Saturday, 29 September 2018

Tringalwadi Fort, त्रिंगलवाडी गड

 त्रिंगलवाडी किल्ला 


त्रिंगलवाडी गडाचे धरणाच्या भिंतीवरून दिसणारे दृश्य



 त्रिंगलवाडी ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  
https://youtu.be/A3v69AXmZEg

महिना झाला सतत काही कामामुळे मोरधन नंतर कुठेच ट्रेक केला नाही. त्यामुळे १६ सप्टेंबरचा रविवारी कुठचा तरी ट्रेक करायचा ठरवलं होत. पण सोबत कोणी येत नसल्यामुळे, एकटा जायायचा ठरवलं. त्यासाठी मी त्रिगलवाडी ट्रेक करायचा ठरवलं.

करीरोड-दादर ते इगतपुरी पर्यंतचा प्रवासाच वर्णन:
दादर वरून सकाळी  ६. २८ ची तपोवन एक्सप्रेस पकडली. इंजिनला लागून पुढे एकच जनरल डब्बा आल्यामळे, कल्याण येईपर्यंत तुफान गर्दी झाली. कसाबसा रेटत-ओरडत इगतपुरीला उतरलो. अस वाटलं, त्यापेक्षा कसाऱ्यापर्यंत लोकल ट्रेनने येऊन. शेअर गाडीने इगतपुरीलाआलो असतो, तर परवडला असता. कमीत कमी बसून तरी आलो असतो. मग येते वेळी इगतपुरी वरून २ तास ट्रेन नसल्यामुळे, कसाऱ्यावरून आलो. २० मिनटात इगतपुरी वरून रोडने कसाऱ्याला पोहचलो.

इगतपुरी रेल्वे स्थानक ते त्रिंगलवाडी पर्यंतचा प्रवासाचं वर्णन:
सकाळी ८. ५० ला इगतपुरीला पोहचलो. बाहेर जाऊन त्रिगलवाडी साठी शेअर जीप कुठे भेटतात म्हणून विचारला असता कळल. शेअर जीप आता बंद झाल्या आहेत. त्यासाठी रिक्षा करून जायायला लागेल. मग मी एसटी आगार मध्ये गेलो. तर तिथे कळलं त्रिंगलवाडीला जायायला एकही एसटी नाही.

आता पुन्हा पाठी फिरून चहा घेऊन दुसऱ्या कुठचा ट्रेक करता येईल का विचार करायचा ठरवलं. पुन्हा पाठी रिक्षा स्टॅन्डला आलो. एका रिक्षावाल्याला पुन्हा विचारला. त्याने मला त्रिगलवाडीला रस्ता जातो  तिथे जीप आहेत का बघायला सांगितले. आता मला हि माहिती होत, जीप नाहीत आणि त्याला हि. तरी हि मी बघायला गेलो.  

त्या रस्त्यात एका बाईक वाल्याला विचारला असता, तो हि मला तेच बोलला "जीप बंद" झाल्या.  तो बोलला, मी सोडतो तुम्हाला मी हि तिथेच चाललो आहे.  त्याचा नाव अर्जुन शेलार, खरतर त्याचा लिफ्ट देण्यामुळेच मी पुढे ट्रेक करू शकलो. त्याबद्दल मी त्याचा आभारी राहील. तरी हि माझ्या मनात प्रश्न पडला. परत येताना काही वाहन नाही भेटल तर?.  मग विचार केला येईल ५ किमी चालत.

नंतर मला अर्जुन आणि इतर गावातल्याकडून कळलं, इगतपुरी वरून गावात येण्या-जाण्यासाठी गाड्या
नसल्यामुळे. गावातील बहुतेक लोक बाईक वापरतात, त्यामुळे रस्त्यात कोणाकडे हि लिफ्ट मागितली कि देतात. त्यामुळे जातेवेळी हि, मी तसाच लिफ्ट मागत गेलो.

इगतपुरी वरून त्रिंगलवाडीला कसा रस्ता जातो त्याचे वर्णन:
इगतपुरी ते त्रिंगलवाडी अंतर ५ किमी आहे. इगतपुरी रेल्वे स्थानकाचा बाहेर आल्यावर इगतपुरी एसटी स्थानकासाठी रस्ता जातो. त्या रस्त्याने पुढे गेलो असता एक चौक लागते तेथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि बुद्ध विहार आहे. तिथून डावीकडे एक रस्ता वर जातो.  हा रस्ता त्रिंगलवाडीला जातो. रस्त्याने चालत गेलो तर अंदाजे १ ते १. ३० तास लागेल, पण रस्त्यामध्ये कुठे वस्ती लागत नाही. आणि एक छोटा घाट लागतो. 

बाइकवरून  १० मिनटात त्रिंगलवाडी गावात पोहचलो. तिथून त्यांनी मला धरणावरून चालत जायायला सांगितले. मी हि मग तिकडूनच गेलो. 

त्रिगलवाडी गाव ते त्रिगलवाडी किल्ल्या पर्यंतचा वाटेचे वर्णन:
दहा वाजता मी त्रिगलवाडी गावातून ट्रेक सुरु केला. गावामागे धरणावर एक वाट जाते. विचारात विचारात पाच  मिनटात मी धरणाजवळ पोहचलो. धरणाचा भिंतीवर आलल्यावर समोर धरणाच्या पलिकडे त्रिंगलवाडी किल्ला दिसतो. त्यासाठी आपल्याला धरणाच्या डाव्याबाजूने वाटेने जायायला लागते. त्यामुळे सतत डाव्याबाजूला डोंगर तर उजव्याबाजूला धरण लागतो.

समोर त्रिंगलवाडीचा वाटेने चालत असताना ध्यानात ठेवणे, डाव्या बाजूला लागणाऱ्या डोंगरावरती न चढता. त्याचा पायथ्याचा कडेने चालत राहणे. कारण काही ठिकाणी धरणाजवळची जमीन तारेचा कुंपण केला आहे. त्यामुळे वाट सुरवातीला धरणाच्या काठाने जाते. नंतर थोडी वरुनच जाते. गडाचा जवळ पोहचल्यावर मला लेण्याची वाडी लागली. वाडीतून १० मिनटात मी त्रिंगलवाडी गडाच्या पायथ्याचा लेणीजवळ पोहचलो

त्रिंगलवाडीतून लेणीपर्यंत पोहचेपर्यंत मला १ तास लागला. पण परत जाते वेळी ४० मिनटात गावात पोहचलो.  ११ वाजता मी लेणीजवळ पोहचलो.

पायथ्याचा लेणीचे थोडक्यात वर्णन:
गडाच्या पायथ्याशी ह्या जैन लेणी आहे. लेणीच्या आत चार दगडी खांबाचा मोठा गाभारा आहे. पण त्यातील एकच खांब अखंड आहे. गाभाऱ्याचा पुढे गुहेच्या खोलीत भगवान महावीरची मूर्ती भग्न अवस्थेत आहे.

लेणी पासून त्रिगलवाडी किल्ल्यावर जाणाऱ्या वाटेचे वर्णन: 
लेणीच्या डाव्याबाजूने गडावर वाट जाते. ह्या वाटेने मी १० मिनटात त्रिंगलगड डोंगराच्या सोंडेवर पोहचलो.
सोंडेवरून सरळ चढत गेल्यावर आपल्याला गडाच्या शिखराचा मुख्य कातळ लागतो. ह्या कातळाच्या दोन बाजूने, उजवीकडून आणि डावीकडून गडावर वाट जाते. 

मी सगळ्या ट्रेककर्स प्रमाणे डाव्या वाटेने गेलो. डाव्यावाटेने गेलो असता, आपल्याला कातळाच्या पायऱ्या आणि गडाचा दरवाजा लागतो. पायऱ्या चडून आल्यावर, समोर मारुतीची ७/८ फुटाची कातळावर कोरलेली मूर्ती दिसते आणि बाजूलाच उजवीकडे दरवाजा आहे.दरवाजाने  वर गेल्यावर आपण गडावर पोहचतो. 

बाराला दहा मिनटं असताना, म्हणजेच साधारण अर्ध्यातासात मी लेणी पासून दरवाज्याने गडावर पोहचलो.

त्रिगलवाडी किल्ल्यावरील पाहिलेल्या वास्तू:
दरवाज्याने वर आल्यावर एक वाट समोर जाताना दिसते. ह्या  वाटेने चालत गेलो असता आपण वाड्याचा अवशेषजवळ पोहचतो. 

वाड्याचे अवशेष 
ह्या पहिल्या वाड्याचा खाली थोड्या अंतरावर अजून एक वाड्याचे अवशेष दिसतात.  ह्या वाड्याचा बाजूने उजवीकडील वाट गडावर येते. ह्या वाटेचे वर्णन मी उतरतेवेळी शेवटी केले आहे. गवतामुळे मला वाडा नीट पाहता आला नाही. ह्या वाड्यांच्या व्यतिरिक्त तिथे आजूबाजूला ३ / ४  नुसते दगड रचून चौकोनी चौथरे केलेले दिसतात. पण त्यांना बघून प्राचीन अवशेष वाटत नाही.

पहिल्या  वाड्याचा येथे आल्यावर आपल्याला गडाच्या सर्वोच माथ्यावर जाताना एक वाट दिसते. ह्या वाटेने शिखर माथ्यावर पोहचता येते. पण ह्या वाटेने मी उतरलो आणि डावीकडील वाटेने पुढे गेलो. 

खांब टाकी किंवा गुहा आणि पाण्याचा तीन टाकी:
डावीकडील वाटेने पहिली मला गडावरील खांब टाकी किंवा गुहा लागली. टाकीचा बाजूला खाली एक आयताकृती टाकी लागते.  इथून वाटेने पुढे गेलो असता. मंदिर जवळ पोहचेपर्यंत, अजून दोन टाकी दिसतात. त्यातील एक जरा वाटेवरून उतरून बाजूला लागते. दोन हि टाकी बघून मी पुढे गडावरील मंदिराजवळ पोहचलो

गडावरील मंदिर:
मंदिरात दोन देवीच्या मूर्ती मध्ये गणपतीची लहान मूर्ती दिसते. मंदिराचा समोरील जागेत शंकराची पिंड आहे.  ह्या जागेच्या खाली बहुतेक समाधी सारखे दोन पाषाण दिसतात. 

शिखर माथ्यावर पोहचल्यावरचे वर्णन:
शिखर माथ्यावर जाण्यासाठी मंदिराचा पाठून माथ्यावर जाणारी वाट दिसते.त्या वाटेने मी ५ मिनटात शिखर माथ्यावर पोहचलो.  सगळे अवशेष बघून मी १२.३० ला शिखर माथ्यावर पोहचलो.

