प्राचीन कर्नाटक - भाग २
अमृतेश्वर मंदिर, जवागलचे लक्ष्मी नरसिंह मंदिर, हळेबिडू आणि बेलूरची मंदिरे, आणि दोडागोदावलीचे लक्ष्मी मंदिर
१३ फेब्रुवारी , दुसरा दिवस
रात्री ९ वाजता आम्ही कडुरला पोहचलो. रेल्वे स्थानक पासून आम्ही हॉटेल शोधण्यासाठी KSRTC बस आगारच्या दिशेने हॉटेल शोधत गेलो. बस आगारच्या बाहेरच नाक्यावर, एक वातानुकूलित हॉटेलवाल्याने आम्हाला २०००-२३०० सांगितले, म्हणून आम्ही दुसरे हॉटेल बघू लागलो. बस स्थानकाच्या समोरच, आम्हाला ७०० रुपयात चांगले Non-AC हॉटेल मिळाले. उशीर झाला होता, त्यामुळे आम्ही तसेच सामान ठेवून बाहेर जेवायला गेलो.
अमृतेश्वर मंदिर
प्रवासाचे वर्णन:
दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता, आम्ही नाश्ता न करता तरीकेरेसाठी बस बघायला गेलो. आम्हाला अमृतेश्वर मंदिर पाहायला जायचे होते. त्यासाठी आम्हाला तरीकेरेला जाऊन पुढे अमृतपुरासाठी बस पकडायची होती. कडुर हे, बेंगळुरू ते शिवमोगा ह्या महामार्ग असल्यामुळे इथे सतत १० ते १५ मिनिटात बस येत असतात. त्यामुळे तरीकेरेमार्गे जाणाऱ्या बस हि लगेच मिळतात. आम्हाला सकाळी ६.४५ ची बस मिळाली.
कडुर ते अमृतेश्वर मंदिर अंतर ३५ किमी आहे. कडुर बस स्थानकातून शिवमोगा, भद्रावतीला किंवा तरिकेरे वरून जाणारी कुठलीही बस पकडावी. आणि तरीकेरेला उतरावे. कडुर ते तरीकेरे तिघांचे बस भाडे १००रु घेतले.
तरीकेरे वरून अमृतेश्वर मंदिर अंदाजे ८ किमी वर आहे. त्यासाठी अमृतपुरासाठी तरीकेरे बस स्थानकातून दुसरी बस पकडायला लागते.
तरीकेरे वरून, आत गावात खाजगी बस चालतात. आम्ही ७.३०ला तरीकेरेला पोहचलो. तेथे बस स्थानकात चौकशी केल्यावर कळाले की बसला अजून उशीर आहे. तोपर्यंत आम्ही तेथे रस्त्याला असलेल्या हॉटेल मध्ये नाश्ता केला. मेदुवडा, इडली आणि बिशीबिळी भात खाल्ला. नाश्ता एकदम गरम आणि चवीला पण उत्तम होता. अजून काही बस आली नव्हती. मग आम्ही तेथील रिक्षा वाल्याना विचारले. त्यांनी आम्हाला फक्त सोडायचे २०० रुपये सांगितले. कमी करून तो १८० रुपयात तयार झाला. आम्ही १५ मिनिटात मंदिराजवळ पोहचलो.
मुंबई वरून यायचे झाले तर कडुर, शिवमोगा किंवा हसन रेल्वे स्थानक वरणा येऊ शकता.
अमृतेश्वर मंदिर वर्णन:
मंदिरात कॅमेराने फोटो काढायला देत नाही, पण मोबाईल कॅमेराने देतात. मंदिर ११९६ साली, होयसाळ राजवटीत त्याच पद्धतीत बांधले गेले आहे. मंदिराचा सभामंडपातील खांब सुंदर प्रकारे तासून ठेवले आहेत. त्यावर आपले प्रतिबिंब ही दिसते. तसेच मंदिराच्या गर्भ गृहात शिवाची पिंड आहे. मंदिराच्या सभामंडपात वरती एका छतावर उच्छिष्ट गणेशची मूर्ती आहे. बाहेरील भिंतीवर खाली रामायण, महाभारत आणि श्रीकृष्ण लीला लहान कोरीव कामात दाखवल्या आहेत. मंदिराच्या बाहेरील सरंक्षक भिंतीवर शिल्प आणि नक्षी ठेवल्या आहेत. बाकी मंदिराचे फोटो मी टाकले आहेत.
