Tuesday, 23 June 2020

दतिया, ओरछा आणि झाशी - भाग १- दतिया

दतिया, ओरछा आणि झाशी

भाग १-दतिया

दिनांक- ४ ऑकटोबर, २०१९

मध्यप्रदेश राज्यामधील हे दोन गाव दतिया आणि ओरछा. पण त्यासाठी तुम्हाला उत्तरप्रदेश मधील झांसी रेल्वे स्थानक जवळ आहे. कारण झांसी ते दतिया हे अंतर ३० किमी आहे. दतियासाठी काही मेल एक्सप्रेस आणि पॅसेंजर ट्रेन पण जातात पण खूपच ठराविक आहेत आणि त्या वेळेत येतील कि नाही त्याचा भरवसा नाही. त्यापेक्षा बसने गेलेलं बरं. इथे राज्य परिवहनचा बसेस नाहीत म्हणून खाजगी बसेस चालतात.

झाशी बस आगर मधून तुम्हाला दतिया साठी दर तासाला एक बस आहे. ह्याच बस आगारचा बाहेरून ओरछाला जायला सुद्धा शेअर रिक्षा मिळतात. ओरछासाठी पण बस आहेत, पण बस तुम्हाला ८ते १० किमी बाहेर फाट्यावर सोडतात. त्यामुळे ओरछाला बहुतेक सगळेजण हे टमटम/वडाप रिक्षाने प्रवास करतात. झांसी ते ओरछा अंतर १९ किमी आहे.

दतिया
दतिया, हे ओरछासारखे पर्यटकांमध्ये किती प्रसिद्ध आहे.  हे माहित नाही, कारण इथे आम्हाला स्थानिक पर्यटकच  जास्त दिसले. झासीला हॉटेल मधील एका कर्मचारी ने आम्हाला दतियाबद्दल सांगितले तसे आम्ही दतियाला जाऊन आलो.

दतियाला बघण्यासारखं बरच आहे पण मुख्य करून राजा वीर सिंग महाल (बीर सिंग पॅलेस) आणि राजांचा छत्री बघण्यासारखी आहे. दोन्ही एकमेकांचा विरुद्ध दिशेला आहे. इथे लोक वीर नाही तर बीर सिंग महाल म्हणतात

आम्ही दतिया बस आगारला पोहचल्यावर राजांचा छत्री बघायला गेलो. बस आगार पासून छत्री चालत १० ते १५ मिनटं अंतरावर आहेत. दतियाचे राजे आणि राजघराण्यातील इतर व्यक्तीच्या हि छोट्या समाधी आपल्याला दिसतात. ह्या छत्री करण सागर तलावाच्या काठावर आहेत. काही छोट्या समाधी पाण्यात अर्धंबुडलेल्या दिसतात. ह्या छत्रीच्या समूहात पाच छत्री मोठ्या आहेत. त्यातील दरवाजाने आत आल्यावर उजवीकडील  तीन छत्र्या मुख्य दिसतात. ते पुढील प्रमाणे सांगतो.

मुख्य दरवाजाने आत आल्यावर उजवीकडे राजा भवानी सिंग, परीक्षित, विजय बहादूर ह्यांच्या छत्री एका रेषेत लागून आहेत. ह्या तीन छत्रीच बांधकाम सुंदर आहे. छत्रीच्या घुमटाच्या आतील छताच्या भागावर सुंदर चित्र काढली आहेत. विशेष करून श्रीकृष्णची ती हि गोपिका बरोबर नृत्य करताना दिसतात. त्यामुळे ह्या तीन छत्री मुख्य करून पाहण्यासारख्या आहेत.

तर डावीकडे राजा इंद्रजित आणि शुभराज ह्यांची समाधी आहेत. ह्यात इंद्रजित ह्याची समाधी छोटी आहे. शुभराज ह्याची छत्री मोठी आहे पण  हि समाधी बाकी तीन समाधी सारखी नाही. आणि काही ठिकाणी पडायला आल्यासारखी वाटते.