मंदिराच्या बाजूने वर आल्यावर, इथून समोर त्रंबक डोंगररांग स्पष्ट दिसत होती. इथून पुढे मी झेंड्याजवळ गेलो. तिथून त्रिंगलवाडी धरण आणि त्याचा पुढचा परिसर दिसत होता. तर त्याचा अजून डाव्या बाजूला डोंगराचा पाठी लांब कावनई  गड दिसत होता. उजवीकडे दूरवर डोंगररांग न दिसता. पठार आणि जंगल दिसत होता. डावीकडेच पाठी मध्य वैतरणा धरणाचं पाठीमागचा जलाशय दिसत होता.

पूर्ण गड पाहून झाला होता, मग माथ्यावरच जेवण करून सव्वा एकला गड उतरायला सुरवात केली. उतरतेवेळी  उजव्या वाटेने गड उतरायला सुरवात केली.  

उजव्या वाटेचे उतरतेवेळी वर्णन:
वर सांगितल्याप्रमाणे दुसऱ्यावाड्याचा बाजूने उजवीवाट वर येते. तिथूनच उतरायला सुरवात केली. 
वाड्याचा खाली आल्यावर आपल्याला कातळात कोरलेल्या तुटलेल्या पायऱ्या लागतात . पायऱ्यांचा वर आपल्याला भिंती सारखे अवशेष दिसतात. बहुतेक छोटा दरवाजा असल्यासारखे अवशेष वाटतात.  पायऱ्या  उतरतेवेळी उजव्याबाजूला एक छोटी गुहा लागते.  गुहेच्या पुढे पायऱ्या संपतात आणि वाट उजवीकडे वळते. आणि आपल्याला जेथे दोन वाटा लागतात तिथे घेऊन जाते.

२. ४० ला मी त्रिंगलवाडी गावात पोहोचलो. 

हि खालील माहिती, माझ्या आठवणी साठी मी लिहिली आहे
त्रिंगलवाडी गाव ते इगतपुरी पर्यंतचा परतीचा प्रवास कसा केला:
गावातून इगतपुरीला जातेवेळी गाडी नव्हती म्हणून चालायला सुरवात केली. गावातले बोलले वाटेत काही ना काही भेटेल. पाच मिनटं चाललो आणि तितक्यात एक डम्पर आला, त्याने मला पारदेवी फाट्याला सोडला आणि तो दुसऱ्या गावात गेला.  मग इगतपुरीच्या दिशने पुढे थोडा चाललो असता. एका बाईकवाला घाटा मध्ये चालला होता, त्यांनी मला तिथपर्यंत सोडला. पुढे मी घाट उतरू लागलो पुन्हा ५ते १० मिनटात दुसरा बाईक वाला आला. त्याने मला इगतपुरी रेल्वे स्थानकापर्यंत सोडला. अशा प्रकारे मी ३. १५ ला इगतपुरीला पोहचलो. काही गाडी नसती भेटली तरी मी ५ किमी म्हणजे साधारण १ ते दिड तास चालायची तयारी ठेवली होती. पण गावातल्याने सांगितल्याने मला गावातल्या लोकांनी लिफ्ट दिली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.


 त्रिंगलवाडी ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  
https://youtu.be/A3v69AXmZEg

लेणीच्या वाडीच्या अगोदर वाटेत हि शिळा दिसली, बहुतेक समाधी शिळा असावी.

गडावरील खांब टाकी किंवा गुहा आणि त्याचा बाजूला खाली टाकी दिसत आहे.

दुसरी टाकी

तिसरी टाकी

मंदिरातील मूर्ती

मंदिराच्या मागाहून शिखर माथ्यावर जाताना. हा शेंदूर लावलेला पाषाण दिसतो.

दुसऱ्या वाड्याजवळ आढळणारी खोबी

लेणीचे गाभाऱ्याचे दृश्य

गडाच्या शिखर माथ्यावरून दिसणारे दृश्य. पॅनोरमा मोड मध्ये टिपले आहे

गडाच्या शिखर माथ्यावरून दिसणारे दृश्य. पॅनोरमा मोड मध्ये टिपले आहे

गडाच्या शिखर माथ्यावरून दिसणारे दृश्य. पॅनोरमा मोड मध्ये टिपले आहे

धरणाच्या काठावरून पॅनोरमा मोड मध्ये टिपलेले दृश्य. 

 त्रिंगलवाडी ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  
https://youtu.be/A3v69AXmZEg

Friday, 24 August 2018

Mordhan fort मोरधन किल्ला

 मोरधन किल्ला 
मोरा किंवा मोरधन डोंगराच्या पठारावरून मोरधन गडाचा काढलेला फोटो.  गड उत्तरदक्षिणेला  लांब पसरलेला दिसतो.
मोरधन ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  
  

ह्या वर्षीच्या पावसाळ्यातील हा पाचवा ट्रेक होता. पण ह्या अगोदरचा ट्रेकपेक्षा ह्या ट्रेकला मिळालेला पावासाचा अनुभव आणि गड माथ्यावर लागणारा जोराचा वारा, ढगांचा खेळ, खूप सुंदर होता. गडावरील अवशेष पाहता, हा टेहळणीचा  किल्ला असल्याचे कळून येते.

प्रवासाचे वर्णन:
शुक्रवारी रात्री आमचा, रविवारी १२ ऑगस्टला मोरधन करायचा ठरल्यामुळे, आम्हाला एक्सप्रेस ट्रेनची तिकीट भेटली नाही. त्यामुळे आम्ही कसारा लोकलने जायच ठरवले. मी सकाळी ५. १२ ची कसारा पकडली, प्रणव आणि विनय डोबवलीला भेटले. ७. ४० ला आम्ही कसारा पोहचलो. तिथेच आम्ही नाश्ता करून. कसारा स्थानकातून शेअर गाडीने अर्ध्यातासात घोटीला पोहचलो.
कसारा ते घोटी अंतर २५ किमी आहे, त्यासाठी गाडीवाले प्रत्येकी ४० रुपये घेतात. पण तो अर्धातासाचा प्रवास अनुभवून, भुसावळ पॅसेंजरने सरळ घोटीला आलो असतो तर परवडलं असत. असे मला वाटत होते. घोटी स्थानकातून खैरगाव साठी एसटी नाही. त्यासाठी शेअर गाडीने किंवा खाजगी रिक्षा करून जायला लागते. किंवा एसटीने देवळे गावात उतरून खैरगाव साठी शेअर किंवा रिक्षाने जावे. घोटी ते खैरगाव अंतर अंदाजे ५ते ६ किमी असेल. त्यासाठी रिक्षावाल्यालाने आम्हाला ३०० रुपये घेऊन जरा लुबाडलच, हे प्रवास केल्यानंतर आम्हाला कळून आले. येतेवेळी आम्ही गावातीलच एकाचा गाडीने आलो त्याने १५० रुपये घेतले. पण जर शेअर गाडीने आलो असतो, तर अंदाजे प्रत्येकी २० ते ३० रुपये घेत असतील. असा माझा अंदाज आहे.

गडाच्या वाटेच वर्णन:
सव्वा दहा वाजता आम्ही खैरगावातील शाळेजवळून ट्रेकला सुरवात केली. शाळेजवळ वाटेत मध्येच झाडाखाली उघड्यावर गणपतीची थोडी प्राचीन अशी मूर्ती दिसते. तिथून पुढे, गावातून आम्ही वाट विचारत ५ मिनटात, गावाचा पाठीमागे बाहेर आलो.

गावातून  बाहेर गडाचा दिशेने आलो असता. मोरधन गडाची किंवा मोरा डोंगराची एक सोंड गावाचा दिशेने आलेली दिसते. ह्या डोंगराच्या वर आपल्याला मोरधन गडाचा मुख्य डोंगर दिसतो. सोंडेवरील ह्या वाटेने आपण, न चुकता डोंगर चढायला लागतो. वर चढल्यावर वाट डावीकडे वळत डोंगराची घळ लागते, तिथे घेऊन जाते.  इथून आपण ५ ते १० मिनटात डाव्याबाजूचा पठारावर पोहचतो.

मोरा किंवा मोरधनच्या डोंगराचा पठार:
आम्ही तासाभरात पठारावर पोहचलो. पठारावरून आपल्याला मोरधन गडाचा मुख्य डोंगर सरळ उत्तर दक्षिणेला लांब पसरलेला दिसतो. तसेच पठारावरून पलीकडील दरणा जलाशय दिसतो. सुसाट सुटलेल्याला वारा आणि पावसाचा थोडावेळ आनंद घेऊन, आम्ही गडावर जाण्यासाठी पुढे चालू लागलो.

पठारावरून गडामाथ्यावर जाणारी वाटेचे वर्णन:
पठारावरून एक वाट सरळ पुढे जाताना दिसते. पण गडावर जाण्यासाठी वाटेने सरळ पुढे न जाता, आपल्या उजव्या बाजूला जेथे मोरधन गडाचा मुख्य शिखर सुरवात होतो. तिथूनच बरोबर खाली वाट आहे, हे लक्षात ठेवणे. कारण पठारावरून येणारी मोठी वाट सरळ पुढे जाते, त्यामुळे उजव्याबाजूची हि छोटी वाट दिसत नाही. त्यामुळे चुकून तुम्ही सरळ जाणाऱ्या वाटेने पुढे जाऊन चुकू शकता.

उजव्याबाजूची हि वाट, डावीकडे वर नागमोडी वळून सरळ न चुकता गडावर घेऊन जाते. ह्या वाटेने आपण  पाऊण ते एक तासात गडाच्या माथ्यावर पोहचतो.

गड माथ्यावरील वर्णन:
गडाच्या माथ्यावर पोहचल्यावर, आम्ही उजवीकडचा माथा जवळ आणि लहान असल्यामुळे. पहिलं त्यादिशेला गेलो. उजव्या माथ्याचा टोकाला, आपल्याला एक चौथऱ्याचे अवशेष आढळतात.  ह्या बाजूला माथ्यावर बाकी काही अवशेष नसल्यामुळे, आम्ही पाठीमागे फिरून डावीकडे गेलो.

डावीकडील माथा दक्षिणेला लांबवर पसरलेला आहे. ह्या बाजूला तुम्ही गडमाथ्यावर ज्या वाटेने येतात.  त्याचा डाव्या बाजूला, काही अंतरावर गडावरील एकमेव पाण्याचे टाके लागते. टाकीच्या पुढे दक्षिणेला गड माथा अजून लांब पसरलेला आहे. पण आम्ही वाचलेल्या माहितीनुसार टाकीच्या पुढील माथ्यावर काही अवशेष नाहीत. म्हणून आम्ही इथूनच मागे फिरून गड उतरायला सुरवात केली.