सकाळी ११.३० ला मंदिर बघून पुन्हा बाहेर बस साठी वाट पाहू लागलो. पण १५-२० मिनीटांनी एक रिक्षा आली. त्यांनी आमच्या तिघांचे ६० रु शेअर भाडे घेत, पुन्हा तरीकेरे बस स्थानकात सोडले. मघाशी सांगितल्याप्रमाणे महामार्गावर सतत बस असतात. त्यामुळे आम्हाला काही वेळातच कडुर साठी बस मिळाली. त्याने आम्ही १ ते सव्वा एक वाजता कडुरला पोहचलो.
अमृतेश्वर मंदिर |
लक्ष्मीनरसिंह स्वामी मंदिर, जवागल:
आम्हाला जवागलचे लक्ष्मीनरसिंह स्वामी मंदिर पहायला जायचे होते आणि तिथून संध्याकाळ पर्यंत हळेबिडूला जायचे होते. त्यामुळे कडुरला पोहचल्यावर, आम्ही जास्त वेळ न घालवता हॉटेल मधून सामान उचलून न जेवता, काही फळ आणि केळी घेऊन, बस साठी गेलो.
जवागल प्रवास वर्णन:
कडुर ते जवागल अंतर ४०-४१ किमी आहे आणि जवागल ते हळेबिडू १० किमी आहे. आम्ही कडुर वरून प्रवास करत होतो. त्यासाठी आम्ही बस स्थानकात हळेबिडू बसची चौकशी केली असता, कळले बसला अजून खूप वेळ आहे. त्यांनी आम्हाला बनावारा पर्यंत जाऊन तेथून पुढे हळेबिडू मार्गे बेलूर किंवा हसनला जाणारी बस पकडायला सांगितली. त्याप्रमाणे आम्ही बनावाराला जाऊन तेथून पुढे बेलूरला जाणारी बस पकडली. त्यामुळे आम्ही लवकर पोहचलो. कडुर ते बनावार आमच्या तिघांचे ९० रुपये आणि तेथून बनावार ते जवागल ७५ रुपये तिकीट घेतली.
अंदाजे दुपारी २.१५ पर्यंत आम्ही जवागलला पोहचलो. मंदिर हे बस स्थानकापासून पाठीमागे असलेल्या गावात आहे, चालत ८ ते १० मिनिटे लागतात. आम्ही विचारत गेलो. वाटेत आम्हाला एका घराबाजूला प्राचीन मंदिराचे खांब दिसले. त्या मंदिराला श्री गंगाधरेश्वर मंदिर म्हणतात पण हे मंदिर फक्त पाषाणाचे दिसत होते. त्यावर शिल्प दिसत नव्हते. त्यामुळे आम्ही बघायला गेलो नाही.
लक्ष्मीनरसिंह स्वामी मंदिराचे वर्णन :
मंदिराचे मुख्य दैवत लक्ष्मीनरसिंह आहे. मंदिर सुंदर अश्या शिल्पांनी भरलेले आहे. मंदिराचे मुख्य द्वार बंद होते, त्यामुळे आम्हाला आत जाता आले नाही. मंदिराचे द्वार बहुतेक बंदच असते. सकाळी कदाचित पुजारी येत असेल तेव्हा उघडत असेल. मंदिराबाहेरील भिंतीवर विशेष करून विष्णूची वेगवेगळी सुंदर शिल्पे आहेत.
मंदिर बघून आम्ही हळेबिडूसाठी निघालो. आम्ही बेलावडीचे मंदिर बघायला गेलो नाही. जवागल वरून बेलावडीचे मंदिर अंदाजे ९ किमी आहे आणि हळेबिडू वरून ११ किमी आहे. हे मंदिर दोघांच्या मधोमध आहे. पण मुख्य रस्त्यावरून बेलावडी गाव आत ४ ते ४.५ किमी आहे आणि तेथून पुन्हा रिक्षा बघायला लागेल म्हणून आम्ही गेलो नाही. जवागल ते हळेबिडूसाठी आम्हाला १५ ते २० मिनिटात बस मिळाली. तिघांचे तिकिटाचे ४५ रुपये घेतले.
जवागलचे लक्ष्मीनरसिंह स्वामी मंदिर |
हळेबिडू आणि बेलूर
हळेबिडू आणि बेलूरला मुंबई वरून जायचा झाला तर ट्रेनने हसन जंक्शन जवळ पडेल आणि हसन वरून बसेस बऱ्याच मिळतील आणि विमानाने म्हैसूर विमानतळ जवळ आहे. मँगलोर विमानतळ देखील जवळ आहे पण तेथून बस किती मिळतील याची मला माहिती नाही.