छत्री बघून आम्ही पुन्हा बस आगार जवळ गेलो. बस आगारमधून वीर सिंग महालला जाण्यासाठी किलाचौकला जाणारी शेअर टमटम रिक्षा/ वडाप आहेत. त्यासाठी प्रत्येकी १० रुपये घेतात आणि हे अंतर अंदाजे २ किमी आहे. त्यांना बाजार सांगितले कि ते आपल्याला त्या बाजारात सोडतात किंवा रिक्षावाल्याला बीर सिंग महालला जायचा सांगा, मग तो आपल्याला बरोबर त्या बाजारात त्या वाटेवर सोडतो.

तिथून ५ मिनटात तुम्ही महालाजवळ पोहचतात. ह्या वाटेवरच बाजार आहे. इथून किल्ला चौक चालत ५ मिनिटावर आहे. किल्ला चौकात एक दरवाजा आहे, या दरवाजाचा समोरच एका राजाचा पुतळा आहे. त्याकाळी हा दरवाजा किल्ल्यात येण्याचा एक प्रवेशद्वार असावा. मला असे वाटते, बहुतेक गावात अजून हि एक-दोन दरवाजे कुठे तरी  असतील.

गुगल नकाशा बघितलं तर आपल्याला महालाच्या पाठीमागे तलावाच्या बाजूने तटबंदी दिसते. ह्याचा वरून अंदाज येतो. पूर्ण महाल आणि गाव त्याकाळी तटबंदीच्या आत असावी. आणि त्याला काही दरवाजे अजून असतील. पण कालांतराने आता गावाचा वाढत्या अतिक्रमणाने तटबंदी नष्ट झाली असावी.

पण महालाचा वरती गेल्यावर पूर्ण दतिया गावाचं दृश्य दिसते. त्या वेळी आपल्याला अजून छोटे मोठे वाडे / हवेली  हि दिसतात. समोरच आपल्याला दूरवर राजगड महाल दिसतो. 

आम्ही जरा उशिरा म्हणजे सकाळी ११ पर्यंत दातियाला पोहचलो, त्यामुळे आम्हाला जास्त फिरता आल नाही. पण छत्री आणि महाल बघण्यात जास्त वेळ गेला. त्यामुळे आम्हाला अजून कुठे जास्त फिरता आले नाही. तलावात आणि त्याचा काठावर पण झुडपात काही तरी मोडक्या वाड्यासारखे दिसते. त्यासाठी बहुतेक राजगड महालचा इथून खाली गावात वाट जायत असावी. पण तेथे कोणी जात नसावे कारण तेथे झाडे झुडपे खूप दिसत होती. ह्याच राजगड महालाच्या बाजूला खाली गावात एक प्राचीन चीन मंदिर हि आहे. आम्ही वेळे अभावी तेथे गेलो नाही.

महाल ६/७ मजली आहे.बाहेरून आपल्याला ४ मजले  दिसतात आणि चौथ्या मजल्यावर मध्य भागी अजून ३ मजले आहेत. बाकी महालाच जास्त वर्णन करत नाही त्यासाठी मी फोटो टाकले आहेत.

आम्ही महाल बघून राजगड महाल बघायला गेलो. आम्हाला बीर सिंग महालचा तिकिट देणाऱ्याने सांगितले होते, तो राजगड महाल आता कायमचा बंद केला आहे. तो महाल आता खाजगी मालमत्ता आहे आणि त्याचा उपयोग बहुतेक हॉटेल साठी करणार आहेत. तरी पण आम्ही बघायला गेलो. किल्ला चौक मधून दतिया स्टेशनला जाणारी शेअर रिक्षा पकडावी. आणि त्यांना पितांबरी माता मंदिर सांगावे. त्यासाठी रिक्षावाले प्रत्येकी १० रुपये घेतात. पितांबरी देवीच्या मंदिरा समोरच रस्त्या पलीकडे एका टेकाड वर महाल आहे.