तसेही गडमाथ्यावर आलेले ढग आणि गवतामुळे अवशेष ओळखणे जरा अवघडच होते. त्यामुळे आमचा चुकून एकाद-दुसरा अवशेष राहून गेले असतील.

थोड्यावेळा साठी माथ्यावरून ढग बाजूला झाल्यामुळे गडा खालील परिसर दिसू लागला. गडाचा पश्चिम बाजूला आपल्या खैरगाव, घोटीचा परिसर दिसतो. पूर्वेला दरना जलाशयचा सुंदर परिसर सतत दिसतो. ढगांमुळे आम्हाला गडावरून आजूबाजूच्या परिसरातील किल्ले दिसले नाहीत. गडावर पाऊस आणि जोराचा वारा लागत होता. वारा एवढ्या जोरात वाहत होता, कि मध्येच आम्हाला त्याचा प्रवाहात ढकलत होता. त्यामुळे आम्ही जास्त करून गडाचा कडेला जाणे टाळले. 


थोडक्यात प्रवासाबद्दल 
  • मुंबई ते कसारा लोकल ट्रेन ने कसारा उतरावे 
  • कसारा ते घोटी अंतर २५ किमी आहे. त्यासाठी शेअर गाडी असतात. प्रत्येकी ३० रुपये घेतात. 
  • किंवा भुसावळ पॅसेंजर घोटी ला १० वाजता पोहचते. हा प्रवास शेअर गाडी पेक्षा उत्तम पडेल. 
  • घोटी ते खैरगाव अंतर ५ते ६ किमी आहे. 
  • घोटी वरून खैरगाव साठी शेअर गाडी भेटतात किंवा खाजगी रिक्षा करून जाणे. 
  • स्वतःची गाडीने  मुंबई ते नाशिक महामार्गावरून घोटीला, घोटी -शिर्डी रस्त्याने देवळे गावातून खैरगाव गाठावे. 
मोरधन ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  


Wednesday, 8 August 2018

Kamandurg कामणदुर्ग



 कामणदुर्ग 


कामणदुर्ग  ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  
तुंगारेश्वर राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलात, भिवंडी-वसई महामार्गावर असलेला कामणदुर्ग. ठाणे जिल्ह्यातील दुसरा उंच किल्ला.

कामणला कसे पोहचलो:
ह्यावेळी माझ्या सोबत नेहमीप्रमाणे प्रणव आणि माझ्या चाळीतील मित्र नंदू होता. प्रणव डोंबिवली वरून सकाळी ५.३३ ची डोंबिवली - बोईसर शटल पकडून वसईला येणार होता. ही गाडी ६.३५ ला वसईला पोहचते. त्याप्रमाणे  नंदू आणि मी पश्चिम रेल्वेच्या दादर वरून सकाळी ५.४५ ची विरार जलद पकडून, ६.४० ला वसईला पोहचलो.
वसई वरून सकाळी ७.१५ ची जळगाव एसटी पकडून, आम्ही कामणला पोहचलो. वसई ते कामण अंतर १४ किमी आहे, सकाळी रस्त्याला रहदारी नसल्याने आम्ही २० मिनिटात पोहचलो. एसटीने कामण पर्यंत प्रत्येकी २० रुपये घेतात. एसटी वाहकाला कामण सांगितले असता, कामण गावच्या थांब्याजवळ गाडी थांबते. बहुतेक कामणरोड रेल्वे स्थानक साठी वेगळे तिकीट असेल.  

वसई वरून सकाळी ७ ची डहाणू-पनवेल शटल होती. पण आम्ही विचार केला, कामणरोड स्थानकावरून पुन्हा रिक्षा करून जाण्यापेक्षा. वसई वरूनच सरळ एसटीने कामण गावात उतरावे. त्याप्रमाणे वसईला नाश्ता करून आम्ही एसटीने कामणला पोहचलो.

दादरला मला नाखिंड ट्रेकचा जुना मित्र भेटला. तो सुद्धा कामणदुर्गला चालला होता. ते चौघे जण होते. त्यातील  दोघांबरोबर मी नाखिंड ट्रेक केला होता. ते चौघे भेटल्यामुळे, आम्ही सात जण झालो. त्यामुळे आता आम्हाला कामणवरून देवकुंडी साठी एकच वडाप रिक्षा किंवा छोटा हाथी सारखी गाडी करता येईल, असा विचार केला. पण कामण वरून तुम्हाला ३ आसनीच रिक्षा मिळतात, त्यामुळे तसे झाले नाही. 

कामण वरून देवकुंडी गाव अंदाजे ३ किमी आत आहे. त्यासाठी रिक्षावाला आम्हाला २०० रुपये सांगत होता. त्याला येऊन-जाऊन ३०० रुपये ठरवत होतो. पण कोणी तयार होत नव्हते. त्यात एक महान रिक्षावाला तर आम्हा ७ जणांना एकाच रिक्षाने सोडायचे ३०० रुपये सांगत होता.

मग शेवटी आम्ही चालत जायचे ठरवले.आम्ही ७.४० ला चालायला सुरवात केली. गावातून रस्ता विचारत विचारत आम्हाला देवकुंडीला पोहचायला पाऊण तास लागला.

देवकुंडी गावातून कामणदुर्गच्या माथ्यापर्यंतचा प्रवास:
देवकुंडी गावातुन,आम्ही एक वाटाड्या मुलगा सोबत घेतला. गड माथ्यापर्यंत त्याच्या घरातल्यानी ५०० रुपये सांगितले होते. त्यामुळे आम्ही त्याला माथ्यापर्यंत न सोडता, जंगल जेथे संपते आणि गडाचा मुख्य खडा चढ लागतो तिथपर्यंत वाट दाखवायला सांगितले होते. त्यासाठी आम्ही २५० रुपये ठरवले. पण बहुतेक त्याला आमची साथ आवडली असावी म्हणून ते आम्हाला माथ्यापर्यंत घेऊन गेले. आमचा मुख्य वाटाड्या १६ ते १७ वर्षाचा मुलगा होता. त्याच्या सोबत त्याचे १२ ते १३ वर्षाचे दोन लहान मित्र होते. असे ते तिघे जण होते. ट्रेक केल्यावर त्यांची मेहनत बघून, आम्ही त्याला ३०० रुपये दिले.

गावात जास्त वेळ वाया न घालवता, आम्ही ८. ३५ ला ट्रेकला सुरवात केली. ट्रेकक्षितीज वर वाचले होते, वाट दर्शविण्यासाठी वाटेत बाणाचे चिन्ह केलेले आहेत. पण देवकुंडी गावातून सुरवातीला वाट सापडणे जरा अवघड आहे. अन्यथा सुरवातीलाच वाट चुकू शकता. पण एकदा जर बाणाचे चिन्ह दिसले तर अनुभवी ट्रेकर्स जाऊ शकतात. अनेक जणांचे ब्लॉग वाचले होते, त्यात त्यांनी वाटाड्या घ्यावा म्हणून सांगितले होते. त्यामुळे आम्ही वाटाड्या सोबत घेतला, त्यामुळे आम्ही वाट न चुकता लवकर पोहचलो.

कामण गावातून आपल्याला फक्त कामणदुर्गचा शिखर दिसतो.  शिखर एका लहान आडव्या लांब डोंगराच्या पाठी दिसतो.  हा लहान आडवा डोंगर वेगळा नसून कामणदुर्ग डोंगराचीच सोंड असून त्याच्या पायथ्याशी देवकुंडी गाव असल्यामुळे, कामणदुर्ग देवकुंडीतुन दिसत नाही.
पूर्ण वाट ह्या आडव्या डोंगराच्या जंगलातून वर चढत जाते. वाटेचे वर्णन करायचे झाले तर पूर्ण जंगलच आहे. कोणी तरी लिहिले होते की बांबूचे दाट वन लागते. पण बांबूच्या झाडापेक्षा इतर रानटी झाडे आणि रानटी केळीची झाडे भरपूर होती. अश्या प्रकारे आपण सोंडेच्या टेकडीवर पोहचतो. टेकडी वरून आपल्याला समोर कामणदुर्गचा खडा चढ दिसतो. पाऊस नसल्यामुळे आम्हाला हा चढ, चढायला जास्त त्रास झाला नाही.

हा चढ चढतेवेळी, चार ठिकाणी कातळाचे टप्पे चढायला लागतात, त्यात तीन मुख्य ठिकाणी कातळ चढायला लागतो. त्यातील २ कातळावर कोरलेल्या पायऱ्या लागतात.  ह्या दोन कातळाच्या वरती तिसऱ्या कातळाला पायऱ्या नाहीत. त्यामुळे ह्या ठिकाणी जरा जपून चढायला आणि उतरायला लागते. हा कातळ चढल्यावर, त्याचाच वरती  माथ्याच्या जवळ चौथ्या टप्यातील कातळ लागतो. माझ्या मते हा कातळ बाकीच्या तुलनेत चढायला एवढा अवघड आणि उंच ही नव्हता.  इथून आपण लगेच माथ्यावर पोहचतो. माझ्या मते नेहमीच्या ट्रेकरसाठी हे चारी टप्प्यातील कातळ चढणे काही अवघड नसावे.
पहिल्या कातळावरून चढून आल्यावर, आपल्याला थोड्याच वेळात पाच टाक्यांचा समुदाय लागतो. टाक्यांच्या अगोदर, हा कातळ चढून आल्यावर, वरती तिथे मोकळ्या जागेत एक प्राचीन पाषाणाची मूर्ती होती. पण आम्हाला त्या भागात कुठेच मूर्ती दिसली नाही. उतरते वेळी आम्हाला टाकीजवळ काही गाववाले भेटले. त्यांनी सांगितले ती मूर्ती गावातील मंदिरात ठेवली आहे. पण उतरल्यावर आमच्या लक्षात न राहिल्याने, ती मूर्ती पाहण्याची राहून गेली.  
पावसामुळे एका टाकीत गुडघाभर पाणी साचलं होता. बाकी टाक्या रिकाम्या होत्या. टाकीच्या डाव्याबाजूने वाट गडावर जाते. वर सांगितल्याप्रमाणे, इथून माथ्यावर पोहचेपर्यंत आपल्याला अजून तीन ठिकाणी कातळ चढायला लागतो. 

शेवटचा टप्यातील कातळ चढून आल्यावर माथ्यावर पोहचते वेळी, उजवीकडे माथ्याला लागूनच वाटेवर एक आडवी टाकी लागते.

कामणदुर्गाच्या माथ्यावरील वर्णन:
गडाचा माथा जास्त मोठा नाही आणि काही विशेष अवशेष ही आढळत नाही. त्यामुळे लगेच बघून होतो. गडाचा माथा दोन शिखराच्या भागात विभागलेला आहे. आपण ज्या शिखर माथ्यावर पोहचतो, त्याचा टाकीच्या बाजूने (उजव्याबाजूने) माथ्याचा टोकाला पोहचल्यावर. समोर आपल्याला दुसरा शिखर माथा दिसतो, समोरचा शिखर थोडा उंच आहे.  ह्या दोन शिखर माथ्यामध्ये लहान दरी सारखा खोलगट भाग आहे. त्यामुळे आपल्याला गडाचे दोन शिखर दिसतात. आम्ही समोरच्या माथ्यावर गेलो नाही. कारण तिथे जाण्याकरीता वाट आहे कि नाही आम्हाला माहित नव्हता. काही ब्लॉग मध्ये वाचले होते, तिथे काही अवशेष आढळत नाहीत. त्यामुळे आम्ही प्रयत्न केला नाही. पण मुख्य माथ्याच्या टोकाला आलो असता, ह्या दोन शिखर माथ्याच्या मधील त्या खोलगट भागात खाली वाट जाताना दिसली. ती नक्की कुठे जाते, ते आम्ही पहिले नाही.

माथ्यावरील टाकीचे वर्णन:
माथ्याला लागून असलेल्या, टाकीच्या बाजूने माथ्यावर आल्यावर. आपल्या डाव्या बाजूला अगदी काही पावलांवर माथा संपतो. आपल्या समोर खाली सुकलेला छोटा तलाव लागतो. उजवीकडे माथा थोडा मोठा आहे. उजवीकडे आपल्याला वाटेत, थोड्याफार अंतरावर २ चौकोनी टाक्या लागतात. दोन्ही टाक्या रिकामी होत्या. त्याच वाटेत अजून एक मोठी टाकी लागते. पण गवतामुळे कळत नव्हते, नक्की टाकी आहे कि खड्डा. टाकीच्या बाजूने वाट पुढे माथ्याच्या टोकाला जाते. 

त्याच्या पुढे मी वर सांगितल्याप्रमाणे, समोर गडाचा दुसरा माथा दिसतो. तिथून आम्ही मागे फिरलो आणि परतीच्या वाटेला लागलो. बाकी गडमाथ्यावर ढग दाटून आल्यामुळे गडावरून आजूबाजूचा परिसर दिसला नाही.
ह्या ट्रेकसाठी आम्हाला प्रत्येकी १२५ रुपये खर्च आला.

थोडक्यात प्रवासाची माहिती
  • मुंबईवरून वसईला पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनने वसईला उतरावे.
  • वसई एसटी स्थानकातून सकाळी ७. १५ ची जळगाव एसटी आहे. तिने कामणला जावे. 
  • वसई वरून गाडी चुकल्यास चिंचोटी-अंजूर फाट्यापर्यंत जावे.
    तिथून भिवंडीला किंवा भिवंडीमार्गे जाणाऱ्या गाडी किंवा शेअर रिक्षाने कामणला उतरावे.
  • अन्यथा वसई वरून सकाळी ७ वाजता डहाणू - पनवेल शटल आहे.
    ती ७.१७ पर्यंत कामण रोड स्थानकात पोहचते. 
  • डोंबिवली वरून सकाळी ५.३३ ची डोंबिवली-बोईसर शटल आहे. 
  • ती कामणरोड स्थानकात ६.१२ ला पोहचते.
  • कामणरोड रेल्वे स्थानक ते कामण गाव अंतर ३ किमी आहे.
  • नायगाव वरून ही कामणला जाता येते. पण नायगाव वरून बहुतेक २ ते ३ रिक्षा बदलत जायला लागते त्यामुळे माझ्या मते नायगाव पेक्षा वसईचा पर्याय निवडावा.



कामणदुर्ग  ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  




Monday, 16 July 2018

Thanale caves ठाणाळे लेणी

ठाणाळे लेणी 

ठाणाळे लेणी

ठाणाळे लेणी  ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  

दोन-चार आठवडे, आमचा ठाणाळे लेणी करायचा विचार चालला होता. पण वेळेला दुसराच ट्रेक ठरवल्यामुळे होत नव्हता. शेवटी प्रणव आणि मी १ जुलैचा रविवारी करायचा ठरवले. ह्या वेळी आमच्या सोबत हेमेश आणी त्याची बायको स्वप्ना होती.

विकिपीडियावर सांगितल्याप्रमाणे ठाणाळे लेणी ह्या २३ बुधलेणींचा समुदाय असून, पहिल्या शतकातील आहे.

थोडक्यात प्रवासबद्दल
  • मुंबई वरून खोपोलीला ट्रेन ने पोहचावे.
  • खोपोली ते पाली एसटी पकडावी, त्या गाडीने पेडली गावात उतरावे 
  • खोपोली ते पेडली अंतर २९ किमी आहे. एसटीने प्रत्येकी ४५ रुपये तिकीट आहे.
  • पेडली ते ठाणाळे साठी रिक्षा करावी (किंवा शेअर रिक्षा हि असाव्यात पण ती भरेपर्यत वाट पहावी लागेल.)
  • पेडली ते ठाणाळे ६.५  किमी अंतर आहे, त्यासाठी आम्ही रिक्षाला १५० रुपये भाडे दिले.

प्रवासाचे वर्णन:
ठाणाळे लेणी रायगड जिल्ह्यातील, सुधागड तालुक्यातील ठाणाळे गावात आहे. पण ठाणाळे गावात जाण्यासाठी तुम्हाला एसटीने पेडली गावात उतरायला लागते. एकंदर इथपर्यंत पब्लिक ट्रान्सपोर्ट ने प्रवास वेळेत करणे, खूप मोठ काम आहे. त्यासाठी आम्हला सकाळी ८ ची कर्जत-खोपोली ट्रेन कर्जत वरून पकडायची होती. ती ट्रेन पकडण्यासाठी, मी सकाळी ५..२० ची  सीएसमटी-कर्जत धीमी लोकल ५. ३२ ला करीरोड वरून पकडली. हि ट्रेन कर्जतला बरोबर ७. ४०ला वेळेत पोहचली. बाकी माझे मित्र मला डोंबीवलीला भेटले.

जास्त करून कर्जतला मुबईवरून आलेली लोकल ज्या स्थानकावर लागते, त्याच स्थानकाच्या दुसऱ्या बाजूला खोपोली ट्रेन लागलेली असते. आम्ही ८. २५ ला खोपोलीला पोहचलो. खोपोली रेल्वे स्थानकाबाहेर हॉटेल मध्ये नाश्ता करून, आम्ही पालीसाठी एसटी बघायला गेलो.

खोपोलीला २ ठिकाणाहून एसटी सुटतात. एक मुख्य एसटी आगर आहे, जिथून बाहेरगावी जाणाऱ्या एसटी येतात. हे मुख्य आगार खोपोली स्थानकातून अंदाजे ३ किमी वर आहे. तर दुसरं रेल्वे स्थानकापासून चालत ५ मिनटाचा अंतरावर महामार्गावर आहे. येथे नगरपरिषदेच्या गाड्या सुटण्यासाठी वेगळा आगार आहे आणि त्याचा समोर रस्त्या पलीकडे. पाली व इत्यादी जवळपासच्या गावात जाण्यासाठी जाणाऱ्या एसटी सुटतात.

आम्ही नाश्ता करून, ह्या स्थानकात पोहचेपर्यंत नऊ वाजले होते. त्यामुळे आमची पाली एसटी गेली होती. बहुतेक ती एसटी ८ किंवा ८. ३० ची होती. आणि आता दुसरी गाडी ९. ४५/ १०. ४५ होती. त्यासाठी आम्ही मुख्य आगार मध्ये जाऊन एसटी बघायचा ठरवल. आम्ही रिक्षा करून तिथे पोहचलो. तिथून सकाळी ९ .४५ची मुंबई- पाली एसटी होती, आम्ही त्या एस्टीने जायचा ठरवलं. गाडी वेळेत आली पण सुठेपर्यंत १० वाजले.
खोपोली ते पेडली  २९ किमीचा अंतर पाऊण तासात पोहचलो. पेडलीला पोहचे पर्यंत १०. ५० झाले. पेडली पासून  पुढे पाली अजून ११ किमी आहे.

खोपोली ते पेडली पर्यंत शेअर गाडीने प्रवास कसा करावा.
खोपोली वरून तुम्ही शेअर गाडीने सुद्धा पाली किंवा पेडली पर्यंत जाऊ शकता. पण पाली किंवा पेडली पर्यंत थेट गाडी नाही.त्यासाठी तुम्हाला खोपोली वरून परळी गावात जायला लागते. नंतर परळी वरून पालीला जाण्यासाठी शेअर गाडी असतात, त्याने पेडली गावात उतरायला लागेल. परळी वरून मृगगडला सुद्धा जातात. 
तसच तुम्ही परतीचा प्रवास करू शकतात. पेडली गावातून तुम्हाला पाली, खोपोली, कर्जत आणि पनवेल ला जाण्यासाठी वेळेत एसटी आहेत.

पेडली ते ठाणाळे गाव अंतर ७ किमी आहे. पेडलीतून आता आम्हाला ठाणाळे साठी एसटी नव्हती. बहुतेक ठाणाळे गावातून वाया करत जाणारी ठराविक एक ते दोन एसटी असाव्यात. ठाणाळे गावात जाणाऱ्या रस्त्याला तशी पण जास्त रहदारी दिसली नाही. त्यामुळे आम्ही पेडली वरून एकवेळेच १५० रुपये भाडे देऊन रिक्षा केली. येते वेळी पण आम्ही त्याच रिक्षावाल्याला फोन करून बोलवून घेतले. बहुतेक ठाणाळे किंवा त्याचा पुढच्या गावात जाण्यासाठी शेअर रिक्षा असाव्यात. कारण आमची हि शेअर रिक्षाची ६ आसनी होती. पण आम्हाला उशीर होत असल्यामुळे आम्ही जास्त विचारपूस न करता. भाड्यावर रिक्षा ठरवली. जर तुम्ही ७ ते ८ जण असाल, तर तुम्हाला परवडेल. 

पेडलीवरून ठाणाळे गावात पोहचायला १५ मिनटं लागली.
ठाणाळे लेणीसाठी वाट गावाचा मागून जाते. त्यासाठी आपल्याला गावामध्ये जाऊन विचारायला लागते. अन्यथा वाट मिळणे मुश्किल आहे. आम्ही ११. १५ ला ट्रेकला सुरुवात केली.