जैन बसडी आणि केदारेश्वर मंदिर
जवागल ते हळेबिडू अंतर फक्त १० किमी असल्यामूळे आम्ही १५ मिनीटात पोहचलो. संध्याकाळी सव्वा चार वाजता आम्ही हळेबिडूला पोहचलो.
हळेबिडूला पोहचल्यावर आम्ही हॉटेल न शोधता, पहिले केदारेश्वर मंदिर आणि जैन बसडी (मंदिर) पाहायला गेलो. हे दोन्ही मंदिर जास्त मोठी नसल्यामुळे आम्ही संध्याकाळीच बघायचे ठरवले.
पहिले जैन बसडी बघायला गेलो. जैन बसडी हि खूप सुंदर आहे. ह्या मंदिराचे खांब इतके सुंदर तासून ठेवले आहेत, त्यामुळे ते सुंदर चकाकतात. आम्ही १० मिनिटात जैन बसडी पाहून केदारेश्वर मंदिर बघायला गेलो.
केदारेश्वर मंदिरात पोहचेपर्यंत ४. ५५ झाले होते. त्यामुळे मंदिर बंद होण्याची वेळ झाली होती. हे मंदिर बहुतेक साडेपाचला बंद होते. कारण साडेपाचला तेथील कर्मचारीने आम्हाला बाहेर जायला सांगितले. बहुतेक आम्ही उशिरा गेल्यामुळे मंदिराच द्वार बंद होते. आम्ही त्या कर्मचाऱ्याला विचारले तो बोलला मंदिर बंदच असते. का जाणो पण मला त्याच्या बोलण्यावर विश्वास नाही बसला, पण खरेच द्वार उघडत सुद्धा नसतील.
जैन बसडी |
केदारेश्वर मंदिर |
कल्याणी/पुष्कर्णी:
दोन्ही मंदिरे पाहून आम्ही साडेपाचला कल्याणी/पुष्कर्णी बघायला गेलो. इथे पुष्कर्णीला कल्याणी म्हणतात. केदारेश्वर मंदिरापासून ३ किमी अंतरावर आहे तिथे आम्ही चालतच गेलो. कल्याणी ज्या गावात आहे, त्या गावाच नाव हेलिकेरे. हळेबिडू वरून एक रास्ता हगरेसाठी रस्ता जातो, त्या दिशेला जायला लागते. मंदिराजवळून चालत आल्यावर रस्त्याला साधारण १.८ ते २ किमी वर सिद्धपुरा गाव लागते. तेथून एक रस्ता आत कल्याणीला जातो. गाववाल्यांना विचारले कि ते रस्ता सांगतात. फाट्यावरून कल्याणी आत साधारण १.२ किमी आहे.
आम्ही ह्या फाट्यापर्यंत चालत गेलो. नंतर आम्हाला तेथील एक रिक्षावाला भेटला, त्याने आम्हाला फुकट सोडले.
नाही तर आम्हाला अजून २०/२५ मिनिटे लागली असती. मग नंतर त्याच रिक्षावाल्याला ७० रुपये देऊन आम्हाला हळेबिडूला सोडायला सांगितले. सव्वा सहाला आम्ही कल्याणी जवळ पोहचलो.
कल्याणी मध्ये पाणी नव्हते. तेथे काही वीरगळ हि ठेवल्या आहेत. मी ह्या कल्याणीचे फोटो टाकले आहेत.
कल्याणीला जाण्यासाठी काही सूचना:
आम्ही हळेबिडू बस स्थानकातून रिक्षा केली असती तर, आम्हाला बरे पडले असते. पण आम्ही पुढे आलो असल्यामुळे चालू लागलो. रस्त्यात मोजक्याच रिक्षा गेल्या पण त्या हि भरलेल्या होत्या. पण त्या रिक्षाने आम्हाला सिद्धपुराला उतरायला लागले असते, तरी पुन्हा आत चालायला लागले असते, त्यापेक्षा हळेबिडू वरून येऊन जाऊन एक रिक्षा ठरवून जावे.
कल्याणी आणि बाजूचा फोटोत तेथे असलेले शिल्प आणि वीरगळ |
हॉटेलचा शोध:
हळेबिडूला पोहचल्यावर आम्ही राहण्यासाठी निवारा शोधू लागलो. इथे खूपच कमी हॉटेल आहेत. त्यामुळे कुठलेही भेटेल त्यात राहायला लागते. आम्ही १००० रुपये देऊन एक हॉटेल मध्ये राहिलो. पैशाच्या मानाने हॉटेल एकदमच ठीक होते. पण पर्याय ही नव्हते. सागर ह्या आधी आला होता तेव्हा तो ह्याच हॉटेल मध्ये राहिला होता.
त्यापेक्षा बेलूरला जाऊन रहावे आणि इथे मंदिर बघून पुन्हा जावे. बेलूरला हि जास्त हॉटेल दिसत नाही तरी पण आम्हाला १/२ चांगली हॉटेल दिसली.
१४ फेब्रुवारी
होयसळेश्वराच मंदिर:
दुसऱ्या दिवशी सकाळी ७ ला नाश्ता करून, आम्ही होयसळेश्वराचे मंदिर बघायला गेलो. मंदिराचे वर्णन करायला, मला तेवढे ज्ञान ही नाही आणि थोडे फार केले तर खूप लांब होईल, त्यामुळे मी त्यांचे वर्णन करत नाही. पण ऐवढे नक्की मंदिराच्या बाहेरील प्रदक्षिणा मार्गावरील आणि मंदिरातील आतील शिल्प बघून मन भरत नाही. मंदिर परिसरातच शेजारी संग्रहालय आहे. शुक्रवारी संग्रहालय बंद असते आणि आम्ही गेलो तो नेमका शुक्रवार होता. जास्त करून मुर्त्या बाहेर उघड्यावरच ठेवल्या आहेत. त्या जागेला बाजूने पूर्ण तारेचे कुंपण होते त्यामुळे काही मुर्त्या लांबून बघता आल्या.
होयसलेश्वर मंदिर आणि खालील फोटो संग्रहालयातील मूर्ती |
योगनरसिंह मंदिर, नरासिपुरा (Narasipura) :
ते बघून आम्ही योगनरसिंहाचे मंदिर बघायला गेलो. हे मंदिर हळेबिडू बस स्थानकापासून २.५ किमी वर आहे. त्यासाठी आम्ही रिक्षा करून गेलो. रिक्षाने आमचे १०० रु घेतले. रिक्षावाल्याला माहित नसेल तर (गुगल मॅपनुसार) नरासिपुरा म्हणून गावाकडे जाणाऱ्या वाटेत आहे सांगा. पण गुगलमॅप वर जवळपासचे अजून दोन नरासिपुरा दाखवतात. त्यामुळे नीट चेक करायला लागते. मंदिर लहानच आहे, तसेच मंदिराच्या भिंतीवर जास्त शिल्प नाहीत. मंदिराचा दरवाजा बंद होता, त्यामुळे आम्हाला आत जाता आले नाही. बहुतेक इथे जास्त कोणी येत-जात नाही, हे तिथे गेल्यावर कळून येते. दहा ते पंधरा मिनिटात मंदिर बघून आम्ही निघालो. निघते वेळी, गावातून दोघातिघांना घेऊन रिक्षा येत होती. त्यांनी आम्ही तिघांचे शेअर पद्धतीने ३० रुपये घेऊन हळेबिडूला सोडले. इथेही तुम्ही हळेबिडू स्थानकातून येण्याजाण्यासाठी रिक्षा ठरवून येऊ शकता. अन्यथा परतीचा वेळी रिक्षा भेटली तर मुख्य रस्त्यापर्यंत दोन किमी पायपीट करायला लागेल.
बेलूरला चेन्नकेशवा मंदिर:
अकरा वाजता, तेथून आम्ही सामान घेऊन बेलूरला चेन्नकेश्वराचे मंदिर बघायला निघालो. १० ते १५ मिनिटात आम्हाला बेलूरसाठी बस भेटली. हळेबिडू ते बेलूर अंतर १६ किमी आहे. आम्हाला बसने २० मिनिटे लागली. पाऊणे बारा वाजता आम्ही बेलूरला पोहचलो आणि पहिलं जेवून घेतले.
मंदिराच्या बाहेर सामान ठेवण्यासाठी दुकान आहे, तेथे तिघांचे सामान ३०रु देऊन ठेवले. बेलूरच्या मंदिरात मला एक गोष्ट विशिष्ट आवडली ती म्हणजे ह्या मंदिरात DSLR कॅमेरा पण वापरू शकतो. फक्त गर्भ गाभाऱ्यातील देवाच्या मूर्तीचा फोटो काढायला देत नाही. तीन-एक तास आम्ही मंदिर बघत होतो. मंदिरातील देवांच्या मूर्ती आणि सुरसुंदरीच्या मूर्ती खूपच सुंदर कलाकृती वाटत होत्या.
बेलूरचं चेन्नकेशवा |
डोड्डागड्डावली लक्ष्मी मंदिर :
मंदिरपर्यंतचे प्रवास वर्णन
मंदिर बघून आम्ही डोड्डागड्डावली (DODDAGADDAVALLI) , हगरे (HAGARE) जवळील लक्ष्मी मंदिर पाहण्यासाठी निघालो. त्यासाठी आम्ही पुन्हा बेलूर बस स्थानक मधून हगरेला जाण्यासाठी हसनची गाडी पकडली. बेलूर ते हगरे अंतर १६ किमी आणि मूलनहळ्ळी पर्यंत २० किमी आहे. जर तुम्ही हसन वरून आलात तर, हसन ते डोड्डागड्डावली २१ किमी आहे. आणि हसन ते हगरे २३ किमी आहे.
आम्ही १५ ते २० मिनिटात बसने हगरेला पोहचलो. येथील लोक डोड्डागड्डावलीला, "गडूवल्ली" पण म्हणतात
हगरे वरून मूलनहळ्ळी मार्गे लक्ष्मी मंदिर ७.५ किमी आत आहे. आणि मूलनहळ्ळी वरून ३.५ किमी वर आहे. पण मूलनहळ्ळी वरून आम्हाला रिक्षा भेटेल कि नाही, म्हणून आम्ही हगरेला उतरलो. पण माझ्या मते आम्ही योग्यच केले. तेथून आम्ही येऊन-जाऊन २४० रुपयात रिक्षा ठरवली. पण रिक्षावाल्याने आम्हाला हगरेचा पुढे मधूनच एका गावातून घेऊन गेला. गुगल नकाशावर त्या गावाच नाव ब्यद्रहली (Bydrahalli) दाखवत आहे. ह्या रस्त्याने अंतर
४.५ किमी आहे. रस्ता मध्ये-मध्ये एकदमच खराब होता.
मंदिर वर्णन:
मंदिर होयसळा राजवटीतील राजाने १११४ मध्ये बांधले. ह्या मंदिराचे शिखर ईतर मंदिरासारखे दिसत नाही. तसेच मंदिराच्या बाहेरील भिंतीवर फक्त दरवाजाचे द्वारपाल सोडले तर एकही शिल्प दिसत नाही. मंदिरात लक्ष्मीची मूर्ती आणि चामुंडा/चण्डिकेची मूर्ती आहे. चामुंडा/ चंडिका देवीच्या समोरील गर्भ गुर्हात लहानशी महादेवाची मूर्ती आहे. पण ती मूर्ती त्यावर वेगळी आणून ठेवलेली दिसते, कारण त्याच्या जोत्यावर गरुडाचे शिल्प आहे, यावरून तिथे श्रीविष्णू ची मूर्ती असावी असे वाटते.
ह्या चंडिका देवीच्या गर्भ गृहाचा बाहेर साधारण ७ ते ८ फुटाचे दोन सांगाड्यातील भूत किंवा वेताळ आहेत. ह्या भुतांच्या सांगाड्याला खाली एक होल दाखवला आहे. असे म्हणतात हे भूत तेथून श्वास घेतात. हे आम्हाला तेथील पुजारी आणि ASI चा माणूस दोघे मिळून आम्हाला मध्ये-मध्ये मंदिरा बद्दल सांगत होते. मंदिराच्या आत फोटो काढायला देत नाही, तरी पण आम्ही गोड बोलून काढून घेतले.
दोड्डागुड्डावल्ली लक्ष्मी मंदिर |
पुढील भागात १५ फेब्रुवारीचा प्रवास
मंदिर पाहून आम्ही पुन्हा हागरेला येऊन हसनला गेलो. कारण आम्हाला उद्याच्या दिवसात अरसिकेरेच ईश्वरा मंदिर, हरणहल्लीचे श्री लक्ष्मीनरसिंह स्वामी मंदिर आणि सोमेश्वरा मंदिरानंतर तेथून तुरुवेकेरेच चन्नकेश्वरा आणि मुलेशंकरेश्वरा मंदिर आणि शेवटी अरलगुप्पेचा चेन्नाकेशवा आणि श्री कल्लेश्वरा मंदिर करायची योजना होती.
ह्या योजनेचा प्रवास अनुभव मी, प्राचीन कर्नाटक ३ ब्लॉग मध्ये लिहिला आहे. त्याची दुआ/ साखळी खाली दिली आहे.
https://kunalstrek.blogspot.com/2020/08/ancient-karnatak-part-3-ariskere.html
खाली प्राचीन कर्नाटक भाग १ ची दुआ/साखळी दिली आहे.
No comments:
Post a Comment