प्राचीन कर्नाटक- भाग ३
अरसिकेरे , हरणहल्ली, तुरुवेकेरे
आणि अरलगुप्पेची मंदिरे
ह्या मंदिरासाठी तुम्ही मुंबई वरून अरसिकेरे जंक्शन किंवा तिपटुर जंक्शनला उतरून येऊ शकता, हसन जंक्शन ला पण उतरू शकता, पण ते ८७ किमी लांब आहे. पण फक्त हि मंदिर करायची असतील तर, तिपटुर मधोमध येते त्यामुळे जास्त सोयीचे पडू शकते.
दोड्डागोड्डवल्लीचे मंदिर बघून, आम्ही पुन्हा हगरेला आलो, आणि हसनला जाणारी बस पकडली. कारण आम्हाला रात्री रहायला अरसिकेरेला जायचे होते. दुसऱ्या दिवशी आम्हाला अरसिकेरे आणि हरणहल्लीची मंदिरे पहायची होती.
आम्ही हगरे वरून पण पुन्हा हळेबिडू-बाणावारा वरून अरसिकेरेला ४५ किमीचे अंतर बस बदलत जाऊ शकत होतो. पण हळेबिडू वरून आम्हाला मोजक्या आणि वेळेत बस होत्या. त्यात आमचा वेळ गेला असता आणि मुख्य म्हणजे संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. हसन हे मुख्य शहर आहे. तेथून कर्नाटकात जाणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या अनेक गाड्या सुटतात. त्यामुळे आम्ही तेथे गेलो. तो योग्य पर्याय आम्ही निवडला. कारण आम्ही तिथे पोहचल्यावर बाजूलाच अरसिकेरेसाठी गाडी लागली होती.
हगरे ते हसन २३ किमी आणि हसन ते अरसिकेरे अंतर ४४.५ किमी, असे आम्ही ६७.५ किमीचा एकूण दोन तासाचा प्रवास केला.
अरसिकेरेला आम्हाला हॉटेल शोधायला जास्त त्रास झाला नाही. बस स्थानकाच्या बाहेरच आम्हाला हॉटेल मिळाले. कोणी तरी दुसऱ्या दिवशी लग्नासाठी तेथील ३/४ वातानुकूलित हॉटेल रूम्स आरक्षित करून ठेवल्या होत्या. तरी त्यातील एकाने (रवी रेसिडेन्सी हॉटेल) आम्ही दुपारी १ वाजेपर्यंत निघून जाऊ सांगितल्या मुळे, तिघांसाठी ९५० रुपयात एक रात्री साठी फॅमिली रम दिली, हॉटेल ही चांगले होते.
तिथे पोहचल्यावर आम्ही पहिली चहा पिऊन घेतली. रस्त्याला उतरल्यावर आपल्याला दोन्ही बाजूला गावात जाणारा रस्ता दिसतो. रस्त्याच्या पलीकडे चन्नकेशवा मंदिर आणि ह्या बाजूला सोमेश्वरा मंदिरकडे आहे. दोन्ही मंदिर ५ मिनिटात चालत पोहचतो.
चन्नकेशवा मंदिर (श्री लक्ष्मीनरसिंह स्वामी) |
मंदिर बंद असल्यामुळे, बाहेरूनच बघून पुन्हा अरसिकेरे साठी निघालो.
सोमेश्वरा मंदिर |
अरसिकेरेला आम्ही नाश्ता करून, ईश्वरा मंदिर बघायला गेलो. मंदिर बस आगार पासून अंदाजे १ किमीवर आहे, त्यामुळे आम्ही चालत गेलो. १५ मिनिटात आम्ही तिथे पोहचलो. ह्या मंदिराच्या सुद्धा आतील फोटो काढायला देत नाही. मंदिर परिसर ASI ने सुंदर ठेवले आहे. तसेच मंदिर परिसरात काही वीरगळ आणि शिलालेख पण ठेवले आहेत.