ठाणाळे गाव ते ठाणाळे लेणी पर्यंतच्या वाटेचं वर्णन:
गावातल्याने दोन घराचा मागुन जायायला सांगितले. त्या घराचा पाठी गेल्यावर, एक पाय वाट जंगलात जात होती. आम्ही त्यावाटेने चालू लागलो. पाच मिनटात आम्ही एका लहान मोकळ्या जागेत पोहचलो. तिथून ठाणाळे लेणी आणि डोंगर दिसतो. इथून एक वाट डावीकडे खाली उतरताना दिसते, तर दुसरी उजवीकडे जंगलात जाताना दिसते. उजवीकडची वाट लेणीकडे जाते. उजवीकडील वाटेने पुढे चालू लागल्यावर, वाटेत मध्ये मध्ये वाट दर्शवण्यासाठी दगडावर बाणाचे चिन्ह केलेले दिसतात. त्यामुळे तुम्ही न चुकता लेणीपर्यंत पोहचू शकता. जास्त करून वाट जंगलातून जात असल्यामुळे काही ठिकाणी वाट चुकू शकतात, त्यामुळे बाण पहात जावे. जंगलात मच्छरचा त्रास खूप होतो. वाटेत आपल्याला ३ ओढे पार करायला लागतात. त्यात तिसरा ओढा शेवटच्या टप्प्यात येतो. ह्या ओढ्या ओलांडून ५ मिनटात लेणीजवळ पोहचतो.

लेणी बद्दल
लेणीपर्यंत पोहचेपर्यंत आम्हाला १ वाजला. मला लेणी बद्दल जास्त माहिती नसल्यामुळे, लेणीबद्दल वर्णन केलेले नाही. 

लेणी एका ओळीत असल्यामुळे, ओळीतच बघून होतात. त्यात मध्ये एक लेणी रुंदीला सगळ्यात मोठी लागते. त्याचा बाजूचाच कातळात एक मोठा स्तुपा आहे . स्तूपाचा थोडा अजून पुढे, एक लेणीजवळ मोठा कातळ तुटून पडलेला दिसत्तो. पण त्या कातळाच्या बाजूने एक वाट पुढे जाताना दिसते. तिथून पुढे गेल्यावर आपल्याला अजून ३ लेणी  दिसतात. ह्या शेवटच्या लेणी, ह्याच्या पुढे लेणी नाहीत पण इथून एक वाट पुढे जाताना दिसते. ह्या वाटेने पुढे गेलो असता लेणीच्या वरती पठारावर जाता येते. पण हि वाट कडेने जात असल्यामुळे, जपून जायला लागते. हि वाट खाली कुठे तरी उतरताना दिसते. त्यामुळे तेथे खाली न जाता वर पठाराकडे जावे. जिथून आम्ही वर चढलो, तिथे आम्हाला एका दगडावर लेणीच्या दिशेने बाण केल्याचे दिसले. त्यामुळे हि वाट नक्की कुठून येते किंवा कोणी ह्या वाटेने येतात कि नाही, ते कळलं नाही.

लेणीच्या पठारावरून दिसणारे अप्रतिम दृश्य:
साधारण १० मिनटात आम्ही पठारावर पोहचलो. पण पठारावरून दिसणारे दृश्य सुंदरच होते. पाऊस किव्हा पावसाचे ढग हि नसल्यामुळे. आम्हाला पठारावरून डावीकडे सुधागड दिसत होता, तर समोर थोडा उजवीकडे सरसगड दिसत होता. तर उजवीकडे खालील ठाणाळे गाव. आणि खाली पूर्ण हिरवागार जंगल दिसत होता. तर पाठी मुख्य डोंगर आणि त्यामधली घळ दिसते. ठाणाळे गावातून जेव्हा आपल्याला ह्या लेणी दिसतात, तेव्हा हा एकच डोंगरा वाटतो.  पण लेणीचा डोंगर आणि मुख्य डोंगर मध्ये एक घळ लागते. त्यामुळे लेणीचा डोंगर मुळ डोंगराची सोंड वाटते.

पठारावरून वाट वर डोंगरात जाताना दिसते. पण ह्या वाटेने बहुतेक गड माथ्यावर जाता येत नाही. कारण आम्ही जेव्हा पठारावर पोहचलो. तेव्हा खालील गावातील काही तरुण वर असलेल्या धबधब्यावरुन परताना,आम्हाला भेटले. आम्ही त्यांना विचारले असता, त्यांनी हि वाट फक्त धबधब्यावर जाते सांगितले.

लेणी मधून तुम्हाला सुधागड आणि सरसगड दिसत नाही. पठारावरून आम्ही सरळ परतीची वाट पकडली. उतरतेवेळी १ तासात आम्ही गावात पोहचलो. ह्या ट्रेकला आम्हाला प्रत्येकी ३०० रुपये खर्च आला.


ठाणाळे लेणी  ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  



गावातून वर आल्यावर दिसणारा ठाणाळे लेणीचा डोंगर

ठाणाळे लेणीच्या  पठारावरून दिसणारे दृश्य

पठारावरून पुन्हा परत लेणीकडे जाताना काढलेला वाटेचा फोटो

ठाणाळे लेणी  ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  



Wednesday, 11 July 2018

Aajobagad आजोबागड

 आजोबागड 

आजोबागडचा डोंगर



आजोबागड  ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  

आजोबागड करायची ही माझी दुसरी वेळ होती. प्रणव आणि विनयने हा ट्रेक केला नव्हता, म्हणून आम्ही हा ट्रेक करायचा ठरवला. खरे तर हा गड नसून फक्त डोंगर आहे. ट्रेकिंग मधल्या सोप्या श्रेणीतील ट्रेक. जास्त करून ट्रेकर, सीतामाईच्या पाळण्यापर्यंतच ट्रेक करतात. ट्रेकिंग किंवा ट्रेकर मुळे बहुतेक ह्याला आजोबागड म्हणत असावेत. मुळात ह्या डोंगराला आजा पर्वत म्हणतात.



आजोबा गड बद्दलची माहिती:
विकिपीडिया वर दिलेल्या माहिती नुसार "पुराणकथेनुसार, याच गडावर बसुन वाल्मिकींनी रामायण लिहिले. याच गडावर सीतामाईने लव आणि कुश यांना जन्म दिला. लव आणि कुश वाल्मिकींना 'आजोबा' म्हणत असत, म्हणूनच या गडाचे नाव आजोबागड असे पडले. गडावर वाल्मिकींचा आश्रम व समाधी आहे. बाकी येथे काही अवशेष आढळत नाहीत.

थोडक्यात प्रवास कसा करावा.
  • मुंबई वरून आसनगावला ट्रेन ने पोहचावे. 
  • आसनगाव वरून शहापूर एसटी डेपोत जावे. ह्या मधील अंतर ४ किमी आहे. 
  • शहापूर वरून देहेणे गावी जावे. त्याचे अंतर ४१ किमी आहे. 
  • देहेणे एसटी चुकली, तर शहापूर ते डोळखांब शेअर गाडीने प्रवास करावा.
  • शहापूर ते डोळखांब अंतर ३० किमी आहे
  • डोळखांब ते देहेणेसाठी दुसरी गाडी करायला लागते. डोळखांब ते देहेणे अंतर ११ किमी आहे.


प्रवासाचे वर्णन:
नेहमीप्रमाणे, मी सकाळी ५.२४ ची आसनगाव ट्रेन पकडली. विनय आणि प्रणव मला डोंबिवलीला भेटले. आम्ही आसनगावला ७.२० ला पोहचलो. आजोबागडच्या पायथ्याचे गाव देहेणेसाठी, शहापूर वरून एसटी पकडायची होती. त्यामुळे आम्ही आसनगाव रेल्वे स्थानकाबाहेर नाश्ता न करता शहापूर एसटी आगारच्या बाहेर नाश्ता करायचे ठरवले. आम्ही रिक्षा करून शहापूर एसटी डेपोत गेलो. आसंनगाव ते शहापूर ४ किमी अंतर १० मिनिटात पोहचलो. आगारात जाऊन आम्ही प्रथम एसटीची चौकशी केली असता, कळले डोळखांब पर्यंतची पहिली एसटी निघून गेली होती आणि आता पाऊणे नऊची एसटी आहे. आम्ही एसटी साठी न थांबता, नाश्ता करून शेअर गाडीने जायचे ठरले.
सकाळी ८ वाजले होते, त्यामुळे बहुतेक हॉटेल आणि दुकाने बंद होती. आम्हाला वाटले आसनगावलाच नाश्ता केला असता, तर बरे झाले असते. पण एक लहानसे हॉटेल चालू होते. मग तिथेच नाश्ता केला. नाश्ता करून आम्ही शेअर गाडी बघायला गेलो.

शहापूरवरून देहेणेसाठी थेट शेअर गाडी नाही. त्यासाठी तुम्हाला शहापूर ते डोळखांब, डोळखांब ते देहेणे असा गाडी बदलत प्रवास करायला लागतो.

त्या शेअर सुमो गाडीत १६ लोक भरेपर्यंत, आम्हाला पाऊणे नऊ वाजले. डोळखांबपर्यंत ३० किलोमीटरचा पाऊण तासाचा प्रवास कसा केला, ते आमचे आम्हालाच माहिती.

साडेनऊ वाजता, आम्ही डोळखांबला पोहचलो. डोळखांबवरून आम्हाला दुसऱ्यागाडी साठी थांबायला लागले नाही. कारण आमच्याबरोबर ट्रेन मध्ये असलेले, ६ जण आजोबालाच चालले होते. त्यांनी आसनगाव वरून देहणेपर्यंत १६०० रुपये देऊन गाडी केली होती. त्यामुळे आम्ही त्यांच्याच गाडीतून डोळखांब ते देहणेपर्यंत गेलो. परत येते वेळी त्यांनाच परतीचे २०० रुपये भाडे देऊन, त्यांचाच सोबतच आसनगावला आलो.  त्यामुळे आमचा वेळ वाचला.

त्यांचाच गाडीतून आल्यामुळे, आम्हाला जिथे आजा पर्वताच्या पायथ्यापर्यंत म्हणजेच वाल्मिकी आश्रम पर्यंत जाण्याचा घाट चालू होतो तिथपर्यंत पोहचलो. आम्ही दुसऱ्या गाडीने आलो असतो, तर आम्हाला देहेणे गावातून अंदाजे २ ते ३ किमी जास्त चालायला लागले असते. खाजगी गाडी वाले डोंगराच्या एकदम पायथ्यापर्यंत सोडतात.

डोळखांब ते देहेणे अंतर ९ किमी आहे. पण खराब रस्तामुळे आम्हाला २५ मिनिटे लागली. इथे पोहचेपर्यंत १० वाजले होते.

सव्वा दहाला आम्ही ट्रेक चालू केला, वर सांगितल्याप्रमाणे आश्रम पर्यंत कच्चा रस्ता असल्यामुळे न चुकता आश्रम जवळ पोहचता येते.

आश्रमचे वर्णन: 
पाऊण तासात म्हणजेच ११ वाजता आम्ही आश्रम पर्यंत पोहलो. आश्रमचा परिसर मोठा आहे.

आश्रमात वालीमिकी ऋषी समाधी मंदिर आहे, मंदिराच्या बाहेर, समोरच ४ मोठ्या वीरगळ ठेवल्या आहेत. वीरगळाच्या मागे दोन लहान आयताकृती पाषाणावर पादुका दिसतात. त्याच्या बाजूला लागूनच, चौकटी सारखे अजून ८ पाषाण ठेवले आहेत. ह्यातील १ पाषाण आयताकृती चौकट त्यावर चौकोनी चिन्ह आहे आणि  ७ पाषाणाचे टोक त्रिकोणी तर काहीच गोलाकार टोक आहे. हे पाषाण कसले आहेत ते कळत नाही. तिथेच पायऱ्यांच्या बाजूला एक लहान दगडी मंदिर लागते. मंदिरात बहुतके देवीची लहान मूर्ती आहे. समाधी मंदिराच्या उजव्या बाजूला थोड्या अंतरावर अजून दोन लहान मंदिरे आहेत. त्या मंदिरात शंकराची पिंड आणि दोन-चार मूर्ती आहेत. समाधी मंदिराच्या समोरून वाट खाली कुंडा जवळ जाते. त्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या उतरून दोन मिनिटात कुंडाजवळ पोहचता येते. कुंडाला आता सिमेंटची चौकट केल्यामुळ, ते कुंड न दिसता सिमेंटची टाकी वाटते. त्याच्या बाजूला अजून एक कुंड लागते, त्याला भिंत करून दरवाजा लावला आहे. बहुतेक ह्यातील पाणी प्यायला वापरत असावेत. हे त्यात टाकलेल्या पाइपवरून कळत होते.

आश्रमचा परिसर मध्ये भक्तांसाठी एक धर्मशाळा सुद्धा बांधली आहे.

आश्रम ते सीतामाईच्या पाळण्यापर्यंतच्या वाटेचे वर्णन:
आश्रमात नंतर येते वेळी थांबू असा विचार करून, आम्ही पुढे चालू लागलो. समाधीच्या डाव्या बाजूला, साधूबाबा राहतात. त्यांच्या घरामागून वाट सीतामाईच्या पाळण्याला जाते. वाट दर्शवण्यासाठी वाटेत ठिकठिकाणी दगडावर बाणाचे चिन्ह केलेली दिसतात. त्यामुळे तुम्ही न चुकता पाळण्यापर्यंत पोहचू शकता.

सीतामाईच्या पाळण्यापर्यंत पोहचेपर्यंत आम्हाला १२.१५ वाजले. आम्ही आश्रम पासून पाळण्यापर्यंत १ तासात  पोहचलो होतो.

सीतामाईचा पाळणा, टाकी आणि सुळक्यावर जाणाऱ्या वाटेचे वर्णन:
पाळण्याजवळ पोहचल्यावर, आपल्याला खिंडीत आल्यासारखे वाटते. त्याचे कारण म्हणजे आजोबा डोंगराचा सुळका आणि मुख्य डोंगराचा मध्ये फट असल्यामुळे, ह्या जागेत पोहचल्यावर आपल्याला एका बाजूला दरी दिसते तर त्याच्या विरुद्ध दिशेने आपण वर येतो. तिकडून आपल्याला समोरील डोंगर माथ्याचे दृश्य दिसते.

ह्या सुळक्याच्या गुहेतच पाळणा आहे. ती गुहा पाहून, ती गुहा नसून कातळाचा खोलगट खड्डा आहे असे दिसते. तिथे वर कोपऱ्यात पाळणा ठेवला आहे. त्या पाळण्याजवळ पोहचण्यासाठी १० फुटाची लोखंडी शिडी लावली आहे. पाळण्यापर्यंत थोडे काळजीपूर्वक चालत जायला लागते, नाही तर पडण्याची शक्यता जास्त आहे. पाळण्यासाठी आपण जेथून शिडी चढतो, तिथेच वर उजव्याबाजूला पाण्याची टाकी लागते तर डावीकडे पाळणा लागतो.

ह्या टाकीच्या पुढे उजवीकडे एक वाट वर जाताना दिसते. पण त्यासाठी टाकीच्या कडेने जायला लागते. ही वाट बहुतेक वरती सुळक्याच्या माथ्यावर जाते. त्यासाठी आम्ही पुढे जाऊन बघितले. जेथे वाट संपते तेथे कातळावर  चढून जायला लागते. पण त्या कातळाची उंची जास्त असल्यामुळे आणि काही दगड हलत सुद्धा होते. त्यामुळे तेथून टेकनिकल मदत शिवाय वर चढणे म्हणजे जीवाला धोका आहे. त्यासाठी आम्ही तेथून मागे फिरलो.

पण त्या वाटेत जिथे वाट वळते. तिकडे एक छोटीशी जागा आहे. तेथून आपल्याला खालील देहेणे गावाचे दृश्य तर समोर उजवीकडे रतनगड, साम्रद गाव दिसते.

पाळण्याच्या समोरच्या डोंगरात अजून एक टाकी दिसते. ही टाकी जेथे खिंडीत उभे राहतो. तेथे खालच्या बाजूला लागते. पण ती टाकी बघण्यासाठी थोडे वर चढायला लागते.

आम्ही १ वाजता गड उतरायला सुरवात केली. आणि नंतर मग आश्रम मध्ये आम्ही आणलेले जेवून परतीच्या प्रवासाला सुरवात केली. ह्या ट्रेकला आम्हाला प्रत्येकी २०० रुपये खर्च आला.


आजोबागड  ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  

 

आश्रम पर्यंत जाणारी वाट

आश्रम

वाल्मिकी ऋषी समाधी मंदिर आणि खालील फोटोत मंदिरासमोर असलेले वीरगळ आणि पद  चिन्ह आणि  ८ पाषाण




सीतामाईचा पाळणा

टाकीच्या  बाजूला विरुद्ध दिशेला असलेली टाकी. ह्या टाकीच्या कड्यावर पाय ठेवून पुढे जायला वाट लागते.


समोरच्या डोंगरात असलेली टाकी

कुंड


गुहेजवळून दिसणारे दृश्य
आजोबागड  ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  

Saturday, 7 July 2018

सिद्धगड Siddhgad

 सिद्धगड 

 नारिवली गावातून दिसणारे सिद्धगडाचे दृश्य.  उजवीकडील डोंगर सिद्धगड आहे.

 सिद्धगड ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  
जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सगळीकडे जोरदार पाऊस पडला होता, पण दुसऱ्या आठवड्यात पावसाने दांडी मारली होती. म्हणून आम्ही १७ जुनसाठी दोन तीन पर्याय निवडले. त्यात मध्यम श्रेणीचा सिद्धगड करायचा ठरवले, पण पावसाळ्यात सिद्धगडच्या बालेकिल्ल्यावर जाणे धोक्याचे आहे, म्हणून आम्ही ठरवले की नाही जमले तर फक्त गुहेपर्यंत जाऊन येऊ. पण २ आठवडे जोरदार पाऊस न पडल्याने, आम्हाला बालेकिल्ल्यावर जायला मिळाले.
ह्यावेळी विनय आणि मी, आम्ही दोघेच होतो. त्यामुळे आम्ही बालेकिल्ला करू या प्रयत्नानेच गेलो होतो आणि आम्ही बालेकिल्ला सर केला. ह्या अगोदर मी एक ग्रुप सोबत सिद्धगड केला होता, पण फक्त माची पर्यंतच, कारण गुहेची  वाट भेटली नाही म्हणून ह्या वेळी पूर्ण किल्ला करायचा ठरवलेच होते. 


प्रवास कसा करावा:
  • मुंबई किंवा पुणे वरून ट्रेन ने कल्याणला उतरावे 
  • कल्याण ते मुरबाड एसटी पकडावी. ह्या मार्गावर सतत एक तासाने मुरबाडसाठी गाडी असते. कल्याण ते मुरबाड अंतर ३० किमी आहे. साधारण पाऊणतास ते एक तासात  मुरबाडला पोहचतो. 
  • मुरबाड वरून नारिवली गावासाठी, देहरी गावाची एसटी आहे. नारिवली करता सतत २ तासाने मुरबाड वरून गाडी आहे. 
  • एसटी चुकली असता, एसटी स्थानकाबाहेरून म्हसा पर्यंत शेअर गाडी असतात ते प्रत्येकी २० रुपये घेतात. 
  • मुरबाड ते म्हसा  १२ किमी अंतर आहे. आणि म्हसा ते नारिवली गाव ९ किमी आहे.
  • म्हसा वरून नारिवली गावापर्यंत शेअर गाडी असतात. ते प्रत्येकी १० रुपये घेतात.
  • नरिवली वरून येते वेळी शेअर गाडी ५.३०/६ नंतर बंद होतात. हे लक्षात ठेवावे नंतर तुम्हाला एसटीचा पर्याय आहे. 
  • नारिवली वरून मुरबाड साठी शेवटची एसटी ७. ४५ ची आहे. 

कल्याण - मुरबाड- म्हसा -नारिवली 
आम्हाला मुरबाड एसटी स्थानकावरून सकाळी ७ किंवा  ७.१५ ची देहरी साठीची बस पकडायची होती. त्यासाठी मी करीरोड स्थानकावरून सकाळी ५ वाजता कर्जत लोकल पकडली आणि ६. २० ला कल्याण ला पोहचलो. पण कल्याण  एसटी स्थानकात, एसटीचा १६ जून पासून लागू झालेल्या भाडेवाढी मुळे, वाहकाची (कंडक्टर)  तिकीटची यंत्रे अपडेट करायची असल्यामुळे सगळ्या गाड्या उशिरा सुटत होत्या. त्यामुळे आम्हाला मुरबाडला पोहचेपर्यंत ८ वाजले. आता देहरी साठी ९.४५ वाजताची एसटी होती. त्यामुळे आम्ही एसटी साठी न थांबता, नाश्ता करून मुरबाड एसटी स्थानकाबाहेरून सुटणाऱ्या शेअर गाड्याने म्हसाला गेलो. आणि म्हसा वरून पुढे देहरी आणि नारीवली  गावासाठी जाणाऱ्या शेअर गाडीने नारिवलीला पोहचलो.