श्री पितांबरी माता मंदिर हे तेथील प्रसिद्द तीर्थपीठ आहे. पण ते प्राचीन न दिसल्यामुळे आणि सामान हि बाहेर जमा करायला लागत असल्यामुळे, आम्ही फक्त महाल बघायला गेलो. राज महालाच्या सुरक्षा रक्षकाला सांगून महालाचे फक्त दरवाजावरून फोटो काढून, आम्ही पुन्हा झांसीला जायायला निघालो. ह्या महाला कडून वीर सिंग महालाच पूर्ण दृश्य सुंदर दिसते.

दातियाला पूर्ण एक दिवस किंवा जास्तीत जास्त दीड दिवस काढून फिरलो, तर अजून बरेच काही छोट्या मोठया  हवेली, तटबंदी बघायला भेटतील. पण ह्यातील काही खाजगी संपत्ती असावेत तर काही पडीक दिसतात. पण वेळे अभावी आम्ही फक्त मुख्य ठिकाण बघून निघालो. आम्हाला झाशीला पोहचेपर्यंत ७ वाजले त्यामुळे बाकी जास्त फिरता आले नाही.


झाशीचा किल्ला आणि ओरछा बद्दल वाचण्याकरिता भाग २ पहावा . त्यासाठी मी खालती दुआ/साखळी दिली आहे. https://kunalstrek.blogspot.com/2020/06/2.html


दतिया छत्री समूह


दतिया छत्री समूह

दतिया छत्री  समूह मधील तीन मुख्य छत्रीच्या आतील छता वरील चित्र

तीन मुख्य छत्रीच्या आतील छता वरील चित्र आणि भिंतीवरील चित्र कलाकारी











 तीन मुख्य छत्रीच्या बाहेरील भिंतीवर असे चित्र आहेत






वीर सिंग महाल ( राज महाल कडून काढलेला फोटो)

वीर सिंग महालचा मुख्य दरवाजा 



महालाचा आतील छतावरील  चित्र




महालाच्या चौथ्या मजल्यावरून दिसणारे दतिया  शहराचं दृश्य. दूरवर आपल्याला राजमहाल दिसत आहे

महालाच्या बाजूला असलेल्या तलावाचं दृश आणि त्यामध्ये अवशेष आहेत.

हा वाडा, किल्ला चौकात आहे. आणि महालाचा बाजूला आहे. पण बहुतेक इथे आत जाण्यास परवानगी नाही.

राजमहाल 

राजमहालचा दरवाजा वरून काढलेला फोटो

राजमहालचा इथून ह्या मंदिराजवळ जायला रस्ता आहे.

झाशीचा किल्ला आणि ओरछा बद्दल वाचण्याकरिता भाग २ पहावा . त्यासाठी मी खालती दुआ/साखळी दिली आहे. https://kunalstrek.blogspot.com/2020/06/2.html

Wednesday, 17 June 2020

कर्दमेश्र्वर महादेव मंदिर, वाराणसी. Kardameshwar Temple, Varanasi

कर्दमेश्वर मंदिर, वाराणसी

आम्ही काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेऊन अस्सी घाट बघायला गेलो. तेथून पुढे आम्हाला कर्दमेश्र्वर मंदिर पहायला जायचे होते. काशी मंदिर ते कर्दमेश्र्वर मंदिर अंतर हे अंदाजे ९ किमी आहे. कर्दमेश्वर मंदिर कन्दवा
गावात आहे. 

आम्ही अस्सी घाट बघायला आलो होतो. तेथून जवळच असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांचे जन्मस्थान स्मारक बघितले.  तेथून आम्हाला मंदिर बघायला जायचे होते, त्यामुळे एका रिक्षावाल्याला भाडे विचारले. त्यांनी फक्त तेथे सोडायचे २०० रुपये सांगितले शेवटी तो १५० रुपये वर आला. आम्ही दोघेच  असल्यामुळे आम्हाला ते महाग वाटले पण जर तिघेजण असतो तर शेअर रिक्षा एवढेच झाले असते.