मंदिर बघून आम्ही पुन्हा जाते वेळी मंदिरा पासून काही अंतरावर वाटेतच, एक प्राचीन जैन मंदिर लागते ते बघायला गेलो. ह्या मंदिराला कळस नाही आहे. त्यामुळे कळून येत नाही. पण मंदिराच्या समोरच काही शिलालेख, मंदिराच्या कळसाचा भाग ठेवला आहे. त्याचा बाजूलाच विष्णूची एक प्राचीन ३/४ फुटाची मूर्ती हि आहे. हे मंदिर ASI च्या अखत्यारीत आहे का नाही माहित नाही. कारण त्या मंदिर परिसरात राहणारी लोक देखभाल करत होते. बरं कां ह्याला पण टाळे लावले होते.
ईश्वरा मंदिर |
टीपटूर स्थानकातील कर्मचारी कन्नडच जास्त बोलत असल्यामुळे, बस बद्दल हिंदी मधून विचारले असता. ते कन्नड मधूनच जास्त सांगत होते. त्यामुळे नीट समजत ही नव्हते. एकाने थोडे हिंदीत सांगितले, मग आम्हाला कळाले की अरलगुप्पेसाठी गाडीला बराच वेळ आहे.
सचिनला थोडी कन्नड भाषा वाचता येत असल्यामुळे तो गाडीची नावे वाचायचा. मग आम्ही वाहक किंवा चालकला
जाते का विचारून गाडीत बसायचो. त्याच्यामुळे आम्हाला पुर्ण भ्रमंतीत बराच फायदा झाला
तुरुविकेरे मध्ये होयसाळा राजवटीतील ३ लहान मंदिरे आहेत. चन्नकेश्वा मंदिर, मुले शंकरेश्वरा आणि श्रीगंगाधेश्वरा मंदिर.
आम्ही आधीच गुगल मॅपवर मंदिर पहिले होते. त्यामुळे आम्ही तुरुवेकेरे बस स्थानकात न जाता बस जेथे स्थानकात जायला वळते, तिथे आम्ही बाहेर उतरलो. त्यामुळे आमचं ५ मिनिटाचे चालणे वाचले.
चन्नकेश्वा मंदिर:
१० मिनिटात आम्ही चन्नकेश्वा मंदिर जवळ पोहचलो. इतर प्राचीन मंदिराच्या तुलनेत हे मंदिर खूपच लहान आहे आणि मंदिराच्या बाहेरील भिंतीवर आणि कळसावर एकही शिल्प नाही. फक्त पाषणाचे मंदिर आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजाला टाळे होते. तेथे पुजाऱ्याचा नंबर दिला होता. आम्हाला शेजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, आम्ही त्यांना संपर्क केला परंतु त्यांचे कोणी तरी इस्पितळात भरती असल्यामुळे येऊ शकत नाही असे सांगितले. मग काय, आम्ही लगेच निघालो, कारण बाहेरून बघण्यासारखे असे काही नव्हते.
चन्नकेश्वा मंदिर , तुरुवेकेरे |
हे गंगाधरेश्र्वर मंदिर होते. रस्त्याला असलेला मुख्य दरवाजा बंद होता. म्हणून आम्ही बाजूला असलेल्या गल्लीत गेलो. मंदिर परिसराच्या बांधाच्या भिंतीला लहान दरवाजा उघडा होता. तिथून आम्ही आत गेलो. इथून आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूने गेलो.
मंदिर सध्याच्या नेहमीच्या मंदिरासारखे दिसत होते .
मंदिराच्या एका बाजूचा दरवाजाच्या बाहेरील मंडपाच्या खांबावर काही शिल्पे आणि एक शिव भक्ताची
कथा दिसत होती आणि त्या मंडपाच्या आतील कळसाला एक भली मोठी, साधारण ३ ते ४ फूट उंच आणि २/३ फूट रुंद अखंड दगडाची घंटा आहे. ते पाहून आम्ही मंदिराचा मुख्य गाभराच्या दरवाजा जवळ पोहचलो. ह्या मंदिराचा दरवाजा पण बंद होता. पण मंदिराच्या समोर दगडी खांबाचे मोठे मंडप आहे, त्यात समोर मोठा नंदी आहे. साधारण १० फूट रुंद आणि उंच, जर मुख्य दरवाजाने मंदिरात आलो तर पहिला आपण ह्या मंडपातून नंदीचे दर्शन घेऊन मंदिरात जाऊ. मंदिरात प्रवेश केल्यावर नंदीच्या अगोदर दरवाजाच्या डाव्या बाजूला अजून एक खोली लागते. बहुतेक तिथे ही प्राचीन अथवा नवीन मुर्ती असावी पण त्याचा ही दरवाजा बंद होता.
जातेवेळी आम्ही मुख्य दरवाजाच्या फटीतून बाहेर पडलो.
तेथून बाहेर पडल्यावर डावीकडे चन्नाकेश्र्वरा मंदिर दिसते आणि उजवीकडे रस्त्याला काही पावले चालल्यावर
गंगाधरेश्वर मंदिर,तुरुवेकेरे. ह्या फोटो मध्ये दगडाची घंटेचा एक फोटो आहे. |
हे मंदिर प्राचीन पण मध्यम आकाराचे आहे. ह्या मंदिराच्या भिंतीवर ही एकही शिल्प दिसत नाही.
मंदिराच्या परिसराला बांध आणि लोखंडी दरवाजा आहे. तो बंद असल्यामुळे आम्हाला मंदिर परिसरात ही जाता आले नाही. आणि बांधाची भिंत थोडी उंच असल्यामुळे आम्ही बाहेरूनच गेलो.
मुले शंकरेश्वरा मंदिर, तुरुवेकेरे |
अरलगुप्पेचा चेन्नकेशवा आणि श्री कल्लेश्वरा मंदिर
आम्हाला आता अरलगुप्पेचा (Aralguppe) चेन्नकेशवा आणि श्री कल्लेश्वरा मंदिर बघायला जायचे होते, त्यासाठी आम्ही बस बघायला गेलो.
प्रवास वर्णन
तुरुवेकेरे वरून अरळगुप्पेसाठी थेट बस नाही आणि तिपटूर ते अरळगुप्पे ठराविक आणि वेळेत बसेस आहेत.
तिपटूर ते अरळगुप्पे आतील गावातून रस्त्याने २० किमी, तिपटूरला परत जातेवेळी आमची बस ह्या मार्गाने गेली, आम्हाला अर्धा तास लागला आणि टीपटूर-टुमकुरू-बेंगळुरू महामार्गावरून बिळिगेरे (बिळिगेरे) वरून २५ किमी आहे.
तुरुवेकेरे ते अरलगुप्पे (एन मंचेना हल्ली/न.मंचेना हल्ली रस्त्याने ) अंतर १४ किमी आहे आणि तुरुवेकेरे ते अरलगुप्पे वाया बंसन्द्रा (Banasandra ) फाटा अंतर १८ किमी आहे साधारण अर्धा तास लागतो. तुरुवेकेरे वरून अरलगुप्पेसाठी थेट बस नव्हती मग आम्ही किबानहळ्ळी (Kibbanhalli cross) वरून जाणारी हुलीयारची (Huliyar ) बस पकडून बंसन्द्रा गावात उतरलो.
तुरुवेकेरे ते बंसन्द्रा अंतर 12 किमी असून, हा राष्ट्रीय महामार्ग १५०अ असल्यामुळे आम्ही १० मिनिटात पोहचलो. तेथून पुढे बंसन्द्रा ते अरळगुप्पे अंतर ६.४ किमी आहे. त्यासाठी आम्ही फक्त तेथे जाण्यासाठी १५० रुपये देऊन रिक्षा केली.
चेन्नकेशवा मंदिर:
चार वाजता आम्ही चेन्नकेशवा मंदिरात पोहचलो. हे मंदिर होयसाळा कालखंडात इसवीसन १२५० मधील आहे. मंदिरात विष्णूची मूर्ती आहे. पण इथे ही मंदिराच्या आत फोटो काढायला देत नाही (मोबाईलने पण) आणि मंदिरात लाईट पण नव्हती. त्यामुळे चोरून लपून काढायचे झाले तर मोबाईलने चांगले येतील. मंदिरातील मुख्य दैवत श्रीविष्णु आहे.
मंदिराच्या मागच्या बाजूचा चौथरा अर्ध चांदणीच्या आकाराचा आहे. मंदिराच्या बाहेरील शिल्प ही सुंदर आहेत. मंदिर बघून आम्ही तेथूनच जवळच असलेल्या श्री कल्लेश्वरा मंदिर बघायला गेलो. अगदी पाच मिनिटात चालत आम्ही तेथे पोहचलो.
चेन्नकेशवा मंदिर, अरलगुप्पे |
हे शिवाचे मंदिर नवव्या शतकातील असून, नोलांबा राजशाहीतील आहे (असे विकिपीडिया वर आहे). मंदिर बहुतेक रंगवल्यामुळे नवीनच बांधकाम केल्यासारखे वाटत होते. मंदिराचं बांधकाम होयसाळ राजवटीतील नसल्यामुळे मंदिराच्या बाहेरील भिंतीवर शिल्प न दिसता, सध्याचा काळातील मंदिरासारखी भिंती दिसतात. आम्हाला फक्त मंदिराची द्वार शाखा नक्षीदार दिसली. मंदिराचे द्वार बंद असल्यामुळे, आम्हाला आत जाता आले नाही. मंदिराच्या मंडपाला लागून अजून दोन लहान देवडी सारखी मंदिरे आहेत. त्यात काही प्राचीन मुर्त्या आहेत. पण त्याला ही टाळे असल्यामुळे, नीट पाहता आले नाही. तरीही दरवाजाच्या फटीतून जेवढे दिसत होते त्यातून आम्ही पाहिले.
मंदिर परिसरात काही वीरगळ आहेत, तसेच मंदिराच्या बाजूला तळे आहे. १५ ते २० मिनिटात आमचा हे मंदिर बघून झाले.
श्री कल्लेश्वरा मंदिर, अरलगुप्पे |
अरलगुप्पे ते तिपटूर प्रवास वर्णन
आम्हाला तिपटूरला जायचे होते. त्यासाठी गावातून ४.४५ किंवा ५.०० ची शेवटची तिपटूर बस होती. हि बस तिपटूर वरून येते आणि तशीच लगेच पुन्हा जाते. बस जरा उशिरा म्हणजे ५.२० ला आली. वर सांगितल्या प्रमाणे ही बस आतील रस्त्याने गेली. आम्ही संध्याकाळी सव्वा सहा पर्यंत तिपटूरला पोहोचलॊ.
तिपटूरला बस स्थानकाच्या आधी १ ते १.५ किमी अंतरावर तलावाच्या बाजूला एक नवीन पुष्कर्णी सारखा छोटा तलाव आहे. त्याच्याच जवळपास पलीकडील रस्त्याला, मंदिर परिसराजवळ रस्त्यालाच ४-५ विरगळी उघड्यावर ठेवलेल्या दिसतात, आम्ही ते पाहून हॉटेल मध्ये नाश्ता करायला गेलो.
पुढील भागात
अशा प्रकारे आमचा दिवस इथे संपला. तिपटूर वरून आमची रात्री १०.३०ची हुबली साठी ट्रेन होती. कारण उद्या १७ फेब्रुवारीला आमचा गंजगट्टीची अश्टदिगपाल चौकट, हंगलचे तारकेश्र्वर मंदिर आणि सिरसीचे सहस्त्रलिंग करायची योजना होती. ह्या प्रवासाचा अनुभव कर्नाटक भाग ४ मध्ये लिहीला आहे.
खाली प्राचीन कर्नाटक भाग १ ची दुआ/साखळी दिली आहे.
No comments:
Post a Comment