मुरबाड ते म्हसा आम्ही २० मिनिटात पोहचलो. म्हसा  ते  नारीवली २०-२५ मिनटे लागली. नारिवली पोहचे पर्यंत ९.४० वाजले. आम्ही नारिवली गावातून ९. ४५ ला ट्रेक सुरु केला, बालेकिल्यावर पोहचेपर्यंत आम्हाला साडेचार तास लागले. 

नारिवली गावातून धापडपाडा गावात पोहचायला सव्वा तास लागतो. खरे पाहायला गेले तर धापडपाडा सिद्धगडचा पायथ्याचे गाव आहे. कारण गड चढायला सुरवात येथूनच होते पण गावात कच्चा आणि अरुंद रस्ता जात असल्यामुळे ह्या गावापर्यंत चालत यायला लागते. पण अजून काही वर्षात बहुतेक जर पक्का रस्ता  झाला आणि गाडी ह्या गावापर्यंत आली तर ट्रेकचा तेवढा वेळ कमी होईल.

नारिवली गाव ते धापडपाडा:
नारिवली गावातून आपण १० मिनिटात चालत गावाच्या बाहेर येतो. जेथे गाव संपतो तेथे मातीचा कच्चा रस्ता धापड पाड्यापर्यंत जातो. पण रस्त्याला मध्येमध्ये शेतात जाणारे किंवा दुसरीकडे जाणारे इतर रस्ते ही लागतात. त्यामुळे आपण चुकू शकतो. बहुतेक गावातील शेतकरी ट्रॅक्टर ने शेती करत असावे, म्हणून शेतात रस्ते जातात. पण आम्हाला वाटेत  शेतात काम करणारे गाववाले भेटले  म्हणून आम्ही न चुकता गेलो. दोन तीन वर्षापूर्वी धापड पाडा अगोदर मोठा ओढा ओलांडून जावा लागत असे. आता ह्या ओढ्यावर पूल बांधला असल्यामुळे सोयीस्कर झाला आहे. पूल पार करताच आपण धापडपाडा  गावात पोहचतो.

धापडपाडा ते सिद्धगड माची:
धापडपाड्यातून सिद्धगड माची पर्यंत जाण्याकरता बऱ्यापैकी  वाट रुळलेली आहे. त्यामुळे तुम्ही न चुकता माचीपर्यंत पोहचता. तसेच काही ठिकाणी वाटेत वनविभागाने वन्यपशूंची माहिती देणारे मोठे फलक लावलेले आहेत. सिद्धगड आणि त्याचा बाजूचा डोंगर त्याचा मध्ये एक V आकार आहे. त्याच घळेच्या दिशेने वाट वर जाते. साधारण तासाभरात धापड पाड्यापासून वर चालून आल्यावर, एक मोठा ओढा लागतो. ह्या ओढयाच्या पलीकडे समोरून वाट वर जाते.  पावसाळ्यात हा ओढा ही भरून वाहत असल्यामुळे, ओढा पार करायला, ओढ्यात दगड रचून वाट केलेली दिसते.

ओढ्यापासून सिद्धगड माची (दरवाजा) पर्यंत अर्धा ते पाऊण तासाचा खडा चढ लागतो. ओढा पार करून वर आल्यावर, १५-२० मिनिटाने आपल्याला उजवीकडे वाटेच्या थोड्या बाजूला कातळात खोदलेली, जमिनीचा सपाटीलाच एक छोटी टाकी लागते. ह्या टाकीतील पाणी माची वर राहणारे लोक गड चढते किंवा उतरतेवेळी पिण्यासाठी वापरतात.

ह्या टाकी पासून अजून ५-१० मिनिटे वाटेला चाललो असता डावीकडे वाटेचा थोड्या वर, बाजूला कातळात अजून एक टाकी लागते. ह्या टाकी ला ६ कातळाच्या पायऱ्या आहेत. टाकीतील पाणी पिण्यायोग्य वाटत नव्हते.  ह्या टाकी पासून थोडा वर चढून गेलो असता, ५ मिनिटात आपण गडाच्या मुख्य दरवाजा जवळ पोहचतो.
म्हणजेच आपण माची वर पोहचतो. दरवाजा समोर लहान पठार आहे, त्यावर एक लहान दगडी मंदिरासारखे रिकामी मंदिर दिसते. आम्ही तेथे उतरतेवेळी गेलो. ह्या पठारावरून समोर सिद्धगड कडे पहिले असता आपल्याला डावीकडे गुहा दिसते. ह्या गुहे जवळ पोहचायला वाट दिसत नाही.  

सिद्धगड माची वर पोहचल्यावर:
दरवाजातून वाट उजवीकडे फिरत सिद्धगड माची गावात जाते. थोडे आत चालत आल्यावर, आपल्याला वाटेत  बाजूला डावीकडे १ मोठी पूर्ण  आणि १ तुटलेली लहान वीरगळ दिसते.  ह्या वीरगळ जेथे आपल्याला दिसतात, त्याच्या वरती आपल्याला एक मंदिर दिसते. तेथे अजून १०-१५ वीरगळी दिसतात. काही तुटलेल्या तर काही अखंड आहेत.  तिथेच मंदिराच्या बाहेर एके ठिकाणी शंकराची पिंडी आणि काही मुर्त्या ही ठेवलेल्या आहेत. त्याच्या जवळच एक तुटलेली तोफ ही आहे. पण ह्या मंदिराजवळ जाण्यासाठी थोडे पुढे जाऊन वरती वाट लागते. जेथे आपल्याला सुरवातीला वाटेत वीरगळ दिसते तेथून वाट नाही. त्यामुळे आम्ही उतरतेवेळी ह्या वीरगळी आणि मूर्ती पाहिल्या.

वाडीकडे जाते वेळी रस्त्यात डाव्याबाजूला थोडा उंचावर दगडी भांडे असा झाडाला फलक लावलेला दिसतो. तेथे एका दगडात भांड्यासारखा खड्डा केलेला दिसतो. ते पाहून आम्ही पुढे चालू लागलो असता, वाटेत डावीकडे अशाच एका झाडाला "दगडी गोळे " म्हणून फलक लावलेला दिसतो आणि तेथून एक वाट डावीकडे पाठीमागे वाट झाडातून जाताना दिसते. त्या वाटेने आत गेलो असता, झाडांमध्ये एका मोकळ्या जागेत गोल आकाराचे, दगडाचे ८ गोळे दिसतात. त्याच्या बाजूलाच भग्न अवस्थेतला एक नंदी बैल सुद्धा दिसतो. त्याचा समोरच आंब्याच्या एका मोठ्या झाडाखाली छोटा दगडाचा बांध आहे. त्यात तांदळा स्वरूपाचा शेंदूर लावलेला देव दिसतो. ते पाहून पुन्हा मुख्य वाटेला येऊन आम्ही सिद्धगड वाडी गावात गेलो.
गावात पोहचेपर्यत आम्हाला १२.४५ वाजले होते. अजून आम्हाला बालेकिल्ल्यावर जायचे  होते. त्यामुळे आम्ही १० मिनिटात थोड खाऊन आणि आराम करून बालेकिल्ल्याच्या दिशेने चालू लागलो.

बालेकिल्ला आणि गुहा:
बालेकिल्ला किंवा गुहेकडे जाण्यासाठी तुम्हाला गावात जाण्याची गरज नाही. गावात पोहोचायच्या थोडे अगोदर डावीकडे, पाठी एक वाट आत झाडा-झुडपातून जाताना दिसते. त्यावाटेच्या बाजूलाच डावीकडे एक लहान फलक लावला आहे. झाडामुळे तो पटकन दिसत नाही. बालेकिल्ल्याची वाट पायथ्याच्या झाडाझुडपातून वर किल्ल्यावर जाते. त्यामुळे पायथ्याला वाट चुकण्याची खूप शक्यता आहे. त्यात मुख्य कारण वाटेला मध्ये मध्ये अजून फाटे फुटतात, त्यामुळे तुम्ही चुकू शकता. त्यामुळे आम्ही गावातील एका मुलाला विचारला. त्याने आम्हाला त्या वाटेने, एका आंब्याच्या मोठ्या झाडाजवळ आणून सोडले. तिकडून त्याने आम्हाला सरळ वर चालत जायला  सांगितले.  तिकडून सुद्धा ,वाट झुडपातून शोधणं जरा अवघड होता. पण त्याने आम्हाला सांगितल्या प्रमाणे आम्ही सरळ वर चढायचे आहे. हे लक्षात ठेवून पुढे गेलो आणि आम्हाला वाट सापडली. काही ठिकाणी आम्हाला  दगडावर केलेले बाणाचे चिन्ह ही दिसले. त्यामुळे आम्ही बरोबर त्या वाटेने चढायला सुरवात केली.
एकदा तुम्ही त्या झुडपातून बाहेर आलात कि गुहेपर्यंतची वाट न चुकता पोहचतात. पण काही ठिकाणी वाट जरा जपून चढायला लागते. वीस मिनिटात आम्ही गुहे जवळ पोहचलो.

गुहेचे वर्णन:
गुहा डाव्याबाजूला लागते आणि उजव्याबाजूने वाट बालेकिल्यावर जाते. ह्या उजव्याबाजूच्या वाटेवर एक टाकी लागते. ही टाकी खालून लगेच दिसत नाही. जेव्हा वाटवर फिरते तेव्हा दिसते.

पण आम्ही पहिले डाव्याबाजूला गुहा बघायला गेलो. गुहेत जायला दगडांचा थर रचून त्यावर पायऱ्या केल्या आहेत. गुहेत ८ ते  १० माणसे झोपतील एवढी जागा आहे.  गुहेच्या डाव्या बाजूला थोडे पुढे वर गेले की कातळात खोदलेल्या अजून दोन टाकी लागतात.

बालेकिल्ल्यावर जाणाऱ्या वाटेचे वर्णन:
टाकी आणि गुहा बघून आम्ही उजवीकडे बालेकिल्ल्यावर जाणाऱ्या वाटेने चालू लागलो. 
गुहेपासून बालेकिल्ल्यापर्यंत उभा चढ लागतो. त्यामुळे माथ्यावर पोहचेपर्यंत पूर्ण घामटा निघतो. ह्या वाटेत बहुतेक ठिकाणी आपल्याला कातळात कोरलेल्या तुटलेल्या, तर काही जीर्ण झालेल्या पायऱ्या लागतात. तर काही ठिकाणी दगडावर पाय ठेवून जायला लागते. वाटेत एके ठिकाणी लहानशी बसण्यासाठी गुहा लागते, त्याच्या बाजूने, डाव्याबाजूला वर जायला पायऱ्या लागतात. 
वाटेत विशेष करून किल्ल्याच्या माथ्यावर पोहचण्याचा वरच्या भागात, वेगवेगळ्या अंतरावर दोन मोठ्या कातळात खोदलेल्या पाण्याची टाकी लागतात. पहिली टाकी तुटलेली आहे. तर दुसरी रिकामी टाकी एकदम माथ्याच्या जवळ लागते. ह्या टाकी जवळ पोहचताच आपण माथ्यावर पोहचतो.

आम्हाला गुहेपासून गडमाथ्यावर पोहचायला १ तास लागला. तर सिद्धगड वाडीतून दीड तास लागला.
माथ्यावरील वाऱ्यामुळे, आमचा  थकवा पूर्णपणे निघून गेला. माथ्यावर पोहचेपर्यंत अडीच वाजले होते. परत वेळेत गड उतरायचा होता. त्यामुळे आम्ही जास्त वेळ न दवडता बालेकिल्ला पाहून घेण्याचे ठरवले.

बालेकिल्ल्याचे वर्णन
आमचा दिवस चांगला होता. त्यामुळे आम्हाला किल्ल्यावर पाउस किंवा पावसाचे ढग दिसले नाहीत. त्यामुळे आम्हाला गडावरून संपूर्ण बाजूचा परिसर दिसत होता. एक बाजूला गोरखगड तर दुसऱ्या बाजूला भीमाशंकरचा डोंगर आणि पदरगड दिसत होता. तर पदरगडच्या मागे कोथळी गड अंधुक दिसत होता.

माथ्यावर पोहचताच  समोर आपल्याला महादेवाची पिंड आणि त्याचा समोर बसलेला नंदी दिसतो.  पिंड आणि त्याच्या बाजूला असलेले काही दगड पाहून, तिथे पहिले मंदिर असावे, असा अंदाज येतो. आपण माथ्यावर जिथे पोहचतो ते बहुतेक आपण बरोबर माथ्याच्या मध्यभागी पोहचतो. त्यामुळे आपल्या एका बाजूला वाड्याचे अवशेष लागतात तर दुसऱ्या बाजूला पाण्याची टाकी आणि टोकाला बुरुज लागतो.
त्याप्रमाणे आम्ही महादेवाचे दर्शन घेऊन, पहिले वाड्याच्या बाजूचा भाग पाहायला सुरवात केला.
वाड्याच्या दरवाजातूनच आपल्याला प्रवेश करायाला लागतो. वाड्याच्या फक्त चौथऱ्याचे अवशेष दिसतात. वाड्याच्या दरवाजाच्या खालची अर्धी चौकट शाबूत आहे, त्याच्या बाजूला पडकी भिंत आहे. दरवाजातुन आत गेल्यावर आपल्या दोन्ही बाजूला चौथरे लागतात आणि समोर थोड्याच अंतरावर अजून एक चौकोनी चौथरा लागतो हा चौथरा घराचा वाटत नाही. त्याच्या बाजूने वाट पुढे गडाच्या टोकाला जाते.

पुढे गेल्यावर डावीकडे आपल्याला लहान मंदिरासारखा चौथरा दिसतो. ह्या चौथऱ्यावर पिंडीच्या  वरच्या भागासारखा, तांदळा स्वरूपातील शेंदूर लावलेला देव सिमेंट लावून स्थापित केलेला दिसतो.
पुढे गडाचे टोक लागते. गडाच्या टोकाला, बहुतेक लहान चौकी किंवा घराचा पडक्या भिंतीचे अवशेष दिसतात. त्याच्या मागे गडाचे टोक लागते तिथे भगवा झेंडा लावलेला आहे. इथे आपल्याला बुरुज किंवा तटबंदीचे काही अवशेष दिसत नाही. ह्या टोकावरून आम्हाला बारवी धरण  जलाशय पर्यंतचा परिसर दिसत होता तर उजवीकडे गोरखगड, पाडाळे धरण जलाशय दिसत होता. डावीकडे पूर्ण सपाट प्रदेश दिसत होता बहुतेक खांडस गावापर्यंत दिसत असावे.

हा भाग पूर्ण बघून, गडाचे दुसरे टोक पाहण्यासाठी निघालो. पुन्हा त्याच वाटेने, आपल्याला महादेवाच्या पिंडीजवळ पोहचायला लागते. गडाच्या ह्या बाजूला टाकी आणि टोकाला बुरुज लागतो. बाकी ह्या बाजूला काही अवशेष नाही. पण ह्या बाजूचा माथा थोडा लांब आहे.

गडावरील टाकी
पिंडीच्या बाजूलाच ३ मोठ्या टाक्या लागतात आणि त्याच्या पुढे मोजून १०-१२ पाऊले चाललो असता, 
त्याच्या पुढे पाच टाक्यांचा समूह दिसतो. ह्या मधील पहिल्या टाकीच्या कातळाची भिंत चांगली असल्यामुळे अखंड टाकी दिसते. पण दुसरी आणि तिसरी टाकीच्या मधील कातळ भिंत अर्धी तुटल्यामुळे एक झाली आहे. तर त्याच्या वर अजून दोन टाकी दिसतात. पण  त्याचा बाजूचा कातळ तुटलेला असल्यामुळे टाकीचा खड्डा दिसतो येथे दोन टाक्या असाव्यात.

गडाच्या माथ्यावरील एकाही टाकीतील पाणी पिण्यायोग्य वाटत नव्हते.

गडावरील बुरुज: 
टाकी बघून आम्ही पुढे चालू लागलो. मी आधी सांगितल्याप्रमाणे, ह्या बाजूचे टोक थोडे लांब आहे आणि  खाली आहे. त्यामुळे बुरुज थोडा खाली असल्यामुळे, गडाच्या टोकाला गेल्याशिवाय दिसून येत नाही.
गडावर दिसणारा हा एकमात्र  बुरुज आम्हाला दिसला. बुरुजाला एका खिडकी सारखा, बहुतेक चोर दरवाजा आहे. पण ह्या दरवाजातुन खाली उतरण्यासाठी वाट नसून सरळ खोल दरी लागते. ह्या बुरुजावरून खाली दिसणाऱ्या छोट्या टेकडीवर कातळात खोदलेल्या दोन टाकी दिसतात. टाकी रिकामी होत्या. पण तिथे टाकी असण्याचे प्रयोजन मला कळाले नाही किंवा त्याकाळी ती टेकडी वापरत असावी.

साडे तीन वाजता आम्ही गड उतरायला सुरवात केली. जाताना पुन्हा आम्ही सिद्धगड वाडीत थोडे जेवून, गड उतरायला सुरवात केली. उतरते वेळी नारिवली गावात पोहचेपर्यंत आम्हाला ६.५० वाजले.  संध्याकाळी शेअर गाडीवाल्यांना जास्त प्रवासी नसल्यामुळे, बहुतेक ५.३०-६.०० नंतर ती वाहतूक बंद होते. त्यामुळे आम्हाला आता एसटीचाच पर्याय होता. त्यात आम्हला वाटले  ६. ४५ ची आमची मुरबाड एसटी चुकली. आता आम्हाला ७.४५ गाडीसाठी थांबायला लागेल. पण एसटी अजून गेली नव्हती. त्यामुळे आम्हाला ७ वाजता एसटी भेटली आणि आम्ही ८ वाजेपर्यंत मुरबाडला पोहचलो. मुरबाडला कल्याण एसटी लागलीच होती, ती सुद्धा रिकामीच भेटली. त्यामुळे आमचा परतीचा प्रवास, सकाळच्या प्रवासापेक्षा सुखकर झाला.


सिद्धगड ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  



धापडपाड्याचा अगोदर लागण्याऱ्या ओढ्यावर बनवलेल्या नवीन पूल


वाटेतील टाकी ह्या टाकीतले पाणी पियायला वापरतात.


वाटेतील दुसऱ्या टाकी जवळून दिसणारी माची वरची तटबंदी

गडाचा दरवाजा

दरवाजाचा आत गेल्यावर येथे वीरगळ दिसतात. त्याचा वरती मंदिर आहे. तिथे अजून १०/१५ वीरगळ आणि काही मूर्ती तसेच एक तुटलेली तोफ दिसते.



दगडाचे भांडे

दगडाचे गोळे

बालेकिल्ल्यावर जाताना गुहा लागते. गुहेचा डाव्याबाजूला अजून दोन टाकी लागतात. मी फोटोत पिवळ्या रंगाने वर्तुळ करून दाखवला आहे. त्यातील एका टाकीचा फोटो खाली लावला आहे.




बालेकिल्ल्यावर जाणाऱ्या वाटेत अशाप्रकारच्या तुटलेल्या पायऱ्या लागतात.




गडमाथ्याला लागूनच खाली असलेली टाकी. ह्या टाकीचा बाजूनेच वाट जाते. आणि खालील फोटोत गड माथ्यावर आलेली वाटेचा फोटो.


बाले किल्य्यावरील महादेवाची पिंड


वाड्याचे अवशेष आणि खालील फोटोत त्याचा दरवाज्याचा फोटो


दरवाजाने आत गेल्यावर काढलेला फोटो


गडाचा टोकाला भगवा झेंडा लावलेला दिसतो.




गडावर असणाऱ्या तुटलेल्या टाकीचा समुदाय

बालेकिल्ल्यावर एकमेव बुरुज गडाच्या दुसऱ्या टोकाला लागतो.

गडाचा बुरुज

बुरुजाला असलेला खिडकीचा आकाराचा दरवाजा (बहुतेक  चोरदरवाजा)



बुरुजावरून खाली दिसणाय्रा टेकडी कडे पहिला असता. टेकडीवर दोन टाक्या दिसतात


बालेकिल्ल्यावरून दिसणारा भीमाशंकरचा परिसर आणि पदरगड







दरवाजाचा समोर असलेल्या लहान पठारावरून वरती माथ्याला बुरुजाचा चोरदरवाजाची चोकट  दिसते. आणि खालील  वर्तुळात दिसणारी गुहा. येथे जाण्याची वाट कुठून आहे, ते कळले नाही आम्हाला बहुतेक आता ती नसावीच

दरवाजाचा समोरील लहान पठारावर असणारे लहान रिकामी मंदिर


 सिद्धगड ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा