथपर्यंत पोहचेपर्यंत चार वाजले. ग्रामपंचायत प्रत्येकी पाच रुपये घेतात. इथे माकडे आहेत त्यामुळे जरा सामान जपायला लागते. नदीच्या पात्रामध्ये असंख्य शिवाची पिंड वेगवेगळ्या दगडावर कोरलेले आहेत. तसेच अनेक नंदी ही आहेत, काही नंदी मोठ्या दगडावर कोरले अथवा बनवले आहेत मध्येच एक गणपतीची मूर्तीही दिसते.
सहस्त्र म्हणजे हजार याचा अर्थ हजारलिंग बहुतेक असावा. आम्ही काही मोजायचा प्रयत्न केला नाही.
सहस्त्रलिंग बघून पुन्हा वरती वाहनतळ जवळ आलो आणि  तेथूनच दोन मिनिटांवर बहुतेक पलीकडील गावात जाण्यासाठी असलेला नदीवरील तारेचा पादचारी पुल बघायला गेलो.

पुल बघायला चांगला दिसतो पण त्यापुलावरून विशेष असा काही दिसत नाही. पण सगळे जात होते, म्हणून आम्ही ही जाऊन बघितले.

सहस्रलिंग ते सिरसी परतीचा प्रवास वर्णन:
आम्ही तेथून पाच वाजता निघालो आणि पुन्हा मुख्य रस्त्याला आलो. एका गाववाल्याने सांगितले, इथे गाडी थांबणार नाही. तसे आम्ही थोडे पुढे पाच मिनटे चालत हुलगोल स्थानकावर गेलो आणि गाडीची वाट पाहू लागलो.

दोन तीन लांब पल्ल्याच्या गाड्या गेल्या, त्या हुलगोल थांब्याला थांबत नाहीत. तरी अंदाजे पाऊण तास झाला पण बस आली नाही. मग काही वेळाने एक टेम्पो वाला चालला होता, त्याला हात केला आणि त्यांनी आम्हाला सिरसीला सोडले त्याने ही आमच्याकडे बस एवढेच ९०रु भाडे घेतले.

आम्हाला सहस्रलिंगलाच वेळ झाला होता, त्यामुळे आम्ही आमचा बनावासी चा मंदिर बघायचे टाळले आणि त्यात जाते वेळी लगेच गाडी भेटली नाही त्यामुळे तर अजूनच वेळ झाला. तरी अंदाजे ६ ते सव्वा सहाला आम्ही सिरसीला पोहचलो.



सहस्रलिंग


सिरसीवरून आम्हाला रात्री राहण्यासाठी शिरलकोप्पाला जायचे होते. कारण उद्या १७ फेब्रुवारीला आम्ही शिरलकोप्पा जवळील बेलावडी गावातील केदार आणि इतर प्राचीन मंदिरे पाहणार होतो तसेच दुपारी हवेरीला जाऊन तेथील प्राचीन मंदिरे पाहणार होतो. ह्याबद्दल मी पुढील प्राचीन कर्नाटक भाग ५ मध्ये लिहिले आहे. त्यासाठी मी खाली त्याची दुआ/साखळी दिली आहे.

https://kunalstrek.blogspot.com/2020/08/ancient-karnataka-5-balligavis.html

 

 खाली प्राचीन कर्नाटक भाग १ ची दुआ/साखळी दिली आहे. 

https://kunalstrek.blogspot.com/2020/08/ancient-karnatak-part1-lepakshi-temple.html


Ancient Karnatak- Part 3, Ariskere, Haranhalli, Turuvekere and Aralaguppe's Temple

प्राचीन कर्नाटक- भाग ३

अरसिकेरे , हरणहल्ली, तुरुवेकेरे
आणि अरलगुप्पेची मंदिरे

भाग दोन मध्ये मी हळेबिडू, बेलूर आणि दोड्डागोड्डवल्लीचा मंदिरांचे प्रवास वर्णन लिहिले. ह्या भागात त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ फेब्रुवारीला अरसिकेरेचे ईश्वरा मंदिर, हरणहल्लीचे चन्नकेशवा आणि सोमेश्वरा मंदिर, तुरुवेकेरेची श्री चन्नकेशवा, मुले शंकरेश्वरा मंदिर आणि अरलगुप्पेची चेन्नकेशवा आणि श्री कल्लेश्वराचे मंदिराच्या प्रवास वर्णन बद्दल लिहिले आहे.

ह्या मंदिरासाठी तुम्ही मुंबई वरून अरसिकेरे जंक्शन किंवा तिपटुर जंक्शनला उतरून येऊ शकता, हसन जंक्शन ला पण उतरू शकता, पण ते ८७ किमी लांब आहे. पण फक्त हि मंदिर करायची असतील तर, तिपटुर मधोमध येते त्यामुळे जास्त सोयीचे पडू शकते.

अरसिकेरे आणि हरणहल्लीचे मंदिर
अरसिकेरे प्रवास वर्णन :
दोड्डागोड्डवल्लीचे मंदिर बघून, आम्ही पुन्हा हगरेला आलो, आणि हसनला जाणारी बस पकडली. कारण आम्हाला रात्री रहायला अरसिकेरेला जायचे होते. दुसऱ्या दिवशी आम्हाला अरसिकेरे आणि हरणहल्लीची मंदिरे पहायची होती.

आम्ही हगरे वरून पण पुन्हा हळेबिडू-बाणावारा वरून अरसिकेरेला ४५ किमीचे अंतर बस बदलत जाऊ शकत होतो. पण हळेबिडू वरून आम्हाला मोजक्या आणि वेळेत बस होत्या. त्यात आमचा वेळ गेला असता आणि मुख्य म्हणजे संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. हसन हे मुख्य शहर आहे. तेथून  कर्नाटकात जाणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या अनेक गाड्या सुटतात. त्यामुळे आम्ही तेथे गेलो. तो योग्य पर्याय आम्ही निवडला. कारण आम्ही तिथे पोहचल्यावर बाजूलाच अरसिकेरेसाठी गाडी लागली होती.

हगरे ते हसन २३ किमी आणि हसन ते अरसिकेरे अंतर ४४.५ किमी, असे आम्ही ६७.५ किमीचा एकूण दोन तासाचा प्रवास केला.

अरसिकेरेला आम्हाला हॉटेल शोधायला जास्त त्रास झाला नाही. बस स्थानकाच्या बाहेरच आम्हाला हॉटेल मिळाले. कोणी तरी दुसऱ्या दिवशी लग्नासाठी तेथील ३/४ वातानुकूलित हॉटेल रूम्स आरक्षित करून ठेवल्या होत्या. तरी त्यातील एकाने (रवी रेसिडेन्सी हॉटेल) आम्ही दुपारी १ वाजेपर्यंत निघून जाऊ सांगितल्या मुळे, तिघांसाठी ९५० रुपयात एक रात्री साठी फॅमिली रम दिली, हॉटेल ही चांगले होते.

चन्नकेशवा (श्री लक्ष्मीनरसिंह स्वामी मंदिर) आणि सोमेश्वरा मंदिर हरणहल्ली
प्रवास वर्णन 
सकाळी ७ ला उठून आम्ही हरनहल्लीचे चन्नकेशवा (श्री लक्ष्मीनरसिंह स्वामी मंदिर) आणि सोमेश्वरा हे दोन प्राचीन मंदिरे बघायला गेलो. त्यासाठी अरसिकेरे वरून हसनला जाणारी किंवा त्यादिशेला जाणारी बस पकडावी. अरसिकेरे वरून हरनहल्ली अंतर ८.८ किमी आहे. बस भाडे प्रत्येकी १५ रुपये घेतले. आम्ही १० मिनिटात तेथे पोहचलो. बहुतेक इथे शेअर वडाप/ टमटम पण चालतात, कारण येतेवेळी आम्ही शेअर वडाप /टमटम रिक्षाने प्रत्येकी १० रुपयात आलो.

तिथे पोहचल्यावर आम्ही पहिली चहा पिऊन घेतली. रस्त्याला उतरल्यावर आपल्याला दोन्ही बाजूला गावात जाणारा रस्ता दिसतो. रस्त्याच्या पलीकडे चन्नकेशवा मंदिर आणि ह्या बाजूला सोमेश्वरा मंदिरकडे आहे. दोन्ही मंदिर ५ मिनिटात चालत पोहचतो.

दोन्ही मंदिरे तेराव्या शतकात होयसळा राजवटीत बांधले गेले आहेत. त्यामुळे तीच शैली आपल्याला दिसते.

चन्नकेशवा मंदिर (श्री लक्ष्मीनरसिंह स्वामी)
दोन्ही मंदिरे बंद असतात, त्यामुळे फक्त बाहेरूनच बघायला मिळतात. चन्नकेशवा (श्री लक्ष्मीनरसिंह स्वामी) मंदिर मध्ये सकाळी पुजारी पूजा करायला येतो, त्यावेळी ५ ते १० मिनिटासाठी दरवाजा उघडतो. त्यामुळे मंदिराचा आत जायला मिळते. आम्ही नेमके त्यावेळीच पोहचलो होतो, त्यामुळे आम्हाला आतील मूर्ती बघता आली. पण पुजारी आतून फोटो काढायला देत नाही, फक्त बाहेरूनच परवानगी देतो. मंदिर परिसराला बाहेरून भिंत घातली असल्यामुळे, जर बाहेरील मुख्य दरवाजा बंद असेल, तर मंदिर बाहेरून हि बघता येणार नाही. मंदिराचा दरवाजा किवा भिंतीवर वेळेचा फलक नव्हता. त्यामुळे पुजारी गेल्यानंतर मंदिर बंदच असते.

आम्हाला पुजारी बोलला मंदिर चालू असते. पण आम्ही दुसरा मंदीर बघून पुन्हा येवुन बघितले असता मंदिर बंदच होते. त्यामुळे मंदिर बघण्यासाठी पुजारीच्या वेळेत जावे अन्यथा बहुतेक तुम्हाला गावात त्याला शोधण्याची खटपट करावी लागेल. तरीपण तो भेटेल कि नाही किंवा तयार होईल कि नाही, काही सांगता येत नाही.


चन्नकेशवा मंदिर (श्री लक्ष्मीनरसिंह स्वामी)


सोमेश्वरा मंदिर
आम्ही निघालो तसे पुजारीने बाहेरील मुख्य दरवाजा बंद करून गेला आणि मग आम्ही सोमेश्वरा मंदिर पाहायला गेलो.  ह्या मंदिर परिसराला पण लोखंडी जाळीचे कुंपण आहे आणि बाहेर मुख्य द्वार. आम्ही गेलो तेव्हा दरवाजाला टाळे होते, पण बाजूला जागा होती तेथून आम्ही प्रवेश केला. हे मंदिर ASI कडून बहुतेक नीट काळजी घेत नसावे. कारण चन्नकेशवा मंदिर परिसरात जसा बाग-बगीचा केला आहे, तसे इथे दिसत नाही.
मंदिर बंद असल्यामुळे, बाहेरूनच बघून पुन्हा अरसिकेरे साठी निघालो.

सोमेश्वरा मंदिर



ईश्वरा मंदिर, अरसिकेरे
अरसिकेरेला आम्ही नाश्ता करून, ईश्वरा मंदिर बघायला गेलो. मंदिर बस आगार पासून अंदाजे १ किमीवर आहे, त्यामुळे आम्ही चालत गेलो. १५ मिनिटात आम्ही तिथे पोहचलो. ह्या मंदिराच्या सुद्धा आतील फोटो काढायला देत नाही. मंदिर परिसर ASI ने सुंदर ठेवले आहे. तसेच मंदिर परिसरात काही वीरगळ आणि शिलालेख पण ठेवले आहेत.

मंदिर बघून आम्ही पुन्हा जाते वेळी मंदिरा पासून काही अंतरावर वाटेतच, एक प्राचीन जैन मंदिर लागते ते बघायला गेलो. ह्या मंदिराला कळस नाही आहे. त्यामुळे कळून येत नाही. पण मंदिराच्या समोरच काही शिलालेख, मंदिराच्या कळसाचा भाग ठेवला आहे. त्याचा बाजूलाच विष्णूची एक प्राचीन ३/४ फुटाची मूर्ती हि आहे. हे मंदिर ASI च्या अखत्यारीत आहे का नाही माहित नाही. कारण त्या मंदिर परिसरात राहणारी लोक देखभाल करत होते. बरं कां ह्याला पण टाळे लावले होते.

ईश्वरा मंदिर

तुरुवेकेरेचे चन्नकेश्वा मंदिर, मुले शंकरेश्वरा
आणि श्रीगंगाधेश्वरा मंदिर

अरसिकेरे -तिपटूर- तुरुवेकेरे  प्रवास वर्णन:
अरसिकेरे वरून आम्हाला अरलगुप्पेला किंवा तूरुवेकेरेला जायचे होते. पण त्या दोन्ही साठी इथून आम्हाला थेट बस भेटली नाही, बहुतेक ठराविक वेळेत बस असतील. त्यासाठी आम्ही बारा वाजता तिपटूर साठी बस पकडली. आणि तिपटूरला गेलो.

अरसिकेरे ते तिपटुर २६ किमी आहे त्यासाठी अर्धा तास लागतो. आणि तिपटूर ते तुरुवेकेरे, तुरुवेकेरे रोड ने अंतर २७ किमी आहे आणि त्यासाठी पाऊण तास लागतो.

आम्ही पहिले अरलगुप्पेला जाऊन नंतर तुरुवेकेरेला जाणार होतो. पण अरलगुप्पेसाठी गाडीला बराच वेळ होता आणि दुपारचे पाऊणे एक वाजले होते, मग आम्ही जास्त वेळ वाया न घालविता तुरुवेकेरेची बस लवकर असल्यामुळे आम्ही तिथे पहिले गेलो.

टीपटूर स्थानकातील कर्मचारी कन्नडच जास्त बोलत असल्यामुळे, बस बद्दल हिंदी मधून विचारले असता. ते कन्नड मधूनच जास्त सांगत होते. त्यामुळे नीट समजत ही नव्हते. एकाने थोडे हिंदीत सांगितले, मग आम्हाला कळाले की अरलगुप्पेसाठी गाडीला बराच वेळ आहे.

सचिनला थोडी कन्नड भाषा वाचता येत असल्यामुळे तो गाडीची नावे वाचायचा. मग आम्ही वाहक किंवा चालकला
जाते का विचारून गाडीत बसायचो. त्याच्यामुळे आम्हाला पुर्ण भ्रमंतीत बराच फायदा झाला

तुरुविकेरे मध्ये होयसाळा राजवटीतील ३ लहान मंदिरे आहेत. चन्नकेश्वा मंदिर, मुले शंकरेश्वरा आणि श्रीगंगाधेश्वरा मंदिर.

आम्ही आधीच गुगल मॅपवर मंदिर पहिले होते. त्यामुळे आम्ही तुरुवेकेरे बस स्थानकात न जाता बस जेथे स्थानकात जायला वळते, तिथे आम्ही बाहेर उतरलो. त्यामुळे आमचं ५ मिनिटाचे चालणे वाचले.

चन्नकेश्वा मंदिर:
१० मिनिटात आम्ही चन्नकेश्वा मंदिर जवळ पोहचलो. इतर प्राचीन मंदिराच्या तुलनेत हे मंदिर खूपच लहान आहे आणि मंदिराच्या बाहेरील भिंतीवर आणि कळसावर एकही शिल्प नाही. फक्त पाषणाचे मंदिर आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजाला टाळे होते. तेथे पुजाऱ्याचा नंबर दिला होता. आम्हाला शेजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, आम्ही त्यांना संपर्क केला परंतु त्यांचे कोणी तरी इस्पितळात भरती असल्यामुळे येऊ शकत नाही असे सांगितले. मग काय, आम्ही लगेच निघालो, कारण बाहेरून बघण्यासारखे असे काही नव्हते.

तिथून आम्ही सरळ मुळेशंकरेश्वरा मंदिर बघायला निघालो. पण त्या मंदिराकडे जातेवेळी, आम्हाला रस्त्याचा बाजूला एक प्राचीन मंदिरसारखे कळस दिसले. हे अगदी चन्नकेश्वा मंदिराच्या काही अंतरावरच आहे म्हणून आम्ही बघायला गेलो.

चन्नकेश्वा मंदिर , तुरुवेकेरे

गंगाधरेश्र्वर मंदिर:
हे गंगाधरेश्र्वर मंदिर होते. रस्त्याला असलेला मुख्य दरवाजा बंद होता. म्हणून आम्ही बाजूला असलेल्या गल्लीत गेलो. मंदिर परिसराच्या बांधाच्या भिंतीला लहान दरवाजा उघडा होता. तिथून आम्ही आत गेलो. इथून आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूने गेलो.

मंदिर सध्याच्या नेहमीच्या मंदिरासारखे दिसत होते .
मंदिराच्या एका बाजूचा दरवाजाच्या बाहेरील मंडपाच्या खांबावर काही शिल्पे आणि एक शिव भक्ताची
कथा दिसत होती आणि त्या मंडपाच्या आतील कळसाला एक भली मोठी, साधारण ३ ते ४ फूट उंच आणि २/३ फूट रुंद अखंड दगडाची घंटा आहे. ते पाहून आम्ही मंदिराचा मुख्य गाभराच्या दरवाजा जवळ पोहचलो. ह्या मंदिराचा दरवाजा पण बंद होता. पण मंदिराच्या समोर दगडी खांबाचे मोठे मंडप आहे, त्यात समोर मोठा नंदी आहे. साधारण १० फूट रुंद आणि उंच, जर मुख्य दरवाजाने मंदिरात आलो तर पहिला आपण ह्या मंडपातून नंदीचे दर्शन घेऊन मंदिरात जाऊ. मंदिरात प्रवेश केल्यावर नंदीच्या अगोदर दरवाजाच्या डाव्या बाजूला अजून एक खोली लागते. बहुतेक तिथे ही प्राचीन अथवा नवीन मुर्ती असावी पण त्याचा ही दरवाजा बंद होता.

जातेवेळी आम्ही मुख्य दरवाजाच्या फटीतून बाहेर पडलो.

तेथून बाहेर पडल्यावर डावीकडे चन्नाकेश्र्वरा मंदिर दिसते आणि उजवीकडे रस्त्याला काही पावले चालल्यावर
डावीकडे मुळेशंकरेश्वरा मंदिराकडे एक वाट जाते, अगदी ५ मिनिटात आम्ही तेथे पोहचलो.

गंगाधरेश्वर मंदिर,तुरुवेकेरे. ह्या फोटो मध्ये दगडाची घंटेचा एक फोटो आहे.


मुळेशंकरेश्वरा मंदिर:
हे मंदिर प्राचीन पण मध्यम आकाराचे आहे. ह्या मंदिराच्या भिंतीवर ही एकही शिल्प दिसत नाही.
मंदिराच्या परिसराला बांध आणि लोखंडी दरवाजा आहे. तो बंद असल्यामुळे आम्हाला मंदिर परिसरात ही जाता आले नाही. आणि बांधाची भिंत थोडी उंच असल्यामुळे आम्ही बाहेरूनच गेलो.

तीनही मंदिर बंद असल्यामुळे लगेच पाहून झाली.

मुले शंकरेश्वरा मंदिर, तुरुवेकेरे


अरलगुप्पेचा चेन्नकेशवा आणि श्री कल्लेश्वरा मंदिर
आम्हाला आता अरलगुप्पेचा (Aralguppe) चेन्नकेशवा आणि श्री कल्लेश्वरा मंदिर बघायला जायचे होते, त्यासाठी आम्ही बस बघायला गेलो.

प्रवास वर्णन
तुरुवेकेरे वरून अरळगुप्पेसाठी थेट बस नाही आणि तिपटूर ते अरळगुप्पे ठराविक आणि वेळेत बसेस आहेत.
तिपटूर ते अरळगुप्पे आतील गावातून रस्त्याने २० किमी, तिपटूरला परत जातेवेळी आमची बस ह्या मार्गाने गेली, आम्हाला अर्धा तास लागला आणि टीपटूर-टुमकुरू-बेंगळुरू महामार्गावरून बिळिगेरे (बिळिगेरे) वरून २५ किमी आहे.

तुरुवेकेरे ते अरलगुप्पे (एन मंचेना हल्ली/न.मंचेना हल्ली रस्त्याने ) अंतर १४ किमी आहे आणि तुरुवेकेरे ते अरलगुप्पे वाया बंसन्द्रा (Banasandra ) फाटा अंतर १८ किमी आहे साधारण अर्धा तास लागतो. तुरुवेकेरे वरून अरलगुप्पेसाठी थेट बस नव्हती मग आम्ही किबानहळ्ळी (Kibbanhalli cross) वरून जाणारी हुलीयारची (Huliyar ) बस पकडून बंसन्द्रा गावात उतरलो.

तुरुवेकेरे ते बंसन्द्रा अंतर 12 किमी असून, हा राष्ट्रीय महामार्ग १५०अ असल्यामुळे आम्ही १० मिनिटात पोहचलो. तेथून पुढे बंसन्द्रा ते अरळगुप्पे अंतर ६.४ किमी आहे. त्यासाठी आम्ही फक्त तेथे जाण्यासाठी १५० रुपये देऊन रिक्षा केली.

चेन्नकेशवा मंदिर:
चार वाजता आम्ही चेन्नकेशवा मंदिरात पोहचलो. हे मंदिर होयसाळा कालखंडात इसवीसन १२५० मधील आहे. मंदिरात विष्णूची मूर्ती आहे. पण इथे ही मंदिराच्या आत फोटो काढायला देत नाही (मोबाईलने पण) आणि मंदिरात लाईट पण नव्हती. त्यामुळे चोरून लपून काढायचे झाले तर मोबाईलने चांगले येतील. मंदिरातील मुख्य दैवत श्रीविष्णु आहे.

मंदिराच्या मागच्या बाजूचा चौथरा अर्ध चांदणीच्या आकाराचा आहे. मंदिराच्या बाहेरील शिल्प ही सुंदर आहेत. मंदिर बघून आम्ही तेथूनच जवळच असलेल्या श्री कल्लेश्वरा मंदिर बघायला गेलो. अगदी पाच मिनिटात चालत आम्ही तेथे पोहचलो.

चेन्नकेशवा मंदिर, अरलगुप्पे

श्री कल्लेश्वरा मंदिर
हे शिवाचे मंदिर नवव्या शतकातील असून, नोलांबा राजशाहीतील आहे (असे विकिपीडिया वर आहे). मंदिर बहुतेक रंगवल्यामुळे नवीनच बांधकाम केल्यासारखे वाटत होते. मंदिराचं बांधकाम होयसाळ राजवटीतील नसल्यामुळे मंदिराच्या बाहेरील भिंतीवर शिल्प न दिसता, सध्याचा काळातील मंदिरासारखी भिंती दिसतात. आम्हाला फक्त मंदिराची द्वार शाखा नक्षीदार दिसली. मंदिराचे द्वार बंद असल्यामुळे, आम्हाला आत जाता आले नाही. मंदिराच्या मंडपाला लागून अजून दोन लहान देवडी सारखी मंदिरे आहेत. त्यात काही प्राचीन मुर्त्या आहेत. पण त्याला ही टाळे असल्यामुळे, नीट पाहता आले नाही. तरीही दरवाजाच्या फटीतून जेवढे दिसत होते त्यातून आम्ही पाहिले.

मंदिर परिसरात काही वीरगळ आहेत, तसेच मंदिराच्या बाजूला तळे आहे. १५ ते २० मिनिटात आमचा हे मंदिर बघून झाले.


श्री कल्लेश्वरा  मंदिर, अरलगुप्पे

अरलगुप्पे  ते तिपटूर प्रवास वर्णन
आम्हाला तिपटूरला जायचे होते. त्यासाठी गावातून ४.४५ किंवा ५.०० ची शेवटची तिपटूर बस होती. हि बस तिपटूर वरून येते आणि तशीच लगेच पुन्हा जाते. बस जरा उशिरा म्हणजे ५.२० ला आली. वर सांगितल्या प्रमाणे ही बस आतील रस्त्याने गेली. आम्ही संध्याकाळी सव्वा सहा पर्यंत तिपटूरला पोहोचलॊ.

तिपटूरला बस स्थानकाच्या आधी १ ते १.५ किमी अंतरावर तलावाच्या बाजूला एक नवीन पुष्कर्णी सारखा छोटा तलाव आहे. त्याच्याच जवळपास पलीकडील रस्त्याला, मंदिर परिसराजवळ रस्त्यालाच ४-५ विरगळी उघड्यावर ठेवलेल्या दिसतात, आम्ही ते पाहून हॉटेल मध्ये नाश्ता करायला गेलो.

पुढील भागात
अशा प्रकारे आमचा दिवस इथे संपला. तिपटूर वरून आमची रात्री १०.३०ची हुबली साठी ट्रेन होती. कारण उद्या १७ फेब्रुवारीला आमचा गंजगट्टीची अश्टदिगपाल चौकट, हंगलचे तारकेश्र्वर मंदिर आणि सिरसीचे सहस्त्रलिंग करायची योजना होती. ह्या प्रवासाचा अनुभव कर्नाटक भाग ४ मध्ये लिहीला आहे.





 खाली प्राचीन कर्नाटक भाग १ ची दुआ/साखळी दिली आहे. 

Wednesday, 5 August 2020

Ancient Karnatak- Part 2, Amruteshwar Temple, Javagal's Temple, Halebidu and Belur's Temple and Doddagoddavali's Lakshmi Temple

प्राचीन कर्नाटक - भाग २

अमृतेश्वर मंदिर, जवागलचे लक्ष्मी नरसिंह मंदिर, हळेबिडू आणि बेलूरची मंदिरे, आणि दोडागोदावलीचे लक्ष्मी मंदिर 


१३ फेब्रुवारी , दुसरा दिवस
रात्री ९ वाजता आम्ही कडुरला पोहचलो. रेल्वे स्थानक पासून आम्ही हॉटेल शोधण्यासाठी KSRTC बस आगारच्या दिशेने हॉटेल शोधत गेलो. बस आगारच्या बाहेरच नाक्यावर, एक वातानुकूलित हॉटेलवाल्याने आम्हाला २०००-२३०० सांगितले, म्हणून आम्ही दुसरे हॉटेल बघू लागलो. बस स्थानकाच्या समोरच, आम्हाला ७०० रुपयात चांगले Non-AC हॉटेल मिळाले. उशीर झाला होता, त्यामुळे आम्ही तसेच सामान ठेवून बाहेर जेवायला गेलो.

अमृतेश्वर मंदिर

प्रवासाचे वर्णन:

दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता, आम्ही नाश्ता न करता तरीकेरेसाठी बस बघायला गेलो. आम्हाला अमृतेश्वर मंदिर पाहायला जायचे होते. त्यासाठी आम्हाला तरीकेरेला जाऊन पुढे अमृतपुरासाठी बस पकडायची होती. कडुर हे, बेंगळुरू ते शिवमोगा ह्या महामार्ग असल्यामुळे इथे सतत 
१० ते १५ मिनिटात बस येत असतात. त्यामुळे तरीकेरेमार्गे जाणाऱ्या बस हि लगेच मिळतात. आम्हाला सकाळी ६.४५ ची बस मिळाली.

कडुर ते अमृतेश्वर मंदिर अंतर ३५ किमी आहे. कडुर बस स्थानकातून शिवमोगा, भद्रावतीला किंवा तरिकेरे वरून जाणारी कुठलीही बस पकडावी. आणि तरीकेरेला उतरावे. कडुर ते तरीकेरे तिघांचे बस भाडे १००रु घेतले.

तरीकेरे वरून अमृतेश्वर मंदिर अंदाजे ८ किमी वर आहे. त्यासाठी अमृतपुरासाठी तरीकेरे बस स्थानकातून दुसरी बस पकडायला लागते.

तरीकेरे वरून, आत गावात खाजगी बस चालतात. आम्ही  ७.३०ला तरीकेरेला पोहचलो. तेथे बस स्थानकात चौकशी केल्यावर कळाले की बसला अजून उशीर आहे. तोपर्यंत आम्ही तेथे रस्त्याला असलेल्या हॉटेल मध्ये नाश्ता केला. मेदुवडा, इडली आणि बिशीबिळी भात खाल्ला. नाश्ता एकदम गरम आणि चवीला पण उत्तम होता. अजून काही बस आली नव्हती. मग आम्ही तेथील रिक्षा वाल्याना विचारले. त्यांनी आम्हाला फक्त सोडायचे २०० रुपये सांगितले. कमी करून तो १८० रुपयात तयार झाला. आम्ही १५ मिनिटात मंदिराजवळ पोहचलो.

मुंबई वरून यायचे झाले तर कडुर, शिवमोगा किंवा हसन रेल्वे स्थानक वरणा येऊ शकता.

अमृतेश्वर मंदिर वर्णन:
मंदिरात कॅमेराने फोटो काढायला देत नाही, पण मोबाईल कॅमेराने देतात. मंदिर ११९६ साली, होयसाळ राजवटीत त्याच पद्धतीत बांधले गेले आहे. मंदिराचा सभामंडपातील खांब सुंदर प्रकारे तासून ठेवले आहेत. त्यावर आपले प्रतिबिंब ही दिसते. तसेच मंदिराच्या गर्भ गृहात शिवाची पिंड आहे.  मंदिराच्या सभामंडपात वरती एका छतावर उच्छिष्ट गणेशची मूर्ती आहे. बाहेरील भिंतीवर खाली रामायण, महाभारत आणि श्रीकृष्ण लीला लहान कोरीव कामात दाखवल्या आहेत. मंदिराच्या बाहेरील सरंक्षक भिंतीवर शिल्प आणि नक्षी ठेवल्या आहेत. बाकी मंदिराचे फोटो मी टाकले आहेत.

सकाळी ११.३० ला मंदिर बघून पुन्हा बाहेर बस साठी वाट पाहू लागलो. पण १५-२० मिनीटांनी एक रिक्षा आली. त्यांनी आमच्या तिघांचे ६० रु शेअर भाडे घेत, पुन्हा तरीकेरे बस स्थानकात सोडले. मघाशी सांगितल्याप्रमाणे महामार्गावर सतत बस असतात. त्यामुळे आम्हाला काही वेळातच कडुर साठी बस मिळाली. त्याने आम्ही १ ते सव्वा एक वाजता कडुरला पोहचलो.

अमृतेश्वर मंदिर

लक्ष्मीनरसिंह स्वामी मंदिर, जवागल:
आम्हाला जवागलचे लक्ष्मीनरसिंह स्वामी मंदिर पहायला जायचे होते आणि तिथून संध्याकाळ पर्यंत हळेबिडूला जायचे होते. त्यामुळे कडुरला पोहचल्यावर, आम्ही जास्त वेळ न घालवता हॉटेल मधून सामान उचलून न जेवता, काही फळ आणि केळी घेऊन, बस साठी गेलो.

जवागल प्रवास वर्णन:
कडुर ते जवागल अंतर ४०-४१ किमी आहे आणि जवागल ते हळेबिडू १० किमी आहे. आम्ही कडुर वरून प्रवास करत होतो. त्यासाठी आम्ही बस स्थानकात हळेबिडू बसची चौकशी केली असता, कळले बसला अजून खूप वेळ आहे. त्यांनी आम्हाला बनावारा पर्यंत जाऊन तेथून पुढे हळेबिडू मार्गे बेलूर किंवा हसनला जाणारी बस पकडायला सांगितली. त्याप्रमाणे आम्ही बनावाराला जाऊन तेथून पुढे बेलूरला जाणारी बस पकडली. त्यामुळे आम्ही लवकर पोहचलो. कडुर ते बनावार आमच्या तिघांचे ९० रुपये आणि तेथून बनावार ते जवागल ७५ रुपये तिकीट घेतली.

अंदाजे दुपारी २.१५ पर्यंत आम्ही जवागलला पोहचलो. मंदिर हे बस स्थानकापासून पाठीमागे असलेल्या गावात आहे, चालत ८ ते १० मिनिटे लागतात. आम्ही विचारत गेलो. वाटेत आम्हाला एका घराबाजूला प्राचीन मंदिराचे खांब दिसले. त्या मंदिराला श्री गंगाधरेश्वर मंदिर म्हणतात पण हे मंदिर फक्त पाषाणाचे दिसत होते. त्यावर शिल्प दिसत नव्हते. त्यामुळे आम्ही बघायला गेलो नाही.

लक्ष्मीनरसिंह स्वामी मंदिराचे वर्णन :
मंदिराचे मुख्य दैवत लक्ष्मीनरसिंह आहे. मंदिर सुंदर अश्या शिल्पांनी भरलेले आहे. मंदिराचे मुख्य द्वार बंद होते, त्यामुळे आम्हाला आत जाता आले नाही. मंदिराचे द्वार बहुतेक बंदच असते. सकाळी कदाचित पुजारी येत असेल तेव्हा उघडत असेल. मंदिराबाहेरील भिंतीवर विशेष करून विष्णूची वेगवेगळी सुंदर शिल्पे आहेत.

मंदिर बघून आम्ही हळेबिडूसाठी निघालो. आम्ही बेलावडीचे मंदिर बघायला गेलो नाही. जवागल वरून बेलावडीचे मंदिर अंदाजे ९ किमी आहे आणि हळेबिडू वरून ११ किमी आहे. हे मंदिर दोघांच्या मधोमध आहे. पण मुख्य रस्त्यावरून बेलावडी गाव आत ४ ते ४.५ किमी आहे आणि तेथून पुन्हा रिक्षा बघायला लागेल म्हणून आम्ही गेलो नाही. जवागल ते हळेबिडूसाठी आम्हाला १५ ते २० मिनिटात बस मिळाली. तिघांचे तिकिटाचे ४५ रुपये घेतले.

जवागलचे  लक्ष्मीनरसिंह स्वामी  मंदिर


हळेबिडू आणि बेलूर
हळेबिडू आणि बेलूरला मुंबई वरून जायचा झाला तर ट्रेनने हसन जंक्शन जवळ पडेल आणि हसन वरून बसेस  बऱ्याच मिळतील आणि विमानाने म्हैसूर विमानतळ जवळ आहे. मँगलोर  विमानतळ देखील जवळ आहे पण तेथून बस किती मिळतील याची मला माहिती नाही.

जैन बसडी आणि केदारेश्वर मंदिर
जवागल ते हळेबिडू अंतर फक्त १० किमी असल्यामूळे आम्ही १५ मिनीटात पोहचलो. संध्याकाळी सव्वा चार वाजता आम्ही हळेबिडूला पोहचलो.

हळेबिडूला पोहचल्यावर आम्ही हॉटेल न शोधता, पहिले केदारेश्वर मंदिर आणि जैन बसडी (मंदिर) पाहायला गेलो. हे दोन्ही मंदिर जास्त मोठी नसल्यामुळे आम्ही संध्याकाळीच बघायचे ठरवले.

पहिले जैन बसडी बघायला गेलो. जैन बसडी हि खूप सुंदर आहे. ह्या मंदिराचे खांब इतके सुंदर तासून ठेवले आहेत, त्यामुळे ते सुंदर चकाकतात. आम्ही १० मिनिटात जैन बसडी पाहून केदारेश्वर मंदिर बघायला गेलो.
केदारेश्वर मंदिरात पोहचेपर्यंत ४. ५५ झाले होते. त्यामुळे मंदिर बंद होण्याची वेळ झाली होती. हे मंदिर बहुतेक साडेपाचला बंद होते. कारण साडेपाचला तेथील कर्मचारीने आम्हाला बाहेर जायला सांगितले. बहुतेक आम्ही उशिरा गेल्यामुळे मंदिराच द्वार बंद होते. आम्ही त्या कर्मचाऱ्याला विचारले तो बोलला मंदिर बंदच असते. का जाणो पण मला त्याच्या बोलण्यावर विश्वास नाही बसला, पण खरेच द्वार उघडत सुद्धा नसतील.

जैन बसडी

केदारेश्वर मंदिर

कल्याणी/पुष्कर्णी:
दोन्ही मंदिरे पाहून आम्ही साडेपाचला कल्याणी/पुष्कर्णी बघायला गेलो. इथे पुष्कर्णीला कल्याणी म्हणतात. केदारेश्वर मंदिरापासून ३ किमी अंतरावर आहे तिथे आम्ही चालतच गेलो. कल्याणी ज्या गावात आहे, त्या गावाच नाव  हेलिकेरे. हळेबिडू वरून एक रास्ता हगरेसाठी रस्ता जातो, त्या दिशेला जायला लागते. मंदिराजवळून चालत आल्यावर रस्त्याला साधारण १.८ ते २ किमी वर सिद्धपुरा गाव लागते. तेथून एक रस्ता आत कल्याणीला जातो. गाववाल्यांना विचारले कि ते रस्ता सांगतात. फाट्यावरून कल्याणी आत साधारण १.२ किमी आहे.
आम्ही ह्या फाट्यापर्यंत चालत गेलो. नंतर आम्हाला तेथील एक रिक्षावाला भेटला, त्याने आम्हाला फुकट सोडले.
नाही तर आम्हाला अजून २०/२५ मिनिटे लागली असती. मग नंतर त्याच रिक्षावाल्याला ७० रुपये देऊन आम्हाला हळेबिडूला सोडायला सांगितले. सव्वा सहाला आम्ही कल्याणी जवळ पोहचलो.
कल्याणी मध्ये पाणी नव्हते. तेथे काही वीरगळ हि ठेवल्या आहेत. मी ह्या कल्याणीचे फोटो टाकले आहेत.

कल्याणीला जाण्यासाठी काही सूचना:
आम्ही हळेबिडू बस स्थानकातून रिक्षा केली असती तर, आम्हाला बरे पडले असते. पण आम्ही पुढे आलो असल्यामुळे चालू लागलो. रस्त्यात मोजक्याच रिक्षा गेल्या पण त्या हि भरलेल्या होत्या. पण त्या रिक्षाने आम्हाला सिद्धपुराला उतरायला लागले असते, तरी पुन्हा आत चालायला लागले असते, त्यापेक्षा हळेबिडू वरून येऊन जाऊन एक रिक्षा ठरवून जावे.

कल्याणी आणि बाजूचा फोटोत तेथे असलेले शिल्प आणि वीरगळ

हॉटेलचा शोध:
हळेबिडूला पोहचल्यावर आम्ही राहण्यासाठी निवारा शोधू लागलो. इथे खूपच कमी हॉटेल आहेत. त्यामुळे कुठलेही भेटेल त्यात राहायला लागते. आम्ही १००० रुपये देऊन एक हॉटेल मध्ये राहिलो. पैशाच्या मानाने हॉटेल एकदमच ठीक होते. पण पर्याय ही नव्हते. सागर ह्या आधी आला होता तेव्हा तो ह्याच हॉटेल मध्ये राहिला होता.
त्यापेक्षा बेलूरला जाऊन रहावे  आणि इथे मंदिर बघून पुन्हा जावे. बेलूरला हि जास्त हॉटेल दिसत नाही तरी पण आम्हाला १/२ चांगली हॉटेल दिसली.

१४ फेब्रुवारी

होयसळेश्वराच मंदिर:
दुसऱ्या दिवशी सकाळी ७ ला नाश्ता करून, आम्ही होयसळेश्वराचे मंदिर बघायला गेलो. मंदिराचे वर्णन करायला, मला तेवढे ज्ञान ही नाही आणि थोडे फार केले तर खूप लांब होईल, त्यामुळे मी त्यांचे वर्णन करत नाही. पण ऐवढे नक्की मंदिराच्या बाहेरील प्रदक्षिणा मार्गावरील आणि मंदिरातील आतील शिल्प बघून मन भरत नाही. मंदिर परिसरातच शेजारी संग्रहालय आहे. शुक्रवारी संग्रहालय बंद असते आणि आम्ही गेलो तो नेमका शुक्रवार होता. जास्त करून मुर्त्या बाहेर उघड्यावरच ठेवल्या आहेत. त्या जागेला बाजूने पूर्ण तारेचे कुंपण होते त्यामुळे काही मुर्त्या लांबून बघता आल्या.

होयसलेश्वर मंदिर आणि खालील फोटो संग्रहालयातील मूर्ती

योगनरसिंह मंदिर, नरासिपुरा (Narasipura) :
ते बघून आम्ही योगनरसिंहाचे मंदिर बघायला गेलो. हे मंदिर हळेबिडू बस स्थानकापासून २.५ किमी वर आहे. त्यासाठी आम्ही रिक्षा करून गेलो. रिक्षाने आमचे १०० रु घेतले. रिक्षावाल्याला माहित नसेल तर (गुगल मॅपनुसार) नरासिपुरा म्हणून गावाकडे जाणाऱ्या वाटेत आहे सांगा. पण गुगलमॅप वर जवळपासचे अजून दोन नरासिपुरा दाखवतात. त्यामुळे नीट चेक करायला लागते. मंदिर लहानच आहे, तसेच मंदिराच्या भिंतीवर जास्त शिल्प नाहीत. मंदिराचा दरवाजा बंद होता, त्यामुळे आम्हाला आत जाता आले नाही. बहुतेक इथे जास्त कोणी येत-जात नाही, हे तिथे गेल्यावर कळून येते. दहा ते पंधरा मिनिटात मंदिर बघून आम्ही निघालो. निघते वेळी, गावातून दोघातिघांना घेऊन रिक्षा येत होती.  त्यांनी आम्ही तिघांचे शेअर पद्धतीने ३० रुपये घेऊन हळेबिडूला सोडले. इथेही तुम्ही हळेबिडू स्थानकातून येण्याजाण्यासाठी रिक्षा ठरवून येऊ शकता. अन्यथा परतीचा वेळी रिक्षा भेटली तर मुख्य रस्त्यापर्यंत  दोन किमी पायपीट करायला लागेल.

 


बेलूरला चेन्नकेशवा मंदिर:
अकरा वाजता, तेथून आम्ही सामान घेऊन बेलूरला चेन्नकेश्वराचे मंदिर बघायला निघालो. १० ते १५ मिनिटात आम्हाला बेलूरसाठी बस भेटली. हळेबिडू ते बेलूर अंतर १६ किमी आहे. आम्हाला बसने २० मिनिटे लागली. पाऊणे बारा वाजता आम्ही बेलूरला पोहचलो आणि पहिलं जेवून घेतले.
मंदिराच्या बाहेर सामान ठेवण्यासाठी दुकान आहे, तेथे तिघांचे सामान ३०रु देऊन ठेवले. बेलूरच्या मंदिरात मला एक गोष्ट विशिष्ट आवडली ती म्हणजे ह्या मंदिरात DSLR कॅमेरा पण वापरू शकतो. फक्त गर्भ गाभाऱ्यातील देवाच्या मूर्तीचा फोटो काढायला देत नाही. तीन-एक तास आम्ही मंदिर बघत होतो. मंदिरातील देवांच्या मूर्ती आणि सुरसुंदरीच्या मूर्ती खूपच सुंदर कलाकृती वाटत होत्या.

बेलूरचं चेन्नकेशवा


डोड्डागड्डावली लक्ष्मी मंदिर :

मंदिरपर्यंतचे प्रवास वर्णन
मंदिर बघून आम्ही डोड्डागड्डावली (DODDAGADDAVALLI) , हगरे (HAGARE) जवळील लक्ष्मी मंदिर पाहण्यासाठी निघालो. त्यासाठी आम्ही पुन्हा बेलूर बस स्थानक मधून हगरेला जाण्यासाठी हसनची गाडी पकडली. बेलूर ते हगरे अंतर १६ किमी आणि मूलनहळ्ळी पर्यंत २० किमी आहे. जर तुम्ही हसन वरून आलात तर, हसन ते डोड्डागड्डावली २१ किमी आहे. आणि हसन ते हगरे २३ किमी आहे.

आम्ही १५ ते २० मिनिटात बसने हगरेला पोहचलो. येथील लोक डोड्डागड्डावलीला, "गडूवल्ली" पण म्हणतात
हगरे वरून मूलनहळ्ळी मार्गे लक्ष्मी मंदिर ७.५ किमी आत आहे. आणि मूलनहळ्ळी वरून ३.५ किमी वर आहे. पण मूलनहळ्ळी वरून आम्हाला रिक्षा भेटेल कि नाही, म्हणून आम्ही हगरेला उतरलो. पण माझ्या मते आम्ही योग्यच केले. तेथून आम्ही येऊन-जाऊन २४० रुपयात रिक्षा ठरवली. पण रिक्षावाल्याने आम्हाला हगरेचा पुढे मधूनच एका गावातून घेऊन गेला. गुगल नकाशावर त्या गावाच नाव ब्यद्रहली (Bydrahalli) दाखवत आहे. ह्या रस्त्याने अंतर
४.५ किमी आहे. रस्ता मध्ये-मध्ये एकदमच खराब होता.

मंदिर वर्णन:
मंदिर होयसळा राजवटीतील राजाने १११४ मध्ये बांधले. ह्या मंदिराचे शिखर ईतर मंदिरासारखे दिसत नाही. तसेच मंदिराच्या बाहेरील भिंतीवर फक्त दरवाजाचे द्वारपाल सोडले तर एकही शिल्प दिसत नाही. मंदिरात लक्ष्मीची मूर्ती आणि चामुंडा/चण्डिकेची मूर्ती आहे. चामुंडा/ चंडिका देवीच्या समोरील गर्भ गुर्हात लहानशी महादेवाची मूर्ती आहे. पण ती मूर्ती त्यावर वेगळी आणून ठेवलेली दिसते, कारण त्याच्या जोत्यावर गरुडाचे शिल्प आहे, यावरून तिथे श्रीविष्णू ची मूर्ती असावी असे वाटते.

ह्या चंडिका देवीच्या गर्भ गृहाचा बाहेर साधारण ७ ते ८ फुटाचे दोन सांगाड्यातील भूत किंवा वेताळ आहेत. ह्या भुतांच्या सांगाड्याला खाली एक होल दाखवला आहे. असे म्हणतात हे भूत तेथून श्वास घेतात. हे आम्हाला तेथील पुजारी आणि ASI चा माणूस दोघे मिळून आम्हाला मध्ये-मध्ये मंदिरा बद्दल सांगत होते. मंदिराच्या आत फोटो काढायला देत नाही, तरी पण आम्ही गोड बोलून काढून घेतले.



दोड्डागुड्डावल्ली लक्ष्मी मंदिर

पुढील भागात १५ फेब्रुवारीचा प्रवास
मंदिर पाहून आम्ही पुन्हा हागरेला येऊन हसनला गेलो. कारण आम्हाला उद्याच्या दिवसात अरसिकेरेच ईश्वरा मंदिर, हरणहल्लीचे श्री लक्ष्मीनरसिंह स्वामी मंदिर आणि सोमेश्वरा मंदिरानंतर तेथून तुरुवेकेरेच चन्नकेश्वरा आणि मुलेशंकरेश्वरा मंदिर आणि शेवटी अरलगुप्पेचा चेन्नाकेशवा आणि श्री कल्लेश्वरा मंदिर करायची योजना होती.
ह्या योजनेचा प्रवास अनुभव मी, प्राचीन कर्नाटक ३ ब्लॉग मध्ये लिहिला आहे.
त्याची दुआ/ साखळी खाली दिली आहे.

https://kunalstrek.blogspot.com/2020/08/ancient-karnatak-part-3-ariskere.html



 खाली प्राचीन कर्नाटक भाग १ ची दुआ/साखळी दिली आहे. 











Tuesday, 4 August 2020

Ancient Karnatak- Part1 - Lepakshi Temple, Devanahalli Fort , Tipu Birth place and Bengaluru Museaum.

प्राचीन कर्नाटक - भाग १

लेपाक्षी मंदिर, देवाणहल्ली किल्ला,
टिपू जन्मस्थळ आणि बेंगळुरू संग्रहालय


कर्नाटकची हि माझी दुसरी सैर. पहिली माझी खेप बिजापूरला झाली. पण ती फक्त दोनच दिवसाची होती. पण ह्या वेळी पूर्ण आठवडा फिरलो. त्यामुळे तेथील एसटी बसेसचे जाळे किती चांगले आहे ते ही कळले. माझ्या प्रवासाचा अनुभव मी आठवण म्हणून हा ब्लॉग सहा भागात लिहिला आहे. त्यामुळे मी ह्या ब्लॉग मध्ये मंदिर वर्णन पेक्षा प्रवासाचे वर्णन जास्त केला आहे. प्रत्येक दिवसाचा एक भाग असा लिहले आहे.

तसा ही मला मंदिर वर्णन करता येत नाही. कारण मंदिर स्थापत्य कलाशास्त्र बद्दल, मला फार ज्ञान हि नाही. आणि मंदिराबद्दल माहिती काडून लिहायचे झाले, तर ब्लॉग खूपच लांबलचक झाला असता. सागर आणि सचिन दोघांना मंदिर स्थापत्य शैली बद्दल चांगली माहिती आहे. त्यामुळे मला ही त्यांच्या बरोबर मंदिर पाहण्याचा फायदा झाला.

मंदिर कितव्या शतकातील आणि कुठच्या राजवटीतील, हे सगळे मी विकिपीडिया वरूनच दिले आहे. फक्त काही विशेष वाटलं तर त्या मंदिराबद्दल एकदम थोडसे लिहायचा प्रयत्न केला आहे.

सागरने १२ ते १८ फेब्रुवारी असा, एक आठवड्याचा हळेबिडू, बेलूर अशी कर्नाटकच्या हसन जिल्ह्यातील अनेक  मंदिरे करण्याची योजना तयार केली होती. पण सुरवात मात्र आम्ही आंध्रप्रदेश मधील लेपाक्षी मंदिराने केली आणि अखेरीस हवेरीचा जवळील मंदिर पाहून मुंबईला परतलो.

माझे नक्की नव्हते, पण शेवटच्या क्षणी मी जायचे ठरवले. सागरने पहिले लेपाक्षी मंदिर ठेवले होते. त्यासाठी त्यांनी बंगलोर वरून ओला किंवा उबर करून जायचे ठरवले होते. सागर, सचिन आणि मी असे आम्ही तिघेजण होतो. त्यामुळे ह्या पुढे मी प्रत्येक भागात जो काही खर्च लिहिला आहे. तो तिघांचे असा मिळून लिहिला आहे.

१२ फेब्रुवारी
पहिल्या दिवशी आमचा लेपाक्षी मंदिर, देवनहळ्ळी (Devanahalli) किल्ला, टिपू सुलतान जन्म स्थळ आणि बेंगळुरू संग्रहालय करून रात्री कडुर साठी जायचे होते.

लेपाक्षी मंदिर :

मुंबई ते लेपाक्षी मंदिर प्रवास निर्माण

लेपाक्षी मंदिर आंध्र प्रदेश राज्यामध्ये येते. पण मंदिर बेंगळुरू वरून साधारण १२२ किमी अंतर इतक्या जवळ आहे, आहे. त्यानुसार आपण मुंबई वरून विमानाने किंवा रेल्वेने सुद्धा येऊ शकतो. रेल्वेने हिदूंपुरम रेल्वे स्थानकला उतरून जायला लागते. हिंदुपुरम ते लेपाक्षी मंदिर अंतर १४ किमी आहे.

सचिन मुंबई वरून ट्रेन ने थेट मंदिराजवळ आला. त्याने मुंबई वरून मुंबई एक्सप्रेस ट्रेन पकडून हिंदूंपुरमला उतरला. ट्रेन ने पूर्ण एक दिवसाचा प्रवास करायला लागतो. त्याची ट्रेन सकाळी ७ वाजता हिंदूंपुरमला पोहचली.
मंदिरापर्यंत खाजगी रिक्षावाले त्याला २००ते ३०० रुपये सांगत होते. त्यामुळे तो स्थानकातून थोडा बाहेर मुख्य रस्त्यावर आला. तेथून तो शेअर रिक्षाने २० रुपयात मंदिराजवळ पोहचला.

सागर आणि मी बुधवारी रात्रीचा विमानाने बेंगलुरूला पोहचलो. थोडा १/२ तास विमानतळावर आराम करून. सकाळी पाच वाजता, १० तासासाठी १३रुपये किमी प्रमाणे ओलाची गाडी ठरवली. बेंगळुरू(केम्पेगोवडा आंतरराष्ट्रीय) विमानतळ ते लेपाक्षी मंदिर अंतर १०० किमी आहे. विमानतळ हे शहराच्या बाहेर आहे.
अंतर बघता आम्हाला वाटले ३ तास लागतील. पण बेंगळूर-हैद्राबाद महामार्ग चांगला असल्यामुळे, आम्ही अवघ्या सव्वा तासात पोहचलो.

आम्ही ६.४५ पर्यंत मंदिराजवळ पोहचलो. आम्ही पोहचल्या नंतर १५/२० मिनिटांनी सचिन ही पोहचला.

मंदिराच थोडक्यात वर्णन :

मंदिर सोळाव्या शतकातील विजयनगर राजवटीच्या शैलीतील आहे. मंदिराचे मुख्य दैवत वीरभद्रेश्वर आहे.
मंदिर सुंदरच आहे पण विशेष म्हणजे मंदिरातील झुलता खांब जास्त आकर्षणाचा विषय आहे. मंदिराच्या मंडपाच्या खांबावर सुंदर मूर्ती शिल्प आहेत. तसेच मंदिराच्या बाहेरील मंडपाचा आतील छतावर पुरातन कथेची चित्र रेखाटलेली आहे. मंदिरात फक्त मुख्य अंतर मंडप सोडला तर बाकी सगळी कडे फोटो काढायला देतात.  मंदिर परिसरात एक मोठी शिवपिंड शेषनागाच्या फण्यांनी छत्र धरलेली आहे.

मंदिर बघून आम्ही पुन्हा बँगलोरच्या दिशेने निघालो. त्याच दिशेला मंदिरापासून, साधारण अर्धा किमी वर रस्त्याच्या शेजारी मोठा नंदी आहे आणि रस्त्याच्या पलीकडे आत आपल्याला छोटा टेकडीवर, गरुडाचा मोठा पुतळा आहे. ह्या पुतळ्याचा टेकडीवर जात येते, पण आम्ही गेलो नाही.

देवनहळ्ळीचा किल्ला:

बंगळुरूला जातेवेळी, आम्ही देवनहळ्ळीचा किल्ला बघायला गेलो. हा किल्ला बंगळुरू रेल्वे स्थानक पासून ३७ किमी वर आहे. किल्ला महामार्गालाच लागूनच असल्यामुळे, किल्ल्याची तटबंदी रस्त्यावरून दिसते. किल्ल्याच्या तटबंदीच्या आत आणि बाहेर पूर्ण गाव वसलेले आहे, पण किल्ल्याची तटबंदी एक दोन ठिकाणी तुटलेली आहे तरीही किल्याच्या अर्ध्या तटबंदी वरून फेरी मारता येते. बुरुज आणि तटबंदी अजून ही चांगल्या अवस्थेत दिसतात.  किल्यात आत श्री वेणुगोपाल स्वामींचे लहान प्राचीन मंदिर आहे. पण त्यावर सध्या नवीन बांधकाम केलेले दिसते. पण आतील खांब आणि भिंतीवरील जुनी शिल्पे अजूनही दिसतात.

टिपू सुलतानचा जन्म स्थळ:

किल्ला बघून आम्ही बाहेर निघालो. तेथून पुढे अंदाजे ४०० मीटर वर टिपू सुलतानचा जन्म स्थळ आहे. त्याचे जन्मस्थळ हे रस्त्यालाच लागून असलेले एक लहानसे स्मारक आहे.

ते बघून आम्ही पुन्हा विमानतळावर गेलो. तेथून पुन्हा बेंगळुरू शहरासाठी आम्ही वातानुकूलित बस पकडून गेलो. शहरापासून विमानतळ खूप लांब आहे. त्यामुळे बस प्रत्येकी २२५ रुपये तिकीट घेते.

बेंगळुरू सरकारी संग्रहालय (Government Museaum):   

शहरात पोहचल्यावर आम्ही संग्रहालय बघायला गेलो. संग्रहालयात प्राचीन मूर्तीचा संग्रह आहे.

बेंगळुरू शहरामध्ये  फिरण्यासारखे बरंच काही आहे, पण आमची संध्याकाळी ४ वाजता यशवंतपुर जंक्शन वरून कडुर साठी ट्रेन होती. त्यामुळे आमच्याकडे जास्त वेळ नव्हता. त्यावेळेत आम्ही फक्त संग्रहालय पाहून व तेथून बस पकडून आम्ही स्टेशनला गेलो.

दुसऱ्या दिवशी आमचा कडूर वरून अमृतेश्वर मंदिर, जवागलचे लक्ष्मीनरसिंह मंदिर, हळेबिडू अशी योजना होती. या योजने बद्दल कर्नाटक भाग २ मध्ये लिहला आहे. त्याची दुआ/ साखळी खाली दिली आहे.