सागर नको म्हणाला, मग आम्ही पुढे चालू लागलो. अंदाजे १. ५ किमी चालल्यानंतर आम्ही बनारस हिंदूविश्वविद्यालय जवळ पोहचलो. ह्या विभागाला लंका असे पण म्हणतात (लंका पोलीस स्थानक पण आहे). तेथून आम्हाला कळाले की इथून पुढे शेअर रिक्षा बदलत चितईपुर जवळ पोहोचता येते, मग आम्ही ४ रिक्षा बदलत कर्दमेश्र्वर् मंदिरा जवळ पोहचलो. 
काशी विश्वनाथ मंदिर जवळून पण शेअर रिक्षा भेटते पण ती ही लंकाला बदलायला लागते. आम्ही कुठून कुठं पर्यंत रिक्षा बदलत गेलो ते सांगतो.

पहिली रिक्षा - काशी विश्वनाथ मंदिराच्या गोदौलिया सर्कल मधून लंका साठी ( किंवा बनारस हिंदू महाविद्यालय पर्यंत ) भेटते त्यासाठी प्रत्येकी २० रुपये घेतात. ही रिक्षा तुम्हाला अस्सी घाटच्या रस्त्यानेच घेऊन जाते, मंदिर ते लंका हे अंतर ४ किमी आहे. 

दुसरी रिक्षा - लंका (बनारस हिंदूविश्व विद्यालय) पासुन नारिया साठी शेअर रिक्षा भेटते त्यासाठी प्रत्येकी १० रुपये घेतात आणि हे अंतर अंदाजे १ किमी आहे. 

तिसरी रिक्षा -  नारीया ते DLW पर्यंत भेटते त्यासाठी प्रत्येकी २० रुपये घेतात आणि हे अंतर २.८ किमी आहे.
DLW चौकात (सर्कल) मध्ये उतरल्यावर चितईपुर पोलीस चौकीसाठी रिक्षा उभ्या असतात. 

चौथी रिक्षा - DLW ते चितईपुर पोलीस चौकी त्यासाठी प्रत्येकी 10 रुपये घेतात आणि हे अंतर अंदाजे १.५ किमी आहे. पोलीस चौकी मुख्य रस्त्याला आहे. ( इथुन रिक्षा अजून कुठे तरी पुढे जाते ).  तेथे उतरल्यावर रस्त्यापलिकडे एक छोटा रस्ता कन्दवा गावात जातो, पण रस्त्याला कर्दमेश्र्वरचा नावाचा मोठा फलक आहे, म्हणून लगेच कळण्यात येते. पोलीस चौकी वरून पुढे मंदिराजवळ जायला रिक्षा मिळत नाही. मग आम्ही चालत निघालो आणि हे अंतर अंदाजे १ किमी आहे. आम्हाला मंदिराजवळ पोहचायला साधारण १५ मिनिटे लागली. 

वाराणसी कँट ( रेल्वे स्थानक) वरून पण चिताईपुरला थेट शेअर रिक्षा आहे. कारण आम्ही परत जाते वेळी कँटला जाणारी रिक्षा पकडून DLW (Circle) चौकात उतरलो. रिक्षावाले फक्त कँन्ट म्हणतात पण ते बहुतेक वाराणसी कॅन्ट किंवा जंक्शन रेल्वे स्थानकला जातात.

काशी विश्वनाथ मंदिरवरून चिताईपुर पर्यंत शेअर रिक्षा बदलत जायला लागते, थेट शेअर रिक्षा मिळत नाही. 

मंदिर वर्णन: 
मंदिर नागर शैलीत आहे. शिखरावर अंगशृंग व उरुशृंग पाहायला मिळतात. मंदिर शिवाचे आहे. मंदिरा बद्दल मी जास्त वर्णन करत नाही ते फोटो वरून कळेलच आणि बाकी माहिती विकिपिडिया वर मिळेलच. मंदिर एका तलावाकाठी आहे त्यामुळे बघायला सुंदर वाटते. मंदिराच्या भिंतीवर आपल्याला मोजकीच शिल्पं दिसतात त्यात मुख्य करून शिवाची आहेत, ब्रह्म आणि विष्णूची ठराविक दिसतात. आम्ही गेलो तेव्हा मंदिर बंद होते. त्यावेळी तेथे काही मुले बसली होती त्यांनी आम्हाला दरवाजा उघडून दिला. आम्ही दर्शन घेऊन पुन्हा मंदिर पाहू लागलो.

मंदिराच्या समोर रस्त्याच्या पलिकडे समोर सूर्याची प्राचीन 2 फुटाची मुर्ती ठेवलेली आहे. ही मूर्ती ज्या कातळावर आहे, तो कातळ चौकोनी आहे. त्याच्या बाकीच्या तिन्ही बाजूला शिल्पे आहेत. त्यांचे ही फोटो मी दिले आहेत. चुकून माझा एका बाजूचा फोटो delete झाल्यामुळे चौथ्या बाजूचा फोटो टाकता आला नाही.
मंदिर बघून आम्ही १५ मिनिटात तेथून निघालो आणि आलो तसेच रिक्षा बदलत बदलत पुन्हा काशी मंदिर जवळ पोहचलो.

मंदिराच वर्णन आणि शिल्पं ची नाव सागर पाटील ने सांगितल्याबद्दल धन्यवाद

मंदिराचं तलाव काठी दिसणारा दृश्य



गजासुर वध

उमामहेश्वर


नटेश्वर शिव

वामन

उजवीकडील शिल्प बलराम व रेवतीचे आहे. त्यात बलराम हल  घेऊन उभा आहे आणि मागे सर्प फणा  आहे. डावीकडे अर्धनारेश्वर चा शिल्प आहे









मंदिर समोरील सूर्याची मूर्ती आणि खाली त्याचा तिन् बाजूला असलेली शिल्प. एक बाजूचा फोटो माझा delete  झाल्या मुळे  टाकता आला नाही. वरती शिवाची पिंड आहे



















Monday, 13 January 2020

Mangalgad Trek /Kangori gad Trek



मंगळगड/ कांगोरीगड 

 मंगळगड / कांगोरीगडाच्या ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  




मंगळगड (कांगोरीगड) ची योजना नेहमीप्रमाणे प्रणवने केली, त्यासाठी व्हाट्सअँप संघावरील मित्रांना विचारून बघितले. होय नाही करता शेवटी आम्ही तीनजणच तयार झालो. प्रणव, मितेश आणि मी. प्रणवने एसटीची माहिती काढून ठेवली होती. त्याप्रमाणे आम्ही त्या एसटीचे शनिवारी रात्रीचे आरक्षण करून ठेवले होते.

प्रवासाबद्दल महत्वाची थोडक्यात माहिती:
मुंबई ते मंगळगड अंतर १९५ किमी
महाड ते मंगळगड २५ किमी
ठाणे सिबीएस ते गोठवली रात्री १२.३० एसटी
एसटी पनवेल, महाड ते बिरवाडी मार्गे जाते.
उतरायचे स्थानक पिंपळवाडी गाव, गोगावले वाडी.

मंगळगड ते मुंबई
दुपारी १२.३० ची बिरवाडी/ महाड पर्यंत एसटी आहे. त्यानंतर ३ ची शेवटची एसटी आहे.
पण रविवारी बहुतेक दुपारी १२.३० गाडी नसते त्यासाठी गावातल्या लोकांना अगोदर विचारणे.
बिरवाडीतून महाडला जाण्यासाठी सतत एसटी आणि रिक्षा भेटतात.
पण पिंपळवाडीतून बिरवाडीसाठी आम्हाला रिक्षा दिसल्या नाही. 

 


मुंबई ते मंगळगड प्रवास वर्णन

मंगळगड ह्याला कांगोरीगड असेही म्हणतात. गडाच्या पायथ्याचे गाव पिंपळवाडी, गोगावले वाडी. त्यासाठी ठाण्यावरून रात्री १२.३० ची ठाणे सिबीएस (खोपट) ते गोठवली एसटी आहे. ही गाडी ठाणे - पनवेल - महाड- बिरवाडीमार्गे जाते. ही एसटी सकाळी ५.३० ला गोठवलीला पोहचते. आम्हाला ही बरोबर त्याच वेळेत गोगावले वाडीत पोहोचवले.

ही महाडला जाणारी शेवटची गाडी असल्यामुळे गाडीला गर्दी असते त्यामुळे आरक्षण करून ठेवलेलं उत्तम. आमची ही गाडी महाडपर्यंत पूर्ण भरलेली होती. जरी ही गाडी पकडता नाही आली तर मुंबई वरून कुठलीही महाडला जाणाऱ्या गाडीने महाडला पोहचावे, महाड बस आगार मधून बिरवाडी साठी एसटी बघावी. महाड ते बिरवाडी साठी बहुतेक एसटी असाव्यात. पण बिरवाडी ते पिंपळवाडी साठी गाडी भेटणं मुश्किल वाटते.

गडाच्या वाटेचे वर्णन:
गोगावले वाडीत रस्त्याच्या शेजारीच असलेल्या मंदिरात ५० ते १०० लोक राहू शकतात. आम्ही थोडे झोपायचा प्रयत्न केला आणि उजाडताच सकाळी ७.२० ला ट्रेकला सुरवात केली. मंदिराच्या समोरच रस्त्याच्या पलीकडे उजवीकडे एक मोठी प्रशस्त वाट डोंगरात जाताना दिसते. तेथे मंगळगडचा फलक ही लावला आहे. साताऱ्याच्या शिवत्व प्रतिष्ठान या किल्ल्यावर गडसंवर्धन करत होते. त्यांनी ही पायथ्याची वाट कच्चा रस्त्यासारखी प्रशस्थ केली आहे. त्यामुळे वाट लगेच दिसते. वाट घाटातील रस्त्यासारखी नागमोडी आहे. हि नागमोडी वाट साधारण तासाभरात आपल्याला टेकडीवर घेऊन जाते. साधारण वीस मिनिट चालून आल्यावर आपल्याला मंगळगडचा पूर्ण डोंगर दिसतो, तो पर्यंत आपल्याला गावातून दिसत नाही.

नागमोडी वाट आपल्याला टेकडीवर घेऊन जाते पण आपण टेकडीच्या पठारावर पोहचत नाही. कारण जेव्हा आपण टेकडीवर येतो तेव्हा एक वाट डावीकडे वर गडावर जाते तर दुसरी समोर टेकडीच्या पठारावर जाताना दिसते. त्यामुळे आपण गडावर जाणाऱ्या वाटेने वर चढायला लागतो. येथून आपल्याला खडा चढ लागतो.

ही वाट डोंगराच्या एक बाजूच्या टोकावर किंवा माचीच्या टोकावर नेते. तेथून डोंगराची धार पठारावर खाली येते, ह्या धारेवरूनच वाट चढावी लागते. त्यामुळे खडा चढ लागतो. साधारण वीस मिनिटे या धारेच्या वाटेने चढून आल्यावर आपल्याला समोर गडाचा कातळ लागतो. येथून आपल्याला उजवीकडे आणि डावीकडे अश्या दोन वाटा लागतात. त्यातील आपल्याला डावीकडील वाट गडावर घेऊन जाते. उजवीकडील वाट कुठे जाते माहित नाही पण ती गडावर जात नाही.

डावीकडील वाट पकडल्यावर आपल्या डाव्याबाजूला सतत दरी लागते तर उजव्या बाजूला गड. ह्या वाटेने चालताना आपल्याला मध्ये मध्ये काही ठिकाणी कातळाच्या तुटक पायऱ्या लागतात (त्या नक्की पायऱ्या होत्या सांगता येत नाही पण पायऱ्यासारख्या वाटत होत्या.). कातळापासून डावीकडील वाटेने आम्ही वीस मिनिटात गडाच्या माथ्यावर पोहोचलो.

गडाच्या दरवाजा जवळ पोहचल्यावर आपल्याला तटबंदी आणि बुरुज दिसतो आणि काही पायऱ्या आपल्याला दिसतात. त्यांनी आपण गडावर पोहचतो. गडाचा दरवाजा पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे.

गडमाथा:

साधारण दीड तासात आम्ही गडावर पोहचलो. गडाच्या दरवाजा जवळ पोहचल्यावर एक वाट उजवीकडे बालेकिल्ल्यावर जाते तर एक वाट समोरच्या कांगोरी देवीच्या मंदिर असलेल्या माचीवर घेऊन जाते.

कांगोरी देवीचे मंदिर आणि माची:
आम्ही प्रथम समोरील वाटेने मंदिराकडे गेलो. जाते वेळी पहिल्या आपल्याला काही प्राचीन मुर्त्या दिसतात. त्यापुढे पायऱ्याचे सुकलेले मोठ टाके लागते आणि त्याच्या बाजूला थोडे खाली उजवीकडे एक मोठ अरुंद असे लांबट टाके लागते, ह्या टाकीला ही उतरायला तुटलेल्या पायऱ्या दिसतात. टाकी पाहून पुढे मंदिराकडे गेलो.  मंदिर थोडे उंचावर बांधल्यामुळे त्याला थोड्या पायऱ्या आहेत.

मंदिरात कांगोरी देवी, भैरवाची मूर्ती आणि शंकराची पिंड आहे. मंदिराच्या बाहेरील गाभाऱ्यात अजून काही मुर्त्या ठेवलेल्या दिसतात. मंदिरात देवीचे दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या मागे बुरुजाकडे गेलो. मंदिराच्या मागे बुरुजापर्यंत पूर्ण तटबंदी बांधलेली दिसते. तिथे बुरुजावर ध्वजस्तंभ आहे. बुरुजावरून दिसणारे दृश्य खूपच रमणीय आहे.

बालेकिल्ला

दोन टाकी
बुरुजावरून आम्ही बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो त्यासाठी पुन्हा दरवाजा जवळून असलेल्या उजवीकडील वाटेने वर गेलो. ह्या वाटेने थोडे वर चढले कि एक वाट बालेकिल्ल्यावर जाते. पण त्या आधी उजवीकडे वाट जाते. त्या वाटेने गेलो असता पुढे डावीकडे ती वाट वळते. तिथे आपल्याला दोन कातळातील गुहेत खोदलेल्या टाक्या लागतात. त्यातील एक खांब टाकी आहे. दोनी टाकी लहान आहेत. खांबटाकीतील पाणी पिण्यायोग्य दिसल्यामुळे आम्ही ते पाणी प्यायला वापरले.

त्या टाकी बघून आम्ही पुन्हा बाले किल्याच्या दिशेने वर जाऊ लागलो. तेव्हा आपल्याला डावी कडे मोठी टाकी दिसते. ह्या टाकीतील पिण्यायोग्य नव्हते.  दरवाजापासून ५ मिनिटात बालेकिल्यावर पोहचतो.

दोन वाड्याचे अवशेष:
बालेकिल्ल्यावर दोन वाड्याचे अवशेष शेजारीशेजारी दिसतात. त्यातील एका वाड्याचा फक्त चौथरा बाकी आहे तर दुसऱ्या वाडयाच्या पडक्या भिंती आहेत.  तसेच इथे आपल्याला एक शिव पिंड आणि एक मूर्ती दिसते.

गडाची दुसरी माची:
वाड्याच्या बाजूने, उजव्याबाजूने  गडाच्या दुसऱ्या माचीवर वाट जाते. माचीकडे जाताना आपल्याला अजून एका वाड्याचे अवशेष दिसतात. पण ते झाडझुडपा मुळे जवळून पाहता येत नाही. त्यामुळे आम्ही ते बाहेरूनच पाहून पुढे माची कडे गेलो.

हि माची पहिल्या माची पेक्षा लहान असल्यामुळे आपण लगेच बुरुजाच्या टोकावर पोहचतो. ह्या माचीला तटबंदी दिसत नाही. बुरुजही नीट दिसत नाही. पण ह्या बुरुजावर आल्यावर आपल्याला आपण ज्या टेकडीच्या धारेवरून वर येतो ती वाट दिसते. थोडक्यात आपल्याला गडाचे हे टोक, गड चढताना सतत दिसत असतो.

परतीचा  प्रवास:
साधारण दीड तासात आमचा पूर्ण गड पाहून झाला आणि आम्ही ११ वाजता गड उतरायला सुरवात केली. कारण आम्हाला १२.३० ची एसटी पकडायची होती. आम्ही १२.१० पर्यंत गावात पोहचलो.

गावात गेल्यावर काही गावकऱ्यांने सांगितले रविवारी १२.३० ची एसटी नसते थेट ३ ची शेवटची एसटी आहे. एसटी बिरवाडी/महाड पर्यंत असते का ते माहित नाही. पण बिरवाडी वरून महाडला जायायला  एसटी किंवा रिक्षा मिळतात.

गाववाल्याने सांगितल्याप्रमाणे आम्ही पुढच्या गावातून एखाद दुसरी रिक्षा वगैरे मिळेल, म्हणून चालू लागलो. आम्हाला चांभारगड पण करायचा होता, त्यामुळे आम्ही जास्त वेळ न थांबता चालू लागलो. पण काही अंतरावर गेल्यावर आम्हाला गडावर भेटलेले काही मित्र त्यांच्या गाडीने दासगाव किल्ल्याला जात होते त्यांनी आम्हाला त्यांचा सोबत दासगावला नेले. त्यामुळे आमचा दासगाव किल्ला सुद्धा झाला अन्यथा आमचा चांभारगड पण नसता झाला.

मी दासगावच्या किल्ल्याचे वर्णन लिहित नाही, कारण आम्हाला किल्यावरील वाट सापडली नाही. त्यामुळे आम्हाला फक्त एक टाके दिसले, बाकी ही एक टाकी सोडून काही अवशेष सापडले नाहीत.

तेथून आम्ही महामार्गावर येऊन मुंबई साठी गाडी पकडली.


मंगळगड / कांगोरीगडाच्या ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  

टेकडीवरून धार वर चढून गेल्यावर गडाच आपल्याला एकाबाजुच टोक लागत. त्याचा कातळ लागतो तिथून डावीकडील वाट गडावर कशी जाते ते ह्या फोटोत पिवळ्या रेषेने दाखवलं आहे.

दरवाजा जवळून उजवीकडे गडावर वाट कशी जाते ते पिवळ्या रेषेत दाखवलं आहे. सुरवातीनंतर  वाट वर वळते आणि सरळ गडावर जाते. तर एकवाट उजवीकडे जाते आणि पुढे डावीकडे वळते तेथे पाण्याचा दोन टाक्या आहेत. त्यातील एक खांब टाकी आहे त्यातील पाणी आम्ही पिण्यास वापरले. टाक्या जेथे आहे तेथे २ बाणाचे चिन्ह जुळताना फोटोत दाखवले आहे.

हि टाकी दरवाजाकडून मंदिराकडे जातो त्या वाटेवर सुरवातीलाच लागते . पण हि टाकी वाटेचा खाली आहे आणि वाट निसरडी असल्यामुळे, आम्ही जाण टाळलं. हि टाकी तुम्हाला जेव्हा बालेकिल्ल्याचा दिशेने जातो तेव्हा मंदिराकडे जाणाऱ्या माचीच्या वाटेला दिसते






          




मंगळगड / कांगोरीगडाच्या ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा